प्रादेशिक लोकनृत्ये
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भारतात विविध प्रकारची प्रादेशिक व लोकनृत्ये प्रदीर्घ परंपरेने चालत आलेली आहेत. ही उत्स्फूर्त सामूहिक नृत्य उत्सव, सण, समारंभ, विवाहासारख्या मंगल प्रसंगी, तसेच पेरणी, कापणी यांसारख्या कृषिजीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगीही केली जातात. चिमण्यांचे दाणे टिपणे, हरिणांचे नाचणे-बागडणे, सर्प, हंसाची गती इ. पशुपक्ष्यांच्या हालचालींचे अनुकरण या नृत्यांमध्ये दिसते. तसेच पेरणी-कापणी करणे, गुरे हाकणे, नांगर चालविणे या ग्रामजीवनातील नित्याच्या क्रियाही त्यांत नृत्यबद्ध केलेल्या आढळतात. या सर्वच नृत्यांना मुळात धार्मिक अधिष्ठान असल्याचे दिसते.
भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांतील काही प्रमुख लोकनृत्ये अशी :
- आसाममधील बिहू या उत्सवप्रसंगी ‘बिहू’ हे नृत्य करण्याचा प्रघात आहे. ‘हुकारी’ हा बिहू नृत्याचाच एक प्रकार आहे. ‘नट पूजा’, ‘वैशाख’, ‘खांबा लिम’, ‘नृइरा लिम’ ही नृत्ये वेगवेगळ्या प्रसंगी केली जातात. मिझो जमातीचे लोक ढोलकाच्या साथीवर बांबू हातात घेऊन ‘सुत्तलाम’ हे नृत्य करतात.
- मणिपूरमधील ‘लायहरोबा’ हे पारंपरिक नृत्य शिव-पार्वतीच्या उपासनेचा व लीलांचा नृत्याविष्कार आहे. ⇨ रासलीला नृत्य हे कृष्णलीलांवर आधारित लोकप्रिय समूहनृत्य असून त्याचे अनेक प्रकार रूढ आहेत. ढोलाच्या साथीने केले जाणारे ‘पुंग-चोलम्’ व करतालाच्या साथीवरचे ‘करताल-चोलम्’ ही नृत्ये ‘संकीर्तन’ या धार्मिक नृत्यगानप्रकारातून निर्माण झाली.
- बंगालमध्ये ढोल व करताल या वाद्यांच्या साथीने केले जाणारे ‘कीर्तन’ हे लोकनृत्य विशेष प्रचलित आहे. ‘जात्रा’ हा नृत्यनाट्यप्रकार प्रशिक्षित कलाकारांकडून गावोगावी केला जातो. ‘गंभीरा’ हे मुखवठानृत्य, ‘रायबेश’ दोन काठ्या हातात घेऊन करावयाचे ‘काठी’ नृत्य ही लोकनृत्येही रूढ आहेत.
- रासलीला नृत्याचे प्रकार उत्तर प्रदेशातही प्रचलित आहेत. ⇨ नौटंकी हा पारंपरिक नृत्यप्रकार लोकप्रिय आहे. व्यावसायिक नर्तक ही नृत्ये सादर करतात. वेगवेगळ्या जमातींत धार्मिक प्रसंगी विविध नृत्ये केली जातात. कुमाऊँ जमातीत ‘झोरा’ व ‘छपेली’ ही नृत्ये, जोनसार जमातीत ‘थाली’ हे स्त्रियांचे नृत्य, अहीर जमातीत ढोलक व झांजांच्या साथीने विवाहासारख्या प्रसंगी केले जाणारे नृत्य, चांभार जमातीत विनोदी संगीतिकेवर आधारित नृत्ये इ. लोकनृत्ये आढळतात.
- पंजाबमधील ⇨ भांगडा नृत्य हे कृपिनृत्य आहे. ढोलाच्या तालावर केल्या जाणाऱ्या पुरूषांच्या ह्या नृत्यात आनंद आणि चैतन्य यांचे उत्स्फूर्त दर्शन घडते. या नृत्यात उंच उड्या, गोल गिरक्या इ. विविध हालचाली अंगविक्षेपांसह करतात. स्त्रियांचे ‘गिद्धा’ नृत्य, पुरुषांचे ‘झुमर’ नृत्य, स्त्री-पुरुषांचे ‘लाइलडी’ नृत्य ही जोषपूर्ण लोकनृत्ये आहेत.
