ऑपरेशन चॅस्टाइझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑपरेशन चॅस्टाइझ
हल्ल्यानंतर उध्वस्त झालेले मॉहने धरण
हल्ल्यानंतर उध्वस्त झालेले मॉहने धरण
दिनांक १६-१७ मे, १९४३
स्थान {{{स्थान}}}
परिणती ब्रिटिश सैन्याचा विजय

ऑपरेशन चॅस्टाइझ हे दुसऱ्या महायुद्धदरम्यान १६-१७ मे १९४३ रोजी ब्रिटनच्या रॉयल एअरफोर्सतर्फे जर्मनीच्या धरणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या कारवाईचे सांकेतिक नाव होते. या मोहिमेचे वैशिष्ट्य हे की खास या मोहिमेसाठी प्रथमच उसळणाऱ्या बाँब (bouncing bomb) चा वापर क‍रण्यात आला. मुळात अशा विशिष्ट बाँबमुळेच ही कारवाई यशस्वी ठरली. लक्ष्यावर आदळल्यावर लगेच स्फोट न होता, उसळ्या घेत काही अंतर कापून फुटणारा हा बाँब बार्नेस वॉलिस यांनी शोधला व विकसित केला होता. या कारवाईअंतर्गत मॉहने धरण (Möhne) आणि एडरसी धरण (Edersee Dams ) उध्वस्त झाले, तर सोर्पे धरणास (Sorpe dam) जुजबी नुकसान झाले.

उसळणाऱ्या बाँबची कार्यपद्धती विषद करणारे चित्र. बाँब पृष्ठभागापासून कमी अंतरावरुन पाण्यात सोडला जातो, त्यानंतर तो उसळत पुढे जातो. काही वेळाने वेग कमी झाल्यावर तो पाण्यात बुडतो व स्फोट होतो.

पार्श्वभूमी[संपादन]

दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या रूर नदीच्या खोऱ्यातील औद्योगिक भागातून जर्मनीसाठी युद्धविषयक उत्पादन जोमाने होत होते. यासाठी तेथील धरणे महत्त्वाची भूमिका निभावत होती. या भागातील धरणे जलविद्युत निर्मितीची महत्त्वाची केंद्रे होती, तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, कालव्यांसाठी पाणी पुरवठा या दृष्टीनेही ती महत्त्वाची होती. यामुळे युद्धातील धोरणांनुसार या ब्रिटनच्या आक्रमणाच्या नकाशावर ती होतीच. तसेच त्यांना शत्रूपासून धोका होऊ शकतो हे जर्मनीही जाणून होता त्यामुळे धरणांच्या सुरक्षेचीही पूर्ण काळजी घेण्यात आलेली होती. पारंपरिक पद्धतीने बाँबहल्ला करून धरणे उडवणे शक्य होते, पण त्यासाठी अचूक मारा आणि तोही सातत्याने योग्य त्या जागी करत राहणे गरजेचे होते. जर्मनीच्या बचावाची तयारी पाहता ते शक्य नव्हते.

उसळणाऱ्या बॉम्बची कल्पना[संपादन]

धरणाला जास्त हानी पोहचवण्यासाठी बाँबचा स्फोट पाण्याच्या पृष्ठभागाखाली व धरणाच्या भिंतीजवळ होणे आवश्यक होते. पाण्याखाली मारा करण्यासाठी टॉर्पेडो हे पाण्याखालून जाणारे मिसाईल सदृश बॉम्ब वापरले जात पण याची संभावना लक्षात घेऊन जर्मनीने आधीच धरणांत टॉर्पेडो विरोधी जाळ्या बसवल्या होत्या. दुसरा मार्ग होता की साधारण १० टन वजनाचा बाँब ४०,००० फूट उंचीवरून सोडला जावा. पण त्यावेळची विमाने वजनदार बॉम्ब घेऊन इतक्या जास्त उंचीवरून उडण्याच्या क्षमतेची नव्हती.

