Jump to content

अतिसार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अतिसार (Diarrhea) म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. अतिसार हा दूषित व अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे. पोटात ढवळणं, उलट्या , जुलाब ही या आजाराची लक्षणे आहेत. उलट्या, जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो. अतिसार म्हणजे अन्ननलिकेची पोट साफ करण्यासाठीची अति हालचाल. वैद्यकीय व्याख्या याहून थोडी वेगळी आहे. प्रगत देशामधील व्यक्ती दररोज सरासरी तीनवेळा शौचास जाते. वैद्यकीय व्याख्येनुसार तीनशे ग्रॅम हून अधिक शौच म्हणजे अतिसार. यातील 60-65 टक्के पाणी असते. या व्याख्येनुसार अतिसार म्हणजे शौचास अधिक वेळा जावे लागणे किंवा शौच स्वतःच्या नियंत्रणाशिवाय अधिक वेळा जाणे. अतिसार डॉकटरांच्या म्हणण्यानुसार तीव्र अतिसार एक आठवड्यांचा आणि दीर्घ म्हणजे 2-3 आठवड्यांचा. विषाणुजन्य आणि जिवाणूजन्य संसर्ग हे अतिसाराचे प्रमुख कारण आहे.

वर्णन- बहुतेक रुग्णामध्ये अतिसार हा मर्यादित उपद्रव आहे. पण जागतिक पातळीवर संसर्गजन्य अतिसाराचा गंभीर परिणाम होतो. दरवर्षी पन्नास लक्ष व्यक्ती अतिसारामुळे मरण पावतात. तिस-या जगात मरण पावणा-यामध्ये पाच वर्षाखालील मुले अधिक असतात. दीर्घ मुदतीच्या अतिसाराचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. आर्थिक आणि सामाजिक परिणाम होतात ते वेगळेच. आतड्यांचे रोग, अन्ननलिका दाह, आणि इतर लवकर बरे न होणाऱ्या आजारामध्ये अतिसारामुळे पोषणासंबंधी विकृति दिसू लागतात, मुलांची वाढ थांबते, प्रतिकार शक्ती कमी होते. अतिसाराचा सामाजिक परिणाम पाहिला म्हणजे कामाचे शेकडो तास वाया जातात.

कारणे आणि लक्षणे अतिसारामुळे मोठ्या आतड्यामधून जेवढे पाणी शोषून घेतले जाते त्याहून अधिक बाहेर पडते. दररोज जेवढ्या पाण्याची आवश्यकता आहे त्याहून अधिक पाणी मोठ्या आतड्यात शोषून घेतले जाते. ज्या वेळी मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याची यंत्रणा कोलमडून पडते त्यावेळी अतिसार होतो. अतिसार बहुधा संसर्ग किंवा अशा आजाराचा परिणाम आहे जेथे द्रवाची निर्मिती किंवा शोषण यामध्ये बिघाड होतो. मोठ्या आतड्यातील काहीं द्रव्ये उदाहरणार्थ मेद आणि पित्त आम्ले जल शोषणामध्ये अडथळा आणतात. अशा वेळी अतिसार होतो. मोठ्या आतड्यातून एखादा पदार्थ जेंव्हा नेहमीपेक्षा वेगाने जातो त्यावेळी सुद्धा अतिसाराची लक्षणे दिसतात. अतिसार संबंधी लक्षणे सामान्यपणे अन्न मार्गाच्या इजेशी जोडलेली आहेत. उदाहरणार्थ ताप, मळमळ, उलट्या, आणि पोटात दुखणे –वेदना. एका दिवसात वीस वेळा शौचास जावे लागणे अतिसाराच्या तीव्रतेवर अवलंबून आहे. काहीं रुग्णामध्ये शौचावाटे रक्त किंवा पू जातो. शौचावाटे जाणा-या रक्तामुळे शौचाचा रंग काळा होतो. शौच फ्लशच्या पाण्यावर तरंगणे म्हणजे शौचामध्ये न पचलेले अन्नद्रव्य शिल्लक आहे. अपचनामुळे बहुधा असे होते. सर्वात नेहमीचे अतिसाराचे कारण म्हणजे जंतुसंसर्ग, (याला प्रवाशांचा अतिसार म्हणतात) अन्न विषबाधा, आणि औषधे. औषधामूळे होणारा अतिसार सामान्यपणे दुर्लक्षित राहतो. प्रतिजैविके आणि आम्लता विरोधी औषधामुळे ब-याच वेळा अतिसार होतो. अनेक कर्बोदक विरहित अन्नद्रव्यामध्ये ना पचणारा भाग असतो. अशामुळे अतिसार होतो. दीर्घ मुदतीचा अतिसार आणि लघु मुदतीचा अतिसार याचे कारण (औषधे किंवा संसर्ग) एकच आहे. फक्त त्यांची लक्षणे अधिक दिवस राहतात. झालेला संसर्ग दीर्घ काळ टिकून राहतो. परजीवीमुळे झालेला संसर्ग (जिआर्डिया- आदिजीव संघातील प्राणी, आणि एडस) दीर्घकाळ राहतो.

