मनुस्मृती
मनुस्मृती हा एक प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे. ब्रिटिश काळात इ.स. १७९४ इंग्रजी भाषेत भाषांतर झालेला हा सर्वात पहिला ग्रंथ असून याच्यावरूनच ब्रिटिशांनी हिंदू कायदा तयार केला.
मनुस्मृतीतील छंदबद्ध रचनेवरून ती इ.स.पू.२ रे शतक ते इ.स.३ रे शतक या काळातील असावी. मनुस्मृती हा मनु आणि भृगु यांतील धर्मावरील संवाद आहे. यात कर्तव्ये, आचार, गुण, नियम व अधिकार इ. बाबतीत चर्चा आहे. मनुस्मृतीच्या आज ५०००हून अधिक प्रती उपलब्ध असून त्यातील कोलकाता येथील इ.स.१८ व्या शतकातील प्रत अधिकृत मानली जाते. मनुस्मृतीचा प्रसार भारताबाहेर म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि इंडोनेशियामध्ये देखील झाला होता.
टीका
[संपादन]महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र शासनाने मनुस्मृतीच्या विक्री-खरेदीवर बंदी घातलेली आहे.[१] मनुस्मृती मध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे/श्लोक सुद्धा आहेत.[ संदर्भ हवा ] या ग्रंथामुळे जातिव्यवस्था, अस्पृश्यता, जातिबंधने बळकट झालेली होती. त्यामुळे महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सर्वप्रथम 'मनुस्मृती' ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले आहे.[२]
अध्याय
[संपादन]मनुस्मृतीमध्ये एकूण १२ अध्याय असून त्यात २६८३ श्लोक आहेत.
अध्याय १- ब्रह्मदेवाची उत्पत्ती, स्वर्ग, भूमी इ.ची उत्पत्ती
अध्याय २- धर्माचे सामान्य लक्षण
अध्याय ३- गृहस्थाश्रम, कन्यालक्षण, विवाह प्रकार, नित्यश्राद्ध, आतिथ्य इ.
अध्याय ४- संतोष प्रशंसा, अनध्याय, स्वाध्याय इ.
अध्याय ५- भक्ष्य अभक्ष्य निर्णय, स्त्री धर्म,पातिव्रत्य, अशौच विचार
अध्याय ६- वानप्रस्थ, अतिथिचर्या, परिव्राजक व त्यांचे नियम, ध्यानयोग इ.
अध्याय ७- राजधर्म, राजप्रशंसा, दंडप्रशंसा, राजकृत्ये इ.
अध्याय ८- व्यवहार, साक्षीदार, १७ प्रकारचे दान
अध्याय ९- स्त्री रक्षण, स्त्री स्वभाव, अपराधांसाठी दंड
अध्याय १०- वर्णसंकर, व्रात्य, दस्यू, चांडाळ, प्रायश्चित्त इ.
अध्याय ११- स्नातकाचे प्रकार, सोमयागाचे अधिकारी, पंचमहापातके
अध्याय १२- शुभाशुभ कर्मांचे काम, मानस कर्मे , त्रिविध शारीर कर्मे
[३]
रचना
[संपादन]ब्रह्मदेवाने उत्पन्न केले असलेले धर्मशास्त्र मनूला मिळते. तो ते ऋषींना सांगतो. असे यात लिहिले आहे.
श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये सांगितले आहे-
- इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं ।
- विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेब्रवीत् ॥
अर्थात, श्रीकृष्ण म्हणतात, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला आणि मनूने इक्ष्वाकुला सांगितला.
श्रीकृष्ण या श्लोकात ज्या मनुचा उल्लेख करत आहे,तो आणि मनुस्मृती चा कर्ता मनु हे दोघेही वेगळे आहेत. कारण गीता साधारण पणे साडेपाच हजार वर्षांपूर्वी सांगितली गेली. मनुस्मृतीचा कर्ता मनु हा इसवी सना नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकातील असावा. असे संशोधक मानतात. तसेच श्रीकृष्णाने "अविनाशी योग" म्हणजे ब्रम्हज्ञान त्या मनुला सांगितले. मनुस्मृतीत लिहिलेले तथाकथित कायदे नाही.
सुवचने
[संपादन]मनुस्मृतीतील काही सुवचने
१.
विषादप्यामृतं ग्राह्यं बालादपि सुभाषितम्।
अमित्रादपि सद्वृत्तममेध्यादपि काञ्चनम्।। (२.२३९)
विषातील अमृत घ्यावे, चांगला विचार एखाद्या लहान मुलाने मांडला तरी त्याच्याकडूनसुद्धा तो घ्यावा, शत्रू असला तरी त्याच्यातील चांगल्या गोष्टी स्वीकाराव्यात आणि घाणीत असलेली सुवर्णसुद्धा स्वीकारावी.
