Jump to content

किवी (फळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मोठे आणि लहान किवी फळ
किवी फळाचे काप

किवी हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड फळ आहे. न्यू झीलंडमध्ये किवी नावाचा प्रसिद्ध पक्षी असला तरी हे फळ मुळात न्यू झीलंडमधील नसून चीनमधील आहे. चीनचे हे 'राष्ट्रीय फळ' आहे. याच झाडाला पूर्वी चायनीज गूजबेरी असे म्हणत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे 'अ‍ॅक्टिनिडिया डेलिसिओसा' (Actinidia deliciosa).

समशीतोष्ण हवामानात किवीची वाढ चांगल्या तऱ्हेने होते. चीन, न्यू झीलंड या देशांप्रमाणेच आता भारतात हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, सिक्कीम, उत्तर प्रदेश, मेघालय या राज्यांत व निलगिरी पर्वत रांगांच्या प्रदेशात किवीचे उत्पन्न घेतले जाते.

लागवड[संपादन]

किवीचा द्राक्षाच्या वेलीसारखा एक वेल असतो. एखाद्या आधारावर या वेली वाढतात. त्यांना फुलेही येतात. नैसर्गिकरीत्या परागीकरण होण्यासाठी किवीची फुले कीटकांना अजिबात आकर्षून घेणारी नसतात. पण या फळाचे उत्पादन घेणारे शेतकरी या फुलांचे परागकण वाफारून फुलांच्या आणि झाडांच्या प्रजजनास मदत करतात.

ज्या भागात किवीची लागवड असेल तेथे माश्या किंवा कीटकांसाठी पोळी तयार करून त्यात माश्या सोडल्या जातात. जवळजवळ एक हेक्टर जागेत मोठी ८ पोळी असे प्रमाण असते. झाड फुलांनी बहरले की माश्या-माश्यांमध्ये फुलातील मध खाण्यासाठी स्पर्धा सुरू होते. या स्पर्धेपोटीच 'परागीकरण' घडविले जाते. वेलींवर एका वर्षांतच फळे धरायला सुरुवात होते. ऑक्टोबर ते डिसेंबर या पिकाचा बहर जास्त असतो. किवीची फळे साधारण कच्ची असतानाच हाताने खुडून काढली जातात. जर योग्य पद्धतीने साठवण केली तर किवी फळ बरेच दिवस राहते.

सेवन[संपादन]

किवी हे फळ बहुगुणी आहे. त्यात क, के आणि ई या जीवनसत्त्वांचे तसेच फॉलिक आम्ल, पोटॅशिअम यांचे प्रमाण भरपूर असते.[१] शरीराला आवश्यक असणारी 'ॲंटीऑक्सिडन्ट्स'देखील असतात. इटली या देशात केलेल्या प्रयोगांतून असेही निष्पन्न झाले आहे की 'किवी' या फळाच्या सेवनामुळे श्वसनाचे विकार, मुख्यत: रात्री येणारा खोकला, श्वासात येणारे अडथळे इत्यादी दूर होण्यास मदत होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Nutrient data for 09148, Kiwifruit, green, raw". Archived from the original on 2017-05-21. 16 December 2012 रोजी पाहिले.

किवी फळ कशा प्रकारचे जमिनीवर येते व त्यांच्या बिया किंवा रोप कुठे उपलब्ध होतील?