दालन:इतिहास/विशेष लेख/२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सम्राट अशोकाचे शिलालेख म्हणजेच बिंदुसार राजाचा दुसरा मुलगा व चंद्रगुप्ताचा नातू आणि मगध साम्राज्याचा इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ या काळात राज्यकर्ता राहिलेल्या सम्राट अशोक याचे शिलालेख होत.

सम्राट अशोकाच्या शाही आज्ञा आणि त्याच्या अन्य आलेखांचे बृहद शिलालेख, लघु शिलालेख, विशाल स्तंभालेख, लघु स्तंभालेख आणि गुंफा शिलालेख असे पाच प्रकारचे शिलालेख आहेत. चौदा बृहद शिलालेख शृंखला पाच ठिकाणी, सहा विशाल स्तंभालेख शृंखला सहा ठिकाणी (त्या पैकी टोपरा स्तंभावर सात लेख), एकोणीस ठिकाणी लधु शिलालेख, सहा लघु स्तंभालेख आणि तीन गुंफा-शिलालेख असे शिलालेख उपलब्ध झाले आहेत.

सम्राट अशोकाचा मीरतमध्ये असलेला पहिला आलेख इ.स. १७५० मध्ये पेड्रोटिफेन-थेलरने शोधून काढला. त्यानंतर इ.स. १९१५ पर्यंत टॉंड, किट्टो, राईस, एलिस, कॅप्टन ले, फीहरर, ऑस्ट्रेल, बीडन व भगवानलाल इंद्र यांनी अशोकाचे आलेख शोधले. इ.स. १८३७ साली प्रिन्सेप याने आलेखातील ब्राह्मी लिपीचे वाचन केले. हे आलेख शाहबाझगढी, मानसेरा, कालसी, गिरनार, धौली, जौगड, कर्नूल, सोपारा या ठिकाणी सापडलेले आहेत. अशोकाचे स्तंभालेख लोरिया नंदनगड, टोपरा, अलाहाबाद, लोरिया अरराज, रामपुरवा व सारनाथ येथे मिळाले. याचबरोबर आणखी काही महत्त्वपूर्ण आलेख रूपनाथ, सहसराम, बैराट, चितळदुर्ग, बाराबर, मस्की, भाब्रू, साँची व कौशांबी येथेही सापडले आहेत.

अशोकाचे हे लेख सामान्यपणे प्राकृत भाषेत आणि ब्राह्मी लिपीत कोरलेले आढळतात परंतु भारताच्या वायव्य भागात आढळलेले लेख आरमाइक भाषेतखरोष्टी लिपीत आढळतात. अफगाणिस्तानात ते आरमाइक व ग्रीक भाषांमध्ये कोरलेले आहेत.

अशोकस्तंभांमध्ये सारनाथ येथील स्तंभ सांस्कृतिक व कलात्मक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. इ.स. १९०५ मध्ये केलेल्या उत्खननात याचे फक्त स्तंभशीर्षच सापडले. ते दोन मीटर उंचीचे असून सध्या ते सारनाथ येथील संग्रहालयात ठेवलेले आहे. भारतीय प्रजासत्ताकाने पहिल्या प्रजासत्ताकदिनी या स्तंभाचे शीर्ष राष्ट्रचिन्ह म्हणून स्वीकारले.