विकिपीडिया:मासिक सदर/डिसेंबर २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाताळ (इंग्लिश: क्रिसमस) हा एक प्रमुख ख्रिश्चन सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण ऐवजी एपिफनी हा ६, ७ किंवा १९ जानेवारीला देखील साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप ज्युलियस पहिलाने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही वैविध्य दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.

ख्रिस्ती बायबलच्या लूक व मॅथ्यु हे दोन्ही सेंट, येशू ख्रिस्तांच्या जन्माचे संदेश देतात. बायबलनुसार येशू ख्रिस्तांचा जन्म जुदेआच्या बेथलेहॅम या जागी एका गोठ्यात झाला. संत लुकच्या लेखनातून येशूची आई मारिया आणि वडील योसेफ यांच्या दृष्टिकोनातून बेथलेहॅमच्या यात्रेचा वृत्तांत दिलेला आहे.असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसीहा म्हणून उद्देशिले व आजू-बाजूचे सर्व मेंढपाळ त्याची स्तुती करत होते. तसेच संत मॅथ्यू यांच्या सुवचनानुसार तीन राजे येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबीय ईजिप्तला गेले.

रोमन कालगणनेनुसार २५ डिसेंबर ही तारीख हिवाळ्यातील संक्रांत अथवा अयनकाळाचा दिवस आहे. प्रतीकात्मक कारणासाठी भगवान येशू यांनी आपल्या जन्मासाठी हा सर्वात छोटा दिवस निवडला अशी धारणा आहे. प्राचीन धर्मोपदेशक ऑगस्टाईन यांनी नोंदविले आहे की आपल्या पृथ्वीय अनुमानानुसार भगवान येशू सर्वात छोट्या दिवशी जन्माला आले. तरीही त्यामागील उदात्त आशय असा आहे की त्या दिवसानंतर पुढे दिवस मोठा होत जातो. त्यामुळे भगवान येशू आपल्यासाठी लीन झाले आणि त्यांनी आपल्या उन्नतीचा मार्ग आपल्याला दाखविला. कारण यानंतरच्या दिवसांमध्ये सूर्य अधिक काळ प्रकाश देत राहतो.

या जन्माच्या स्मरणाचे औचित्य साधून चर्चमध्ये सायंकाळपासून प्रार्थना म्हणण्यात येतात.ख्रिस्ती बांधव या विशेष उपासनेस आवर्जून उपस्थित राहतात. काही ठिकाणी नाताळ सणापूर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जावून येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. यांना केरॉल असे म्हणतात.

पुढे वाचा... नाताळ