पटकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पटकी (महामारी अथवा कॉलरा) हा एक संसर्गजन्य रोग आहे. व्हायब्रियो कॉलरी नावाच्या जीवाणूंच्या उपसर्गाने अन्ननलिका व आतड्यांध्ये विषजन्य प्रथिनांच्या निर्मितीमुळे कॉलराची लागण होते. कॉलराचा संसर्ग आणि प्रसार मुख्यत्वे दूषित पाणी अथवा अन्नग्रहण केल्याने होतो. पटकी (कॉलरा) आतड्याना होणारा एक तीव्र सांसर्गिक रोग. स्वत्पविराम चिन्हासारखा आकार असलेल्या व्हिब्रिओ कॉलेरी या जिवाणूमुळे पटकी हा रोग होतो. ज्या व्यक्तीना पटकीची लागण झाली आहे त्यांची विष्ठा पाण्यात किंवा अन्नात संदूषित झाल्यामुळे कॉल-याचा फैलाव होतो. कॉलरा या शब्दाचे मूळ भारतीय असावे. ग्रीक भाषेमध्ये कॉलरा या शब्दाचा अर्थ ‘पित्त’असा होतो. भारतातून उगम पावलेला हा रोग आता सर्व जगभर पसरलेला आहे. गंगा नदीच्या खो-यात कॉल-याचा इतिहास शेकडो वर्षे आहे. व्यापारी मार्गाने जमिनीवरून जलमार्गाने कॉलरा 1817च्या सुमारास रशियात व रशियामधून युरोपमार्गे उत्तर अमेरिकेमध्ये पसरला. गेल्या दोनशे वर्षामध्ये सातवेळा कॉल-याची साथ आली आहे. 1961 मधील इंडोनेशियातील साथ सातवी होती. अन्ननलिकेमधील ‘व्हिब्रिओ कॉलेरी’ या जिवाणू संसर्गा मुळे होणाऱ्या तीव्र अतिसार मराठीमध्ये पटकी या नावाने ओळखला जातो. रोगाच्या लक्षणामध्ये तीव्र पाण्यासारखे जुलाब आणि उलट्यांचा समावेश होतो. पटकीची लागण दूषित पाणी आणि अन्नामधून होते. उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाणी आणि विद्युत अपघटने (क्षार) यांची कमतरता ओढवून निर्जलीकरण होते. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्वरित उपचार न झाल्यास मृत्यू ओढवतो. प्राथमिक उपचारामध्ये तोंडावाटे क्षार आणि पाणी देणे आणि ते शक्य न झाल्यास सलाइनवाटे शरीरातील पाण्याचे आणि क्षारांचे प्रमाण पूर्ववत करावे लागते. 2010 मध्ये जगभरात सु साठ लक्ष व्यक्तीना पटकीची लागण झाली होती.त्यातील एक लाख तीस हजार व्यक्ती मरण पावल्या.

पटकीच्या जिवाणूंचा शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर एक ते पाच दिवसामध्ये भाताच्या पेजेसारखे जुलाब होतात. उपचार केले नाहीत तर एका दिवसमध्ये दहा ते वीस लिटर पाणी जुलाब आणि उलट्यावाटे शरीरातून बाहेर पडते. जुलाबास माशासारखा वास येतो. फक्त तीन टक्के व्यक्तीमध्ये पटकीची लक्षणे दृश्य स्वरूपात दिसतात. इतर व्यक्ती पटकीच्या वाहक असतात. वेळीच उपचार चालू केले नाहीत तर झपाट्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी होण्याच्या प्रकारास वैद्यकीय भाषेमध्ये जलशुष्कता (डीहायड्रेशन) असे म्हणतात. जलशुष्कतेमुळे रक्तदाब कमी होतो, नाडी वेगाने चालते, व्यक्तीचे डोळे खोल जातात आणि त्वचेवर सुरकुत्या पडतात.

पटकीचे जिवाणू निसर्गत: पाण्याच्या साठ्यात असतात. निरोगी व्यक्तीमध्ये शंभर दशलक्ष जिवाणू अन्ननलिकेत गेल्यास पटकीची लक्षणे दिसतात. ‘ओ’ रक्तगटाच्या व्यक्तीमध्ये पटकीचा धोका अधिक असतो. काहीं कारणाने जठराची आम्लता कमी झाल्यास पटकीच्या संसर्गाचा धोका वाढतो. चार ते पाच वर्षाच्या मुलामध्ये पटकीच्या संसर्गाची शक्यता अधिक असते. पटकीचे जिवाणू जठरामध्ये असलेल्या आम्लामुळे नष्ट होतात. पण काहीं शिल्लक राहिलेले जिवाणू लहान आतड्यामध्ये पोहोचल्यानंतर लहान आतड्याच्या अंत:त्वचेतील पेशीमध्ये प्रवेश करतात. तेथे शरीरातील लवक प्रथिन तयार करण्याचे थांबवून शरीरामधून जीवविष प्रथिनाच्या स्वरूपात बाहेर टाकतात. या जीवविषामुळे H2O, Na+, K+, Cl−, HCO3− आयने लहान आतड्याच्या पोकळीमध्ये साठतात. याबरोबर आतड्याच्या अंत:त्वचेच्या पेशींचा नाश होतो आणि जुलाब चालू होतात.

पाण्याच्या साठ्यामध्ये मलमूत्र येणार नाही याची काळजी घेतल्यास पटकीचा प्रादुर्भाव होत नाही. निसर्गत: सागरी कवचधारी प्राण्यांच्या शरीरावर व्हिब्रिओ कॉलेरी जिवाणू आढळतात. त्यामुळे सागरी खेकडे, तिस-या आणि खुबे यांच्याबरोबर पटकी जिवाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी ते स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावेत. पिण्याच्या आणि वापराच्या पाण्यावरील क्लोरिनीकरणामुळे पटकी जिवाणू नष्ट होतात. त्याचप्रमाणे विषाणू आणि जिवाणू प्रतिबंधक अतिनील किरण उपचार, आधुनिक फिल्टर सारख्या उपायामुळे पटकी जिवाणूंचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.. सार्वजनिक आरोग्य खाते यासाठी अधूनमधून पाण्याच्या साठ्याची पाहणी करते. पटकी झाल्यानंतर जलसंजीवनी, शिरेतून सलाइन आणि नॉरर्फ्लॅक्सोसिन, इरिथ्रोमायसिन,क्लोर्रेंफिनेकॉल टेट्रासायक्लिन सारखी प्रतिजैविके वेळीच दिल्यास रुग्ण वाचतो. आता पटकीची लस साथीचा आजार नसल्यास द्यावी लागत नाही


या रोगात जिवाणू आतड्याला सूज आणतात त्यामुळे आतड्यातील पेशींकडून अनियंत्रितपणे पाणी सोडले जाते व खूप जुलाब होतात. यामुळे शरीरातील पाणी कमी होते. शरीरातील पाणी खूप कमी झाले तर गुंतागुंत होते. होतात व १ आठवड्यात रुग्ण मरू शकतो. कॉलरा झाल्यानंतर रुग्णाला प्रथमतः उकळलेले पाणी दिले पाहिजे. रुग्णाची त्वचा चिमटीत घेऊन सोडावी. जर ती परत पूर्ववत होत असेल तर शरीरातील पाण्याचा स्तर योग्य आहे असे समजावे. अन्यथा अजून पाणी द्यावे. रुग्णाला उलट्यासुद्धा होऊ शकतात. अशा वेळी त्यास डॉक्टरांकडे घेऊन जावे व सलाईन[मराठी शब्द सुचवा]द्वारे पाणी द्यावे.