दीर्घकालीन अतिसाराची काहीं कारणे – • एडस • मोठ्या आतड्याचा कर्करोग अन्न् नलिकेमधील अर्बुद • संप्रेरकामधील असामान्य बदल- उदाहरणार्थ थायरॉइड , मधुमेह इत्यादी • अन्न अधिहर्षता • अन्ननलिका दाह आजार (आतड्यातील व्रण- अल्सर; क्रोहान चा आजार) • दुधशर्करा सहन ना होण्याचा विकार. • अन्नशोषण विकृति ( सिलियाक आणि व्हिपल्स चा आजार ) • इतर – मद्यपान , आतड्याचा दाह, किरण चिकित्सा, शस्त्रक्रिया

अतिसारामधील गुंतागुंत अतिसारामुळे होणारा परिणाम एकंदरीत शरीरातील शुष्कता – डीहायड्रेशन, कुपोषण आणि वजनातील घट. शरीर शुष्कतेची लक्षणे ध्यानात येणे अवघड असते. अधिक तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा, डोके हलके झाल्यासारखे वाटणे, उभे राहिल्यानंतर चक्कर येणे, मूत्राचा रंग काळपट होणे, मूत्रविसर्जन कमी होणे या गोष्टी शुष्कतेचे दर्शक आहेत. शरीरामधील शुष्कता वाढल्यामुळे शरीरामध्ये रासायनिक असंतुलन निर्माण होते. असे असुंतलन जीवघेणे होण्याची शक्यता असते. अतिसारामुळे झालेल्या शुष्कतेमुळे वृक्काचे काम थांबणे, मेंदूच्या कार्यात अडथळा, संधिशोथ, आणि त्वचा विकार उद्भवतात.

निदान ‌– अतिसारच्या बहुतेक रुग्णामध्ये जोपर्यंत अतिसार तीव्र होत नाही तोपर्यंत निदान करण्याची आणि उपचाराची फारशी आवश्यकता नसते. पण अतिसार झालेल्या रुग्णास 102 पर्यंत ताप, शुष्कतेची लक्षणे , शौचामधून रक्त, पोटदुखी, आणि प्रतिजैविके घेतल्याची माहिती असल्यास त्वरित वैद्यकीय उपचाराची गरज आहे. निदान पद्धतीमध्ये परजीवी शोधण्यासाठी आणि वृद्धि मिश्रणामध्ये जंतुसंसर्गाची शौच तपासणी करावी लागते. ब-याच रुग्णामध्ये ही चाचणी नकारात्मक येते. अतिसाराचे नेमके कारण कळत नाही. अतिसार झाल्याची लक्षणे सुरू झाल्यावर त्वरित या तपासण्या केल्या तरच नेमके कशामुळे अतिसार झाला आहे याचे निदान करता येते. दोन महिन्याहून अधिक काळ प्रतिजैविके घेणा-या रुग्णामध्ये प्रतिजैविक संबंधी विषारी द्रव्ये आणि बृहहदांत्रशोथ – कोलायटिस असल्यास खात्री करून घ्यावी लागते. शौचामधून रक्त पडत असल्याचे निदान सूक्ष्मदर्शक तपासणीमधून करता येते. शौचामधून रक्त पडणे आतड्याचा तीव्र दाह होत असल्याचे लक्षण आहे. आतड्याची दुर्बीणीतून तपासणी केल्यास आतड्याचा दाह किती तीव्र आहे हे ठरवता येते. रक्त तपासण्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि रक्तपेशींचे प्रमाण मोजणे आवश्यक असते. दीर्घकालीन अतिसार याहून अगदी वेगळा असतो. बहुतेक रुग्ण एवढ्या दिवसात आपली तपासणी करवून घेतात. दीर्घकालीन अतिसाराचे प्रमुख कारण परजीवी आतड्यामध्ये असणे . काळजीपूर्वक घेतलेल्या रुग्णाच्या माहितीमध्ये आधी घेतलेली औषधे, आहारातील बदल, कौटुंबिक इतिहास, आणि इतर लक्षणांचा समावेश होतो. 4.5 किलो घटलेले वजन, शौचावाटे रक्त पडणे आणि रात्री शौचासाठी झोपल्यानंतर उठावे लागणे हे काळजी करण्यासारखी स्थिति दर्शवतात. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे, आणि केमिस्टकडे मिळणारी औषधामध्ये असलेले लॅक्टोज आणि सॉरबिटॉल सारख्या घटकांना काही व्यक्ती संवेदनशील असतात. अशा संवेदनशील व्यक्तींना अशा घटकामुळे अतिसार होऊ शकतो. अधिहर्षता किंवा त्वचेमध्ये होणारा बदल हे आणखी एक कारण. कधी कधी ताण असल्यास अतिसार होण्याची शक्यता असते. परीक्षेच्या काळात किंवा पळण्याच्या शर्यती आधी ताणामुळे शौचास सारखे जावे लागणे हे ताणाचे लक्षण आहे. शौच, रक्त आणि मूत्र तपासणी दीर्घकालीन अतिसाराच्या नेमक्या निदानासाठी करणे आवश्यक आहे. दुर्बीणीतून आतड्याची तपासणी आणि क्ष किरण चिकित्सा वारंवार केल्यानंतर योग्य ते निदान करता येते.

