Jump to content

मसुरे (मालवण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मसुरे या पानावरून पुनर्निर्देशित)
  ?मसुरे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
Map

१६° १०′ २३″ N, ७३° ३०′ १४″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १.१४ चौ. किमी
जवळचे शहर मालवण
विभाग कोंकण
जिल्हा सिंधुदुर्ग
तालुका/के मालवण
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
७०५ (२०११)
• ६१६/किमी
१,०७३ /
भाषा मराठी

मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ११४.२९ हेक्टर क्षेत्राचे गाव आहे.

भौगोलिक स्थान व लोकसंख्या

[संपादन]

मसुरे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातील ११४.२९ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात २०२ कुटुंबे व एकूण ७०५ लोकसंख्या आहे. ह्याच्या सर्वात जवळचे शहर मालवण १८ किलोमीटर अंतरावर आहे. यामध्ये ३४० पुरुष आणि ३६५ स्त्रिया आहेत. यामध्ये अनुसूचित जातीचे लोक ५९ असून अनुसूचित जमातीचे ५ लोक आहेत.ह्या गावाचा जनगणना स्थल निर्देशांक ५६६५७३ [] आहे.

साक्षरता

[संपादन]
  • एकूण साक्षर लोकसंख्या: ६१५
  • साक्षर पुरुष लोकसंख्या: ३०४ (८९.४१%)
  • साक्षर स्त्री लोकसंख्या: ३११ (८५.२१%)

हवामान

[संपादन]

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती केली जाते.

जमिनीचा वापर

[संपादन]

मसुरे ह्या गावात जमिनीचा वापर खालीलप्रमाणे होतो (हेक्टरमध्ये क्षेत्रफळ):

  • बिगरशेती वापरात असलेली जमीन: १२.१
  • ओसाड व लागवडीला अयोग्य जमीन: १२.६५
  • कायमस्वरूपी पडीक जमीन: १३.१
  • सद्यस्थितीतील पडीक जमीन: १०.२
  • पिकांखालची जमीन: ६६.२४
  • एकूण बागायती जमीन: ६६.२४

उत्पादन

[संपादन]

मसुरे या गावी पुढील वस्तूंचे उत्पादन होते ( महत्त्वाच्या उतरत्या अनुक्रमाने): भात, काजू, आंबा

जत्रा

[संपादन]

गावात फाल्गुन महिन्याच्या शेवटी आंगणेवाडीची जत्रा भरते. आंगणेवाडी ही मसुरे गावातील एक वाडी आहे[]. ह्या गावात भराडी देवीचे मंदिर आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून समजली जाणारी तसेच सबंध महाराष्ट्रामधील प्रसिद्ध अशी जत्रा म्हणजे भराडीदेवी (आंगणेवाडी)ची जत्रा ही सर्वांना माहीतच आहे परंतु... ह्या जत्रेची परंपरा आणि विविध सांस्कृतिक रीती यांची माहिती बहुतेक जणांना माहिती नसेल ती आपण जाणून घेऊ.

आंगणेवाडीची यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तिथं दरवर्षी भाविकांच्या उपस्थितीचा उच्चांक होत असतो. मालवण तालुक्यातील सर्वांत मोठा गाव म्हणून मसुरेची ओळख आहे. आंगणेवाडीची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील. तेथील यात्रा एवढी झपाट्याने सर्वदूर का झाली याचे अनेक कंगोरे आणि उदाहरणेदेखील आहेत.

आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख कशी ठरते?

आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख कुठच्या तिथी अथवा वारानुसार ठरत नाही. यात्रेचा दिवस निश्चित करण्यासाठी गावाची आपली पद्धत आहे. त्यासाठी गाव पारध केली जाते. ही गाव पारध झाल्यावर आज यात्रेची तारीख निश्चित होते. 

यात्रेची तारीख देवीचा कौल घेऊन ठरवली जाते. यात्रा दोन दिवस चालते. यात्रेची लगबग देवदिवाळीपासून सुरू होते. देवदिवाळीच्या दुसऱ्या दिवशी डाळप (डाळमांजरी) होते. तिसऱ्या दिवशी प्रमुख आंगणे मानकरी देवळात जमतात. ते मानकरी वंशपरंपरागत असले तरी दरवर्षी चार नवीन मानकरी निवडले जातात.

मानकरी तांदूळ लावून देवीला कौल लावतात. ‘‘शिकारेक संपूर्ण गाव जमतोलो, शिकार करुक तू हुकुम दे, शिकार साध्य करून दी…’’ असे गाऱ्हाणे घालून कौल लावला जातो. पाषाणास तांदूळ लावून उजवा कौल मिळण्याची वाट बघतात. एकदा कौल मिळाला, की सात ते आठ जणांचा गट करून जंगलात रान उठवले जाते. बहुतांश वेळा डुकराची शिकार केली जाते.