अपकीप (Upkeep) असे सांकेतिक नाव दिलेला सध्या इंग्लंडच्या डक्सफोर्ड युद्धसंग्रहालयातील उसळणारा बॉम्ब

अखेर बार्नेस वॉलिस यांना कल्पना सुचली की जर एखादी गोलाकार वस्तू स्वतःभोवती गिरक्या घेत सरळ दिशेत पुरेशा वेगाने पाण्याच्या पृष्ठभागावर आदळली तर ती त्याच जागी लगेच पाण्यात न बुडता उलट उसळून पुढे जाईल. अशा प्रकारे काही टप्पे उसळ्या मारत पुढे गेल्यावर ती वस्तू बुडेल. याच तत्त्वाचा वापर करून त्यांनी उसळणारे बाँब बनवले. त्यासाठी पारंपरिक बाँबमध्ये व त्यांना नेणाऱ्या विमानांत जरुरी बदल करण्यात आले.

अपकिप[संपादन]

या मोहिमेसाठी वापरलेल्या बाँबला 'अपकिप' (upkeep) हे सांकेतिक नाम देण्यात आले. अपकिप हा पारंपारिक बाँबच्या आकारात नव्हता. बाँबचा आकार बदलून त्यांना पिंपासारखे बनवण्यात आले. तसे केल्याने त्यांना फिरक्या देणे सोपे होईल व पाण्याच्या पृष्ठभागाशी त्यांचा योग्य प्रकारे संपर्क होईल. अपकिप हा ६० इंच लांब होता व त्याचा व्यास ५० इंच होता. बाँबचे एकुण वजन ९,५०० पौंड होते व त्यात ६,६०० पौंड वजनाची शक्तिशाली स्फोटके वापरली होती. बाँब फेकण्यापूर्वी त्यांना फिरक्या देण्यासाठी विमानांत एक खास मोटरही बसवण्यात आली.

अपकिप बाँबला वाहुन नेण्यासाठी लँकेस्टर जातीचे विमान वापरण्यात आले. त्यांत मोटार लावण्यासकट इतरही बदल करण्यात आले. जसे अपकिपच्या अवाढव्य आकारामुळे विमानाचे बाँब टाकण्याच्या जागेचे दरवाजे काढण्यात आले. बाँब विमानाच्या खालच्या भागात लटकवले गेले. बाँब च्या जास्त वजनामुळे एका विमानाला एकच बाँब नेणे शक्य होते.

पूर्वतयारी[संपादन]

कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यापूर्वी इंग्लंडमध्ये याची तालीम घेण्यात आली. यासाठी एका नवीन स्क्वॉड्रनची निर्मिती करण्यात आली. यात इंग्लंडसोबत त्यावेळील इंग्लंडच्या वसाहती असणारे ऑस्ट्रेलियान्यू झीलँड यांच्याही काही वैमानिकांचा समावेश होता. परिस्थितीची तपासणी करून ठरवण्यात आले की धरणाच्या भिंतीपासून ४०० ते ४५० यार्ड अंतरावर पाण्यापासून केवळ ६० फूट उंचीवरून ३९० किमी प्रति तास या वेगाने बॉब टाकण्यात यावा. या तुकडीला सरावासाठी एक वापरात नसलेले धरणही उपलब्ध करून देण्यात आले. रात्रीच्या वातावरणात उड्डाण करण्याचा तसेच कमी उंचीवरुन उडण्याचा सराव करण्यात आला. वैमानिकांना एक अडचण होती. त्यावेळी वापरली जाणारी, हवेचा दाब मोजून जमिनीपासूनची उंची ठरवणारी उपकरणे barometric altimeters[मराठी शब्द सुचवा] फारशी अचूक नव्हती, त्यामुळे पाण्याच्या पातळीपासून ६० फूट उंच हे अंतर मोजणे अवघड होते. यावर एक उपाय योजला केला. विमानाच्या पुढच्या भागात (नाक)आणि मागील भागात खालील बाजूने असे २ दिवे लावण्यात आले त्यांचा झोत आतल्या बाजूस अशा कोनात वळवला गेला की पाण्यापासून ६० फूट उंचीवर असतांना दोन्ही दिव्यांचे प्रकाशझोत एकमेकात मिसळतील व पाण्यावर एकच झोत दिसेल. अखेर पुरेशा तयारीनंतर मे महिन्याचा मुहूर्त काढण्यात आला. कारण या दिवसात धरणांतील पाण्याची पातळी जास्त असते. त्यामुळे जास्त पाण्याच्या प्रवाहाने मोठा पूर येऊन जास्त नुकसान व्हावे.

