भगवानगड
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
भगवानगड | ||
नाव: | श्रीक्षेत्र भगवानगड | |
---|---|---|
निर्माता: | संत भगवानबाबा | |
जीर्णोद्धारक: | मंहत डॉ .न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री | |
निर्माण काल : | 1951 & 53 | |
देवता: | विठ्ठल, धौम्य ऋषी | |
वास्तुकला: | हिन्दू | |
स्थान: | महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका | |
श्रीक्षेत्र "भगवानगड" (अक्षांश १९°१२’उत्तर, रेखांश ७५°२४’ पूर्व) हे महाराष्ट्र राज्यातील बीड-अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेले निसर्गरम्य देवस्थान आहे. या निसर्गरम्य देवस्थानलगतच राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम हा जातो. महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते. या ठिकाणी विठ्ठल आणि पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे मंदिर आहे. तसेच जनार्दनस्वामी, भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या समाध्या येथे आहेत. सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील ऊसतोडणी मजुरांचे श्रद्धास्थान म्हणूनही भगवानगडाकडे पाहिले जाते. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान आणि सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून श्री क्षेत्र भगवानगडाकडे बघितले जाते.हा गड वारकरी संप्रदायातील ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा यांनी बांधला आहे. भगवानबाबा हे थोर वारकरी संप्रदायाचे संत होते. भगवानबाबांच्या निधनानंतर वारकरी संप्रदायातील संत भीमसिंह महाराज गादीवर बसविले. आता वारकरी संप्रदायातील संत श्री डाॅ नामदेव महाराज शास्त्री गादीवर बसविले आहेत. हे वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की येथे जातीभेद,वर्णभेद,धर्मभेद,लिंगभेद नाही.त्यामुळेच विठ्ठलाचे विटेवर चरण समान आहेत.
इतिहास
[संपादन]या ठिकाणाच्या प्राचीन इतिहासाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की येथे सप्तर्षींनी तपश्चर्या केली होती. पांडवांचे पुरोहित असलेल्या धौम्य ऋषींचे या भागात वास्तव्य असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. धौम्य ऋषींच्या पादुका असलेले हे ठिकाण 'धौम्यगड' किंवा 'धुम्यागड' म्हणून ओळखले जात होते. येथील धौम्य ऋषीच्या मंदिराचे अस्तित्त्व काही हजार वर्षांपूर्वीपासून असल्याची नोंद आहे. या प्राचीन मंदिराविषयी अनेक दंतकथा सांगितल्या जातात. याचबरोबर रंग ऋषी, भारद्वाज ऋषी, शृंगी ऋषी, पराशर ऋषीचे यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण. हे ठिकाण सदगुरू जनार्दनस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. यानंतर दुर्दैवाने अनेक वर्षे धौम्यगड दुर्लक्षित असल्याने जुने अवशेष तसे फार कमी आहेत. या जवळच काशी केदारेश्वराचे मंदिर, हरिहरेश्वराचे भव्य मंदिरे आहे.
काशी केदारेश्वराचे मंदिर नागलवाडी परिसरात आहे. हे ठिकाण राम लक्ष्मण आणि सीता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे. येथे सीतेचा संसार असल्याचे सांगितले जाते. येथे अनेक मोठे जाते, रांजण आहे. सीतेला तहान लागली म्हणून रामाने येथे रामबाण चालवले असल्याचा उल्लेखही काही पुराणांमध्ये आहे. येथे मुख्य उत्सव श्रावण सोमवारला सुरू होतो.
धौम्यगडाचा जीर्णोद्धार
[संपादन]यानंतर ह्या धौम्यगडाचे ऐतिहासिक महत्त्व जाणून श्री संत शिरोमणी ह.भ.प. भगवानबाबा येथे वास्तव्यास आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. येथे भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांच्या अथक धाडसीवृत्ती आणि लोकसहभाग यातून भक्तीचा गड उभारणीचे काम सुरू झाले आणि गडाचे भाग्य उजळले. भागवत धर्मच्या भगवा फडकला. बाबा स्वतः वास्तुशास्त्रात निपुण होते. विशेष म्हणजे गडाचे संपूर्ण बांधणी पाषाणात असून लाकडाचा वापर न करता केलेले आहे. ओवऱ्यासाठी नवगण राजुरी येथील राजूबाईच्या डोंगरावर हजारो वर्षापासून पडलेल्या पाषाणखांडे आणले होते. सर्व पाषाणखांडे बैलगाडीने आणले गेले आणि त्यांनी चौकोनी चीर्यांचे रूप दिले गेले. त्यामुळे बांधकाम भक्कम झालेले आहे. स्वतः भगवानबाबा आजूबाजूच्या परिसरात फिरून गडाच्या बांधकामासाठी आवाहन करत होते. भगवानबाबाला तन-मन-धनाने काम करणारे भक्तगण भेटले. त्यांना तसा प्रतिसादही मिळत होता. गड उभारणीच्या कामाला आजूबाजूच्या परिसरातील भक्तगणांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वतःचे दागदागिने, अलंकार, आभूषणे दिली आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध झाला. प्रत्येक भक्तगण या कार्याला हातभार लावत होते. भक्तगणांनी घरून स्वतःच्या भाकरी-भाजी आणून, रात्रंदिवस गडाचे बांधकाम पार पाडले. पाहता पाहता भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड ही अत्यंत विस्तीर्ण प्रचंड भव्य वास्तू नावारूपास आली. उत्कृष्ट वास्तुशिल्पकलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे. त्यांच्या संकल्पनेतूनच धौम्यगडाचा जीर्णोद्धाराची खऱ्या अर्थाने मुहूर्तमेढ ही रोवली गेली व भक्तीचा गडाची स्थापना झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने धौम्यगडाचा कायापालट झाल्याचे पहावयास मिळाले. त्यांनी रस्त्यांच्या दुर्दशेवर प्रकाश टाकत रस्ता विकास करण्यावर भर दिला. भक्तांना एकत्र करून श्रमदानाने भगवानगड ते पायथ्याच्या खरवंडी गाव रस्ता करण्याचे काम पूर्ण झाले.
