पाळीव प्राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाळीव प्राणी

प्राणी पाळणे – डोमिस्टिकेशन- हा इंग्रजी शब्द लॅटिन ‘डोमेस्टिकस’ या शब्दापासून तयार झालेला आहे. प्रत्यक्षात, 'पाळणे' याचा अर्थ एखादा समुदाय, प्राणी किंवा वनस्पति मानवी संपर्कात कृत्रिम रीत्या आणून नियंत्रित करणे. जैवविविधतेमध्ये पाळीव जाती (स्पीसिस) याचा जीवशास्त्रातील अर्थ ‘मानवाने त्याच्या उपयोगासाठी आणि वापरासाठी नियंत्रित केलेली’. अशा जातीमधील नैसर्गिक उत्क्रांतीमध्ये मानवाने प्रयत्नपूर्वक बदल किंवा अडथळा आणलेला असतो. नैसर्गिक निवडीविरुद्ध पाळीव प्राण्यामधील उत्क्रांतीची पद्धत म्ह्णजे प्रयत्नपूर्वक केलेली कृत्रिम निवड होय. या पद्धतीने मानवाने विविध कारणासाठी वनस्पती आणि प्राणी निवडले आहेत. उदाहरणार्थ,अन्न, कापूस, लोकर, रेशीम अशी उत्पादने, वाहतूक. संरक्षण, युद्ध, शास्त्रीय संशोधन, करमणुकीचे साधन, किंवा चक्क एखादी वस्तू प्राणी, वनस्पति आपल्याकडे असावी, एवढ्या इच्छेने जवळ बाळगलेली वगैरे.

शोभेची झाडे किंवा वनस्पती'. फक्त चांगल्या दिसताहेत अशा वनस्पतिना ऑर्नॅमेंटल प्लांटस म्हणतात. गुलाब, क्रोटॉन, जास्वंद, फुलझाडे,पाने चांगली दिसतात,फुले नाजूक विविध रंगाची दिसतात. म्हणून लावलेली अनेक झुडुपे, रोपे यांची मोठी यादी झालेली आहे. बागा आणि उद्याने येथे केवळ शोभेची लावलेली झाडे म्हणजे वनस्पति संवर्धन. इंग्रजीमध्ये पशुपालन यासारखा वनस्पतीच्या बाबतीतील शब्द आहे ‘cultigen’. मराठीमध्ये यासाठी ‘संवर्धित वनस्पति’ अशा शब्द वापरता येईल. संवर्धित वनस्पति आणि वन्य जाति यामध्ये संवर्धन केल्याने फार बदल झालेला नाही. प्राणी पाळताना ते कशासाठी पाळले आहेत यावरून त्यंच्यामध्ये सूक्ष्म फरक पडतो. केवळ सोबतीसाठी पाळलेले प्राणी म्हणजे ‘पेट’.अन्न आणि वाहतूक किंवा कामासाठी पाळलेले प्राणी ‘लाइव्ह स्टॉक’ किंवा कृषि वापराचे पशु 'पशुपालन'.