मोहीम[संपादन]

मोहिमेचे नेतृत्व विंग कमांडर गाय गिब्सन यांच्याकडे होते. हवाईदलाशी संबंधित १३३ जण मोहिमेत सहभागी होते. १६ मे च्या रात्री करावयाच्या हल्ल्यासाठी ३ गट बनबून प्रत्येक गटाला वेगवेगळी लक्ष्ये दिली गेली.

पहिल्या गटात ९ विमाने होती यातील वैमानिक पुढीलप्रमाणे : स्वतः गिब्सन, हॉपगुड, मार्टिन,यंग, डेव्हिड माल्टबी, डेव्ह शेनॉन, मॉडस्ले, बिल अ‍ॅस्टेल, लेस नाईट (Gibson, Hopgood,Flt Lt H. B. "Micky" Martin,Young, David Maltby ,Flt Lt Dave Shannon, Maudsley, Flt Lt Bill Astell ,Flying Officer Les Knight ). यांवर प्रमुख जबाबदारी होती ती मॉहने धरण उडवायचे आणि जर कोणाकडे काही बाँब शिल्लक राहिले तर इतर ईडर धरणावरही हल्ला करायचा.

गट दुसरा : यात ५ विमाने होती, यांचे वैमानिक पुढीलप्रमाणे : जो मॅकार्थी, वर्नन बायर्स, बॉब बार्लो, जॉफ राईस, लेस मनरो (Joe McCarthy , Pilot Officer Vernon Byers, Flt Lt Bob Barlow , P/O Geoff Rice and Flt Lt Les Munro), यांचे लक्ष्य होते ते सोर्पे धरणावर हल्ला करण्याचे.

तिसरा गट राखीव फळी म्हणून काम करणार होता. यात वैमानिक होते सिरिल अ‍ॅन्डरसन, बिल टॉनसेंड, केन ब्राऊन, वॉर्नर ऑटली, ल्युइस बर्पी, (Flight Sergeant Cyril Anderson, Flt Sgt Bill Townsend, Flt Sgt Ken Brown , P/O Warner Ottley and P/O Lewis Burpee ) यांना कामगिरी सांगितली होती की गरजेनुसार प्रमुख लक्ष्य असणाऱ्या धरणांवर हल्ला करायचा अथवा शक्य झाल्यास दुय्यम लक्ष्यांवर हल्ला करायचा.

जर्मनीच्या विमानविरोधी गोळीबारापासून नजर चुकवण्यासाठी २ वेगवेगळ्या मार्गांनी विमाने गेली. अर्थात विमांनांच्या उड्डाणात अंतर ठेवूनही लक्ष्याजवळ सर्व विमाने योग्य वेळेतच पोहोचली. सर्वात पहिल्या विमानाने १६ मे च्या रात्री ९:२८ ला उड्डाण घेतले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर विमाने निघाली. रडारच्या कक्षेत सापडण्यापासून वाचण्यासाठी विमाने अवघ्या १०० फूट उंचावरुन ( सुमारे ३० मीटर ) उडत होती. तरीही जर्मनांच्या तावडीतून ती वाचू शकली नाहीत. दुसऱ्या गटातील विमानांना सर्वात जास्त हानी झाली.

दुसऱ्या गटातील वैमानिक राईस विमानावर ताबा राखू शकला नाही. त्याचे विमान इतक्या खाली आले की जर्मनीत प्रवेश कराण्याआधीच ते समुद्राच्या पाण्यावर घासले गेले. त्यामुळे विमानातील बाँब तेथेच पाण्यात पडला. अखेर राईस विमानाला सांभाळत तळावर प‍रतला. मनरोचे विमानही गोळीबारात क्षतिग्रस्त झाले आणि तो ही तळावर परतला. यानंतर बायर्स आणि बारलो यांच्या विमांनाना तर जर्मनांनी पाडले. ती विमाने शत्रूच्या प्रदेशातच कोसळली. तर पहिल्या गटातील अ‍ॅस्टेल याचे विमान कमी उंचीवरुन उडण्यामुळे उच्च दाब विद्युत वाहक तारांमध्ये अडकून कोसळले.