२.
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः।
यत्रैतास् तु न पूज्यन्ते सर्वास् तत्राफलाः क्रियाः ॥ (३.५६)
जेथे नारीची पूजा होते तेथे देवता रममाण होतात. परंतु जेथे अशी पूजा होत नाही तेथे सर्व धर्मक्रिया विफल होतात.
३.
पिता रक्षति कौमारे भर्ता रक्षति यौवने।
रक्षन्ति स्थविरे पुत्राः न स्त्री स्वातंत्र्यं अर्हति॥ (९.३)
स्त्रीचे ती कुमारी असताना पित्याने रक्षण करावे, तरुणपणी नवऱ्याने आणि वृद्धापकाली तिला पुत्रांनी सांभाळावे. स्त्रीला कधी संरक्षणाशिवाय (एकटे) सोडू नये.
४.
चक्रिनो दशमिष्ठस्य रोगिनो भारिनः स्त्रियः।
स्नातकस्यच राज्ञश्च पन्था देयो वरस्यच ॥
(पायी चालताना अरुंद) रस्त्यावर (मागून किंवा पुढून) वाहनावर आरूढ असलेलेला माणूस (चक्रिनः),९० ते १०० वर्षांचा वृद्ध (दशमिन्), रोगी, स्त्री, ओझे वाहणारा (भारिन्), विद्वान (स्नातक) व राजा (राज्ञः) (यांपैकी कोणी आले तर ) त्यांना याच क्रमाने अग्रक्रम द्यावा. (२.१३८).
कुवचने
[संपादन]स्त्रियांविषयी आणि शुद्रांविषयी मनुस्मृतीत अनेक अपमानास्पद आणि भेदभावाची वादग्रस्त वचने आढळून आलेली आहे. त्यामुळे प्रामुख्याने महिला आणि मागासवर्गीय समुहाद्वारे मनुस्मृतीवर टीका केला जाते. मनुस्मृतीमुळे समाजात विषमतेचा पाया रचला गेला, अशी अनेक लोकांची समजूत आहे.
- शुद्ध आणि अस्पृश्यांविषयी मनुस्मृतीतील काही वाईट वचने खालीलप्रमाणे आहेत
- [४]
- ‘शूद्रांस उष्टे अन्न व जीर्ण वस्त्रे द्यावीत. धान्याचा कोंडा इत्यादी भाग व जुने अंथरूण पांघरूण इत्यादी द्यावे.’ (मनु. १०.१२५)
- ‘धनार्जन करण्यास समर्थ असलेल्या शूद्रानेही माता-पिता इत्यादी पोष्यवर्गाचे संवर्धन व पंचयज्ञ करण्यास लागणाऱ्या द्रव्याहून अधिक द्रव्याचा धनसंचय करू नये. कारण धनसंचय झाला असता शूद्र ब्राह्मणास पीडा देऊ लागतो.’ (मनु. १०.१२९)
- शूद्राने वरिष्ठ तीन वर्णाच्या स्त्रीशी व्यभिचार केला तर त्याचे लिंगविच्छेदन करून त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याचा दंडक घालतो. हा अपराध ती स्त्री त्याच्या संरक्षणाखाली ठेवली असता घडला असेल तर त्याला प्राणदंड द्यावा, असा उपदेश तो करतो.
- ब्राह्मण स्त्रीशी शूद्राने केलेल्या संभोगाबाबत- मग तो खुशीचा असो वा नाखुशीचा - (मनु ८.३६६) त्याला प्राणदंड देण्याचा आदेश देतो. याउलट, ब्राह्मणाने ब्राह्मण स्त्रीवर बलात्कार केल्यास त्याला हजार (नाणी) दंड होई व त्याने तिच्याशी व्यभिचार केल्यास पाचशे (मनु ८.३७८) आणि ब्राह्मणाने असंरक्षित क्षत्रिय वा वैश्य वा शूद्र स्त्रीशी संभोग केल्यास त्याला पाचशे दंड होई (मनु ३.३८५)
- एखादा शूद्र एखाद्या ब्राह्मणाला अपशब्द बोलला तर त्याला शारीरिक दंड दिला जाई व त्याची जीभ छाटून टाकली जाई (मनु ८.२७०), पण एखाद्या क्षत्रियाने वा वैश्याने तसे केले तर त्यांना अनुक्रमे १०० व १५० दंड होई (मनु ८.२६७) आणि एखादा ब्राह्मण एखाद्या शूद्राला अपशब्द बोलला तर त्याला फक्त १२ दंड होई (मनु ८.२६८) किंवा काहीच होत नसे.
