एअरबस ए-३४०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एअर बस ए-३४० या पानावरून पुनर्निर्देशित)
उदयोन्मुख लेखCrystal Project tick yellow.png
हा लेख १० जून, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१२चे इतर उदयोन्मुख लेख
एअरबस ए-३४०
Cathay.pacific.a340-600.b-hqb.arp.jpg

कॅथे पॅसिफिकचे एअरबस ए-३४०-६००

प्रकार लांब पल्ल्याचे मोठे प्रवासी जेट विमान
उत्पादक देश फ्रान्स, इटली
उत्पादक एअरबस
पहिले उड्डाण ऑक्टोबर २४, इ.स. १९९१
समावेश मार्च, इ.स. १९९३
सद्यस्थिती प्रवासी सेवेत
मुख्य उपभोक्ता लुफ्तांझा, इबेरियन एअरलाइन्स, व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्स, साउथ आफ्रिकन एअरलाइन्स
उत्पादित संख्या ३७४ (सप्टेंबर, इ.स. २०१०)
प्रति एककी किंमत ए-३४०-२००: ८ कोटी ७० लाख अमेरिकन डॉलर
ए-३४०-३००: २१ कोटी १८ लाख ते २२ कोटी ८० लाख अमेरिकन डॉलर
ए-३४०-५००: २३ कोटी ३० लाख ते २५ कोटी अमेरिकन डॉलर
ए-३४०-६००: २४ कोटी ५० लाख ते २६ कोटी ४० लाख अमेरिकन डॉलर
उपप्रकार एअरबस ए-३३०

एअरबस ए-३४० (इंग्लिश: Airbus A340) मोठ्या प्रवासीक्षमतेचे लांब पल्ल्याचे प्रवासी विमान आहे. चार इंजिने असलेले हे विमान २६१ ते ३८० प्रवाशांना ६,७०० ते ९,००० मैल (१०,८०० - १४,६०० कि.मी)पर्यंत नेऊ शकते. या विमानाची रचना एअरबस ए-३३० या विमानासारखी आहे.

ए ३४०चे लांबीनुसार चार उपप्रकार आहेत. ए ३४०-३०० हा ५९.३९ मीटर लांबीचा पहिला उपप्रकार इ.स. १९९३पासून तयार केला गेला. -२०० हे त्याहून छोटे विमान आहे. ए ३४०-६०० हा -२०० पेक्षा १५.९१ मीटर जास्त लांबीचा आहे. -५०० हा सगळ्यात मोठा पल्ला असलेला उपप्रकार आहे. -३०० आणि -२०० उपप्रकारांवर वर सीएफएम५६-५सी प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता प्रत्येकी १५१ किलोन्यूटन आहे. -५०० आणि -६०० वर रोल्स-रॉइस ट्रेंट ५०० प्रकारची इंजिने असतात. यांची क्षमता २६७ किलोन्यूटन आहे. -२०० व -३००ची बाह्य रचना एअरबस ए-३३०सारखीच आहे तर -५०० आणि -६००ला ए३३०पेक्षा मोठे पंख असतात.[१]

लुफ्तांझा आणि एअर फ्रान्सने सर्वप्रथम ए३४० विमानांचा वापर मार्च १९९३मध्ये केला. ऑक्टोबर, इ.स. २०१०अखेर ३७९ प्रती विकल्या गेल्या आहेत. पैकी ३७४ विमाने विमानकंपन्यांना देण्यात आली होती आणि पाच तयार होत होती. यांपैकी २१८ विमाने ए३४०-३०० उपप्रकाराची आहेत व लुफ्तांझाकडेच ५९ आहेत. ए३४०ला चार इंजिने असल्यामुळे त्यावर इटॉप्सची बंधने नाहीत व जमिनीपासून अमुक एकच अंतरापर्यंत समुद्रात जाता येण्याची मर्यादा नाही, म्हणून ही विमाने बहुधा महासागरांपलीकडील शहरांत विमानसेवा पुरवण्यासाठी वापरली जातात. अलीकडे विमानइंजिनामध्ये झालेल्या शोधांमुळे त्यांची विश्वसनीयता वाढली आहे व दोन इंजिनांची बोईंग ७७७ सारखी विमानेही इटॉप्स बंधनांपासून मुक्त होत आहेत. यामुळे ए३४०ची लोकप्रियता काही अंशी कमी झाली आहे.