मॉहने धरणावरील हल्ला[संपादन]

पहिल्या गटाने गिब्सनच्या नेतृत्वाखाली प्रथम मॉहने धरणावर हल्ला केला. पहिला बाँब गिब्सनने टाकला. त्यानंतर हॉपगुडने बाँब टाकायचा प्रयत्न केला. पण त्याच्या विमानाच्या पंखावर गोळ्यांच्या खूप जखमा झाल्या. विमान त्याच्या अपेक्षित उंचीपेक्षा इतके खाली आले की त्याच्या स्वतःच टाकलेल्या बाँबचा झटका बसला व पंख तुटून ते कोसळले. यानंतर तिसरा प्रयत्न मार्टिनने केला. यावेळी मार्टिनला गोळीबारापासून वाचवण्यासाठी गिब्सनने स्वतःचे विमान धरणाला समांतर उडवले. जेणेकरुन जर्मन तोफांचे लक्ष विचलित व्हावे. तरीही मार्टिनच्या विमानाला थोडी इजा झालीच. पण त्याने योग्य प्रकारे बाँब टाकला. त्यांनंतर यंगनेही बाँब टाकला आणि नंतर माल्टबीने. अखेर माल्टबीच्या बाँब नंतर धरण फुटले. मॉहने धरण फुटल्यावर गिब्सन हा यंगला सोबत घेऊन इडर धरणाकडे वळला. तेथे त्याने डेव्ह शेनॉन, मॉडस्ले, लेस नाईट यांना सोबत घेऊन धरणावर हल्ला केला.

ईडर धरणावरील हल्ला[संपादन]

१७ मे १९४३ रोजी फुटलेल्या ईडर धरणाचे चित्र
ईडर धरणाचे सध्याचे चित्र: धरणाच्या डावीकडे असलेल्या जागेत आताही दरवाजे नाहीत.

ईडर धरणाच्या सभोवतलचा भौगोलिक परिसर त्यातील विविध टेकड्यांमुळे विमानउडडाणासाठी फार अवघड होता. यातच धुकेही पडले होते. शेनॉनने पहिला प्रयत्न केला पण त्याला बाँब योग्य जागी टाकण्याजोगी विमानाची स्थिती बनवता आली नाही. त्याने एकुण ६ वेळा प्रयत्न केले. पण त्याला विमान योग्य जागी आणणे जमत नव्हते. अखेर त्याने काही वेळा पुरती विश्रांती घेतली. यानंतर मॉडस्लेने बाँब टाकण्याचा प्रयत्न केला पण त्याचा अंदाज चुकला व बाँब धरणाच्या भिंतीच्या वरच अडकुन फुटला. या स्फोटात स्वतः मॉडस्लेच्या विमानाचे फार नुकसान झाले. यानंतर शेनॉनने पुन्हा प्रयत्न केला व यावेळी मात्र यशस्वीरीत्या बाँब टाकला. अखेरचा बाँब नाईट याने टाकल्यावर ईडर धरणही फुटले.

सोर्पे धरणावरील हल्ला[संपादन]

