Jump to content

अर्काटचे राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अर्काटचे नवाब या पानावरून पुनर्निर्देशित)
अर्काटच्या राज्याचा ध्वज

अर्काटचे राज्य(सुरुवात: इ.स.१६९० ते विलय: इ.स. १८०१) हे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर चिंचोळ्या पट्टीत वसलेले, एक लहानसे मुस्लिम नवाब शासित राज्य होते. अर्काट याच नावाचे शहर या राज्याची राजधानी होती. अर्काट हे शहर कावेरी आणि कृष्णा नद्यांच्या मुखाजवळ बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीत वसलेले होते. या राज्याच्या उत्तरेला गुंडलकम्मा ही नदी होती. दक्षिणेला तंजावरचे राज्य व त्रिचनापल्लीचे राज्य ही हिंदू राज्ये तर पश्चिमेला म्हैसूरच्या राज्यातील पर्वतरांगा होत्या.

पॉंडिचेरी ही फ्रेंचांची वसाहत दक्षिण अर्काट जिल्ह्यात होती.

इतिहास

[संपादन]

प्राचीन काळी राष्ट्रकूट, चालुक्य, चोल, पल्लव, यादव, नायक व अखेर, मराठे ह्यांचा अंमल ह्या मुलखावर होता.[]

मुघल औरंगजेब ने राजाराम राजे वर स्वारी केली त्यावेळी राजाराम राजे जिंजीस गेले. त्याच्यावर औरंगजेबाने सैन्य पाठवून सुरुवातीला कर्नाटक प्रांत हस्तगत केला. त्यावेळेस छत्रपती संभाजीनगर हा मुघल साम्राज्याचा मुख्य सुभा होता. पण कर्नाटक प्रांत हस्तगत केल्यावर औरंगजेबाने कर्नाटकाचा एक स्वतंत्र छोटा सुभा केला. त्याची अर्काट ही राजधानी होती. त्यामुळे तेथील सुभेदारास अर्काटचे नवाब असे नाव पडले.

नवाब

[संपादन]

दक्षिणेचा सुभेदार निजाम उल मुल्कने दिल्लीविरूद्ध बंड करून हैदराबाद येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले त्यावेळी कर्नाटकात शिरा, कडप्पा, सावनूर आणि अर्काट या नवाबशाह्या निर्माण झाल्या. या नवाबशाह्यांचे शासक स्वतःला नवाब म्हणवीत.

शासक नवाबांची यादी

[संपादन]

नवाब

[संपादन]
अ.क्र. नवाबाचे नाव कार्यकाल
झुल्फिकार अली खान[] १६९० - १७०३
दाऊद खान[] १७०३ - १७१०
पहिला महम्मद सादतउल्लाखान[] १७१० - १७३२
अली दोस्त खान[] १७३२ - १७४०
सफदर अली खान[] १७४० - १७४२
महम्मद सैय्यद[] १७४२ - १७४४
महम्मद अन्वरूद्दीन[] १७४४ - १७४९
महम्मद अली वल्लाजाह[] १७४९ - १७९५
गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र[] १७९५ - १८०१
१० अझीम उद्दौला[] १८०१ - १८१९
११ आझम जाह[] १८२० - १८२५
१२ गुलाम महम्मद गौस खान[] १८२५ - १८५५

नवाब आणि त्यांचे वारस

[संपादन]
फ्रेंचांविरुद्ध लढत असताना नवाब अनवरुद्दीन मुहम्मद खानचा मृत्युक्षण (पॉल फिलिपॉटूने काढलेले चित्र)

अर्काटचा पहिला नवाब झुलफिकारखान हा होय. औरंगजेबाची दक्षिणेची मोहीम चालू असताना त्याने झुलफिकारखानाला इ.स. १६८७ मध्ये दक्षिणेत पाठवले व इ.स. १६९२ साली त्याला कर्नाटकाचा नवाब करून दक्षिणेच्या सुभेदाराच्या हाताखाली नेमले. याच्याकडे कर्नाटकाचा कारभार इ.स. १७०३ सालापर्यंत होता. यानंतर दाऊदखान पन्नी याची कर्नाटकच्या कारभारावर नेमणूक झाली. त्याने इ.स. १७०८ सालापर्यंत कर्नाटकाचा कारभार केला. त्यानंतर त्याची दिल्लीचा मुख्य सेनापती म्हणून नेमणूक केल्याने त्याच्या जागी सादतउल्लाखान हा कर्नाटकचा नवाब होऊन आला.

