विपश्यना
विपस्सना (पाली) किंवा विपश्यना (संस्कृत) ही गौतम बुद्ध यांनी सांगितलेली बौद्ध धर्माची ध्यान पद्धती आहे. प्रचलित अर्थाने विपश्यना या नावाने ही ध्यानपद्धती जगभरात प्रसिद्ध पावलेली आहे. बुद्धाने सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा महत्त्वाचा विषय म्हणजे हे ध्यान होय.[१] पाली भाषेत "विपस्सना' शब्दाचा अर्थ "स्वतःच्या आत डोकावणे" असा होतो. गौतम बुद्धाने स्वतः या ध्यानपद्धतीचा अभ्यास करून; तिच्या आचरणाचे महत्त्व अनुभवून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे अशी धारणा आहे.[२]
अष्टांग मार्ग
[संपादन]समाधी अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी उपासकाला बुद्धाने आठ मार्ग आचरायला सांगिले आहेत. समाधी म्हणजे ध्यानाची अवस्था. अष्टांग मार्गाचे आचरण करून स्वतः अधिक प्रसन्न ठेवणे आणि जीवनाची वास्तवता स्वीकारणे हे तंत्र विपश्यना साधन प्रक्रियेचे महत्त्वाचे अंग मानले जाते.[१]
उगम
[संपादन]गौतम बुद्धाने स्वतः आचरलेली ही ध्यान पद्धती आपल्या शिष्यगणांना सांगितली. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या शिष्य समुदायाच्या माध्यमातून जगभरात या ध्यानपद्धतीचा प्रसार झाला. भारतात सुमारे पाचशे वर्षे ही ध्यान पद्धती आचरली गेली, त्यानंतर मात्र ती लोप पावली. तथापि म्यानमारमध्ये काही उपासक समुदायाने ही पद्धती आचरणे सुरूच ठेवले होते. त्यांपैकी सयागयी उ बा खिन या वरिष्ठ उपासक आणि शिक्षक असलेल्या व्यक्तीने ही उपासना पद्धती अनेकांना शिकवली.[३][४]
पुनरुज्जीवन आणि प्रसार
[संपादन]सयागयी उ बा खिन (इ.स. १८९९ - इ.स. १९७१) यांनी आपल्या रंगून येथील केंद्रात परदेशी व्यक्ती आणि म्यानमारमधील स्थानिक व्यक्ती यांना या ध्यान पद्धतीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.[४] मूळ भारतीय असलेले सत्यनारायण गोयंका हे आपल्या कुटुंबासह म्यानमारमध्ये राहत असत. त्यांनी तेथील केंद्रात विपश्यना शिकून घेतली. आपले आचार्य सयागयी उ बा खिन यांच्याजवळ चौदा वर्षे ही ध्यान पद्धती शिकून, आत्मसात करून गोयंका हे इ.स. १९६९ मध्ये भारतात आले. गौतम बुद्धाच्या मूळ भूमीत म्हणजे भारतात या ध्यानपद्धतीचे पुनरुज्जीवन करण्याचे व जगभरात तिचा प्रसार करण्याचे काम सत्यनारायण गोयंका यांनी सुरू केले. संपूर्ण समर्पित भावनेने चालणारी अशी केंद्रे आज भारतात आणि भारताबाहेर सुरू आहेत.[३]
विपश्यना प्रशिक्षण वर्गाचे स्वरूप
[संपादन]ज्या व्यक्तीला मनःपूर्वक साधना करण्याची इचछा आहे अशा कोणाही व्यक्तीसाठी हा वर्ग खुला आहे. अशी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सक्षम असणे अपेक्षित असते. हा वर्ग दहा दिवस कालावधीचा असतो. यामध्ये साधक/साधिकेने दहा दिवस संपूर्ण मौन पाळणे अपेक्षित असते. स्त्री आणि पुरुष यांच्या निवास-भोजन आणि ध्यान कक्ष यांची योजना स्वतंत्र केलेली असते. भोजनात सात्त्विक आहार योजना केलेली असते. या दहा दिवसात अपेयपान, धूम्रपान, मांसाहार वर्ज्य असतो. आपल्या जवळील सर्व बहुमोल सामान आपण वर्गाच्या प्रारंभीच संबंधित केंद्राकडे दहा दिवसांसाठी सुपूर्द करायचे असते. ( आपले सर्व लक्ष हे केवळ ध्यान पद्धतीमध्ये असणे आवश्यक असते.)प्रत्येक वर्गात आचार्य मार्गदर्शन करतात. हे आचार्य ध्यानसत्रांच्या खेरीज नियुक्त वेळात साधकांचे शंका निरसन आणि साधनेतील अडचणी समजून घेणे, त्या सोडविणे यासाठी साहाय्य करतात.