- हिमाचल प्रदेशात स्थानिक देवतेस प्रसन्न करण्यासाठी स्त्री-पुरुष ‘सांगला’ नृत्य करतात. चंबामधील ‘झांझर’ नृत्य सणाच्या प्रसंगी करतात. धनगर जमातीचे ढोलाच्या साथीवरचे स्त्री-पुरुषांचे ‘दीपक नृत्य’ आकर्षक असते.
- काश्मीरमध्ये वासुकी नागाच्या जत्रेत त्याचा जयजयकार करीत ‘गद्दी’ नृत्य करण्याची प्रथा आहे. स्त्रियांचे ‘रोफ’ नृत्य, ‘हिकात’ हे तरुण मुलामुलींचे नृत्य, ‘बचनग्मा’ हे तरुणांचे स्त्रीवेष घेऊन करण्याचे नृत्य, फेर धरून करण्याचे ‘छज्जा’ नृत्य ही लोकनृत्ये प्रचलित आहेत.
- राजस्थानातील भवाई जमातीचे गतिमान ⇨ भवाई नृत्य गावोगावी जाऊन सादर केले जाते. स्त्री-पुरुषांचे ‘घूमर’ हे धार्मिक नृत्य लोकप्रिय आहे. होळीप्रसंगीचे ‘गैर’ हे समूहनृत्य, ‘खयाल’ हा नृत्यनाट्यप्रकार, भिल्लांचे ‘गौरी’ नृत्य ही अन्य लोकनृत्ये आहेत. ‘झंकरिया’ व ‘पणिहारी’ ही लोकनृत्ये गारुडी जमातीत रूढ आहेत.
- मध्य प्रदेशात गोंड जमातीमध्ये करमा या उत्सवप्रसंगी नृत्य करण्याची प्रथा आहे. घोडकाठ्यांवरील नृत्ये वैशिष्ट्यपूर्ण असतात. ‘गौड’ हे स्त्री-पुरूषांचे नृत्य तसेच भाद्रपद महिन्यात ‘नवा राणी’, माघ व चैत्र महिन्यांत ‘देवारी’ व ‘चैतदंडा’ ही नृत्ये केली जातात. बंजारा लोकांचे ‘लोटा’ हे नृत्य व ‘लांगी’ हे वीरनृत्यही उल्लेखनीय आहेत. ‘गोंचा’ व ‘लक्ष्मीजागर’ ही अन्य काही लोकनृत्ये होत.
- ओरिसातील आदिवासींमध्ये विविध प्रकारची नृत्ये प्रचलित आहेत. ‘छाऊ’ हे पैका जमातीचे पारंपरिक युद्धनृत्य, ‘पाईक’ हे शेकोटीभोवती केले जाणारे नृत्य आणि ‘किरातार्जुन’ ही नृत्ये जोषपूर्ण आहेत. देवतेच्या आराधनेसाठी ‘करमा’ व ‘जदुर’ ही नृत्ये केली जातात.
- गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात केले जाणारे स्त्रियांचे ⇨गरबा नृत्य लोकप्रिय आहे. अखंडदीप लावलेला सच्छिद्र दीपगर्भघट ठेवून त्याभोवती स्त्रिया फेर धरून नाचतात. पुरुषांचे ‘गरबी’ नृत्य दसऱ्यानंतर केले जाते. ‘दांडिया रास’ हे पुरूषांचे रासलीला नृत्य आहे. यात घुंगरू लावलेल्या काठ्या हातात घेऊन ढोल व सनईच्या साथीने नाचतात. शेतकऱ्यांचे ‘कुछाडी’ नृत्य, सौराष्ट्रातील कोळ्यांचे ‘पांघर’ नृत्य, स्त्रियांचे ‘टिपणी’ ही नृत्ये वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
- आंध्र प्रदेशातील वजारी जमातीत होळीच्या वेळी मदन व रती यांच्या मातीच्या मूर्तीभोवती आकर्षक नृत्य करतात. ‘डप्पू’ हे वाद्य लहान काठ्यांनी वाजवून त्याच्या तालावरही पुरुष नृत्य करतात. ग्रामदेवतेला रेड्याचा बळी दिल्यानंतर त्याच्याभोवती फेर धरून नाचण्याची आदिवासींमध्ये प्रथा आहे. ‘मथुरी’ हे स्त्री-पुरूषांचे नृत्य उल्लेखनीय आहे. स्त्रियांचे ‘बतकम्मा’ हे व स्त्री-पुरुषांचे ‘माधुरी’ ही नृत्ये उत्सवप्रसंगी केली जातात.
