कारंजा लाड
?लाड कारंजे महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ४०० मी |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
लोकसंख्या | ५०,१५८ (इ.स. 2001) |
नगरपरिषद | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 444105 • MH37 |
कारंजा लाड ( अक्षांश २०° २९′ उत्तर; रेखांश ७७° २९′ पूर्व) हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले एक शहर आहे. या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. करंज ऋषींवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर, आणि नंतर कारंजा झाले. या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने 'कारंजा लाड' असा या गावाचा उल्लेख केला जातो.[१]
कारंजा गावाजवळ अडाण नदीवर बांधलेले धरण आहे. मात्र त्याचा अधिक उपयोग यवतमाळ जिल्ह्याला होतो. तसेच या कारंजा नगरीत जैन समाज मोठया प्रमाणात आहे.[ संदर्भ हवा ]
इतिहास
[संपादन]वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. या साम्राज्यांत उभारलेल्या दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरुळपीर वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत.
अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण म्हणून दिले होते असे म्हणतात. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही होतो. आतापर्यंत किल्ला म्हणून ओळखली जाणारी एक गढी आत्ता आत्तापर्यंत अस्तित्वात होती. तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. त्याचा दरवर्षी उरूस निघतो. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा असे म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली आहे. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला आहे. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर करणाऱ्या व त्या मोबदल्यात अकबरकालीन नाणी देणाऱ्या लेकुर संघई यांची ही कथा पिढ्यान्पिढ्या सांगितली जाते. या संघईची एकोणिसावी पिढी आज कारंज्यात आहे. मात्र या हवेलीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. अशा प्राचीन हवेल्यातील भिंतीतून जाणारे जिने, तळघरे, बाराद्वारी नावाची विहीर आणि त्यातील भुयारी वाटा मात्र अजून शिल्लक आहेत. कारंजा गाव हे पूर्वी धनाढ्य होते. या गावात शिवाजी महाराजांचे वास्तव होते. असे जुने इतिहास सांगतो.
हे शहर इ.स.च्या १४व्या शतकातील हिंदू गुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.[ संदर्भ हवा ]
श्री. नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान
[संपादन]शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हे नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असल्याचे वासुदेवानंद सरस्वतींनी शोधून काढले आहे. येथील काळे आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणी आहेत.[ संदर्भ हवा ]
नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारे साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्यांचे मुनीम असलेल्या घुडे नावाच्या गृहस्थांना विकल्या गेली आहे. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चनेची शाश्वत व्यवस्थाही केली आहे.[ संदर्भ हवा ]
संकीर्ण माहिती
[संपादन]या स्थानाचे प्राचीन माहात्म्य दाखविणारी 'श्रीकरंजमाहात्म्य' नावाची संस्कृत पोथी उपलब्ध आहे. त्या पोथीनुसार या स्थानाचे नाव वसिष्ठ ऋषींचे शिष्य असलेल्या करंज नामक ऋषींशी निगडित आहे. कारंजा येथे हस्तलिखित जैन ग्रंथांचे मोठे भांडार आहे.
कारंजा लाड गावातील जैन मंदिरे
[संपादन]- चंद्रनाथ स्वामी काष्ठसंघ दिगंबर जैन मंदिर (पद्मावती देवीचे मंदिर),
- मूलसंघ चंद्रनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिर आणि,
- दिगंबर जैन पार्श्वनाथ स्वामी सेनगण मंदिर.
कारंजा गावातले जैनांचे आश्रम
[संपादन]- संमतभद्र महाराज यांनी १९१८मध्ये स्थापन केलेला महावीर ब्रह्मचर्याश्रम
- संमतभद्र महाराजांच्याच प्रेरणेने समाजातील विधवा वा निराधार महिलांच्या शिक्षणासाठी १९३४मध्ये स्थापन झालेला कंकूबाई श्राविकाश्रम
इतर संस्था व इमारती
[संपादन]- कंकूबाई कन्या शाळा.
- श्वेतांबर जैन मंदिर व जैन स्थानकवासीयांचे साधनास्थळ.
- रामदास स्वामींच्या शिष्यांचे दोन मठ - रोकडाराम म्हणून ओळखला जाणारा बाळकरामांचा मठ आणि दुसरा प्रल्हाद महाराजांचा मठ.
- प्राचीन सिद्धेश्वर मंदिर आणि शिवाय नम:मठ.
- ब्राह्मण सभेची वास्तू.
- काण्णव नावाच्या व्यापाऱ्याने इ.स. १९०३ साली परदेशी वास्तुविशारदच्या देखरेखेखाली बांधलेला बंगला. या बंगल्याची रचना श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या बंगल्यासारखीच असल्याचे सांगितले जाते.
- तुकाराम भगवान काण्णव यांनी १८७६ मध्ये बांधलेले श्रीराम मंदिर.
- नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा आणि तेथले नृसिंह सरस्वतींचे पादुका-मंदिर.