वर्गातील ध्यानसत्रात गोयंका गुरुजी यांच्या आवाजातील ध्यानाच्या सूचना देत असलेल्या ध्वनिफिती लावल्या जातात, त्यात दिलेल्या सूचना ऐकून व समजून घेऊन साधकाने ध्यानपद्धतीचा सराव करायचा असतो.सुत पिटक या बौद्ध ग्रंथातील निवडक सूचनांचे पठण या वर्गात साधकांना ऐकविले जाते. यातील विचार हे साधकाच्या ध्यान पद्धती सरावाला पोषक असे असतात.
या प्रक्रियेत साधकाने स्वतः ही उपासनापद्धती आचरून तिचा अनुभव घ्यावा असे गोयंका गुरुजी सांगत असत.विपश्यना उपासना वर्गाच्या दहा दिवसांच्या कालावधीत दिली जाणारी श्री. गोयंका यांची व्याख्याने/प्रवचने ही या वर्गाचा महत्त्वाचा भाग आहेत. साधकाने घेतलेली अनुभूती आणि प्रवचनातून मार्गदर्शन असे या वर्गाचे स्वरूप असते.[२]
ध्यान प्रक्रिया शिकताना पहिल्या साडेतीन दिवसात साधक केवळ मानसिक स्थैर्य आणि एकाग्रता मिळण्यासाठी सराव करतात. ही एकाग्रता साध्य करण्याचा प्रयत्न केल्यावर चौथ्या दिवशी प्रत्यक्ष विपश्यना ध्यान पद्धती शिकविली जाते व टप्प्याटप्प्याने तिची प्रगत तंत्रे शिकविली जातात व त्यांचा सराव करण्यासाठी साधकाला वेळ दिला जातो.
विपश्यनेचे साध्य
[संपादन]विपश्यना ध्यानपद्धती आत्मसात केल्यानंतर साधक स्वतःकडे तटस्थ भावनेने पहायला शिकतो असे अपेक्षित आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा घटक असलेल्या उणीवा जणीवपूर्वक भरून काढणे आणि बलस्थाने अधिक सक्षम करणे हे यात अपेक्षित आहे. आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे तटस्थपणे पहायला शिकणे आणि शांततेच्या मार्गाने त्यावर मात करीत आयुष्याचा आनंद घेणे असे ही ध्यानपद्धती शिकविते. वास्तवाकडे सर्व आयामांनी पहायला शिकणे यासाठी ही ध्यानपद्धती पोषक ठरते. कोणतीही गोष्ट काही काळाने बदलते मात्र त्यासाठी आवश्यक संयम मिळविण्याचा मार्ग या प्रक्रियेतून आत्मसात करता येतो.[२][५]
विपश्यना केंद्रे
[संपादन]विपश्यना ध्यान पद्धतीचे प्रशिक्षण देणारी केंद्रे भारतात आणि भारताबाहेर चालविली जातात. महाराष्ट्रातील इगतपुरी येथे असे एक महत्त्वाचे केंद्र आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]चित्रदालन
[संपादन]-
विपश्यना ध्यान करणारे साधक-साधिका
-
बौद्ध आचार्य संध्याकाळी पठण करताना
-
गोराई (मुंबई) येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्र
-
पुणे येथील एक विपश्यना केंद्र
बाह्य दुवे
[संपादन]- विपश्यना ध्यान म्हणजे काय ? Archived 2020-10-14 at the Wayback Machine.
- विपश्यना साधना
संदर्भ
[संपादन]- ^ a b Bickell, George D. (2011-09-12). Vipassana-Meditation - Insight-Meditation (जर्मन भाषेत). Satzweiss.com. ISBN 9783902458063.
- ^ a b c Hart, William (2011-01-11). The Art of Living: Vipassana Meditation as Taught by S.N. Goenka (इंग्रजी भाषेत). Pariyatti. ISBN 9781928706731.
- ^ a b Hetherington, Ian (2011-12-15). Realizing Change: Vipassana Meditation in Action (इंग्रजी भाषेत). Pariyatti Publishing. ISBN 9781928706953.
- ^ a b Harvey, Peter (2012-11-22). An Introduction to Buddhism: Teachings, History and Practices (इंग्रजी भाषेत). Cambridge University Press. ISBN 9781139851268.
- ^ Hetherington, Ian (2011-12-15). Realizing Change: Vipassana Meditation in Action (इंग्रजी भाषेत). Pariyatti Publishing. ISBN 9781928706953.