उंबरखिंडीची लढाई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उंबरखिंडची लढाई , शिवाजी राजे व मुघल सरदार कारतलबखान ह्यांच्यात २ फेब्रुवारी १६६१ रोजी झाली. उत्तर कोकण काबिज करण्यासाठी निघालेल्या मुघल सैन्याला , शिवाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उंबरखिंडच्या दरीत गनिमी कावा पद्धतीने हल्ला करून , मुघल सैन्याचा पूर्ण पराभव केला.

उंबरखिंडची लढाई
मराठे-मुघल युद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक ०२ फेब्रुवारी इ.स. १६६१
स्थान चावणी, खालापूर, रायगड
परिणती मुघल सैन्याचा पूर्ण पराभव
युद्धमान पक्ष
शिवाजी महाराज मुघल
सेनापती
शिवाजी महाराज
नेतोजी पालकर
कारतलब खान(मुघल सैन्याचा प्रमुख )
रायबाघण


उंबरखिंडची लढाई[संपादन]

इ.स.१६६०ला शाइस्ताखान मुघलांच्या दख्खन सुभ्याचा सुभेदार म्हणून दक्षिणेत आला व मे १६६०ला पुण्यात येऊन राहिला. जून १६६०ला शाइस्ताखानाने शिवाजी राजांचा चाकणचा कोट जिंकून घेतला .१६६० च्या शेवटी आदिलशहाच्या गालिब ह्या किल्लेदाराला हरवून परांडा कोट मुघल सरदार कारतलब खान याने जिंकून घेतला. १६६१ च्या सुरुवातीला शाइस्ताखानाने कारतलब खानास शिवाजी राजांच्या ताब्यात असलेल्या उत्तर कोकण भागातील चौल , कल्याण , भिवंडी , पनवेल , नागोठणे ही ठिकाणे हस्तगत करण्यासाठी रवाना केले. कारतलब खानासोबत कच्छवाह , चतुरभूज चौहान , अमरसिंह चंद्रावत , मित्रसेन व त्याचा भाऊ , सर्जेराव गाढे , सावित्रीबाई उर्फ रायबाघण , जसवंतराव कोकाटे , जाधवराव हे मुघलांचे सरदार ह्या मोहिमेत होते.

२ फेब्रुवारी इ.स.१६६१ला कारतलब खानाच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य पुण्याहून निघून लोहगडच्या बाजूने बोर घाटाकडे न जाता घाटमाथ्यावरून उंबरखिंडीच्या दिशेस उतरु लागले. नळीसारख्या बारिक वाटेने मुघल सैन्य सह्याद्री डोंगर उतरत होते. घाट उतरून मुघल सैन्य पुढे उंबरखिंडीत आले. उंबरखिंडच्या घनदाट अरण्यात लपून बसलेल्या शिवाजी राजांच्या सैन्याने मुघलांवर बाणांच्या वर्षावाने व तोफांच्या गोळ्यांनी हल्ला सुरू केला.

मुघल सरदार मित्रसेन व अमरसिंह यांनीही मराठा सैन्याचा बाणांचा हल्ला करून प्रतिकार करण्यास सुरुवात केला. जंगलात व डोंगरावरून गनिमी कावा पद्धतीने युद्ध करणाऱ्या मराठा सैन्याला घाबरून मुघल सैनिक मार्ग मिळेल तेथे पळत होते. पण सर्व मार्ग शिवाजी राजांच्या सैन्याने अडवून धरले होते. मुघल सैन्याचे मराठा सैन्याकडून प्रचंड हाल होत असताना रायबाघण यांच्या सल्लावरून कारतलब खानाने तह करण्यासाठी शिवाजी राजांकडे दूत पाठवला.

पाठीवर बाणांचे भाते , एका हातात धनुष्य व दुसऱ्या हातात भाला , कमरेला तलवार , मस्तकावर शिरस्त्राण, शरीरावर चिलखत व ढाल ह्या युद्धसज्ज वेशात शिवाजी राजे घोड्यावर बसलेले होते.

