कडुलिंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कडुलिंब
निंबोळ्या

लिंब किंवा कडूलिंब, कडूनिंब व बाळंतलिंब (शास्त्रीय नाव: Azadirachta indica; कुळ:Meliaceae) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा वृक्ष आहे. कडुलिंबाला भारतीय भाषांमधून वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.

 • संस्कृत-निम्ब/तिक्तक/अरिष्ट/पारिभद्र/पारिभद्रक/पिचुमंद/पिचुमर्द
 • हिंदी-नीम/नीमला
 • बंगाली-नीमगाछ
 • कानडी-बेवु
 • गुजराती-लींबडो
 • मलयालम-वेप्पु/अतितिक्त
 • तामिळ-कड्डपगै/अरुलुंदी
 • तेलगु-निम्बमु
 • इंग्रजी-Indian Lilak, Neam, Margosa Tree
 • लॅटीन-Azadirachta indica

वर्णन[संपादन]

हा मोठा, ३०-६० फूट उंच वाढणारा छायादार वृक्ष आहे. याला साधारणत: ९ ते १५ इंच लांब देठ व त्यास सम अंतरावर, हिरव्या रंगाची २-३ सेंटिमीटर लांबीची, टोकदार, करवतीसारखे दाते असणारी ९ ते १५ पाने येतात. कडूलिंबाची फुले पांढरी, लहान व सुगंधित असतात. तर फळे आधी हिरवी व पिकल्यावर पिवळी होतात. जवळपास ३-४ मिलिमीटर लांब असलेल्या या फळांत प्रत्येकी एक बी असते.त्या बियांना निंबोळी असे म्हणतात. याच्या लाकडाचा वापर इमारत व पेट्या वगैरे बनविण्यासाठी होतो. कडूलिंबामध्ये आयुर्वेदिक गुणधर्मही असतात व ते कडू, विपाकी, शीतवीर्य, लघु, मंदाग्निकर-खोकला, ज्वर, अरुची, कृमी, कफ, कुष्ठ नाशक म्हणून वापरले जाते. हा जणू कल्पवृक्षच आहे.

हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्व कडू असतात. याच्या अनेक उपयोगामुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे,सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.

उत्पत्तिस्थान[संपादन]

भारतात सर्व ठिकाणी[ संदर्भ हवा ]

उपयोग[संपादन]

 • काड्या दांत घासण्यास उपयोगी, लाकूड इमारतीसाठी
 • आयुर्वेदानुसार - जंतुनाशक, सापाच्या विषावर, गर्मीवर, रक्तदोषहारक, विषमज्वरावर, कृमिनाशक, दाहावर, महारोगावर, बाळंतरोगावर, अफूच्या उतारासाठी, जखमेवर, मुळव्याध, इ. अनेक रोगांवर[ संदर्भ हवा ]
 • यापासून बनणाऱ्या औषधी - पंचनिंबचूर्ण, अनेक औषधांमधील एक प्रमुख घटक

इतर[संपादन]

हा उत्तराभाद्रपदा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

बाह्‍य दुवे[संपादन]

हेही बघा[संपादन]