'प्राणी पालनाची पार्श्वभूमि' डार्विनच्या म्हणण्याप्रमाणे दररोजच्या मानव आणि त्याच्यासभोवतीलचे प्राणी यांच्यामधील संपर्कामुळे प्राणी पालनाचा प्रारंभ चालू झाला. मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या देखरेखीखाली संपर्कात आलेल्या प्राण्यांचा संकर घडवून आणल्यामुळे प्राणीपालनाचा प्रारंभ झाला. निसर्ग निवड आणि कृत्रिम निवड यामध्ये कृत्रिम निवडीचे तंत्र तयार झाल्याने प्राणी पालनामुळे अपेक्षित बदल असलेली संतति जोपासणे याची खात्री निर्माण झाली. अशा प्रकाराचे उत्तम उदाहरण गव्हाचे आहे. वन्य गहू बियाणे तयार झाले म्ह्णजे . गव्हाच्या या ओंबीमधील दाणे तयार झाल्यानंतर जमिनीवर वितरित होत नाहीत. गहू लागवडीमागे परस्पर झालेले हे उत्परिवर्तन (म्यूटेशन) कारणीभूत आहे. शेती करताना या उत्परिवर्तनाचा उपयोग करण्यात आला. परिणाम संवर्धित पीक. केवळ नैसर्गिक उत्परिवर्तन हेच संवर्धित पिकाचे उदाहरण नाही . अनेक वेळा मानवी हस्तक्षेप केल्याने कृत्रिम निवड करून इच्छित वाण निर्माण झाले आहेत. लांडग्यांच्या कळपामधील काहीं कमी हिंस्र लांडगे मानवी वस्त्याजवळ आल्याने माणूस आणि लांड्गे यांच्या साहचर्यामुळे आजच्या पाळीव कुत्र्यांची प्रजाती तयार झाली. अनेक पिढ्यांच्या साहचर्याने हे घडले आहे. मानवी वस्त्याजवळ आलेले लांडगे शिकारीनंतर फेकून दिलेला भाग खाऊन मोठे झाल्यानंतर त्यांची पिले आपापल्या कुटुंबाबरोबर मानवी संपर्कात येत राहिली. निश्चित खाद्य मिळते हे समजल्यावर लांदग्यानी उपजत प्रेरणेमुळे जेथे वसती आहे तेथे राहणे पसंत केले. आजच्या कुत्र्यांचे हे पूर्वज हळू हळू मानवावर अधिक अवलंबून राहू लागले. धोक्याची सूचना देणे, शिकारीस मदत करणे, वासावरून शिकारीचा माग काढणे ही लांडग्यांची उपजत प्रेरणा .त्याच्या बदल्यात इतर हिंस्र प्राण्यापासून संरक्षण, निवाऱ्याची ऊब आणि अन्न हे मानवापासून लांडग्यास मिळाल्याने तीस हजार ते दहा हजार वर्षापासूनचा कुत्रा आणि माणूस यांचे सहजीवन निर्माण झाले. कुत्रा आता वन्य प्राण्यांच्या समवेत राहण्याचे कौशल्य हरवून बसला आहे. ढोल हा रानटी कुत्रा आजही माणसाच्या सहवासात येणे टाळतो. आजच्या काळात परस्परावर अवलंबून असलेल्या लांडगा आणि माणूस लांडगा आणि पाळीव कुत्रा या सह जाती आहेत (सब स्पेसीज )

प्राणी पालन प्रयोग : अगदी अलीकडे नियोजनपूर्वक निपज करून प्राणी पालन कसे करता येते याचा एक प्रयोग करून पाहण्यात आला. 1950 मध्ये एका रशियन दिमित्री के बेल्याएव या शास्त्रज्ञाने सिल्वर फॉक्स (Vulpes vulpes)चे जाणीवपूर्वक प्रजनन करण्याचे ठरवले. प्रजननासाठी जे कोल्हे माणसासना घाबरता माणसाच्या जवळ येतील अशांची निवड केली. काहीं पिढ्यामध्ये त्यानी आणि त्यांच्या सहकार्यानी वाढवलेल्या राखाडी कोल्ह्यांचा समूह रानटी तांबड्या कोल्ह्याहून सर्वस्वी वेगळा असल्याचे दिसले. माणूस जवळ आल्यानंतर ते शेपूट हलवून त्यांची काळजी घेणाऱ्याचे हात चाटत. लहान कवटी, वळलेली शेपूट, आणि खाली पडलेले कान ही कुत्र्यामधील सर्व वैशिष्ठ्ये त्यांच्या मध्ये दिसायला लागली. हा प्रयोग यशस्वी जरी झालेला असता तरी मानवी सान्निध्यात प्रजनन केल्यांतर प्राणी प्रत्येक वेळी माणसाळेलच असे नाही. वन्य अनेक प्राण्याना माणसाळवण्याचे प्रयोग अयशस्वी झाले आहेत. झेब्रा हे त्याचे उदाहरण . घोडा, गाढव आणि झेब्रा हे तीनही प्राणी इक्विडी कुलातील आहेत. या पैकी फक्त घोडा आणि गाढव या दोनच प्रजाती माणसाळल्या. झेब्र्याचा संकर गाढव आणि घोडा या दोन्ही प्राण्याबरोबर होतो. पण झेब्रा मानवी वस्तीजवळ येतसुद्द्धा नाही. मानवी इतिहासात आशियायी हत्ती, घोडा ,गायबैल, शेळी मेंढी, रेशीम कीटक, डुक्कर, रेडा, म्हैस,लामा, रुई, एक आणि दोन वशिंडांचा उंट, याक आणि रेनडियर एवधेच प्राणी माणसाळवण्याचे श्रेय माणसास आहे.

प्राणी पाळण्यासाठीची सहा वैशिष्ठ्ये 1. बदलते अन्न: ज्या प्राण्यांचे अन्न पूर्णपणे वेगळे आहे असे प्राणी पाळता येत नाहीत. उदाहरणार्थ बेडूक. बेडूक फक्त जिवंत किडे खात असल्याने त्याला कृत्रिमरीत्या अन्न देता येत नाही. या उलट मका, गहू, यांच्या मानवी वापराच्या भागाशिवायचा अवशिष्ट भाग, ज्वारीचा कडबा, गवत अशावर अवलंबून असलेले प्राणी पाळण्यास अधिक योग्य. कुत्रा प्रत्यक्षात मांसभक्षी असला तरी आपण शिजवलेल्या अन्नामधील भाग तो सहज खातो. असे प्राणी पाळण्यासाठी फार खर्च येत नाही. 2. वाढीचा वेग: मानवी वाढीच्या वेगाहून अधिक वेगाने वयात येणारे प्राणी पाळण्यायोग्य आहेत. त्यांचे प्रजोत्पादन नियंत्रणामध्ये आणता येते. घोडा, गाय, म्हैस, कुत्रा, पाळीव मांजरासारखे प्राणी त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा वितात. त्यांची काळजी घेणे आणि त्यापासून उत्पन्न मिळवणे सोपे जाते. पण हत्ती उपयोगात येण्यासाठी अधिक कालावधि लागतो. त्यामुळे हत्ती पालनाचा खर्च वाढत जातो. 3. बंदिस्त क्षेत्रामध्ये प्रजनन: पांडा, सांबर , रानडुक्कर बंदिस्त क्षेत्रामध्ये सहसा प्रजनन करीत नाहीत. प्रजननासाठी त्याना त्यांच्या मूळ अधिवासामध्ये राहणे आवश्यक असते. गर्दीच्या ठिकाणी किंवा पिंजऱ्यामध्ये त्याना जिवंत ठेवता येते पण त्यांची प्रजनन क्षमता क्षीण असते. पिलांचा सांभाळ करण्याची त्यांची तयारी नसते. असे प्राणी पाळता येत नाहीत. प्राणिसंग्रहालयामध्ये ठेवले तरी त्यांच्या जोड्या बदलाव्या लागतात. 4. स्वभाववैशिष्ठ्ये : काही प्राणी स्वभावतः भांडखोर असतात. त्यामुळे मानवास त्यांच्यापासून धोका आहे. आफ्रिकन गव्याचे अनाकलनीय वर्तन आणि माणसावर कधीही हल्ला करण्याची प्रवृत्ति असल्याने भारतीय म्हैस आणि रेडा शेता कामासाठी चीन.मायनमार, इंडोनेशिया आणि भारतात माणसाळला. अमेरिकेत बायसन संरक्षित प्रदेशामध्ये वाढवला जातो. पण तो सुद्धा धोकादायक गटात मोडला जातो. अमेरिकन पेकरी,आफ्रिकन रान डुक्कर हे सुद्धा मानवाबरोबर राहण्यास धोकादायक आहेत. 5. क्षोभक स्वभाव: बरेच वन्य प्राणी पकडून एकत्र किंवा संरक्षित क्षेत्रामध्ये ठेवल्यास जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा पळून जाण्याचा प्रयत्न करतात. गॅझेल (चिंकारा) जातीचे हरीण भली मोठी उडी मारून कुंपणावरून पसार होते. पाळीव मेंढी त्याच्या क्षेत्रामध्ये इतर प्राणी आल्यास त्वरित गोंधळ घालते. तरीपण मेंढ्या आणि शेळ्यामध्ये कळप प्रवृत्ति असल्याने एकत्र राहतात. त्याना पाळणारा माणूस किंवा कुत्रा यांच्या संगतीमध्ये एकत्र राहण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्याना पाळणे सोपे होते. 6. समाजप्रिय प्राणी आपापल्या क्षेत्रातील नायकाचे नेतृत्व मान्य करतात. त्यामुळे थोड्याच दिवसात पाळणाऱ्या माणसाच्या नेतृत्वाखाली राहणे त्याना जमते. उदाहरणार्थ घोडा. वरील यादी मर्यादित आहे. कारण पाळीव प्राण्याच्या जातीवर होणाऱ्या दीर्घकालीन परिणामांचा यामध्ये विचार केलेला नाही. पोपट, व्हेल आणि बहुतेक मांसभक्षी प्राणी बंदिस्त जागेमध्ये जन्मले आणि सांभाळले तरी त्यांच्यामधील वन्य उपजतप्रेरणा नष्ट होत नाही. वन्य प्राणी निसर्गत: भित्र्या स्वभावाचे असतात. स्वतःचे संरक्षण ही त्यांची उपजत प्रेरणा असते. याचे कारण त्याना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये असणारा इतर शत्रूपासून धोका. पाळीव प्राण्यामध्ये ही उपजतप्रेरणा नाही. त्याना माणसाने शत्रूपासून दिलेल्या संरक्षणामुळे पाळीव प्राण्यामधील भित्रेपणा संपलेला आहे. तरी पण काहीं पाळीव प्राण्यामध्ये संकटात सापडल्यानंतर प्रतिकार करणे टिकून राहिलेले आहे. पाळीव म्हैस किंवा रेडा सिंहाचा चांगलाच प्रतिकार करतो. वेळ प्रसंगी रेड्याने आफ्रिकन सिंहाला ठार केल्याची उदाहरणे आहेत. अन्न आणि पाण्याच्या शोधात पाळीव प्राण्याना भटकावे लागत नाही. मार्कसन बेटस या प्राणिशास्त्रज्ञाने 1960 मध्ये लिहिलेल्या पुस्तकामध्ये पाळीव प्राण्यामध्ये झालेल्या जाति बदलावर एक प्रकरण लिहिलेले आहे. कोंबडीची उडण्याची शक्ती नष्ट झाली आहे. बहुतेक पाळीव प्राण्यामधील वर्षातील ठरावीक कालावधिमधील प्रजनन थांबून कोणत्याही हंगामात त्यांचे प्रजजन होते. आपापले क्षेत्र रक्षण ही वन्य प्रेरणा आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे प्राणी पाळणे हाच मुळी प्राणी पालनाचा प्रारंभ आहे.

प्राणी पालन पायऱ्या : हत्तीच्या वाढीसाठी लागणारी वर्षे आणि परिसरातील वन्य आणि पाळीव हत्तींची संख्या विचारात घेतली तर दोन्ही समूहातील अंतर फारसे स्पष्ट नाही. हाच प्रश्न घरातून पसार झालेले मांजर भटके बनते त्यावेळी येतो. अधिकाधिक प्राणी पाळण्यामुळे एका नव्या वर्गीकरणाचा उदय झाला आहे. 1. वन्यः वन्य प्राणी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय जगण्यास सक्षम . 2. संरक्षित क्षेत्रामध्ये वाढलेले / वन्य क्षेत्रामधून पकडून बंदिस्त केलेले. :प्राणिसंग्रहालयामध्ये वन्य प्राणी बंदिस्त केलेले असतात. त्यांची काळजी प्राणिसंग्रहालयामध्ये घेतली जाते.पण संरक्षित क्षेत्रामधील प्राण्यावर मानवी नियंत्रण सहसा असत नाही. उदाहरणार्थ गीर येथील सिंह अरण्य. आशियायी हत्ती, अस्वल आणि स्लॉथ अस्वल. यांच्या संरक्षित क्षेत्रामध्ये त्यांचा अधिवास आहे. त्यांच्या नेहमीच्या सवयीवर आणि प्रजननावर कोणतेही निर्बंध नाहीत. शक्यतो त्यांचे नैसर्गिक खाद्य त्या संरक्षित क्षेत्रामध्ये उपलब्ध असेल याची काळजी फक्त घेतली जाते. बऱ्याच वेळा प्राणिसंग्रहालयामध्ये संरक्षित क्षेत्राबाहेरील किंवा बंदिस्त ठिकाणी जन्मलेले वन्य प्राणी ठेअव्लेले असतात. 3. व्यापारी उपयोगासाठी वाढवलेले प्राणी: वन्य क्षेत्रामधून पकडलेले किंवा निपज करण्यासाठी बंदिस्त केलेले. घोडे अस्गा पद्धतीने मोठ्या कुरणामध्ये ठेवलेले असतात. अन्न, पाळीव प्राण्यांचा पुरवठा करण्यासाठी किंवा व्यापारी पद्धतीने विक्रीसाठी उपलब्द केलेले प्राणी. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाघांची हाडे टायगर वाइन बनविण्यासाठी लागतात. चीनमधील सर्व वाघ संपलेले आहेत. तेथे वाघ प्रजनन व्यापारी पद्धतीने घेतले जाते. वाघाचा लिलाव करून त्याची हाडे विक्रीचा व्यवसाय केला जातो. भारतात अशाच प्रकारचे क्रोकोडाइल सेंटर आहे. ठरावीक दिवसानंतर त्यातील काही सुसरी विकल्या जातात. शहामृग, हरीण, मगर, मोती कालवे, आणि अमेरिकन पाळीव प्राण्यामध्ये लोकप्रिय असलेला बॉल पायथॉन (अजगर) , टेरांटुला नावाचा कोळी याना सतत मागणी असते. जगभरातील वन्य प्राणी कायद्यानुसार वन्य प्राणी प्राणिसंग्रहालयात ठेवण्यास बंदी आहे. पण प्राणिसंग्रहालयात जन्मलेले प्राणी देवाणा घेवाण तत्त्वानुसार उपलब्ध करून दिले जातात. 4. पाळीव : अशा प्राण्याना मुद्दाम मानवी देखरेखीखाली कित्येक पिढ्या वाढवले जाते. काहीं पिढ्यानंतर त्यामध्ये वर्तनात बदल होतो. घोडा, चिपांझी, डुक्कर, मांजर, गाणारे पक्षी, कबूतर, गोल्ड फिश, रेशीम कीटक, कुत्रा, शेळी, मेंढी, कोंबडी, लामा, गिनी पिग, मिथुन, उंट असे अनेक पाळीव प्राणी पिढ्यानपिढ्या माणूस वाढवतोय. यामध्ये आता भर पडली आहे ती प्रयोगशाळेतील उंदीर, गिनी पिग आणि प्रयोगशाळेतील माकडांची.

प्राणी पालन मर्यादा : योग्य असे गुणधर्म शोधून फक्त असेच प्राणी पाळायचे याला काहीं मर्यादा आहेत. एकदा पिढ्यानपिढ्या एक प्राणी जाति पाळावयास प्रारंभ केला म्हणजे त्याचा आकार लहान होतो. रंग बदलतो. शरीरातील मेदाचे प्रमाण वाढते. स्नायू कमकुवत होतात. हाडे ठिसूळ होतात. मेंदू लहान, वर्तन सौम्य पाळीव प्राणी वयात येण्याचा काळ लांबतो. पाळीव प्राण्यामधील जनुकीय विविधता कमी झाल्याने त्यांच्यामधील आजाराचे प्रमाण वाढते. हे बदल एकोणीसाव्या शतकामध्ये प्राणी प्रजनन करणाऱ्यानी लिहून ठेवले. विसाव्या शतकात ते प्रयोगाने सिद्ध झाले. पाळीव प्राण्यापासून होणारा एक घातक परिणाम म्ह्णजे पाळीव प्राण्यापासून माणसास होणारे आजार. पॉक्स विषाणू, ट्युबरक्युलोसिस (क्षय), गोवर; डुकरापासून आणि बदकापासून एंफ्ल्युएंझा ; घोड्यापासून उद्भवणारा –हायनोव्हायरस. केवळ एकट्या कुत्र्यामुळे माणसास साठ विविध आजार होऊ शकतात. अनेक परजीवी पाळीव प्राण्यामधून माणसामध्ये संक्रमित झाले आहेत. पाळीव प्राणी सतत मानवी संपर्कात असल्याने पाळीव प्राण्यामधील परजीवीना मानव हा आणखी एक आश्रित मिळाला. योग्य ती स्थिति उत्पन्न झाली म्हणजे त्यांचामध्ये आवश्यक बदल होऊन मानवी शरीरामध्ये चटकन शिरकाव करणे त्याना सोपे जाते.