सुमती जांभेकर
सुमती धोंडदेव जांभेकर | |
---|---|
जन्म |
५ जुलै, १९५० चिपळूण |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | एम. कॉम. व बी.एड |
पेशा | समाजसेविका |
धर्म | हिंदू |
पुरस्कार | अहिल्याबाई होळकर पुरस्कार |
सुमती धोंडदेव जांभेकर (५ जुलै, १९५०:चिपळूण - ) या महाराष्ट्रातील समाजेविका होत्या. त्यांचे बी.कॉम. पर्यंतचे शिक्षण चिपळूण मधेच झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील जामसुख या गावी शिक्षिका म्हणून नोकरीस सुरुवात केली. अध्यापनाचे कार्य चालू असतानाच एम. कॉम. व बी.एड.ची पदवी प्राप्त केली. त्यानंतर चिपळूण येथील युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये नोकरी करू लागल्या. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड असल्याने सामाजिक कामासाठी जास्त वेळ देता यावा यासाठी २५ वर्षे नोकरी केल्यानंतर स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली.
नोकरी
[संपादन]शिक्षक म्हणून काम करताना मुलांच्या शिक्षणाबद्दल आणि भवितव्याबद्दल विचार करताना त्यांच्या असे लक्षात आले की जवळपास ३० ते ४० टक्के विद्यार्थी दरवर्षी नापास होतात. अशा मुलांचे वर्ष वाया जाते आणि अनेक विद्यार्थी शिक्षण सोडून देतात. अशी मुले खऱ्या शिक्षणापासून वंचित राहतात. तेव्हा अशा मुलांसाठी त्यांनी त्यांच्या आवडीच्या विषयांमधील शिक्षण देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. त्यात शारीरिक शिक्षणाची आवड असणाऱ्या मुलांना व्यायामासाठी व वेगवेगळ्या क्रीडास्पर्धात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले, निसर्गाची आवड असणाऱ्यांना कलम लावणे तसेच शेती, पर्यावरणाची माहिती दिली. अशा प्रकारे औपचारिक शिक्षणाबरोबर अनौपचारिक शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पण शाळेत हे सगळे करताना मर्यादा होत्या.
सामाजिक कारकीर्द
[संपादन]१० ऑगस्ट १९८१ रोजी ‘कोकण वुमेन युथ अँड स्टुडंटस् डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटी (कोवॅस)’ या नावाने संस्था स्थापन केली. कोकणातील स्त्रिया, तरुण व विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी व स्वयंरोजगारासाठी या संस्थेची सुरुवात करण्यात आली. याद्वारे मुलांना व महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रातील व्यावसायिक प्रशिक्षण व विक्री कौशल्य शिकविण्यात येऊ लागले. हे करत असतानाच जांभेकर बाईंच्या सहकारी मैत्रीण श्रीमती इंदुमती पोळ यांनी मतिमंद मुलांच्या शिक्षणाबद्दल सुचविले. यातूनच २६ जानेवारी १९८८ रोजी मतिमंद मुलांना विशेष शिक्षण व प्रशिक्षण देण्यासाठी ‘जिद्द मतिमंद मुलांची शाळा’ स्थापन करण्यात आली. सुरुवातीला जागेची अडचण असल्याने जांभेकर बाईंच्या घरीच ही शाळा चालत असे. मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाट्यस्पर्धा, क्रीडास्पर्धांचे आयोजन करण्यात आले. तसेच राख्या, मेणबत्त्या, भेटकार्ड, खडू, आकाशदिवे तयार करण्याचे कौशल्य शिकविले. त्याचबरोबर १८-१९ वर्षांच्या मुलांसाठी व्यावसायिक उत्पादनाच्या प्रशिक्षण कार्यशाळा भरविल्या जातात. यातून मतिमंद मुले १२ प्रकारचे उत्पादन तयार करतात. त्याचबरोबर मतिमंद मुलांचा तीन तासांचा ‘स्वर भरारी’ हा संगीतमय कार्यक्रम (ऑर्केस्ट्रा) तयार करण्यात आला आहे. त्याचे आजपर्यंत अनेक ठिकाणी प्रयोग करण्यात आले आहेत. तसेच या शाळेतील मतिमंद मुलांनी विविध क्रीडा व नाट्य स्पर्धांमध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर बक्षिसे मिळविली. हे सगळे करत असताना जांभेकर बाईंना प्रशिक्षित शिक्षकांची उणीव भासायला लागली. त्यामुळे त्यांनी २००८ मध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतील पहिले विशेष शिक्षणाचे (स्पेशल एज्युकेशनचे) डी.एड. महाविद्यालय सुरू केले. याबरोबरच कोवॅस संस्थेतर्फे जांभेकर बाईंनी अनेक उपक्रमांना सुरुवात केली आहे. त्यात ‘भरारी अपंग कल्याण केंद्र’, ‘कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन केंद्र’, ‘कोकण स्त्री जागृती केंद्र’ इत्यादी. तसेच त्यांना व्यायामाची आवड असल्याने ‘रत्नागिरी जिल्हा योग केंद्र’ व ‘चिपळूण तालुका जिमनॅस्टिक असोसिएशन’ची स्थापना त्यांनी केली. त्याचबरोबर कोकण विकास मंच, कोकण कन्या नागरी सहकारी पतसंस्था यांसारख्या संस्थांची स्थापना देखील जांभेकर बाईंनी केली. तसेच महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण केंद्र, रोजगार हमी योजना, महिला सक्षमीकरण योजना आदी सरकारी समित्यांवर देखील त्या काम करीत आहेत.
पुरस्कार
[संपादन]- अहिल्याबाई होळकर पुरस्कार
- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा सामाजिक जाणीव व सामाजिक कार्य पुरस्कार