उपचार -

अतिसाराच्या उपचारामध्ये नेमके अतिसाराचे कारण शोधून काढण्याकडे भर असतो. प्राथमिक उपचारामध्ये शुष्कता थांबविणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण पूर्ववत करण्यावर भर असतो. कोणत्या पद्धतीने शरीरातील गेलेल्या द्रवाची भरपाई करायची हे किती द्रव शरीरातून बाहेर गेला यावर अवलंबून असते. द्रवाची भरपाई तोडाने जलसंजीवनी , फळांचा रस, देऊन करता येते. तोंडाने किंवा शिरेमधून सलाइन द्वारे द्रवाचे शरीरातील प्रमाण पूर्ववत करता येते. शक्यतो जलसंजीवनीचा वेळीच वापर केल्यास शिरेमधून द्रव द्यावे लागत नाहीत. शरीर शुष्कतेचे कोणतेही लक्षण दिसले म्हणजे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. जलसंजीवनी घेण्याची झाल्यास तयार मिश्रणे किंवा घरी बनवलेली जलसंजीवनी त्वरित घेण्यास प्रारंभ करावा. जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेले मिश्रण बनवून थोडे थोडे सतत घेत रहावे. जागतिक आरोग्य संघटनेचा फॉर्म्युला खालीलप्रमाणे- • घरगुती मीठ तीन चतुर्थांश चमचा • खाण्याचा सोडा एक चमचा • एका संत्र्याचा रस • पाणी एक लिटर दीर्घकालीन अतिसारामध्ये सुद्धा आवश्यकतेनुसार अन्न घेणे चालू ठेवावे. किती आणि कोणते अन्न घ्यावे यासाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा. आतड्यांची हालचाल थांबावी यासाठी लोपरामाइड, डायफेनोक्झायलेट दीर्घकालीन अतिसारावर उपयोगी आहेत. त्यांचा वापर शरीराचे तापमान वाढले असेल किंवा शौचामधून रक्त पडत असेल तर मर्यादित आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय त्यांचा वापर करू नये. अतिसाराच्या लक्षणानुरूप आणि कारणाप्रमाणे उपचार उपलब्ध आहेत. अतिसारावर उपचार म्हणून इसबगोल घेतात. इसबगोल बियामधून बाहेर पडणाऱ्या श्लेष्मामध्ये आतड्यातील पाणी शोषण्याचा गुणधर्म आहे. त्यामुळे शौच पातळ झाले असल्यास त्याची घनता वाढते. पित्त क्षार (बाइल सॉल्ट) तक्रारीमुळे अतिसार झाला असल्यास कोलिस्टेरामिन देण्यात येते. कमी मेद /तेले असलेले अन्न किंवा पचण्यास सुलभ तेले असलेले अन्न काहीं रुग्णाना श्रेयस्कर ठरते. काहीं आजारात नवी अतिसार प्रतिबंधक औषधामुळे आतड्यामधील अन्नामधील पाणी जाणे थांबवते. काहीं रुग्णाना लॅक्टोजसारख्या घटकामुळे अतिसार होतो. अशी लॅक्टोज असलेली औषधे वैद्यकीय सल्ल्यानुसार घ्यावीत.

