केदारेश्वर मंदिर (धर्मापुरी)
केदारेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील धर्मापुरी गावाजवळ असलेले मध्ययुगीन शिवमंदिर आहे. याचे स्थापत्य चालुक्य शैलीत केले आहे.
आरंभ
[संपादन]मराठवाडा परिसर प्राचीन शिल्प स्थापत्य अवशेषांनी समृद्ध आहे. प्राचीन ऐतिहासिक पुराव्यांचा विचार करत असताना मराठवाड्याला वगळून चालतच नाही. आजही अशा अनेक ऐतिहासिक खाणाखुणा जागोजागी सर्व मराठवाडाभर उभ्या आहेत. सातवाहनांपासून यादव काळापर्यंत येथे अनेक शिल्पस्थापत्य रचना उदयास आल्या.
मराठवाड्यावर सर्वप्रथम राज्य सातवाहनांनी केले.प्रतिष्ठाननगरी ही त्यांची राजधानी होती. वेरुळच्या कातळातून अखंड काव्य निर्माण करणारा सर्वश्रेष्ठ कलाकार कोकस हा या प्रतिष्ठानचाच. तर या प्रतिष्ठानवर इ.स.पूर्व २३५ पासून ते इ.स. २२५ असे सुमारे साडेचारशे वर्ष सातवाहनोनी राज्य केले. त्यानंतर या मराठवाड्यात इ.स. २२५ ते ५५० असे सुमारे तीनशे वर्ष वाकाटकांनी राज्य केले. त्यानंतर इथे बदामीच्या चालुक्यांची सत्ता निर्माण झाली. ती सुमारे दोनशे वर्ष म्हणजे इ.स. ५५० ते ७५० अशी टिकली. ह्युएन-त्सांग याच काळात मराठवाड्यात आला होता. त्यानंतर इथे राष्ट्रकुटांची सत्ता निर्माण झाली. राष्ट्रकुटांच्या प्रभावी राजवटीनंतर इथे आले कल्याणीचे चालुक्य कल्याणी. हे सरधारणत: १० वे ११ वे शतक नंतर इथे अल्पकाळ सत्ता टिकली ती कलचुरींची.
सर्व राजवंशात सातवाहनांपासून ते यादवांपर्यंत मराठवाड्यात धार्मिक,सामाजिक,सांस्कृतिक असंख्य घडामोडी घडल्या. प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारी अनेक देवालये व गुहाशिल्पे निर्माण झाली. या सर्व देवालयात धर्मापुरीचे केदारेश्वर देवालय वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे.काळाच्या ओघात मूळ मंदिराचा जवळजवळ निम्माच भाग आज कसाबसा तग धरून उभा आहे.
चालुक्य राजवटीतील विक्रमादित्य सहावा याचा पुत्र सोमेश्वर तृतीय याने धर्मापुरी नगरी निर्माण केली. या राजाला साहित्याची आवड होती. त्याने 'अभिलषितार्थ चिंतामणी' (राजमानसोल्लास) या ग्रंथाची निर्मिती केली होती. या धर्मापुरीत सर्व सोयी होत्या. भव्य राजप्रासाद,नृत्यशाळा,तलाव,मनोहारी उद्याने,सुंदर वनराइ,उत्तुंग देवालये आणि भव्य बाजारपेठ यांनी ही नगरी सजलेली व गजबजलेली होती.
धर्मापुरीतील शिलालेख
[संपादन]धर्मापुरीत आजपावेतो तीन कानडी आणि एक नागरी शिलालेख उपलब्ध आहे. नागरी शिलालेखाचे वाचन पुरातत्त्व खात्याच्या वतीने डॉ.वि.भी. कोलते यांनी केले.हा शिलालेख संस्कृत भाषेत कोरलेला असून लेखनाचा काळ 'शके संवत १०५६ आनंदसंवत्सांतर्गत आषाढ वदी १५ सोमे' हा दिलेला आहे. इसवीसनाप्रमाणे त्यादिवशी तारीख होती २३ जुलै ११३४ वार सोमवार.[१] या शिलालेखात श्रीपती नामक इसमाने धर्मापुरीत मुरारीचा मठ बांधल्याचा उल्लेख येतो.