विकास[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

लुफ्तांझा ए-३४०-६००मधील इकोनॉमी भाग

१९७०च्या दशकात एअरबसने अमेरिकेतील बऐंगडग्लस या दोन प्रस्थापित विमानोत्पादक कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी एअर बस ए-३००ची रचना करण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच ए३००चे विविध प्रकार विकसित करून बोइंग व डग्लसशी टक्कर देण्याचा एअरबसचा मनसूबा होता.[२] पहिले विमान तयार होण्याआधीच एअरबस अभियंत्यांनी त्याचे ९ वेगवेगळे भावी प्रकार तयार करण्याची शक्यता वर्तवली होती. यांना ए३००बी१-ए३००बी९ असे नामाभिधान होते.[३] त्यानंतर इ.स. १९७३मध्ये दहावा प्रकार निश्चित करण्यात आला (ए३००बी१०) आणि त्याची रचना इतरांपेक्षा आधी करण्यात आली.[४] या छोट्या आकाराच्या पण लांब पल्ल्याच्या उपप्रकाराचा पूर्ण विकास झाल्यावर याचे नामकरण आरबस ए३१० करुन त्याचे व्यावसायिक उत्पादन सुरू करण्यात आले. यानंतरचे एअरबसने आपले लक्ष एक चालपट्टी असलेल्या प्रकारांवर केंद्रित केले. याचे फळ म्हणजे, आरबस ए३२०, पहिलेवहिले फ्लाय-बाय-वायर[मराठी शब्द सुचवा] प्रवासी विमान. याच सुमारास एअरबसमधील जर्मन भागीदारांनी चार इंजिने असलेले मोठे विमान तयार करण्याचा आग्रह लावला होता. त्याऐवजी ए३२०कडे लक्ष दिल्याने आरबसच्या भागीदारांत तणाव निर्माण झालेला होता. ए३२० बोइंगच्या ७३७ आणि डग्लसच्या डीसी-९ प्रकारच्या विमानांशी स्पर्धेत उतरल्यावर एअरबसने परत आपले लक्ष मोठ्या आकाराच्या विमानांकडे वळवले.

ए३१०वर आधारित ए३००बी११ची रचनादहा टनी इंजिनांच्या उपलब्धतेवर अवलंबून होती.[५] यात १८० ते २०० प्रवाशांची बसण्याची सोय असून साधारण ६,००० nautical mile (११,००० किमी)चा पल्ला नियोजित होता. हे विमान बोईंगच्या ७०७ आणि डग्लसच्या डीसी-८ प्रकारच्या विमानांशी थेट स्पर्धेत असणार होते.[५] या रचनेत एअरबसच्या अभियंत्यांनी ए३००बी९मधील भाग आणण्यास सुरुवात केली. बी९ या ए३००च्या मोठ्या आवृत्तीचा विकास एअरबसने मंदगतीने सुरू ठेवला होता त्याला आता वेग आला. याची मुख्य कल्पना होती ती ए३००ची लांबी वाढवून त्याला त्यावेळ उपलब्ध असलेली सगळ्यात शक्तिमान टर्बोफॅन इंजिने लावण्याची.[५] आरबसने हे विमान मध्यम पल्ल्याच्या आंतरखंडीय गर्दीच्या मार्गांवर वापरले जाण्याचा अंदाज बांधला होता. याचा पल्ला आणि भारवहनक्षमता साधारण मॅकडोनेल डग्लस डीसी-१० आणि लॉकहेड ट्रायस्टार एल-१०११ इतकीच पण इंधनखर्च २५%[५] ते ३८%[६] पर्यंत कमी करण्याचा दावा एअरबसने केला.

