ग्रिप्स नाट्य चळवळ
ग्रिप्स नाट्य चळवळ ही बर्लिनच्या ग्रिप्स थिएटर येथील नाट्यचळवळ आहे.. या नाट्यगृहात १९६० सालापासून खास मुलांसाठी आणि तरुणांसाठी लिहिलेली नाटके व्हायला लागली. फोकर लुडविग यांनी त्याची सुरुवात केली. ही नाट्य चळवळ जगभर पसरली आणि २०१६ साली ४० भाषांमध्ये आणि ५० देशांमध्ये लाखो मुले आणि तरुण ही नाटके पाहत होती.
ग्रिप्स चळवळीतील नाटके इतर बालनाटकांप्रमाणे परीकथांवर आधारलेली नसतात, तर खेळाच्या मैदानांची कमतरता, पर्यावरण, अभ्यासातल्या अडचणी आदी मुलांना भेडसावणाऱ्या विषयांवर लिहिलेली असतात. नाटकांतील कलाकार वयाने मोठे असले तरी ते मुले असल्यासारखे वागतात.
मनोरंजनाच्या माध्यमातून मुलांचे विविध प्रश्न हाताळणे हे ग्रिप्सच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. हे करीत असताना मुलांच्या दृष्टिकोनातूनच या प्रश्नांकडे पाहिले जाते. सध्याच्या दैनंदिन जीवनात मुलांच्या अनेक प्रश्नांवर या नाटकांच्या माध्यमातून परिणामकारक चर्चा करीत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यातील सुसंवादाला चांगली सुरुवात करून दिली आहे. राक्षस, जादूटोणा, परी आणि भुतेखेते या विषयांत गुरफटलेल्या बालनाट्यांना एक सकस जीवनदर्शी पर्याय देणे हा या चळवळीचा मानस आहे.
भारतामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात ग्रिप्स चळवळ आली. डॉ. मोहन आगाशे यांनी १९८६ च्या सुमारास पुण्याच्या मॅक्समुल्लर भवनाच्या साहाय्याने मुलांसाठी आणि तरुणांसाठी नाटके बसवायला आणि सादर करायला सुरुवात केली. पुण्यातून ही चळवळ कोलकाताला गेली आणि पुढे भारतातील अनेक शहरांत आणि पाकिस्तानातही पोचली. पुण्यात महाराष्ट्र कल्चरल सेंटर, कोलकाता येथील सुत्रपत, बंगळूर येथील साकेत, मुंबई येथील आलाप आणि दिल्ली येथील थिएटर फोरम या संस्थांतर्फे ग्रिप्सच्या नाटकांचे प्रयोग सादर होत आहेत.
प्रत्येक नाट्य मोसमात (मे आणि दिवाळीच्या सुट्टीत) तरुणांनी लिहिलेली आणि बसवलेली नाटके रंगमंचावर सादर होतात. ग्रिप्स संस्था नाट्यशिक्षणाचे वर्गसुद्धा चालवते. शाळांशाळांतून हे प्रशिक्षण दिले जाते; चांगल्या नाटकांना बक्षिसे दिली जातात.
ग्रिप्स चळवळीतील नाटके मुलांच्या अडचणींवर मात करण्याची दिशा दाखविणारी असतात आणि नाटकांचा शेवट नेहमी आशावादी असतो. पुण्यातले श्रीरंग गोडबोले आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर सध्या (२०१६साली) बालनाट्यमहोत्सवाची ही चळवळ चालवत आहेत.
महाराष्ट्रातले अमृता सुभाष, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, गौरी लागू, परेश मोकाशी, रसिका जोशी आणि विभावरी देशपांडे यांच्यासारखे कलावंत या चळवळीने घडविले
ग्रिप्स चळवळीतील काही मराठी नाटके
[संपादन]- अतिथी देवो भव (मूळ जर्मन - डेर गेस्ट इस्ट गॉट)
- एकदा काय झालं?
- गोष्ट सिंपल पिल्लाची
- छान छोटे वाईट मोठे (मूळ जर्मन लेखक - Volker Ludwig )
- Du and Me
- तू दोस्त माझा
- नको रे बाबा
- पण आम्हांला खेळायचंय
- प्रोजेक्ट अदिती