प्राण्यांचे लसीकरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


पाळीव व दुभत्या प्राण्यांना रोगबाधा होऊ नये म्हणून त्यांना रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात येते.यासाठी तज्ञ पसुवैद्यक डॉक्टरची गरज असते.

आवश्यकता[संपादन]

पाळीव प्राणी हे फाशी,फऱ्या,घटसर्प,धनुर्वात,स्तनदाह,हळवा,आंत्रिविषार,आदी जीवघेणे रोग तसेचगर्भपात,तोंडखुरी,बुळकांडी आदी रोगांना बळी पडू नये व आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून प्राण्यांचे लसीकरण आवश्यक आहे. रोगाची लागण झाल्यावर लसीकरण करणे योग्य ठरत नाही. लसीकरणावर खर्च केलेला पैसा व्यर्थ जाण्याची शक्यता असते. लसीकरणानंतर जनावरांमध्ये आवश्यक प्रतिबंधक शक्ती तयार होण्यास वेळ लागतो.सबब, पुढील काळात होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्यापूर्वीच लसीकरण करणे आवश्यक आहे.एखाद्या रोगाची साथ आल्यावर नंतर लस दिल्यास ते फायदेशीर ठरत नाही कारण लसीचा प्रभाव होण्यास २-३ आठवडे सहज लागतात.

कोणत्या वयात करावे[संपादन]

  • घटसर्प व फऱ्या रोगाची लस ही सहा महिने वयाच्या वासरास किंवा त्यापेक्षा मोठ्या जनावरांना द्यावी.

पूर्वतयारी[संपादन]

लसीकरण करण्यापूर्वी काही पूर्वतयारी आवश्यक असते.लसीकरणाच्या ७ दिवस आधी आंतर-परजीवी जंतूंचा नायनाट करण्यास जंतूनाशक औषध देणे आवश्यक आहे.तसेच बाह्य-परजीवी जंतू जसे-गोचिड, गोमाशा, पिसवा आदींचाही कीटकनाशक वापरून बंदोबस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा लसीकरण निष्प्रभ ठरण्याची व विनाकारण खर्च होण्याची शक्यता असते.

खबरदारी[संपादन]

  • योग्य व नामांकित कंपनीची लस निवडणे आवश्यक आहे कारण अशा लसींची, ती बाजारात विक्रीस आणण्यापूर्वी आवश्यक ती चाचणी केल्या जाते. त्यामुळे अशी लस देण्याने लसीकरण विफल होण्याची शक्यता कमी असते.
  • लस विकत घेतांना ती कालबाह्य तर नाही याची पूर्ण खात्री करून घ्यावी. तसेच विकत घेतल्यावर ती जनावरांना देण्यापूर्वी, त्या औषधीचा बॅच क्रमांक नोंदवून ठेवावा.
  • काही लसींना त्या एखाद्या विशिष्ट तापमानावरच ठेवणे आवश्यक असते. त्याची हयगय झाल्यास, लस खराब होण्याची शक्यता असते.खुरी,श्वानदंश, धनुर्वात आदींच्या लसी बर्फात ठेवणे जरुरी असते. त्याची योग्य काळजी घ्यावी.जनावरांना अशा लसी देईपर्यंत त्या बर्फातच ठेवाव्यात.आणलेल्या लसींचा लगेच वापर लाभदायक असतो.
  • लसीकरण हे निरोगी जनावरांनाच करणे आवश्यक आहे.
  • लसीकरण हे सकाळी अथवा संध्याकाळी (कमी तापमान असतांना)करावे.
  • लसीकरणासाठी वापरण्यात येणारी सुई ही निर्जंतूक असणे आवश्यक आहे.
  • लसीच्या उघडलेल्या बाटलीतील लस साठवून पुन्हा वापरू नये.
  • योग्य जागी अथवा मार्गात लसीकरण करणे जरूरी आहे.
  • कळपातील अथवा गावातील सर्व जनावरांना एकाच दिवशी लसीकरण करणे आवश्यक आहे.

लसीकरणापश्चातची दक्षता[संपादन]

  • जनावरांना हलके काम द्यावे.त्यायोगे त्यांचे शरीरावर ताण पडणार नाही.
  • त्यांना आहार चांगला द्यावा.
  • टोकाचे वातावरणापासून (अति थंड अथवा अति गरम) त्यांचे रक्षण करावे.
  • लसीकरणाने जनावरांना ताप येणे आदी शारीरिक प्रतिक्रिया घडू शकतात. पण ते स्वाभाविक आहे.

लसीकरणाच्या गाठी[संपादन]

घटसर्प व फऱ्या रोगाची लस दिल्यावर जनावरांच्या मानेवर गाठी येऊ शकतात.त्या येतात म्हणून लसीकरण टाळू नये.त्या ठिकाणी हलकेच चोळावे व गाठीस कोमट पाण्याने अथवा बर्फाने शेकले तर अशी गाठ जिरून जाते.

दूध कमी होणे[संपादन]

दुभत्या जनावरांचे दूध कमी होते, पण ते तात्कालिक असते.

लसीकरण फसण्याची कारणे[संपादन]

  • लसीची मात्रा योग्य प्रमाणात न देणे
  • लसीची साठवण योग्य रितीने न करणे
  • लसीकरणाच्या कालावधीत अनियमितता असणे
  • आंतरजीवी व बाह्यजीवींचा प्रादुर्भाव
  • लसीकरणाचे वेळी जनावर अशक्त अथवा रोगग्रस्त असणे.

लसीकरणाचा कालावधी[संपादन]

लसीकरणाचा कालावधी हा साधारणतः खालीलप्रमाणे असतो, तरीही यासाठी पशुवैद्यक डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

लसीकरणाचा कालावधी दर्शविणारा तक्ता
अ.क्र. रोगाचे नाव लसीकरणाची वेळ
(पशुवैद्यकीय सल्ल्याने)
शेरा
घटसर्प एप्रिल-मे महिन्यात वर्षातून एकदा
(संकरीत गायी म्हशींना वर्षातून दोनदा)
फऱ्या एप्रिल-मे महिन्यात -
फाशी मे महिन्यात वर्षातून एकवेळेस (काळपूरी रोगाचा प्रादुर्भाव असल्यासच)
लाळ्या व खुरकूत वर्षातून दोनदा मार्च व सप्टेंबर महिन्यात
फक्त शेळ्या-मेंढ्यांसाठी
काळपूरी फेब्रुवारी महिन्यात वर्षातून एकदा फक्त रोगग्रस्त भागातच द्यावी
घटसर्प मार्च महिन्यात वर्षातून एकदा
देवी वर्षातून एकदा डिसेंबर महिन्यात
(गाभण मेंढ्यांना ही लस देऊ नये)


बाह्य दुवे[संपादन]