- तमिळनाडूमधील भरतनाट्यम् या अभिजात नृत्याकडे झुकणारे ‘कुरवंजी’ हे डोंगराळ प्रदेशातील कुराती जमातीचे पारंपारिक लोकनृत्य येथे प्रचलित आहे. ‘करगम्’ हे मरिअम्माचे पूजानृत्य फुलांनी सजवलेले पितळी हंडे डोक्यावर ठेवून तुतारी व ढोल यांच्या तालावर केले जाते. मंदिराच्या आवारात उत्सवप्रसंगी एका हातात रुमाल व दुसऱ्या हातात टिपरी घेऊन पुरुष ‘ओइलाट्टम्’ नृत्य करतात. उत्सवप्रसंगी ‘कुम्मी’ हे नृत्य मुली गोलाकार फेर धरून करतात. स्त्रिया टिपऱ्या हातात घेऊन ‘कोलाट्टम्’ नृत्य करतात. ‘पिन्नल कोलाट्टम्’ हे सामुदायिक गोफ-नृत्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. भटक्या पारधी जमातीच्या ‘चिंडू’ या नृत्यात चिमण्या पकडण्याचा अभिनय करतात. लाकडी घोड्याचे तोंड लावलेली काठी दोन पायांमध्ये घेऊन करावयाचे ‘अश्वनृत्य’ आदिवासींमध्ये प्रचलित आहे.
- केरळमध्ये ‘कोलकळी’ हे नृत्य मोपला मुसलमान करतात. मध्यभागी उंच समई ठेवून त्याभोवती हातात दांडकी घेऊन फेर धरतात. ‘भद्रकाळी’ हे धार्मिक नृत्य मंदिरात करतात. ‘काईकोट्टिकळी’ हे नृत्य मुली ओणम् सणाच्या प्रसंगी करतात. नायर लोक पद्मनाम स्वामींच्या उत्सवप्रसंगी ‘वेलकळी’ हे युद्धनृत्य करतात. ‘काळीयाट्टम्’ हे धार्मिक नृत्य संघ व द्रुत लयींत केले जाते.
- महाराष्ट्रात समुद्रकिनाऱ्याजवळील भागात ⇨कोळी नृत्याचे विविध प्रकार रुढ आहेत. नागर व ग्रामीण समाजात लोकप्रिय असलेल्या टिपरी व ⇨लेझीम ह्या तालबद्ध खेळांची गणना सांकेतिक अर्थाने नृत्यातही करता येईल. आषाढी व कार्तिकी एकादशीला विठ्ठलाच्या व संतांच्या पालखीपुढे वारकरी भजने म्हणत नाचत जातात. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी लहान व तरुण मुले नाचत हिंडतात व मानवी मनोरा रचून त्यावर लहान मुलास चढवून उंच बांधलेली दहीहंडी फोडतात. दशावतारी तसेच ⇨तमाशा ही पारंपरिक नृत्यनाट्ये ग्रामीण समाजात फार लोकप्रिय आहेत. ⇨ लावणी नृत्य हे तमाशाचे खास आकर्षण म्हणता येईल. ⇨ फुगडी, पिंगा, आगोटापागोटा, कोंबडा हे स्त्रियांचे पारंपरिक नृत्यप्रकार विशेषत्वाने रूढ आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ "भारत (नृत्य)". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-11-06. 2022-03-11 रोजी पाहिले.[permanent dead link]