सोर्पे धरणाकडे केवळ ३ विमाने पोहचु शकली. इतर विमाने एकतर रस्ता चुकली वा जर्मनांनी ती वाटेतच पाडली. सोर्पे धरणाची परिस्थिती इतर धरणांपेक्षा वेगळी होती. धुके होतेच त्यातच धरणाची भौगोलिक रचना अशी होती की इतर धरणांप्रमाणे सोर्पेच्या मुख्य भिंतीला लंबरेषेत सरळ उडाण करून बाँब टाकणे शक्य नव्हते. विमानांना तेवढी जागाच नव्हती. यामुळे त्यांनी सोर्पे धरणावर बाँब टाकतांना वेगळी पद्धत वापरली. विमानांनी धरणाच्या भिंतीला समांतर अशा रेषेत उडडाण केले आणि बाँब टाकला. सहाजिकच यावेळी बाँबला जागीच टाकायचे असल्याने त्यांना फिरक्या देण्याची गरजच नव्हती त्यामुळे बाँबना फिरक्या न देताच टाकण्यात आले. मॅकार्थी , ब्राउन, अँडरसन या तिघांनी सोर्पे वर हल्ला केला. पहिला प्रयत्न मॅकार्थीने केला पण त्याचे गणित जमले नाही. त्यातच त्याचे विमान समोरील बाजुच्या टेकडीवर आदळणार होते पण थोडक्यात बचावले. त्याने अजुन ९ प्रयत्न केले. पण बाँब टाकण्याचे जमत नव्हते. अखेर १०व्या प्रयत्नात त्याच्या विमानातील सहकाऱ्याने बाँब टाकला. त्यानंतर त्याने विमान वळवुन नुकसानीचा अंदाज घेतला. पण त्याला आढळुन आले की भिंतीला फारच किरकोळ दुखापत झाली असुन धरण सहीसलामतच होते. याच दरम्यान राखीव दलातील वैमानिकांना सोर्पे कडे जाण्याचे आदेश मिळाले होते. पण बर्पीचे विमान रस्त्यातच जर्मनांनी पाडले व ते सोर्पे जवळ पोहचु शकले नाही. ब्राउन धरणाजवळ आला तोपर्यंत धुके दाट होऊ लागले होते. त्याने अंदाजे बाँब टाकला पण त्याने धरणाला नुकसान झाले नाही. यानंतर अँडरसन पोहोचला पण तोपर्यंत धुके इतके दाट झाले होते की अँडरसनला प्रयत्न करणेही जमले नाही.

मोहिमेची समाप्ती[संपादन]

यानंतर इंग्लंडची विमाने माघारी वळली. परत येतांनाही त्यांनी १०० फुट उंची वरुनच उडडाण केले. पण जर्मनांनीही खोलवर मारा करत आणखी २ विमाने पाडली. प्रत्यक्ष मोहिमेतुन केवळ ९ विमाने परतु शकली. २ विमाने मोहिमे पुर्वीच परतली होती. इतर ८ विमाने एकतर जर्मनांनी पाडली अथवा फार नुकसान होऊन ती कोसळली. त्यातील सैनिकही इंग्लंडला गमवावे लागले. स्कॅम्पटनच्या तळावर ३:११ वाजता पहिले विमान परतले. विंग कमांडर गिब्सन ४:१५ ला परतला. सर्वात शेवटचे विमान सकाळी ६:१५ ला परतले.

इंग्लंडला नुकसानीचा पुर्ण अंदाज हवा होता. म्हणुन सकाळ होताच हल्ला केलेल्या जागेचे छायाचित्रण करण्यास विमाने पाठवली गेली. त्या विमानाच्या वैमानिकाने रुर नदीचे खोरे पाहुन म्हटले, सर्वत्र पुराचे पाणी पसरले होते. आणि केवळ जमिनीचे उंचवटे , झाडांचे शेंडे आणि चर्च ची टोके पाण्यातुन डोकावतांना दिसत होती.

मोहिमेमुळे झालेली प्राणहानी[संपादन]

या मोहमेत युनायटेड किंग्डमची १७ पैकी जवळपास निम्मी म्हणजे ८ विमाने खस्त झाली तसेच मोहिमेत भाग घेतलेल्या १३३ पैकी ५३ वायुसैनिक म्हणजे ४०% जण मारले गेले. वाचलेल्यांतील ३४ जणांना शौर्यपदके देऊन बकिंगहॅम पॅलेस मध्ये गौरवण्यात आले. स्वतः विंग कमांडर गिब्सनला व्हिक्टोरिया क्रॉसने सन्मानित करण्यात आले.