पर्यायी उपचार – अतिसार कशामुळे झाला आहे हे शोधून त्यावर उपचार करण्याने शरीरातील महत्त्वाचे क्षार आणि पाणी शरीरातून बाहेर जाणे थांबते. पाण्याचे शरीरातून होणारे उत्सर्जन दीर्घकाळ चालू राहणे घातक आहे. पण त्याच वेळी शरीरात अनावश्यक असलेला घातक पदार्थ बाहेर जाणे हा घातक पदार्थ बाहेर टाकण्याचा आवश्यक मार्ग असू शकतो. अतिसार बरा करण्याचा परिणामकारक मार्ग म्हणजे आतड्यातील जिवाणूची पूर्ववत वाढ करण्यास मदत करणे. आतड्यात लॅक्टोबॅसिलस असिडोफिलस, लॅ. बायफिडस, आणि सॅकॅरोमायसिस बोउलार्डी हे तीन यीस्ट कुलातील जिवाणू आतड्याच्या सामान्य कार्यासाठी आवश्यक आहेत. प्रतिजैवेके संबंधी अतिसारामध्ये या तीन जिवाणूंची संख्या कमी झालेली असते. या जिवाणूंचा जैवौपचार पद्धतीत अतिसार नियंत्रणासाठी वापर होतो. शरीरातील निघून गेलेल्या घटकांची भरपाई करणे अतिसारामध्ये तेवढेच आवश्यक आहे. झिंक पुरेशा प्रमाणात दिल्याने शरीराची प्रतिकार यंत्रणा परत कार्यान्वित होते. शरीरातील झिंक (जस्त) कमी झाले असल्यास अतिसार दीर्घकालीन अतिसारामध्ये बदलतो. कुमारवयीन रुग्णामध्ये झिंक दिल्याने त्यांची वाढ पूर्ववत होते. भरपूर द्रवपदार्थ, दिल्याने शुष्कता येत नाही. ब्रॅट आहार दिल्याने आतड्यांची स्थिति पूर्ववत होते. ब्रॅट हे बनाना, राइस,ॲसपल आणि टोस्ट चे लघुरूप आहे. या चार पदार्थाच्या आहारावर अवलंबून असलेल्या रुग्णामध्ये विरधळणारे आणि न विरघळणारे तंतू, आतड्याचा दाह न होता आहारातून मिळतात. टोस्ट थोडा काळा किंवा अधिक ब्राउन भाजला तर जिवाणू विषे चारकोल मध्ये शोषली जाऊन शरीरातून बाहेर जातात. लहान मुलामध्ये आणि बालकामध्ये होमिओपॅथीच्या औषधाने अतिसारावर चांगला परिणाम होतो.

पूर्वानुमान- अतिसाराचे कारण पूर्वानुमानाशी संबंधित आहे. सुधारित देशामध्ये अतिसाराच्या , संसर्गजन्य अतिसाराच्या कारणाने आजारी पडणे हे सामान्य व्यक्तीस असह्य होते. औद्योगिक आणि विकसनशील देशामध्ये अतिसाराचे गंभीर परिणाम होतात. वेळीच उपचार केले नाहीत तर मृत्यू ओढवतो. दीर्घकालीन आजारामध्ये अतिसाराचे कारण शोधण्यासाठी ब-याच चाचण्या कराव्या लागतात. नेमके कारण 90% रुग्णामध्ये सापडते. इतर रुग्णामध्ये नेमके कारण सापडले नाही तर आतड्यांची हालचाल नियंत्रित करणे आणि स्थूल मानाने औषध देणे एवढेच शक्य आहे. प्रतिबंध : शुद्ध आहर, स्वच्छता , अन्न हाताळण्याच्या निरोगी सवयी यामुळे अतिसार पसरत नाही. प्रवासी अतिसार पेप्टो बिस्मॉल किंवा प्रतिजैविकामुळे आटोक्यात येतो. शुष्कता येऊ ना देणे आणि शुष्कतेच्या लक्षणावर शीघ्र उपचार करणे हे अत्यावश्यक आहे.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे असते. ओ. आर. एस. युक्त पाणी घेणे गरजेचे आहे. एक लिटर पाण्यात एक मूठ साखर आणि चिमुटभर मीठ घातल्यास ओ. आर. एस. तयार होते. अंतराने मीठ आणि साखरेचे पाणी घेतल्यास फायदा होतो. यामुळे शरीरातील पाण्याची कमी भरून निघते , तसेच अशक्तपणा ही काही प्रमाणात कमी होतो. ओ. आर. एस. या उपचार पद्धतीमुळे अनेक बालकांचे प्राण आजपर्यंत वाचले आहेत. ओ. आर. एस. मधील मिश्रणामुळे मोठ्या आतड्यात पाणी धरून ठेवले जाते.

गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्याने योग्य ती प्रतिजैविके घेणे इष्ट आहे.