शकुंतला रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


२५ डिसेंबर १९०३ रोजी सुरू झालेली शकुंतला रेल्वे ही अनेक वर्ष वऱ्हाडवासीयांची जीवनरेखा होती. विदर्भातील मूर्तिजापूर ते यवतमाळ या मार्गावर, क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनी या खासगी कंपनीने या मीटरगेज रेल्वेलाईनची उभारणी केली होती. वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वेलाईनची इंग्रजांनी उभारणी केली होती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी या शकुंतलेने लवकरच वऱ्हाडवासीयांना आपलेसे केले. अतिशय कमी तिकिटामुळे खेड्यापाड्यातील नागरिकांची ती पहिली पसंती होती. त्या मार्गावर किनखेड, जिल्हेगाव, भाडशिवणी, पोही, कारंजेटाऊन (कारंजा लाड), दादगाव, सोमठाणा, सांगवी, वरुडखेड, भांडेगाव, दारव्हा, बोरी, लाडखेड, लिंगा, लासीना अशी १५ स्टेशने होती. ज्या विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छोट्या-मोठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारी अशी ही ‘शकुंतला रेल्वे’ होती.

क्लिक-निक्सन ॲन्ड कंपनीने (पुढे तिचे नाव सेंट्रल प्रॉव्हिन्सेस रेल्वे कंपनी (CPRC) असे झाले होते ) या रेल्वे मार्गाचे काम जेव्हा सुरू केले, तेव्हा पुढील १०० वर्षे ही रेल्वे कंपनीच्या मालकीची राहील, असा करार तत्कालीन ब्रिटिश सरकारबरोबर केला गेला होता. त्यामुळे इ.स. २००३ पर्यंत या रेल्वेलाईनची मालकी त्या कंपनीकडेच होती. शकुंतला ज्यावरून धावते ते रूळ ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे, त्यामुळे भारतीय रेल्वेलाच या विदेशी कंपनीला काही रक्कम द्यावी लागे.[१] स्वातंत्रप्राप्तीनंतरही भारतीय रेल्वे सुरुवातीला त्या कंपनीला दरवर्षी रॉयल्टीची एक कोटी रुपयांची रक्कम देत असे. मात्र गाडी चालवताना उत्पन्न नावापुरतेच आणि देखभालीचे खर्च जास्त होते. मध्य रेल्वेने संबधित कंपनीला प्रत्यक्ष रक्कम न देता ती रक्कम देखभालीसाठी खर्च करणे सुरू केले होते.

या रेल्वेने, यवतमाळ-मूर्तिजापूर या ११४[२] किलोमीटरच्या प्रवासासाठी अगदी कालपर्य़ंतचे ११ रुपये भाडे होते. आजचे भाडे केवळ १९ रुपये आहे. याच अंतरासाठी एसटी १०५ रुपये घेते.

अत्यंत कमी भाड्यामुळे ही गरिबांना परवडणारी असली तरी हिचा वेग कायम थट्टेचा विषय राहिला आहे. यवतमाळपर्यंतचे अंतर कापायला शकुंतला सहा ते सात तास घेते. चालत्या गाडीतून उतरून बाजूच्या शेतातला हरबरा उपटून पुन्हा गाडी पकडता येत असे, असे जुने प्रवासी सांगतात. त्यामुळे शकुंतला धावत नाही तर रांगते, असे लोक गमतीने म्हणत. या एवढ्या वर्षांत या शकुंतलेत काही बदल झाले नाहीत. पूर्वी तीन डबे होते, पुढे ती संख्या पाचवर गेली. १९९४ पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर चालत असे. (ते इंजिन आता पुणे रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळते.) १५ एप्रिल १९९४ पासून गाडीला डिझेल इंजिन लागले. मात्र, तिच्या वेगात काहीही बदल झालेला नाही.

आर्थिक दृष्ट्या परवडत नाही या सबबीखाली, ही शकुंतला रेल्वे बंद करण्याचा भारतीय रेल्वेचा आटोकाट प्रयत्‍न चालू आहे. त्याची सुरुवात म्हणून ही गाडी आता यवतमाळ ते मूर्तिजापूर या दरम्यान कुठलेही स्टेशन न घेता धावते. असाच प्रकार मूर्तिजापूर-अचलपूर रेल्वेमार्गाबाबत झाला आहे. त्याही मार्गावरच्या लाखपुरी, भुजवाडा, बनोसा (दर्यापूर), लेहगाव, कोकर्डा, नवबाग, अंजनगाव सुर्जी, पथरोट या स्टेशनवर ती गाडी थांबत नाही, आणि कहर म्हणजे त्या स्टेशनांवरील बहुतेक कर्मचारी हलविण्यात आले आहेत.