‘पारध’ मिळाले की वाजतगाजत देवीसमोर आणले जाते. मंदिराच्या उजव्या बाजूला पातोळी आहे. तिथे डुकराचे मांस सुटे करून ‘कोष्टी’(प्रसाद) म्हणून वाटले जाते. यानंतर देवीला कौल लावून यात्रेची तारीख ठरवली जाते. नवसाला पावणारी म्हणून देवीची ख्याती असली तरी कोंबड्या-बकऱ्यांच्या बळीचे नवस मात्र यात्रेमध्ये आढळत नाही.

देवीची ओटी कशाने भरतात?

देवीला सोन्या-चांदीच्या नाण्यासह ओटी भरणे, साडी चोळी, नारळाचे तोरण घातले जाते. ज्याचा नवस असेल त्याच्या वजनाएवढी साखर, नारळ, गूळ, तांबे याची तुलाभार करून देवीला वाहिली जाते. तुलाभार हा नवसाचा प्रकार पाहण्यासाठी झुंबड उडालेली असते. याशिवाय आगळावेगळा नवस म्हणजे भिक्षा मागण्याचा. जत्रेच्या दिवशी कडक उपवास करून रात्री देवीला दाखवलेल्या प्रसादापैकी शिते भिक्षा मागून ग्रहण केली जातात. त्यानंतरच उपवास सोडला जातो. यात्रेदिवशी रात्री नऊनंतर देवीचे दर्शन बंद केले जाते. मंदिराची साफसफाई झाल्यावर देवळात ताटे लावणे (देवीचा महाप्रसाद) हा कार्यक्रम असतो. उत्सवाच्या दिवशी आंगणे कुटुंबीय उपवास करतात. आंगणेच्या प्रत्येक घरातील एक सुवासिनी प्रसादाची ताटे घेऊन मंदिराकडे येतात. त्या उत्सवात सामील होणाऱ्या आंगणे कुटुंबीयांच्या लेकी व सुनांनी ओटीचे सामान (खण, नारळ इत्यादी) व नवस असेल तर साडी आपल्या सोबत आपल्या घरूनच घेऊन यावे, अशी पूर्वापार प्रथा आहे.

भराडी देवीची पालखी नाचवताना भाविकांकडून देवीस मोठ्या प्रमाणात नवस केले जातात. ते नवस पूर्ण होत असल्याने नवसफेड करण्यासाठी भाविकांना रांग लावावी लागते. यात्रेचा दुसरा दिवस जत्रेचा असतो. सूर्योदयाच्यावेळी सूर्यकिरणांचा कवडसा देवीच्या मुखावर पडल्यानंतर देवीची ओटी भरून यात्रेस सुरुवात होते. दुसऱ्या दिवशी वाडीतील सर्व आंगणे ग्रामस्थ देवीची ओटी भरून दर्शन घेतात. त्याला मोडजत्रा म्हणतात. त्यानंतर एकवीस ब्राह्मण येऊन सम्राज्ञा होते, देवळाचे शुद्धीकरण आदी विधी होतात. देवीने जत्रोत्सव सुरळीतपणे पार पाडून घेतला म्हणून देवीप्रती कृतज्ञता व्यक्त होते.

मुंबईकर चाकरमानी, सेलिब्रिटी मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने जत्रेची ख्याती ‘चाकरमान्यांची यात्रा’ म्हणून वाढत आहे. चाकरमान्यांबरोबर अनेक प्रवर्गातील मंडळी मोठ्या संख्येने तेथे येतात.

साधारणत: तीनशे वर्षांपूर्वी देवीची स्‍थापना झाल्याचे सांगण्यात येते. चिमाजी अप्पा यांनी इनाम म्हणून देवीस साधारण दोन हजार एकर भरड व शेतजमीन दिली आहे, असे ऐतिहासिक दाखले आढळतात.

आम्ही आंगणेवाडीच्या जत्रेला चाललो असे सांगत कोकण पर्यटनाची सैर करणारे अनेक हौशी ग्रुप यात्रा कालावधीत आंगणेवाडीत पोचतात आणि पर्यटनासाठी मार्गस्थ होतात.

आंगणेवाडीला कसे जावे...

मुंबई-गोवा महामार्गवरील कणकवली येथून आचरा रोड बेळणे फाट्यावरून आंगणेवाडी ३५ किलोमीटरवर आहे

मुंबई-गोवा महामार्गवरून कसाल तेथूनही दुसरा मार्ग आहे. तेथून आंगणेवाडी २० किलोमीटर.

मुंबई-गोवा महामार्गावरून कसाल मार्गे मालवण मार्गावरून २३ किलोमीटर आंगणेवाडी

आंगणेवाडीला जाण्यासाठी जवळचे रेल्वेस्टेशन : सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन ३० किलोमीटर., कणकवली रेल्वेस्टेशन ३७ किमी.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ http://www.censusindia.gov.in/2011census/dchb/DCHB.html
  2. ^ थिंक महाराष्ट्र ह्या संकेतस्थळावरील किशोर राणे ह्यांचा लेख दि. १२ जानेवारी २०१७ रोजी रात्री २१.०६ वाजता पाहिल्याप्रमाणे