कारतलब खानाचा दूत शिवाजीराजांकडे आला व "कारतलब खान पूर्ण शरणागती पत्करतो आहे व ह्या प्रदेशातून बाहेर पडण्यासाठी परवानगी मागत आहे." हा संदेश दुताने शिवाजी राजांना दिला. शिवाजी राजांनी विनंती मान्य करून , कारतलब खानाला मुघल सैन्यासह निघून जाण्यास सांगितले. हा संदेश दूताने कारतलब खानाकडे पोहोचवला. तेव्हा कारतलब खान, मित्रसेन व इतर मुघल सरदारांनी शिवाजी राजांना खंडणी पाठवली. उंबरखिंडीच्या वेगवेगळ्या भागात लढत असलेल्या मराठा सैन्याला युद्धबंदीचा संदेश देण्यात आला व मुघल सैन्याला आल्या वाटेने परत पाठवण्यात आले.

युद्धात हरलेल्या मुघलांनी परत हल्ला केला तर त्यांचा बंदोबस्त करता यावा म्हणून शिवाजी राजांनी सेनापती नेतोजी पालकर यांना उंबरखिंडच्या परिसरात म्हणजेच उत्तर कोकणात ठेवले व शिवाजी राजे स्वतः दाभोळ, शृंगारपुरच्या दिशेस दक्षिण कोकणच्या मोहिमेवर गेले.[१]

उंबरखिंडचे स्थान[संपादन]

रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यात, खोपोली-पाली रस्त्यावरील शेंबडी गावापासून ०४ कि.मी अंतरावर चावणी गावाच्या अलिकडे उंबरखिंड आहे. चावणी हा छावणी ह्या शब्दाचा अपभ्रंश असावा.

मावळ तालुक्यातील कुरंवडे गावाजवळील नागफणी उर्फ ड्युक्स नोज ह्या सुळक्याच्या पायथ्याशी अंबा नदीचा उगम होते. ही नदी गारमाळ डोंगराच्या दरीतून उंबरखिंडीतून पुढे जाते व पुढे नागोठणेच्या खाडीत जाऊन समुद्राला मिळते.

मध्ययुगीन नाणे मावळ मधील अनेक घाटमार्गांपैकी एक - कुरंवडे घाटाच्या खाली उंबरखिंड आहे. पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स.१७८१) इंग्रज बोरघाटाऐवजी कुरवंडे घाटाच्या मार्गाने घाटमाथ्यावर येऊ नये म्हणून पेशव्यांचे सरदार हरीपंत फडके हे उंबरखिंडीत सैन्यासह पहारा देत होते.

उंबरखिंड विजय स्तंभ व विजयोत्सव[संपादन]

०२ फेब्रुवारी १६६१ रोजी शिवाजी महाराजांचे सैन्य व कारतलब खानाचे मुघल सैन्य यांच्यात उंबरखिंड येथे युद्ध झाले व त्यात मुघलांचा पूर्ण पराभव झाला. मुघल सैन्याने शरणागती पत्करल्यावर खंडणी घेऊन त्यांना सोडण्यात आले. ह्या युद्धात शिवाजी महाराज स्वतः हजर होते , म्हणून हे युद्ध मराठा इतिहासात महत्त्वाचे मानले जाते. ह्या युद्धाचा विजयोत्सव दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. लोणावळा येथील 'शिवदुर्ग मित्र , लोणावळा ' ह्या संस्थेने २००१ साली उंबरखिंडीत अंबा नदीच्या पात्राशेजारी ध्वजस्तंभ उभारून हा विजयोत्सव सुरू केला. त्यानंतर दरवर्षी हा उत्सव साजरा करण्यात येतो.[२]

'शिवदुर्ग मित्र, लोणावळा ' ह्याच संस्थेने येथे एक उंबरखिंड युद्ध विजयस्तंभ उभारला असून २ फेब्रुवारी २००७ रोजी ह्या विजयस्तंभाचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरेउदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

उंबरखिंड युद्ध विजयस्तंभाची उंची १२.५० मीटर असून, स्तंभाच्या समोरील बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून, डावीकडे आज्ञापत्रातील वृक्षा विषयीची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ ह्याच्या मोठ्या प्रतिकृती करून ठेवल्या आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ^ परमानंद, कवींद्र. श्री शिवभारत. भारत इतिहास संशोधन मंडळ,पुणे. pp. Page 291, 292.
  2. ^ 'किल्ला' दिवाळी अंक २०१२. p. १५० ते १५४. Unknown parameter |समाविष्ट= ignored (सहाय्य)