शकुंतला देशमुख[संपादन]

दर्यापूरचे स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्रीमंत बळवंतराव देशमुख यांच्या पत्‍नी शकुंतलाबाई देशमुख यांच्या नावावरूनच या गाडीला शकुंतला नाव पडल्याचे सांगण्यात येते. देशमुखांचा दर्यापुरात मोठा वाडा होता. स्वातंत्र्य आंदोलन, सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते त्या वाड्यावर येत. अमरावतीचे माजी खासदार व ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते सुदामकाका देशमुख हेदेखील देशमुखांकडे या वाड्यावर यायचे. आणीबाणीच्या काळात ते या ठिकाणी काही काळ आश्रयाला होते. शकुंतलाबाईंचे वडील रेल्वेत अधिकारी होते. स्वातंत्र्यापूर्वी लग्न झाल्यावर त्या याच गाडीने पहिल्यांदा सासरी आल्या होत्या.

१ ऑगस्ट २०१० साली शकुंतला देशमुख यांचे निधन झाले. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनी या लोहमार्गाच्या विकासासाठी मूर्तिजापूर ते अचलपूर अशी प्रवास परिक्रमा या गाडीने आयोजित केली होती.

शकुंतलाची वैशिष्ट्ये[संपादन]

यवतमाळ या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही एकमेव गाडी आहे. अन्य कोणतीही गाडी यवतमाळवरून सुटत नाही किंवा यवतमाळवरून जातही नाही. त्यामुळे ब्रिटिश काळापासून या एका गाडीसाठी यवतमाळ स्थानकाचा संसार सुरू आहे.

या गाडीचा वेग इतका कमी असतो की कुणीही धावत्या गाडीत चढू वा उतरू शकतो. 'हात दाखवा एसटी थांबेल', अशी एक जाहिरात एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी केली होती. शकुंतला एक्स्प्रेसने ही परंपरा फार पूर्वीपासून सांभाळली आहे. गाडी येताना पाहून कुणी हात दाखवला तर त्याला घेऊनच मग ही गाडी पुढे निघते. तिकीट काढलेच पाहिजे असेही नाही. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांची संख्या मोठी असते.

प्रवासाची अन्य साधने नसणाऱ्या त्या काळात या गाडीने लोकांच्या थेट हृदयात जागा घेतली. लोक बकऱ्या, कोंबड्यांसह या गाडीने प्रवास करायचे. आजही करतात. प्रवाशी खाली पडणार नाही असा वेग या गाडीचा असल्याने ज्यांना डब्यात जागा मिळाली नाही ते टपावर चढून बसायचे.

रेल्वे फाटक आले की, लोको पायलट गाडी थांबवतो. फाटक लावून घेतो. गाडीने फाटक पार केले की मग पुन्हा उतरून रेल्वे फाटक उघडतो व त्यानंतर गाडी पुढे निघते, असेही या गाडीबद्दल सांगितले जाते.

शकुंतला रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे, यासाठी आजवर सुदामकाका देशमुख, उषा चौधरी, माजी खासदार व राष्ट्रपती प्रतिभा पाटील, रा.सू. गवई, अनंत गुढे या सर्व माजी खासदारांनी सेंट्रल रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी प्रस्ताव देऊन प्रयत्‍नही केले होते.[३]

ब्रॉडगेजीकरण[संपादन]

ह्या दोन्ही रेल्वेगाड्या बंद झाल्या असत्या तर मूर्तिजापूर सोडले तर बाकी सारी गावे रेल्वेच्या नकाशावरून कायमची अदृष्य झाली असती परंतु, भारत सरकारने ऑगस्ट २०१६मध्ये दीड हजार कोटी मंजूर करून नॅरोगेजवर धावणारी शकुंतला, ब्रॉडगेजवर आणण्याचा प्रस्ताव आणला आहे.[४]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "शकुंतला ज्या रुळांवरून धावते ते रूळ ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे". dailyhunt. १६ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  2. ^ "Shakuntala Railways: India's only private railway line". The Economic Times. १६ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  3. ^ "शकुंतला रेल्वे झाली भूमिहीन". loksatta.com. १६ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.
  4. ^ jacob, shine. "Government to take over Shakuntala, only private railway line". Business Standard. १६ जानेवारी २०१९ रोजी पाहिले.