प्रशासनाच्या सोयीसाठी त्यावेळी राज्याचे विभाग आणि उपविभाग पाडले जात होते. विभागलेल्या भागांचा बेळगोळ ३००, बनवासी १२०००अशाप्रकारे गावाच्या किंवा प्रदेशाच्या समोर आकडे देऊन उल्लेख करणे ही पद्धत होती. हे आकडे त्या त्या विभागातील खेड्यांची संख्या सुचवत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. धर्मापुरीतीलच दुसऱ्या शिलालेखात लोक्कीगुंडी ५०० असा उल्लेख येतो. हे लोक्कीगुंडी म्हणजे आजचे लोखंडे होय.[२] याच शिलालेखात धर्मापुरीत काळेश्वर देवालय व बंकीसेट्टी बस्ती असल्याच्या नोदी आढळतात.
मंदिर
[संपादन]हे मंदिर गावापासून सुमारे १ कि.मी. अंतरावर असून ही पूर्ण वास्तू ५७×४८ फूट लांबी रुंदीची असून महीमंडप अत्यंत विस्तीर्ण आणि भव्य आहे. या मंडपातील १६ खांब अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. महामंडपातील ९×९×६ च्या चौथर्यावरील एक रंगशिळा मन वेधून घेते. त्याच्या चारही कोपऱ्यांवर चार प्रचंड शिल्पांकीत खांब आहेत. रंगशिळेच्या छतावरही कीर्तीमुख,सप्तमातृका,वराह इत्यादिंची मोहक शिल्पकारीता आहे. रंगशिळेवरील छताच्या मध्यभागी पूर्ण विकसित कमळ आहे. या छताचा इंचन इंच भाग भौमितिक आकृत्या व लतापल्लवींच्या गुंफणीने शिल्पित केलेला आहे.
मुखमंडप,महामंडप,अंतराळ व गर्भगृह हे या देवालयाचे प्रमुख भाग आहेत. देवालयाच्या अर्धभिंतीवर गजथर व नरथराची रचना आढळते. गर्भगृहाच्या द्वारपट्टीकेवर पाच शिल्पपट्टीका वेगवेगळ्या भौमितिक आकारांनी शिल्पित केलेल्या आहेत. उंबरठ्यावर विशाल किर्तीमुख आहे. गर्भगृह १०×१० चे असून विशिष्ट पद्धतीच्या भौमितिक आकृतीच्या आधारे गर्भगृहाचे सपाट छत उभारलेले आहे.
मंदिरावरील शिल्पे
[संपादन]देवादिकांची शिल्पे
[संपादन]केदारेश्वर देवालयाचे खरे कलावैभव बाह्यभिंतीवरील शिल्पकारीतेत दिसते. या बाह्यभिंती तारकाकृती आकार देऊन मोठ्या आकर्षक बनवलेल्या आहेत. या बाह्भिंतीचे जोते खूपच उंच आहे. या जोत्यावर नरथराचीही रचना शिल्पकाराने केली आहे. या भिंतीच्या कटीप्रदेशावर असंख्य मूर्ती कमालीच्या तालबद्धतेने कोरलेल्या आहेत. एक समर्थ कलाविष्कार या ठिकाणी जाणवतो. प्रत्येक शिल्पात जिवंतपणा,गतिमानता आहे. नृसिंह व वामन अवताराच्या शिल्पांच्या रूपाने अवतार शिल्पांचा मोहक अविष्कार याठिकाणी झालेला आहे. वामन अवताराचे शिल्प असलेली प्रचंड शिळा या देवालयाच्या भिंतीमधून कोसळून बाजूला जमिनीवरच दुर्लक्षित व दुरावस्थेत शांतपणे पडलेली दिसते.