बी९ आणि बी११ या दोन्ही प्रकारांच्या विकासखर्चात बचत करण्यासाठी एअरबसने दोन्ही विमानांना एकाच रचनेचे पंख आणि एअरफ्रेम[मराठी शब्द सुचवा] (वातचौकट,वायुचौकट)देण्याचे ठरवले. यामुळे सुमारे ५ कोटी अमेरिकन डॉलरची बचत अपेक्षित होती.[७] या आर्थिक बचतीशिवाय तांत्रिक फायदा असा होता की चार इंजिने असलेल्या बी११च्या (नवीन नामाभिधान टीए११) चारपैकी बाहेरच्या बाजूच्या दोन इंजिनांच्या भाराने पंख आपोआप वाकून इंधनबचत वाढली तर दोन इंजिने असलेल्या बी९चे (टीए९) पंख न वाकल्यामुळे क्रुझगती वाढली.

उपप्रकार[संपादन]

ए३४०चे चार उपप्रकार आहेत. ए३४०-२०० आणि -३०० इ.स. १९८७मध्ये घोषित करण्यात आले. -२०० उपप्रकाराचे पहिले उड्डाण मार्च, इ.स. १९९३मध्ये झाले. इ.स. १९९७मध्ये ए३४०-५०० आणि -६००ची घोषणा करण्यात आली. हे दोन्ही उपप्रकार इ.स. २००२मध्ये प्रवासी सेवेत दाखल झाले. हे चारही उपप्रकार व्यावसायिक प्रवासी सेवेशिवाय खाजगी वापराकरतादेखील तयार केले जाऊ शकतात.

ए३४०-२००[संपादन]

ए३४०-२०० हे ए३४०चा पहिला उपप्रकार आहे. यात २६१ प्रवासी तीन वर्गांमध्ये ७,४४० nautical mile (१३,७८० किमी) इतक्या अंतरावर किंवा तीन वर्गांत २४० प्रवासी ८,००० nautical mile (१५,००० किमी) अंतरावर नेणे अपेक्षित आहे.[८] पंखांची लांबी फ्युजलाझ[मराठी शब्द सुचवा](विमानगाभा)च्या लांबीपेक्षा जास्त असलेला हा एकमेव उपप्रकार आहे. याला चार सीएफएम५६-५सी४ इंजिने लावली असतात तसेच हनीवेल ३३१-३५० ऑक्झिलरी पॉवर युनिट[मराठी शब्द सुचवा](उपसाधन उर्जा केंद्र)ही असते.[९] हे विमान दूर अंतरावरील शहरांदरम्यानच्या पण अतिगर्दी नसलेल्या मार्गांवर वापरले जाणे अपेक्षित आहे. याचा मुख्य प्रतिस्पर्धी बोइंग ७६७-४००ईआर हे विमान आहे.

३४०-२००चा अजून एक उपप्रकार ए३४०-२१३एक्स आहे. याचा पल्ला ८,००० समुद्री मैल असून उड्डाणभार २७५ टन आहे तसेच याची चाके -२००पेक्षा किंचित जास्त मजबूत आहेत. याचा उगम एअरबसने ब्रुनेइच्या सुलतानासाठी बांधलेल्या एकमेव ए३४०-८००० या प्रकारच्या विमानात आहे. ब्रुनेइच्या सुलतानाने स्वतःसाठी खास असे विमान बनवून घेण्यासाठी आरबसला लक्षावधी डॉलर देऊ केले व ८,१०० समैल पल्ला असलेले व २७५ टन उड्डाणभार असलेले हे विमान बनविण्यात आले. प्रत्यक्षात सुलतानाने हे विमान कधीच वापरले नाही. जर्मनीत हँबुर्ग येथील विमानतळावर पडून राहिलेल्या या विमानाच्या रचनेवरुन एअरबसने -२१३एक्स हा उपप्रकार तयार केला व -२००ऐवजी -२१३एक्सचेच उत्पादन कायम केले.

