Jump to content

रंगनायकम्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(१९३९−). आधुनिक तेलुगू कथालेखिका, कादंबरीकर्त्री समीक्षक. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील बोम्मिडी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. ताडपल्लीगुडम्‌ येथे मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. वीरेशलिंगम्‌ यांनी केलेल्या स्त्रीस्वातंत्र्याच्या पुरस्काराचाच त्यांनी आपल्या सर्व लेखनात पुरस्कार केला. लग्नानंतर त्या सु. १२ वर्षे विशाखापटनम्‌ येथे राहिल्या. त्यावेळी त्यांनी चलम्‌ (गुडिपाटी वेंकटाचलम्‌) व मार्क्स यांच्या ग्रंथांचे मनन केले.

रूढिभंजक बुद्धिवादाचा त्यांच्या मनावर फारच प्रभाव पडला आणि त्यांचे लेखन स्त्रीस्वातंत्र्य, मुक्त व्यवहार व निखळ बुद्धिवाद यांचे समर्थन यांसाठीच खर्ची पडले आहे. आतापर्यंत त्यांनी सु. ७० लघुकथा, १२ कादंबऱ्या व ५ टीकाग्रंथ लिहिले. त्यांनी सर्वत्र बंडखोर व क्रांतिकारी विचार व्यक्त करणारी पात्रे रंगविली आहेत.खुसखुशीत शैली व तर्कशुद्ध विचार यांमुळे त्यांचे लेखन तरुणवर्गात फारच लोकप्रिय झाले. त्यांच्या कित्येक कादंबऱ्यांच्या पाचाच्या वर आवृत्त्या निघाल्या. तेलुगूच्या फारच थोड्या लेखकांना हे भाग्य लाभले आहे. त्यांनी आपल्या सर्व लेखनातून मार्क्सच्या विचारपद्धतीचा पुरस्कार केला व त्या विचारांना चलम्‌ यांच्या शैलीत गुंफले.

रामायण विषवृक्षमु (३ भागांत−१९७३, ७४, ७५) या त्यांच्या बहुचर्चित टीकाग्रंथात त्यांनी रामायणातील आदर्शांचे वाभाडे काढले आहेत. सीतेला ‘एक दुर्बल पत्नी’ म्हणून त्यांनी निकालात काढले आहे. पातिव्रत्य, एकपत्नीव्रत, आज्ञाधारकता ही सर्व ढोंगे आहेत, असे त्यांनी आवेशाने मांडले आहे. अर्थात या ग्रंथावर उलटसुलट टीकाही भरपूर झाली


मार्क्सच्या कॅपिटल ग्रंथाचा अनुवाद करण्याचे काम त्यांनी आता हाती घेतले आहे. हॅरिएट स्टोच्या अंकल टॉम्स केबिन या कादंबरीचा त्यांनी तेलुगूत केलेला अनुवादही बराच लोकप्रिय झाला आहे.