बहादूरशहाने मुघल नोकरशाहीतील अनुभवी नोकरशहा म्हणून सादतउल्लाखान याला इ.स. १७१० साली अर्काटच्या नवाबपदी नेमले. सादतउल्लाखानाला मुलगा नसल्याने त्याने त्याचा पुतण्या दोस्तअली याला स्वतःचा वारस म्हणून घोषित केले. इ.स. १७३२ साली सादतउल्लाखानाचा मृत्यू झाल्यानंतर दोस्तअली अर्काटचा नवाब झाला. दोस्तअलीने त्याच्या नवाबपदाच्या कार्यकाळात त्याच्या दोन जावयांनाही अर्काटच्या प्रशासनात आणि राजकारणात महत्त्वाच्या भूमिका दिल्या होत्या. त्याच्या जावयापैकी एक मुर्तझा अलीखान याची त्याने वेल्लोरच्या राज्यपालपदी[टीप १] नेमणूक केली तर दुसरा जावई चंदासाहेब याची अर्काटच्या दिवाणपदी त्याने नियुक्ती केली. दोस्तअलीनंतर त्याचा थोरला मुलगा सफदरअली अर्काटच्या नवाबपदी आला. मुर्तझा अलीखान याने काही दिवसातच सफदरअलीचा वध करून नवाबपद बळकावले. पण नंतर तो स्वतःच भिऊन वेल्लोरला पळून गेला तेव्हा सफदरअलीचा मुलगा दुसरा सादतउल्लाखान हा अर्काटचा नवाब झाला. हाही इ.स. १७४४ साली अर्काट येथे मारला गेला. अर्काटचे नवाब हे दक्षिणेच्या सुभेदाराचे मांडलिक आहेत तरीही कोणीही उठतो आणि अर्काटचा नवाब बनतो हे पाहून दक्षिणेचा सुभेदार निजामअली याने चिडून अर्काटवर स्वारी केली आणि तेथील कारभार अल्पवयीन नवाबाच्या वतीने पाहण्यासाठी महम्मद अन्वरूद्दीन याची नेमणूक केली. अल्पवयीन नवाबाचाही पुढे खून झाला त्यानंतर अन्वरूद्दीन स्वतंत्रपणे अर्काटटच्या राज्याचा कारभार पाहू लागला.

वारसाहक्काचा वाद

[संपादन]

अन्वरूद्दीनच्या मृत्यूनंतर अर्काटच्या नवाबपदासाठी वाद निर्माण झाला. नवाबाच्या जागेसाठी दोघेजण आपला हक्क सांगू लागले. एक अन्वरुद्दीन याचा मुलगा महम्मद अली व दुसरा चंदासाहेब. अन्वरुद्दीनला माफुजखान नावाचा महम्मद अलीहून मोठा एक मुलगा होता. पण अंबूरच्या लढाईत तो कैद होऊन शत्रूच्या हाती पडला. पुढे जरी त्याची लवकरच सुटका झाली असली तरी तो महम्मद अलीविरुद्ध कधी गेला नाही.

अर्काटचे राज्य खालसा

[संपादन]

इ.स. १८०१ साली अर्काटचा नवाब गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र‎ मरण पावला. त्यानंतर इंग्रज गव्हर्नर जनरलने जाहीर केले की, श्रीरंगपट्टण येथे जी कागदपत्रे सापडली आहेत त्यावरून इ.स. १७९५ साली दिवंगत झालेला नवाब महम्मद अली वल्लाजाहचा व त्याच्या नंतर गादीवर बसलेला त्याचा पुत्र गुलाम हुसैनी उम्दत उल उम्र‎ यांचा टिपू सुलतानशी गुप्‍त पत्रव्यवहार आढळून आला असल्यामुळे ते ब्रिटिश सरकारचे शत्रू ठरतात. टिपूशी कट केल्याच्या आरोपावरून इंग्रजांनी २७ जुलै, इ.स. १८०१ यादिवशी अर्काटचे राज्य खालसा केले. तथापि बरीच वाटाघाट झाल्यावर महम्मद अली वल्लाजाहचा नातू अझीम उद्दौला याच्याकडे नवाब ही नामधारी पदवी कायम ठेवण्यात आली.

राजकीय घडामोडी

[संपादन]

अर्काटचा शासक या नात्याने नवाब सादतउल्लाखान याने कधीही दिल्लीच्या मुघल सत्तेला झिडकारले नाही व स्वतःचे अस्तित्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला नाही मात्र मुघलाचा दक्षिणेतील सुभेदार निजाम उल मुल्कने मुघल सत्ता झुगारून हैदराबाद हे स्वतंत्र राज्य केल्यावर मुघलाच्या वतीने अर्काटचा शासक असलेला नवाब सादतउल्लाखान यानेही अर्काटचे स्वातंत्र्य जाहीर करून मुघल सत्ता आणि निजाम या दोघांशीही संबध तोडला.

अर्काट राज्यात व त्याच्या शेजारी इंग्रज, फ्रेंच व डच वखारी स्थापन झालेल्या होत्या. अर्काटच्या नवाबांनी या युरोपियन व्यापाऱ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राखलेले होते. या युरोपियन व्यापाऱ्यांना राज्यात व्यापार करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती त्यांनी दिलेल्या होत्या. या मोबदल्यात अर्काटच्या नवाबांना भरपूर प्रमाणात नफा मिळत असे.