- ज्या कन्येचे वाग्दान झाल्यावर पती मरतो तिच्याशी तिच्या पतीच्या सख्ख्या भावाने विवाह करावा.
- पहिल्या ऋतुप्राप्तीपासून आठ वर्षांपर्यंत जिला अपत्य होत नाही, तिच्या पतीने आठव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जिची अपत्ये होऊन मरत असतील तिच्या पतीने दहाव्या वर्षी, जिला कन्याच होत असतील तिच्या पतीने अकराव्या वर्षी दुसरा विवाह करावा, जी अप्रिय भाषण करणारी असेल आणि निपुत्रिक असेल तिच्या पतीने तात्काळ दुसरा विवाह करावा, पुरुषाने दुसरा विवाह केला असता जी स्त्री रागावून निघून जाते तिला पतीने तात्काळ माहेरच्या लोकांपाशी पोहोचवावे, जिला ऋतू प्राप्त झाला आहे, अशी कन्या मरेर्पयत पित्याच्या घरी राहिली तरी चालेल, पण तिला विद्यागुणरहित वरास कधीही देऊ नये, असे मनुस्मृतीच्या अध्याय ९ मध्ये नमूद केलेले आहे.
- महिलांविषयी मनुस्मृतीतील काही वाईट वचने खालीलप्रमाणे आहेत
- "व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." (मनुस्मृती, अध्याय ९ वा. श्लोक १९)
- "लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
- "पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
- "स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्याचा भोग घेतात." [९/१४]
- "पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावतः स्नेहशून्य असतात." [९/१५]
- "नवऱ्याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची त्या बायकोवरची मालकी कायम राहते."[९/४६]
- "सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [२/१३]
- "माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [२/१५]
- "ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [३/८]
- "जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [३/११]
- "ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [३/५६]
- "नवऱ्याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [४/४३]
- "आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरुण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [५/४७]
- "स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [५/४८]
- "पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [५/४९]
- "पति जरी रागावलेला असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [५/१५०]
- "लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [५/१५२]
- "पती सदाचारशून्य असो, तो दुसऱ्या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [५/१५४]
- "पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [५/१५५]
- "स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [५/१६२]
- "पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [५/१६८]
- "स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपल्या पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [५/१६६]
- "पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [६/२]
- "विवाहाच्या पूर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही. योग्य नाही." [६/३]
- "स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसऱ्याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचार दोष होत." [९/१३]
- "स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतात." [९/१८]
पुस्तके
[संपादन]मनुस्मृतीवरील मराठी पुस्तके
[संपादन]- डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृती का जाळली? (डॉ. यशवंत मनोहर)
- निवडक मनुस्मृती, संकलन आणि भाष्य (डॉ. रंगनाथ मुडसूरकर)
- मनु आणि स्त्री (डॉ. म.बा. कुलकर्णी)
- मनुशासनम् : निवडक मनुस्मृती (विनोबा भावे)
- मनुस्मृति उघडा! (गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी)
- मनुस्मृति-मराठी-भाष्य (स्वामी स्वरदानंदभारती)
- मनुस्मृती (अशोक कोठारे). या पुस्तकाची ई-आवृत्ती मनुस्मृती-मराठी अनुवाद येथे मोफत वाचता येते.
- मनुस्मृती (शंकर वासुदेव अभ्यंकर)
- मनुस्मृती-काही विचार (डॉ. नरहर कुरुंदकर)
- मनुस्मृति कालबाह्य झाली का? (गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी)
- मनुस्मृती - भूमिका (वरदानंद भारती)
- श्री मनुस्मृती-सार्थ-संभाष्य (वरदानंद भारती)
- महर्षी मनूच्या मनुस्मृतीमधील मौलिक विचार (क. के. शिंत्रे). हिंदीत - महर्षि मनु के मनुस्मृती अंतर्गत मौलिक विचार.
मनुस्मृतीवरील हिंदी पुस्तके
[संपादन]- महर्षि मनुरचित मनुस्मृती : उपयोगी रूपांतर (गोविन्दसिंह)
- मनुस्मृतीचे हिंदी भाषांतर http://www.hindibookspdf.com/ या संकेतस्थळावरून मोफत उतरवून घेता येते.
मनुस्मृतीवरील इंग्रजी पुस्तके
[संपादन]- Manusmriti (Patrick Olivelle) in The Oxford International Encyclopedia of Legal History
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/manusmriti-reprinted-in-marathi-now/articleshow/51322786.cms
- ^ http://m.lokmat.com/maharashtra/manusmriti-again-publishing-new-form-despite-being-banned/
- ^ भारतीय संंस्कृृती कोश
- ^ https://www.loksatta.com/vishesh-news/manusmriti-granth-toward-to-the-constitution-1163694/