- यांशिवाय, बालाजी मंदिर, प्राचीन खोलेश्र्वर महादेव मंदिर, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, हरिहर मंदिर, बाराभाऊ राम मंदिर वगैरे.
- ग्रीन्झा माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा ही कारंजा शहरातली प्रथम माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहे.
कारंजा गावाच्या आसपासच्या गावातली मंदिरे
[संपादन]- सोमठाणा या गावी असलेले शंकराचे हेमाडपंथी मंदिर
- भांबचे देवी मंदिर
- धामणीखडीचे नृसिंह मंदिर वगैरे
कापसाचा व्यापार
[संपादन]१८८६ मध्ये गावात कारंजा बाजार समितीची स्थापना झाली. त्या समितीकडून नुसार विदर्भातील कापसाचा व्यापार सर्वप्रथम नियंत्रित केला गेला. त्यामुळे कापूस व धान्य बाजार यांच्या व्यापाराला वेग आला. १९०४ मध्ये मूर्तिजापूर-कारंजा-यवतमाळ ही नॅरोगेज रेल्वे -शकुंतला रेल्वे- सुरू झाली आणि कापसाची व्यापारपेठ विस्तारली. मुंबईच्या मुलजी जेठा, डोसा, रामजी काण्णव सिकची, गोविंददास गोवर्धनदास, गोएंका अशा पेढ्या, अकबर ऑइल मिल, अकबानी ऑइल मिल, अशा तेलगिरण्या व लक्ष्मी जिनिंग मिल अशा जिनिंग फॅक्टऱ्या, कारंज्यात सुरू झाल्या. कापसाच्या गाठींची परदेशी निर्यात व्हायला लागली.[ संदर्भ हवा ]
कारंज्याचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातला हिस्सा
[संपादन]- स्वराज्याच्या मोहिमेच्या दरम्यान विदर्भाच्या दौऱ्यावर आलेले लोकमान्य टिळक ९ जानेवारी १९१७ला कारंजाला आले.
कारंजा रेल्वेस्थानकालगतच्या मैदानात झालेल्या त्यांच्या भव्य जाहीर सभेने भारावलेल्या तरुणांनी जंगल सत्यायग्रहात भाग घेतला. त्यात बंकटलाल किसनलाल बंग यांना कारावास भोगावा लागला.
- १७ नोव्हेंबर १९३३ मध्ये गांधींजी आणि १९३७ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर कारंज्यात आले होते. १९४२ च्या ‘चले जाव’ चळवळीत जे.डी. चवरे विद्यामंदिरचे शिक्षक देवराव पासोबा काळे यांनी चौकात इंग्रज सरकारविरुद्ध भाषणे दिली. त्यामुळे त्यांना १३ महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला.
- त्याच शाळेचे विद्यार्थी अवधूत शिंदे व उत्तमराव डहाके यांनीही तुरुंगवास भोगावा लागल्याचे शाळेने नमूद केले आहे.
- या चळवळीतील २० स्वातंत्र्यसैनिकांची नावे असलेला दगडी खांब स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त जयस्तंभ चौकात लावण्यात आला होता. आता तो जेसिज गार्डनमध्ये हलवण्यात आला आहे.[ संदर्भ हवा ]
कारखाने आणि इतर उद्योगधंदे
[संपादन]चवरे कुटुंबीयांची स्वयंचलित सूतगिरणी, बाबासाहेब धाबेकर यांनी स्थापन केलेली कापूस पणन महासंघ कर्मचारी सूतगिरणी, रुईवालेंचा अॅल्युमिनियमची भांडी करण्याचा कारखाना, प्रमोद चवरे आणि बागवान यांचा हॅन्डमेड कागदाचा कारखाना. धनजचा एल.पी.जी. बॉटलिंग प्लॅट, दिलीप भोजराज यांचा पी.व्ही.सी. पाईपचा कारखाना वगैरे.
सांस्कृतिक कार्यक्रम
[संपादन]- नानासाहेब दहीहांडेकर, गजानन देशपांडे, सखारामपंत साधू, बाबासाहेब दातार, वामनराव मोकासदार यांनी पुढाकार घेऊन १९५६ मध्ये बालकिसन मुंदडा, मोहनलाल गोलेच्छा, डॉ. शरद असोलकर यांच्या सहकार्याने सुरू केलेली शरद व्याख्यानमाला, कारंजा लाड. अमरावतीचे बाबासाहेब खापर्डे यांनी पहिले व्याख्यानपुष्प गुंफले. गेली त्रेपन्न वर्षे ही व्याख्यानमाला सुरू आहे. कार्यकर्त्यांची तिसरी पिढी सध्या कार्यरत आहे.
- शांता दहीहांडेकर, गजानन देशपांडे, पवार गुरुजी यांनी कलोपासक मंडळाची स्थापना करून ख्यातनाम गायकांच्या मैफिली आयोजित केल्या.
- शिवाजी उत्सव स्मारक समितीतर्फे १९६८ मध्ये श्रीरंग खाडे, केशवराव पाटील, भाऊसाहेब राऊत गुरुजी यांनी शिवजयंती व्याख्यानमाला सुरू केली.