देवालयाच्या उत्तरेकडिल देवकोष्टात केशव,पश्चिमेकडिल देवकोष्टात वासुदेव व दक्षिणेकडिल देवकोष्टात नृसिंह यांच्या प्रतिमा आहेत. शिवाय देवळाच्या मंडोवरावरील शिल्पावळीत भगवान विष्णूच्या केशवादी २४ मूर्तीप्रकारातील सुरेख प्रतिमा आढळतात. वामन अवताराच्या शिल्पातील वामन द्विभूजी असून त्याचा उजवा हात मनगटापासून पूढे भग्न झालाय. वामनाच्या डोक्यावर अधोमुष्क आहे. समोरचा स्थानक बळीराजा हातातील कलशातून वामनाला जलदान करीत आहे. शेजारी उभे असलेले दाढीधारी शुक्र बळीराजाला मार्गदर्शन करीत आहेत. संहार श्रीगणेशाची एक मूर्ती या केदारेश्वराच्या मंदिरावर सुस्थितीत आहे. दुर्दैवाने त्याचे सर्व हात आयुधांसह भग्न झाले आहेत. गणपती सूर्यकर्णी असून त्याची सोंडही अर्धवट तुटलेली आहे. याशिवाय मंदिरावर लक्ष्मी-विष्णूची आलिंगन अवस्थेतील मूर्ती,संहाररूपातील विष्णू,ब्रम्हदेव,चामुंडा व भैरवाच्या मूर्तीही आहेत.[३]
सौंदर्यशिल्पे
[संपादन]महाराष्ट्राच्या शिल्पवैभवात भर टाकणाऱ्या अनेकविध सौंदर्यशिल्पांचा अविष्कार याठिकाणी झालेला आहे. येथील एका पत्रलेखिकेचे शिल्प विलक्षण सुंदर आहे. हे चिरतारुण्ययाने मुसमुसलेले मोहक सौंदर्य पाठमोरे उभे आहे. या शिल्परचनेची कल्पना मोठी काव्यमय आहे. एक सौंदर्यसंपन्न अप्सरा पाठमोरी उभी राहून शिलालेख लिहीत आहे. अशा या मोहक शिल्परचनेच्या चार ओळी पूर्ण झाल्या असून पाचव्या ओळीवर हात थबकला आहे. हा क्षण येथील शिल्पीने आपल्या कलासामर्थ्याने गोठवून ठेवला आहे.[४] एका शिल्पात मुलायम देहकांतीची अप्सरा आपल्या देहावरील विस्कळीत झालेले पातळ वस्त्र व्यवस्थित करण्यात मग्न दिसते. स्वतःच्या मोहक कृश कटीवरून खाली घसरत असलेले स्वतःचे वस्त्र दोन्ही हाताने स्वतःच्या पिळदार मांड्यांमध्ये पकडण्याचा ती प्रयत्न करीत आहे. तर एक मर्कट तिचे ते वस्त्र ओढण्याचा वात्रटपणा करीत असल्याचे शिल्पकाराने विलक्षण गतिमानतेने शिल्पित केले आहे. अन्य एका शिल्पातील सौंदर्यवतीच्या एका हातात आम्रडहाळी आहे, तर दुसऱ्या हातावरील एका खट्याळ पोपटाने आपली चोच त्या फळाऐवजी या सौंदर्यवतीच्या उरोजावरच मारलेली आहे. याठिकाणी दर्पणात आपला चेहरा न्याहाळीत कुंकुमतिलक लावणारी लावण्यवती आहे. एका सौंदर्यवतीच्या कमरेस नागाने विळखा घातलेला आहे आणि सौंदर्याचे केंद्रस्थान असलेल्या नाभीजवळ विंचू दाखवलेला आहे.[५]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ डॉ. वि.भि. कोलते, भारतीय इतिहास आणि संस्कृती, धर्मापुरी येथील शिलालेख
- ^ डॉ.एम.एम.कलबुर्गी, महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख, पद्मगंधा प्रकाशन, २००९
- ^ डॉ. प्र.र.देव, धर्मापुरी येथील चालुक्य शिल्पस्थापत्य अवशेष, मराठवाडा संशोधन मंडळ वार्षिक, १९७५, पान नंबर १२
- ^ डॉ. डी.पी. राव, टेंपल्स ऑफ मराठवाडा, पब्लिकेशन स्कीम, जयपूर, इ.स्.अ १९९१
- ^ संतोष दहिवळ, पत्रलेखिकेच्या निमित्ताने धर्मापुरी, ग्रंथसखा डिसेंबर २००९, पान नंबर २६ 6. बीड जिल्ह्याच्या प्राचीन व मध्ययुगीन इतिहास लेखक: डॉ सतीश साळुंके / प्रथम आवृत्ती 23 फेब्रुवारी 2011/ पृष्ठ 166 ते 189