Jump to content

सिद्धिविनायक (सिद्धटेक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सिद्धटेक (सिद्धिविनायक) या पानावरून पुनर्निर्देशित)
सिद्धिविनायक (सिद्धटेक)

नाव: सिद्धिविनायक (सिद्धटेक)
निर्माता: अहिल्याबाई होळकर
देवता: गणपती
स्थान: सिद्धटेक, अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत


सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे..आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात..यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे..

पौराणिक कथा

[संपादन]

येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळविलेली असते.पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे, परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे.  हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने, ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव "सिद्धी-विनायक" असे ठेवले आहे, सिद्धी देणारा ("सिद्धी, यश", "अलौकिक शक्ती"). सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते ..येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हणले जाते.

मुद्गल पुराणात असे वर्णन केलेले आहे की सृष्टीच्या सुरुवातीस, जेव्हा विष्णू त्यांच्या योगनिद्रेत होते..त्यावेळी विष्णूच्या नाभीतून एक कमळ उगवले. सृष्टीचा निर्माता-देव ब्रह्मा याच कमळातून उदयास आले. ब्रह्माने विश्वाची निर्मिती सुरू केली असतानाच, मधु आणि कैटभ हे दोन राक्षस विष्णूच्या कानातील घाणीतून उद्भवले.या राक्षसांनी ब्रह्माच्या सृष्टिनिर्मितीच्या प्रक्रियेस अडथळा आणण्यास सुरुवात केली.. ज्यामुळे साक्षात विष्णूला जागृत करण्यास भाग पाडले .समोरील विनाशकारी दानवांसोबत विष्णू नारायण लढाई लढले खरे.. पण त्या दानवांचा पराभव करू शकले नाहीत. मग त्यांनी यामागील कारण शिवाला विचारले. शिवाने विष्णूला सांगितले की ते लढाईआधी, शुभ कार्याचा आरंभ असलेल्या आणि कामातील अडथळा, विघ्ने दूर करणाऱ्या देवतेला गणेशाला वंदन करायला विसरले होते आणि त्याचमुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अखेरीस, विष्णूनी सिद्धटेक येथे तपश्चर्या केली आणि गणरायाला मंत्रमुग्ध केले - "ओम श्री गणेशाय नमः". प्रसन्न झाल्याने,श्री गणरायांनी विष्णूला आशीर्वाद आणि विविध सिद्धी ("शक्ती") प्राप्त करून दिली. ती मिळवून विष्णू आपल्या लढाईकडे परत आले आणि दोन्ही राक्षसांना ठार मारले. विष्णूने ज्या ठिकाणी सिद्धि घेतली ती जागा सिद्धटेक म्हणून ओळखली जाते

इतिहास

[संपादन]

पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.

छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. मात्र, १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ अहिल्याबाई होळकर यांनी बांधले.

हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते.

याच क्षेत्रात संत मोरया गोसावी यांनीही सिद्धी प्राप्त केली होती..

विलोभनीय पवित्र निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याशीच भीमा नदी वाहते.

मंदिर

[संपादन]
सिद्धिविनायक (सिद्धटेक) मंदिर

मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

भौगोलिक

[संपादन]
  • श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
  • सिद्धटेकला जाण्यासाठी यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्थानक म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौंडवरून शिरापूर येथे बसने जाऊन पुढे नदी ओलांडून जावे लागते. नदीवर होड्या चालू असतात. आता मात्र नदीवर पूल झाला असल्याने होडीने जावे लागत नाही. गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.
  • दौंड-काष्टी-पेडगावमार्गे सिद्धटेक या ४८ कि.मी. लांबीच्या मार्गानेसुद्धा जाता येते.
  • पुण्याहून हडपसर-लोणी-यवत-चौफुला-पाटस-दौंडमार्गे सिद्धटेक ९८ कि.मी. वर आहे. (नदी पार करावी लागते/पूल आहे.)


अष्टविनायक
मोरेश्वरसिद्धिविनायकबल्लाळेश्वरवरदविनायकगिरिजात्मजचिंतामणीविघ्नहरमहागणपती