Jump to content

वेदकुमार वेदालंकार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. वेदकुमार वेदालंकार (इ.स. १९३२ - ) हे मराठी साहित्याचा हिंदीमध्ये अनुवाद करणारे साहित्यिक आहेत.

डॉ. वेदालंकार यांनी हिंदीत अनुवाद केलेल्या मराठीतल्या छावा या कादंबरीच्या १७वर आवृत्त्या निघाल्या आहेत. त्यांच्या लेखनाद्वारे संत तुकाराम, संत एकनाथपु.ल. देशपांडे यांचे साहित्य हिंदीत लोकप्रिय झाले आहे.

डॉ. वेदालंकार मूळचे लातूरचे असून त्यांचे मूळ नांव वेदकुमार रघुत्तमदास डुमणे आहे. मुलाने वेदवाङ्मयामध्ये पंडित व्हावे, या वडिलांच्या इच्छेखातर ते वयाच्या सहाव्या वर्षी वेदांचे शिक्षण घेण्यासाठी हरियाणात गेले. १९५४मध्ये हरिद्वार येथील कांगडी गुरुकुलाने त्यांना वेदालंकार ही पदवी बहाल केली. हिंदीचे पदव्युत्तर शिक्षण आग्रा विद्यापीठातून, तर त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून संस्कृतमधून एम.ए. केले. त्यांनी मूळ आडनाव त्यागून वेदालंकार ही पदवी त्यांनी स्वीकारली. मराठी भाषा पुन्हा शिकून तसेच. हिंदी व संस्कृत या विषयांत पारंगत होऊन डॉ. वेदालंकार यांनी ३६ वर्षे प्राध्यापक व प्राचार्य म्हणून उस्मानाबादतुळजापूर येथील महाविद्यालयांमध्ये नोकरी केली. ते उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य होते.

वेदालंकार ही पदवी असणारे वेदालंकार यांच्यावर आर्य समाजाच्या विचारांचा पगडा. जात न मानण्याच्या या चळवळीत त्यांनी मोठे काम केले. मितभाषी आणि सतत वाचन, लेखनात रमणाऱ्या या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर अनुवादाच्या कामाने अक्षरशः पछाडले. निवृत्तीनंतर त्यांनी मराठी साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध व्हावे यासाठी अनुवादाचे काम सुरू केले. शिवाजी सावंत हे प्रा. वेदालंकारांचे मित्र होते. त्यांनी लिहिलेल्या छावाच्या हिंदी अनुवाद हा वेदालंकारांचा पहिला अनुवाद होता.

वेदालंकार यांनी मराठीतील तीसहून अधिक ग्रंथ हिंदीत अनुवाद करून प्रसिद्ध केले आहेत. छावा, रणजित देसाई यांची श्रीमान योगी, रा.रं. बोराडे यांच्या पाचोळा (हिंदीत तिनका) यांसह पु.ल. देशपांडे यांच्या काही निवडक कथा, संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा, शासनाच्या महात्मा जोतिबा फुले समग्र वाङमयाचे चार खंड (गुलामी, किसान का कोडा, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीयरत्‍न आणि इतर रचना) अशा पुस्तकांचा हिंदी अनुवाद करून डॉ. वेदालंकार यांनी मराठी वाङमयाचा अमूल्य ठेवा हिंदी भाषिकांसाठी खुला केला आहे.

तुकारामांच्या ४ हजार ६०७ अभंगाचे अनुवादित निरूपण, तसेच संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर, संगीत शारदा आणि कट्यार काळजात घुसली ही चार नाटके, एकनाथ महाराजांचे भारूड, बहिणाबाई चौधरी यांच्या २३० गीतांचा हिंदी पद्यानुवाद या साहित्याच्या हिंदी अनुवादाचे काम डॉ. वेदालंकारांच्या हातून घडले आहे. मराठी संत गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखा मेळा, सोयराबाई, बंका, कर्ममेळा, निर्मला, कान्होपात्रा या नऊ संत कवींच्या एकूण ६०० अभंगांचा देखील त्यांनी हिंदीमध्ये पद्यानुवाद केला आहे.

रायगडाची माहिती देणारी पुस्तिका आणि संत गाडगेबाबा यांच्यावरील अनुवादाचे काम पुरे होत आले आहे. संत एकनाथांचे साहित्य भाषांतरित करण्यासाठी त्यांनी हाती घेतले आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या तीन कादंबऱ्या (फकिरा, वारणेचा वाघ आणि वारणेच्या खोऱ्यात) आणि वीस कथांचा वेदालंकार यांनी केलेला अनुवाद प्रकाशित करण्यासाठी कोणीही पुढाकार न घेतल्याने ही पुस्तके प्रसिद्ध होऊ शकली नाहीत. (२०१६ची बातमी).

संगीत नाटकांतील पद्यांचाही त्यांनी शक्यतोवर मूळ चाल तशीच ठेवूनच अनुवाद केला आहे. गरज पडली तिथे वेदालंकारांनी व्रज भाषेचा आधार घेतला आहे.

पुरस्कार

[संपादन]
  • अनुवाद व आंतरभारती कार्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा श्रीपाद जोशी पुरस्कार. (२०१६)
  • महाराष्ट्र राज्य शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीतर्फे गजानन माधव मुक्तिबोध हा पुरस्कार
  • ‘तीन संगीत नाटकं’ या अनुवादित पुस्तकास महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीनचा पुरस्कार (२०१७)

वेदकुमार वेदालंकार यांची अन्य पुस्तके

[संपादन]
  • माझा भारत (अनुवादित, मूळ इंग्रजी माय इंडिया-लेखक जिम कॉर्बेट)
  • म्हणे गोरा कुंभार
  • संस्कृत सुभाषित सागर