- १९८३ मध्ये दिनकर तुरकाने, वासे, खंडारे, ठाकरे, वासनिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला सुरू केली.
- १९८४ पासून भगवान महावीर व्याख्यानमाला सुरू करण्यात आली होती. देवचंद अगरचंद जोहरापूरकर, प्रफुल्ल जुननकर, चवरे कुटुंबीय आदींनी ती व्याख्यानमाला चालवली होती.
- १९५५-५६ मध्ये कारंजातील नाट्यप्रेमांनी कलामंदिर नाट्यसंस्थेतर्फे रंगमंचावर काही नाटके सादर केली. वसंतराव घुडे, डॉ. बाबासाहेब संपट, मु. ना. कुळकर्णी, पवार मास्तर, मनोहर देशपांडे, बायस्कर, परळीकर गुरुजी, अनंतराव चावजी, जोशी, प्रभा घुडे आदींनी ती नाटके सादर केली होती. विशेष म्हणजे कि.न. महाविद्यालयाच्या इमारतीसाठी सहा हजार रुपयांचा निधीही या नाटकांनी मिळवून दिला.
- सन १९०३ साली गवळीपुरा येथे 'गवळीपुरा आखाडा' या नावाने व्यायामशाळेचे उदघाट्न खैरु उस्ताद शेकूवाले (प्रथम) यांच्या हस्ते करण्यात आले. नंतर सन २००१ मध्ये व्यायामशाळेचे नाव 'शहीद अ. हमीद व्यायामशाळा' असे ठेवण्यात आले आहे.
- बजरंगपेठ नाट्यमंडळाचे फकीरआप्पा राऊत, शंकरआप्पा पिंपळे, श्यामराव पाठे, ज्ञानेश्वरआप्पा पिंपळे, हिरालाल गुप्ता, हनुमानप्रसाद गुप्ता, बन्सीलाल कनोजे यांनी या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
- आज कारंजामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेची शाखा आहे.
- विदर्भ साहित्य संघाच्या कारंजा शाखेने १९९२ मध्ये आयोजित केलेल्या ४५ व्या विदर्भ साहित्य संमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता.[ संदर्भ हवा ]
कारंजा लाड मधील शाळा आणि महाविद्यालये आणि त्यांचे स्थापनावर्ष
[संपादन]- आदर्श शिक्षण संस्थेचे शिक्षणशास्त्रातील पदविका आणि पदवी महाविद्यालय
- कंकूबाई कन्या शाळा (१९४४)
- कन्हैयालाल रामचंद्र इन्नानी महाविद्यालय
- कि.न. कला-वाणिज्य महाविद्यालय (किसनराम नथमल गोएंका)
- जे.डी. चवरे विद्यामंदिर (१९२९)
- जे.सी. हायस्कूल (१९२९)
- बालाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय
- म.ब्र. आश्रम हायस्कूल (१९६५)
- मुलजी जेठा हायस्कूल (१९५०)
- रामप्यारी लाहोटी कन्या शाळा (१९३७)
- विद्याभारती विज्ञान महाविद्यालय
- विवेकानंद हिंदी शाळा (१९३५)
- विश्व भारती (१९८७)
- वैद्यकीय, अभियांत्रिकी, पदविका व विविध विषयांचे शिक्षण देणाऱ्या संस्था
- श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालय (१९९८)
- सावळकरांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था
उत्सव
[संपादन]करंज नगरीत इ.स. १३७८ मध्ये श्री दत्तात्रयाचा दुसरा अवतार समजला जाणाऱ्या नृसिंह सरस्वती स्वामींचा जेथे जन्म झाला, त्या वासुदेवानंद सरस्वती यांनी शोधून काढलेल्या जन्मस्थानी नृसिंह सरस्वतींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. १ एप्रिल १९३४ मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. गुरूमंदिर या नावाने ते आज प्रसिद्ध आहे.
स्वामींच्या अवतार तिथीपासून म्हणजे पौष शुद्ध द्वितीयेपासून तो माघ वद्य प्रतिपदेपर्यंत ४५ दिवस उत्सव साजरा केला जातो. तसेच कारंजा नगरीत जैन समाज महावीर जयंती मोठया प्रमाणात साजरी करतात. यासाठी गावातून भगवान महावीरांची पालखी काढली जाते.[ संदर्भ हवा ]
कारंजा शहरात गणपती उत्सव आणि नवरात्रौत्सव खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. नवरात्रामध्ये विविध मंडळ आकर्षक सजावट करतात. त्यामुळे शहरातीलाच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील सुद्धा लोक बघण्यासाठी गर्दी करतात.
तसेच कारंजाला शिवाजी महाराज निगडित इतिहास असल्यामुळे इथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होते.
चित्रदालन
[संपादन]-
पोहा वेस
संदर्भ
[संपादन]- ^ कोलते, वि. भि. (१९९६). प्राचीन विदर्भ व आजचे नागपूर. अमरावती: अमरावती विद्यापीठ. pp. १०२.