जर्मनीत धरण फुटल्यावर आलेल्या पुराने अंदाजे १,६५० जण मारले गेले, यातील अंदाजे १,००० जण हे युद्धकैदी वा शत्रुराष्ट्रांचे वेठबिगारीचे मजुर होते. यात प्रामुख्याने रशियन व इतर विविध देशांच्या युद्धकैद्यांचा समावेश होता. यामोहिमेत स्थापन करण्यात आलेली स्क्वॉड्रन आजही कार्यरत आहे. पुढे या स्क्वॉड्रनांनी अशाच काही अपारंपारिक वा कठीण मोहिमांत भाग घेतला. '१९७७ साली जिनिव्हात झालेल्या ठरावानुसार धरणांवर केल्या जाणाऱ्या अशाप्रकारच्या हल्ल्यांना नियमबाह्य ठरवण्यात आले आहे.

युद्धावरील परिणाम[संपादन]

आज ऑपरेशन चॅस्टाइझचे मुल्यमापन करतांना या मोहिमेला तांत्रिक दृष्ट्या फार यश लाभलेले दिसत नाही पण तत्कालिन दिवसात या मोहिमेचे प्रचंड यशस्वी अशेच स्वागत झाले. जर्मनीत घुसुन आपणही प्रहार करु शकतो हा विश्वास इंग्लंडला पर्यायाने मित्र राष्ट्रांना मिळाला. जर्मनीच्या आक्रमक हवाई हल्ल्यांनी इंग्लंड फार त्रस्त होते. या कारवाई मुळे ब्रिटीश जनतेचा आत्मविश्वास वाढला. एकुणच या कारवाईमुळे ब्रिटीश सैन्याचे मनोधैर्य प्रचंड वाढले. जर्मनीच्या फुटलेल्या धरणांचे व पुर वाहुन गेलेल्या कारखान्यांचे छायाचित्रण पाहुन जर्मनीच्या औद्योगिक क्षेत्राला जबर झटका बसला असुन त्यातुन जर्मनीला सावरण्यात कित्येक वर्ष लागतील असा काहींचा होरा होता.

प्रत्यक्षात जर्मनी मात्र काही आठवड्यांतच सावरला. मॉहने धरणाला २५० रुंदीचे व २९२ फुट उंच भगदाड पडले होते. त्यातुन ३३० मिलियन टन इतके पाणी रुर खोऱ्यात पसरले. पाण्याचा १० मीटर उंची प्रवाह २४ किमी च्या वेगाने नद्यांच्या खोऱ्यातुन गेला. त्यात काही खाणी बुडाल्या , ११ कारखाने , ९२ घ्ररेही उध्वस्त झाली तर ११४ कारखाने व ९७१ घ्ररे क्षतिग्रस्त झाली. ८० किमी पर्यंतच्या प्रदेशात पुराचे पाणी शिरले यात सुमारे २५ रस्ते , लोहमार्ग व पुले ही वाहुन गेले. विजेच्या उत्पादनात मोठा फटका बसला ५१०० किलोवॅट वीज उत्पादन करणारे दोन केंद्रे उधवस्त झाली तर इतर ७ केंद्रांचे नुकसान झाले. यामुळे याभागातील वीजपुरवठा २ आठवड्यांपर्यंत गायब होता.

पण या सर्वातुन २७ जुन पर्यंत जर्मनीने पाणीपुरवठा पुर्णपणे सुरळीत केला. तसेच विद्युत पुरवठाही पुर्ण क्षमतेने सुरु झाला. खोऱ्यातील जलवाहतुकही पुर्ववत झाली. पण जर्मनीला यासाठी मदतकार्य युद्धपातळीवर हाती घ्यावे लागले. त्यासाठी आपले राखीव सैन्य व इतर सैनिक युद्धक्षेत्रातुन दुर असे मदतकार्यात राबवावे लागले. त्याचा युद्धातील आक्रमक धोरणांवर परिणाम झालाच पण यापुढील काळात मित्रराष्ट्रांनी केलेल्या हल्ल्यांदरम्यानही भोगावा लागला. इंग्लंड व मित्रराष्ट्रांसाठी हीच बाब फायद्याची ठरली व त्यांनी खास अशाप्रकारे मोहिमा आखुन जर्मनीला आपली बलाढ्य लढाऊ नौकाही गमवावी लावली.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.