ए३४०-२०० प्रकारचे विमान प्रवासी वाहतुकीशिवाय खाजगी वापरातदेखील आहे. रॉयल ब्रुनेई एअरलाइन्स, कतार अमीरी फ्लाइट, इजिप्तचे सरकार, सौदी अरेबियाची वायुसेना, जॉर्डनचा राजा आणि फ्रान्सची वायुसेना या प्रकारचे विमान अव्यावसायिक तत्त्वावर वापरतात. याशिवाय कॅथे पॅसिफिक, फिलिपाईन एअरलाइन्स आणि एअर बर्बन या कंपन्यांनीसुद्धा हे विमान भाड्याने देण्यासाठी वापरले.

-८०००चे विकसन केल्यावर जुन्या -२०० प्रकारच्या विमानांनाही त्यातील सुखसोयी देण्यात आल्या व त्यांचा पल्ला ८,००० समुद्री मैलांचा केला गेला. यांचे ए३४०-२१३एक्स असे पुन्हा बारसे केले गेले.

मोठे पंख, चार इंजिने, त्यामानाने असलेली कमी क्षमता आणि नंतर विकायला आलेले ए३४०-३००मधील नवीन सुखसोयी, यांमुळे -२०० जास्त लोकप्रिय झाले नाही. या प्रकारची फक्त २८ विमाने तयार केली. पैकी बरीचशी आता खाजगी वापरात आहेत. साउथ आफ्रिकन एअरवेझकडे सहा, रॉयल जॉर्डेनियनकडे पाच, एरोलिनियास आर्जेन्टिनासकडे चार, इजिप्त एअरकडे तीन आणि कॉन्व्हियासाकडे असलेले एक, इतकीच विमाने आता व्यावसायिक प्रवासी सेवेत आहेत.

या विमानाचे उत्पादन आता थांबवले गेले आहे.

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. एअरक्राफ्ट फॅमिली - (ए३३०-२००) स्पेसिफिकेशन्स. एअरबस. (इंग्लिश मजकूर)
  2. वेन्स्विन, जे.जी. (इ.स. २००७). एअर ट्रान्स्पोर्टेशन: अ मॅनेजमेंट पर्स्पेक्टिव्ह. ॲशगेट पब्लिशिंग लिमिटेड, पृ. ६३. (इंग्लिश मजकूर) 
  3. गन्स्टन, बिल (इ.स. २००९). एअरबस: द कंप्लीट स्टोरी. हेन्स पब्लिशिंग, सॉमरसेट, युनायटेड किंग्डम. (इंग्लिश मजकूर) 
  4. वॅग्नर, नॉरिस (इ.स. २००१). एअरबस ए३४० ॲंड ए३३०. एमबीआय पब्लिशिंग, सेंट पॉल, मिनेसोटा, पृ. १८. (इंग्लिश मजकूर) 
  5. ५.० ५.१ ५.२ ५.३ वॅग्नर, नॉरिस (इ.स. २००१). एअरबस ए३४० ॲन्ड ए३३०. एमबीआय पब्लिशिंग, सेंट पॉल, मिनेसोटा, पृ. २३. (इंग्लिश मजकूर) 
  6. मेनार्ड, मिशेलिन. "टु सेव्ह फ्युएल, एरलाइन्स फाइंड नो स्पेक टू स्मॉल", न्यू यॉर्क टाइम्स, जून ११, इ.स. २००८. (इंग्लिश मजकूर) 
  7. वॅग्नर, नॉरिस (इ.स. २००१). एअरबस ए३४० ॲंड ए३३०. एमबीआय पब्लिशिंग, सेंट पॉल, मिनेसोटा, पृ. २२. (इंग्लिश मजकूर) 
  8. ए३३०/अ३४० फॅमिली : ट्विन-ॲन्ड-फोर-इंजिन एफिशियन्सी. एअरबस. (इंग्लिश मजकूर)
  9. प्रॉडक्ट कॅटलॉग. हनीवेल. (इंग्लिश मजकूर)

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साचा:एअरबस विमाने