केतकी मोडक
Appearance
केतकी मोडक | |
---|---|
निवासस्थान | पुणे |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | एम.ए. (मराठी), एम.एड., पीएच.डी. |
पेशा | प्राध्यापिका, लेखिका, भाषांतरकार |
डॉ. केतकी मोडक (जन्म: १९६८) या मराठीतील लेखिका, भाषांतरकार आहेत, संतसाहित्याच्या अभ्यासक आहेत. आणि मराठी भाषेच्या प्राध्यापिका होत्या. इतिहासलेखन केले आहे.
शिक्षण
[संपादन]मोडक यांनी एम.ए (मराठी), एम.एड, पीएच.डी. या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी पीएच.डी.च्या प्रबंधासाठी 'मराठी संत साहित्यातील नाथप्रतिपादित सोऽहम् साधना' या विषयावर संशोधन केले. हे संशोधन करतानाच त्यांनी संत मुक्ताबाई यांच्या वाङ्मयावरही संशोधन करून ग्रंथलेखन केले.[१]
कारकीर्द
[संपादन]- मोडक या सेवानिवृत्तीपूर्वी (२०२३) पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स येथे मराठी भाषेचे अध्यापन करत असत. तसेच नोव्हेंबर २००९ ते मे २०२२ या कालावधीत त्या उपप्राचार्य पदावर कार्यरत होत्या. त्या 'महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी'च्या आजीव सदस्य मंडळाच्या आणि नियामक मंडळाच्या सदस्य होत्या.
- श्रीअरविंद सोसायटी, पुडुचेरी येथून प्रकाशित होणाऱ्या अभीप्सा (अर्थ = Aspiration towards Divine) या मासिकाच्या जानेवारी २०१८ पासून त्या संपादिका आहेत. या मासिकामध्ये श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या इंग्रजी साहित्याचा अनुवाद प्रकाशित केला जातो.
- श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या साहित्याला वाहिलेल्या auromarathi.org या संकेतस्थळाच्या आणि auromarathi या युट्यूब चॅनेलच्या त्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
लेखन
[संपादन]- इ.स. २००५ साली प्रथम प्रकाशित 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं (संत मुक्ताबाई: व्यक्ती आणि वाङ्मय)' या संशोधन ग्रंथात संत मुक्ताबाईंच्या जीवनचरित्र, कार्यकर्तृत्व, त्यांचे वाङ्मय, आणि इतर समकालीन व उत्तर कालीन मराठी संतांवरील प्रभाव यांचा शोध घेतला आहे.[२] संत मुक्ताबाईंना नेमके कोणते गोरोबा भेटले आणि गोरोबांना भेटलेल्या मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वर भगिनी संत मुक्ताबाई या व्यक्ती दोन की एकच या विषयाचाही या ग्रंथाच्या माध्यमातून शोध घेतला गेला आहे. संत मुक्ताबाईंच्या समग्र अभंगांचा अर्थ प्रथमच या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला गेला आहे.[३] या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद, पुणे नगर वाचन मंदिर, इतिहास संशोधन मंडळ, संगमनेर आणि ज्ञानप्रबोधिनी (निगडी) या संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
- Principles of Integral Education and its possible implementation in existing educational system या विषयावर त्यांनी विद्यापीठ अनुदान मंडळाकडून मिळालेल्या अनुदानातून लघुसंशोधन प्रकल्प सादर केला आहे.
- केतकी मोडक या पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या 'उपयोजित मराठी (डॉ.गं.ना.जोगळेकर कृतज्ञताग्रंथ)' या पुस्तकाच्या सहसंपादक आणि सहलेखिका आहेत.[४] सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या ग्रंथास संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता दिलेली आहे.
- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६० व्या वर्षाच्या पूर्तीनिमित्त प्रकाशित झालेल्या 'ध्यासपंथे चालता' या इतिहास-ग्रंथाच्या त्या लेखिका आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये भारताचे उपराष्ट्रपती मा.श्री. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिल्ली येथे या ग्रंथांचे प्रकाशन करण्यात आले.
संदर्भ
[संपादन]- ^ "Shodhganga@INFLIBNET: Marathi santsahityatil nathpratipadit soham sadhna_ek abhyas".
- ^ "Kadkadoni Vij Nimalee Thayeeche Thayee". archive.org. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Kadakadoni Veej Nimali Thayinche Thayi". www.bookganga.com. 2018-04-25 रोजी पाहिले.
- ^ "Upyojit Marathi". www.bookganga.com. 2018-04-25 रोजी पाहिले.