रामचंद्र हरी पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रामचंद्र हरी पटवर्धन (?-१७४० चे दशक) हे पटवर्धन घराण्यातील एक पेशवेकालीन सरदार होते. हरभट पटवर्धन ह्या पटवर्धन सरदार घराण्याच्या मूळपुरुषाल ७ मुले होती. रामचंद्र हरी हे त्यातील एक कर्तबगार चिरंजीव होते. ते थोरले बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा ह्यांना समकालीन होते.

कारकीर्द[संपादन]

जंचिऱ्याच्या सिद्द्याशी झालेल्या लढाईत ते चिमाजी अप्पांबरोबर लढले. ह्याच सुमारास कोल्हापूरच्या संभाजी राज्यांनी इचलकरंजीवर हल्ला केला. इचलकरंजीचे सरदार व्यंकटराव घोरपडे हे बाजीरावांबरोबर उत्तरेच्या मोहिमेवर असल्याने ते आपल्या जहागिरीवरचा हा हल्ला थोपवू शकले नाही. अशा वेळी बाजीरावांच्या आदेशानुसार रामचंद्र हरी हल्ला परतवण्यास इचलकरंजीला चालून गेले. ह्या प्रतिहल्ल्यात संभाजींचा पराभव झाला. संभाजींनी शाहूंकडे तक्रार केली आणि शाहू ह्यांनी पटवर्धन आणि कोल्हापूरकर भोसले ह्यांच्यात समेट घडवून आणला.

दरम्यान उत्तर कोकणात स्वकीयांचे पोर्तुगिजांकडून अनन्वित धार्मिक अत्याच्यार सुरू होते. म्हणून मराठ्यांतर्फे चिमाजीअप्पा पेशव्यांनी जंजिऱ्यानंतर इ.स्. १७३७ साली साष्टी आणि वसईवर हल्ला केला. ह्या मोहिमेत रामचंद्र हरी ह्यांनी ठाण्याचा किल्ला जिंकून् घेतले. केळवे माहीमची कामगिरी फत्ते करत असताना बंदुकीच्या गोळीने ते जखमी झाले. इ.स. १७३९ च्या मे महिन्यात चिमाजींनी वसई काबीज केली तेव्हा मराठ्यांचा ध्वज रामचंद्र हरी ह्यांनीच किल्ल्यावर फडकवला, असे समजले जाते.

रामचंद्र हरी ह्यांना बरीच वर्षे पुत्रलाभ नव्हता म्हणून् त्यांनी आपले बंधू कृष्णाभट ह्यांचे चिरंजीव पुरुषोत्तम दाजी ह्यांना आपल्या तालमीत तयार केले. अनेक वर्षांनी रामचंद्र हरींना पुत्रसंतति झाली. हेच पुढे परशुरामभाऊ पटवर्धन म्हणून् प्रसिद्ध पावले.

१७४० च्या दशकांत् रामचंद्र हरींचे निधन झाले.

हेसुद्धा पहा[संपादन]