मृणालिनी साराभाई
मृणालिनी साराभाई (माहेरच्या मृणालिनी स्वामिनाथन) (११ मे, इ.स. १९१८:केरळ - २१ जानेवारी, इ.स. २०१६:अहमदाबाद) या एक भारतीय नर्तकी होत्या. त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. त्या भरतनाट्यम आणि कथकली या नृत्यकलेत पारंगत होत्या. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या त्या पत्नी होत. स्वित्झर्लंडला जाऊन तेथे त्यांनी रशियन बॅले व ग्रीक नृत्ये यांचे अध्ययन केले. भारत सरकारने इ.स. १९९२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा सन्मान केला. [१]
पूर्वायुष्य
[संपादन]अंतराळशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या पत्नी म्हणून त्या १९४२ अहमदाबादेत आल्या. हे घराणे कापड उद्योगात स्थिरावलेले आणि गांधीजींच्या चळवळीत रस घेणारे; तर केरळमधील मूळच्या मृणालिनी स्वामिनाथन यांचे वडील बॅरिस्टर, आई स्वातंत्र्यसैनिक आणि सख्खी ज्येष्ठ बहीण आझाद हिंद सेनेतील पहिल्या महिला कॅप्टन लक्ष्मी सहगल. आझाद हिंद फौजेतील ‘कॅप्टन लक्ष्मीं’प्रमाणे धाकट्या मृणालिनी रणरागिणी नव्हत्या, पण नृत्यातून मानवमुक्तीची लढाई त्या अखेरपर्यंत लढल्या. नृत्यनाट्ये भारतात आधीही केली जात, आनंदशंकर तर त्यासाठी प्रसिद्धच होते. मात्र पौराणिक वा भावुक कथांवर आधारित नृत्यनाट्यांना मृणालिनी यांनी सामाजिक जाणीव दिली. मीनाक्षी सुंदरम पिल्लै यांच्याकडून भरतनाट्यम्, ताकाळी कुंचू कुरूप यांच्याकडून कथकली आणि कल्याणीकुट्टी अम्मन यांच्याकडून मोहिनीअट्टम शिकल्यावर त्या टागोरांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनात शिकल्या आणि त्याहीआधी, वयाच्या १२-१३ व्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये बॅलेचेही धडे गिरवले. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम त्यांच्या नृत्यनाट्यांत दिसतो.
दर्पण नृत्य अकादमी
[संपादन]विक्रम आणि मृणालिनी यांचा प्रेमविवाह हा ‘शास्त्र व कलेचा संसार’ होता. विक्रम साराभाई यांनीच १९४८ मध्ये ‘दर्पण नृत्य अकादमी’ स्थापण्यात पुढाकार घेतला. अहमदाबादेत प्रथम विद्यार्थी मिळेनात, पण दहा वर्षांत अकादमी बहरली. या अकादमीतून १८,०००हून अधिक विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम आणि कथकली या नृत्यप्रकारांत पदवी मिळवली आहे. १९६३ पासून मृणालिनी यांनी पारंपरिक नृत्यशैलींची अभिजात परिभाषा कायम राखून नृत्यनाट्ये बसविणे सुरू केले. १९७७ मध्ये कन्या मल्लिका साराभाई यांच्या हाती ‘दर्पण’ची सूत्रे त्यांनी सोपवली आणि अगदी अखेरपर्यंत येथेच त्या शिकवत राहिल्या. मल्लिकांनी ‘दर्पण’ वाढविले, तेथे ‘नटराणी’ हे वर्तुळाकार प्रेक्षागार उभारले आणि मुख्य म्हणजे, ‘अम्मा’देखील नव्या नृत्यनाट्यांत सहभागी होतील, याची काळजी अनेकदा घेतली. अगदी पाच वर्षांपूर्वीपर्यंत या मायलेकींनी मिळून नृत्यनाट्ये आणि मार्गदर्शन शिबिरे केली होती. वयाच्या नव्वदीतही ‘अम्मा’ नृत्याविष्कारांबद्दल, त्यातील बदलांबद्दल सजग असत.
नृत्यपरंपरा
[संपादन]मृणालिनी साराभाई ऊर्फ अम्मा यांच्या नृत्यपरंपरेत त्यांच्या कन्या मल्लिका साराभाई व नातू रेवंत हेही समाविष्ट असून त्यांच्या अनेक शिष्यांनी आणि त्यांच्यापासून प्रभावित अनेकांनी, अभिजात नृत्यातून समकालीन प्रश्नांशी संबंधित विषय मांडण्याची प्रेरणा दिली आहे. भरतनाट्यमला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम रुक्मिणीदेवी अरुंडेल यांच्या कलाक्षेत्रने चेन्नईतून केले होते; तर दाक्षिणात्य अभिजात नृत्यप्रकारांना वर्तमानात आणण्याचे काम साराभाई यांनी केले. त्यांना पद्मश्री (१९६५), पद्मभूषण (१९९२) आणि संगीत नाटक अकादमीची फेलोशिप (१९९४) तसेच अनेक विदेशी सन्मान मिळाले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ सुरेंद्र वडगावकर. "साराभाई, मृणालिनी". २७ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले.