पंचकर्म चिकित्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वमन, विरेचन,बस्ती,नस्य,रक्तमोक्षण या पाच क्रिया ज्या चिकित्सेत आहेत ती चिकित्सा पंचकर्म चिकित्सा होय.

वमन[संपादन]

अनेक प्रकारचे त्वचारोग, दमा, सांधेदुखी, सूज, आम्लपित्त, इत्यादी आजारांवर वमन (उलटी) करवणे हिताचे असते. अन्नमार्गातला कफ घालवून स्वच्छ, रिकामा करणे हे वमनक्रियेचे उद्दिष्ट आहे. अशी स्वच्छता वेळोवेळी न केल्यास अन्नमार्गात कुजण्याची क्रिया होते. त्यातून निर्माण होणारे विषारी पदार्थ निरनिराळे आजार उत्पन्न करतात असे आयुर्वेदाचे सांगणे आहे.

वमनक्रिया तज्ज्ञांकडून शिकून घेणे आवश्यक आहे. वमनक्रिया स्वतःवर करून पाहावी म्हणजे आत्मविश्वास येईल.

वमन क्रियेसाठी अन्नमार्गात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात स्राव पाझरवून त्यावर कडू गिळगिळीत पदार्थ देऊन उलटी करवली जाते. छोट्या गावात कडू पडवळ, कडू दोडका, कडू इंद्रावण, इत्यादी फळे सहज मिळतात, ती यांत उपयोगी पडतात.

आधी तीन-चार दिवस थोडे थोडे तूप पाजावे.

वमनाआधी दही, उडदाच्या डाळीचे वरण खावयास द्यावे.

यावर तीन चार तास गेल्यावर मदनफळाचे चूर्ण किंवा इंद्रावण एक ग्रॅम + एक चमचा काढा किंवा कडू दोडके किंवा पडवळ यांचा काढा पाजावा.

यानंतर दोन ते पाच मिनिटांनी उसाचा रस (एक -दीड लिटर ) पाजावा, म्हणजे भरपूर घाम येऊन भडभडून उलटी होते. उलटीत चिकट तार, फेस येणारे स्राव पडतात.

असे चांगले वमन झाल्यावर लगेच काही खाऊ देऊ नये. वमन घेतल्याच्या दिवशी भूक लागल्यावर केवळ साळीच्या लाह्या खाव्यात. त्यांना साजूक तुपाची फोडणी देऊन गरम गरम खाव्यात. तहान लागल्यास गरम पाणीच प्यावे.

दुसरे दिवशी तांदळाची पेज, मग मऊ भात त्यानंतर मुगाच्या डाळीपासून बनवलेली खिचडी आणि मग गव्हाचे गरम फुलके, पोळी अशा पद्धतीने आहार दोन-तीन दिवसांत वाढवत जाऊन पूर्ववत आणावा. यालाच संसर्जनक्रम असे म्हणतात. वमनानंतर काही दिवसांत वरील प्रकारच्या आजारांत फरक पडतो.

विरेचन[संपादन]

विरेचन म्हणजे रुग्णास आधी तीन-चार दिवस रोज तूप किंवा तेल पाजून नंतर जुलाबाचे औषध देणे. पित्तदोषाच्या आजारांना (आग, जळजळ, लालसरपणा ही लक्षणे असणाऱ्या आजारांत) विरेचन सांगितले जाते. विरेचनाचा उद्देशही पित्त घालवून कोठा साफ रिकामा करणे हाच आहे. वमनात मुख्यत्वेकरून जठर, इत्यादी वरचा अन्नमार्ग स्वच्छ होतो. याउलट विरेचनात आतडी वगैरे खालचा अन्नमार्ग साफ होतो.

विरेचनासाठी आधी तीन-चार दिवस तित्तक तूप (म्हणजे कडू औषधांनी तयार केलेले तूप) १५ ते २० मिलिलिटर या प्रमाणात रोज सकाळी रिकाम्या पोटी घेण्यास सांगावे.

संध्याकाळी जेवणानंतर दोन-तीन तासांनी त्रिफळा चूर्ण (२ ते ३ ग्रॅम) एक कप गरम पाण्यातून द्यावे. जेवणानंतर हे चूर्ण देणे जास्त परिणामकारक ठरते.

पहाटेपासून सकाळपर्यंत दोन-तीन जुलाब होतात. हलका कोठा असणाऱ्यांना त्रिफळा चूर्णाऐवजी बहाव्याचा दोन-तीन ग्रॅम मगज पाण्यात कुस्करून दिला तरी अपेक्षित परिणाम होतो.

सकाळी जुलाब झाल्यानंतर भूक लागली तरी ४-५ तास काही खाऊ नये. नंतर मूग-तांदळाची पातळ खिचडी खायला द्यावी.

सर्वसाधारणपणे वमनक्रियेनंतर विरेचन दिले जाते. या दोन्हींचा परिणाम होऊन अन्नमार्ग साफ होतो.

बस्ती[संपादन]

बस्ती म्हणजे तैलयुक्त औषधे (कधी केवळ तेल) गुदद्वारातून मोठया आतडयात सोडणे. तेथून तेल शरीरात शोषले जाते. या स्नेहनाने (तेलकट पदार्थाच्या वापराने) आतडयातील कोरडे मळाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो. बस्तीमध्ये यासाठीच आहारातले अनेक पदार्थ वापरले जातात. या पदार्थाच्या वापराप्रमाणे बस्तीचे प्रकारही पाडले आहेत.

आपण एनिमाबद्दल (गुदद्वारात साबण पाणी) ऐकले असेल. एनिमाचा उद्देश गुदाशयातील आणि त्यामागच्या भागातील विष्ठा, मळ काढून टाकणे हा असतो. मात्र बस्ती वेगळी असते. एनिमामध्ये साबण-पाणी विष्ठेबरोबर बाहेर पडते. याउलट बस्तीत दिलेला पदार्थ आत राहून शोषला जातो. एनिमा छोटया दोन-तीन इंच नळीद्वारे दिला जातो तर बस्ती देताना लांब रबरी नळी वापरली जाते. एनिमा देताना अर्धा-पाऊण लिटर पाणी वापरले जाते, मात्र बस्तीत जास्तीत जास्त १५० मिलिलिटर मिश्रण दिले जाते. ४० ते६० मिलिलिटरची बस्ती (लहान बस्ती) मात्रा बस्ती म्हणून ओळखली जाते. मात्रा बस्ती देणे सोपे असते.

लहान मुलांमध्ये-अगदी नवजात अर्भकालाही बस्ती देता येते. अपुऱ्या दिवसांच्या नवजात बाळांची वाढ नियमित बस्तीमुळे सुधारते असा अनुभव आहे. फक्त शरीराच्या आकारमानाप्रमाणे आतडयाचा आकार लहान मोठा असतो. हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आपल्यालाही बस्ती शिकता येईल.

बस्तीआधी त्या व्यक्तीस मलमूत्र विसर्जन करून येण्यास सांगतात. बस्तीसाठी औषधी काढे, सैंधव, वनस्पतीची कुटलेली चटणी, तेल, इत्यादी वापरून मिश्रणे तयार केली जातात. हे सर्व मिश्रण पिचकारीमार्फत मोठया आतडयात सोडले जाते. यासाठी त्या व्यक्तीला डाव्या कुशीवर झोपवावे. पायथ्याची बाजू किंचित उंच करून गुदद्वारातून एक रबरी नळी (8 ते 13 क्रमांकाची लघवी काढण्याची नळी) तेलाने बुळबुळीत करून 3 ते 5 इंच आत सारावी. त्यानंतर नळीच्या टोकाला पिचकारी जोडून दांडा दाबून मिश्रण आत ढकलावे.

आत द्यायचे मिश्रण शरीराच्या तापमानापेक्षा किंचित गरम असावे. असे मिश्रण पिचकारीने नळीने हळूहळू आत सोडले जाते. पिचकारीऐवजी सलाईनप्रमाणे बाटली वर टांगून त्याला नळी जोडूनही मिश्रण थेंब थेंब आत सोडता येते. असे करायचे असेल तर चिकटपट्टीने रबरी नळी गुदद्वारास चिकटवून ठेवावी लागेल. या पद्धतीने बस्ती आत टिकून राहते.

सुमारे ६ ते २४ तासांत हे मिश्रण आतडयातून पूर्ण शोषले जाते, जेवढा वेळ बस्ती आत राहील तेवढे चांगले. बस्ती क्रियेनंतर पचन सुधारते. बस्तीने नेहमीचे अन्न चांगले अंगी लागते असा अनुभव आहे.

नस्य[संपादन]

नस्य म्हणजे नाकात औषधी थेंब किंवा चूर्ण टाकणे. नाकाच्या पोकळीत सायनसची तोंडे उघडतात. नाकातील नेहमीचे स्राव अंतर्भाग ओलसर ठेवतात. यामुळे फुप्फुसात जाणारी हवा ओलसर दमट होते. यामुळे फुप्फुसांना कोरडेपणा येत नाही. मात्र हा स्राव जास्त प्रमाणात निर्माण झाला तर तो नाकपुडयांच्या बाजूच्या कप्प्यांमध्ये साठून राहतो.

हा चिकट पदार्थ हवेच्या मार्गातही येतो. शरीर-डोके उभ्या अवस्थेत असताना हे स्राव बाहेर पडणे अवघड असते. मात्र डोके लोंबते ठेवले तर हे स्राव बाहेर पडायला मदत होते. यासाठी डोके अगदी उलटे न करता आडवे झोपवून मान, डोके खाटेच्या बाहेर लोंबकळू दिले की पुरते.

आधी त्या व्यक्तीचे (डोळे सोडून) गाल, नाक, कपाळाचा भाग तेल चोळून कपडयाने शेकल्यास सायनस पोकळयांमधील स्राव सुटायला मदत होते. यानंतर त्या व्यक्तीस हाताचे तळवे एकमेकांवर चोळायला सांगून थेंब सोडावेत.

या अवस्थेत नाकात काही औषधी थेंब टाकल्यास हे स्राव सुटायला मदत होते. तेल, मिठाचे पाणी (अश्रूंच्या इतके खारट), सुंठ-शिकेकाई उगाळलेले सौम्य पाणी, इत्यादींचे थेंब वापरले जातात. प्रत्येक नाकपुडीत याचे दोन-तीन थेंब टाकलेले पुरतात. थेंब टाकताना थोडा वेळ झणझणते. पण याने काही अपाय होत नाही. या अवस्थेत थेंब टाकल्यावर थेंब डोक्याकडे जातात हे त्या व्यक्तीस स्पष्ट जाणवते (या अवस्थेत थेंब घशात उतरत नाहीत.)

या अवस्थेत डोके दोन-तीन मिनिटे तसेच राहू द्यावे. मग उठून गुळण्या करावयास सांगावे. डोळा, कान, नाक यांचे आरोग्य सुधारण्यास, सायनस मोकळे होण्यास, डोकेदुखी (काही प्रकारची) थांबण्यास नस्य चांगले उपयोगी आहे. दीर्घकाळची सायनसदुखी नस्य क्रियेने सुधारते असा अनुभव आहे. मिरगी-फेफरे (फिट येणे) यांसारख्या आजारांच्या उपचारात जाग आणण्यासाठी नस्य फारच उपयुक्त आहे.

रक्तमोक्षण[संपादन]

रक्तमोक्षण म्हणजे रक्त काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण आधुनिक पद्धतीने सुई, सिरिंज वापरूनही रक्तमोक्षण करता येते. पण त्वचाविकारात, गळू पिकले असल्यास मात्र जळवांचा उपयोग होत नाही. रक्तमोक्षण करायचे असल्यास जळूचा वापर अधिक योग्य आहे. इतर उपचारांत सुई, इत्यादी वापरण्यास हरकत नाही. रक्तदान करण्यानेही रक्तमोक्षणाचे काम होते. या दृष्टीने पाहू जाता रक्तदान करणे हे रक्तदात्यालाही उपकारक आहे.

जळू वापरून रक्तमोक्षण करणे अगदी सोपे आहे. पण यासाठी जळवा पाळणे आवश्यक आहे. नद्या-नाल्यांच्या दलदलीत, ऑगस्ट ते डिसेंबर काळात या जळवा मिळू शकतील. त्या रुंद तोंडाच्या एका बाटलीत जमा करून ठेवता येतात. बाटलीत थोडे पाणी व थोडी माती टाकावी (अगदी चिमूटभर माती पुरते). बाटलीच्या झाकणास एक-दोन भोके पाडावीत म्हणजे हवा खेळती राहील.

मात्र पाणी नळाचे असेल तर त्यात क्लोरिन वायु असण्याची शक्यता असते. असे पाणी दहा-बारा तास परातीत उघडे ठेवून क्लोरिन वायु जाऊ देऊन वापरावे. नाहीतर या पाण्याने जळवा मरतील.

जळवांना उष्ण तापमान सोसत नाही. म्हणून उन्हाळ्यात, ऑक्टोबरच्या उष्णतेत जळवांची बरणी माठात, ओल्या फडक्यात ठेवणे आवश्यक आहे. जळवांना माती पुरते, वेगळे खाणे लागत नाही. जळवा निवडताना लहान-मध्यम आकाराच्या (पाच इंचांपेक्षा जास्त लांब नको), आणि पट्टे नसणाऱ्या निवडाव्यात. पट्टेरी जळवा विषारी असतात.

जळू लावायची वेळ आल्यावर ती आधी पाण्याच्या लहान भांडयात टाकावी. या पाण्यात चिमूटभर हळदपूड टाकावी. यामुळे जळू भराभर हालचाल करू लागते. मग ती जळू वापरावी. त्वचेवर जळू लावताना त्यावर स्पिरीट, आयोडीन, इत्यादी काही न लावता फक्त पाण्याने दोन-तीन वेळा पुसून घ्यावे. जळू खराब त्वचेवर लावावी. जळू रक्त शोषते आणि रक्त शोषताना तिचे तोंड घोडयाच्या खुराप्रमाणे दिसते. रक्त शोषताना ते लाटालाटांनी जळवेच्या शेपटीपर्यंत पोहोचते व जळू हळूहळू फुगते. जळवेचे शेपूट आधारासाठी त्वचेवर टेकलेले असते. रक्त शोषून पूर्ण फुगलेली जळू आपोआप गळून पडते. पण आधी काढायची असल्यास तोंडापाशी चिमूटभर हळद किंवा मीठ टाकल्यास काम होते. रक्त प्यायलेली जळू लगेच पाण्यात टाकून त्यावर चिमूटभर हळद टाकावी. म्हणजे रक्त ओकून जळू रिकामी होते. हे करण्याचा आळस करू नये नाहीतर रक्त प्यायलेली जळू मरून जाण्याची शक्यता असते. जळू हलके हलके शेपटाकडून तोंडाकडे दाबूनही रक्त बाहेर काढता येते. रिकामी केलेली जळू दोन-तीन दिवसांनी परत लावता येते. लगेच लावू नये. जास्त रक्त काढायचे असल्यास दोन-तीन जळवा वापराव्यात. प्रत्येक जळू १० ते १५ मिलिलिटर रक्त शोषू शकते.

अधिक माहिती[संपादन]

स्वस्थ आणि निरोगी व्यक्तींनी पंचकर्मचिकित्सा करून घेताना वमन वसंत ऋतूच्या सुरुवातीस करून घ्यावे, कारण वसंत ऋतूमध्ये शरीरातील कफाचा प्रकोप होत असतो. वमन हा कफावरील उत्तम उपचार आहे. त्याप्रमाणे विरेचन शरद ऋतूमध्ये, रक्तमोक्षण शरद ऋतूमध्ये आणि बस्ती वर्षाऋतूमध्ये करवून घ्यावी.

बाह्य दुवे[संपादन]