इ.स. १७३२ साली अर्काटचा दिवाण असलेला चंदासाहेब; जो नवाब दोस्तअलीचा जावई होता, त्याने त्रिचनापल्लीचा शासक निपुत्रिक मरण पावल्यामुळे त्रिचनापल्लीच्या किल्ल्याला वेढा दिला आणि फंदफितुरीने किल्ला ताब्यात घेतला. नवाबाने किल्ला ताब्यात आल्यावर तो अर्काटच्या राज्यास जोडला व त्रिचनापल्लीचे राज्यपालपद चंदासाहेबास दिले.

त्रिचनापल्लीचा अर्काटच्या राज्यात समावेश झाल्यावर दोस्तअली स्वतःला कर्नाटकचा नवाब म्हणवून घेऊ लागला. त्याने चंदासाहेबाला शेजारी राज्यांशी युद्ध करण्यासाठी प्रोत्साहित केले. दोस्तअलीने चंदासाहेबाला शेजारील तंजावरच्या मराठा राज्यावर आक्रमण करण्यास सांगितले. तंजावरवर आक्रमण करण्यासाठी चंदासाहेबाने पॉंडेचेरी येथील फ्रेंच सैन्याची मदत घेतली. या आक्रमणात तो अयशस्वी झाला परंतु यामुळे वसाहतवाल्या फ्रेंच व्यापाऱ्यांचा भारतीय राज्यकर्त्यांच्या अंतर्गत राजकारणात प्रवेश झाला व इंग्रज आणि फ्रेंच व्यापाऱ्यांनी परस्परविरोधी गटांना सहकार्य करून स्वतःचा स्वार्थ साधला.

अर्काटच्या नवाबाने बऱ्याच वर्षांपासून मराठ्यांना चौथाई व सरदेशमुखी दिलेली नव्हती. त्यातच चंदासाहेबाने तंजावरवर केलेल्या आक्रमणाने साताऱ्याचा छत्रपती शाहू संतप्त झाला. परिणामी शाहूने रघूजी भोसले आणि फतेहसिंह यांच्या नेतृत्वाखाली इ.स. १७४० च्या सुरुवातीला मराठी सेना अर्काटच्या स्वारीवर पाठविली. दिनांक २० मे, इ.स. १७४० रोजी दामलचेरू येथे नवाब दोस्तअली आणि मराठा सैन्यात लढाई झाली. या लढाईत दोस्तअली पराभूत होऊन मारला गेला. दोस्तअलीचा द्वितीय मुलगा हसनअलीही या लढाईत मारला गेला. दोस्तअलीचा मोठा मुलगा सफदरअली वेल्लोरहून वडिलांच्या मदतीला येत असताना वाटेतच त्याला मराठ्यांच्या विजयाची बातमी समजल्याने तो माघारी गेला व वेल्लोरच्या किल्ल्यात दडून बसला. त्याने त्याचे कुटुंब पॉंडेचेरी येथे फ्रेंचांच्या रक्षणाखाली पाठवून दिले. वेल्लोरच्या किल्ल्यातूनच चाळीस लाख रुपये खंडणी आणि नियमितपणे चौथाई व सरदेशमुखी मराठ्यांना देण्याचे सफदरअलीने मान्य करून मराठ्यांकडे शांततेची याचना केली.

दोस्तअलीचा जावई चंदासाहेब ज्याला दोस्तअलीनेच त्रिचनापल्लीचे राज्यपालपद दिले होते त्यानेही राज्यपाल झाल्यावर अर्काटच्या नवाबाचे वर्चस्व झुगारून दिलेच पण मराठ्यांविरुद्धही शस्त्र उगारून कारवाया चालू केल्या होत्या परिणामी त्याच्याही कारवायांना आळा घालण्याचे मराठ्यांनी ठरविले. रघुजी भोसलेने दिनांक २६ मार्च, इ.स. १७४१ रोजी त्रिचनापल्लीवर आक्रमण करून चंदासाहेबाचा पराभव केला व त्याला कैद केले. त्रिचनापल्लीवर मराठ्यांचा ताबा निर्माण झाला पण चंदासाहेबाने त्याचे कुटुंब पॉंडिचेरी येथे फ्रेंचांच्या संरक्षणाखाली पाठवून दिल्याने मराठ्यांची निराशा झाली. रघुजी भोसलेने चंदासाहेबाचा पराभव केल्यानंतर मुरारराव घोरपडेची मराठ्यांच्या अधिपत्याखालील त्रिचनापल्लीचा राज्यपाल म्हणून नेमणूक केली. मुराररावासाठी काही लष्करही रघुजीने त्याच्याकडे ठेवले आणि कैदी चंदासाहेबाला घेऊन तो साताऱ्याला परत आला.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ गोखले, कमल. अर्काटचे नबाब. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)
  2. ^ a b c d e f g h i j k l "The Prince of Arcot" (इंग्रजी भाषेत). 2017-08-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० सप्टेंबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)

तळटीपा

[संपादन]
  1. ^ राज्यपाल - राजाच्या वतीने संबंधित प्रदेशाचे शासन पाहणारा/चालविणारा प्रमुख.