पुढे इ.स. १९५८ मध्ये स्वामी सहजानंद सरस्वती, ह.भ.प. मामासाहेब दांडेकर आणि बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते विठ्ठलाच्या मूर्तीची देवळात प्रतिष्ठापना केली. गडाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी झाले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘धर्मरक्षणासाठी भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. याचवेळेस बाबांच्या संकल्पनेतून भगवान विद्यालयाने आकार घेतला. शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली आहे. वाड्या, पाड्या, तांड्यांवरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी आहेत. [१]
मंदिराची रचना
[संपादन]श्रीक्षेत्र भगवानगड येथील मंदिर चार मुख्य मंदिरांचा समूह आहे. यांतील विठ्ठलाचे मुख्य मंदिर मध्यावर असून सभोवतीची असणारी मंदिरे धौम्य ऋषी आणि महारुद्र हनुमान यांची आहेत. विठ्ठल व भगवानबाबा यांच्या मंदिरांची उंच शिखरे व त्यांवरील कळस हा सर्व देखावा फारच मनोहारी वाटतो. विठ्ठलाचे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिरावरील कोरीवकाम पाहण्यासारखे आहे. आत दगडी कासव आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या द्वारातून आत गेल्यानंतर मंदिरासमोर भव्य उंच सभामंडप लागतो. या सभामंडपात प्रत्येक कोपऱ्यात पूर्ण अखंड स्तंभ आहेत. या मंडपातील शिल्पांकित स्तंभ अत्यंत कल्पकतेने उभारलेले आहेत. या स्तंभावर मजबूत घुमटाकार छत आहे. सभामंडप ते गाभाराप्रवेश दरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. मंदिरात सभामंडपजवळच गाभाराप्रवेश आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी गणपतीची मूर्ती आहे. सभामंडपात सभोवार अरुंद फरसबंद रस्ते आहेत. पाषाण घडवून एकावर एक बसवून मंदिराच्या भिंती उभारल्यामुळे कोरीव काम स्पष्ट व टिकून राहिले आहे. या जवळच धौम्य ऋषीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये पाचही पांडव, पांडवांची पत्नी द्रौपदी व धौम्य ऋषी यांच्या मूर्ती आहेत. या मंदिरातील प्रत्येक मूर्ती अतिशय देखणी सुंदर कोरीव काम असलेल्या असून त्या प्राचीन कलावैभवाची साक्ष देणारा एक अद्वितीय नमुना म्हणावा अशीच आहेत. या मूर्ती पांढरे शुभ्र संगमरवरी वस्त्र नेसलेल्या आहेत. धौम्य ऋषींच्या मंदिराच्या बाजूला जनार्दनस्वामी यांची एक छोटेशी समाधी भग्नावस्थेत अजूनही उभी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजासमोरच एका बाजूला महारुद्र हनुमानाचे पुरातन मंदिर आहे.
येथे ह.भ.प. ऐश्वर्यसंपन्न, परमविठ्ठलभक्त श्री संत भगवानबाबा व भीमसिंह महाराज यांच्या संगमरवरी पाषाणबांधणीच्या समाध्या आहेत. समाध्यांचा प्रदक्षिणामार्ग अरुंद आहे. समाधीसाठी येथील केलेली खास योजना लक्षही वेधुन घेते. सूर्योदयासमयी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून समाधीगाभाऱ्यापर्यंत पोहचतात. ज्ञानेश्वरींचे भाष्यकार भगवानबाबांनी आयुष्यभर आध्यात्मिक विचार कीर्तनाच्या माध्यमातून भक्तगणांपर्यन्त पोहचविला. बाबांचे प्रेमळ व्यक्तिमत्त्व यामुळे त्यांचा भक्तगण परिवार फार मोठा आहे. भक्तगणांनी भगवानबाबाचे वास्तव्य केले ते निवासस्थान श्रद्धापूर्वक जतन केले आहे. [१]
उत्सव
[संपादन]सर्व जातिधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भक्तीचा गड श्रीक्षेत्र भगवानगड याची उभारणी झालेली आहे. भगवानगडावर उत्सव विजयादशमीला, पौष वि प्रतिपदाला, प्रत्येक शुद्ध एकादशी याशिवाय कार्तिक पौर्णिमाला सुरू होतो.
विजयादशमी सीमोल्लंघन उत्सव
[संपादन]भगवानगडावर मुख्य उत्सव विजयादशमीला सुरू होतो. भगवानबाबांनी विजयादशमी साजरी करण्यामागे खेडय़ापाडय़ातील भाविकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखाची विचारांची देवाणघेवाण करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने विजयादशमी उत्सव साजरा केला जातो. येथील विजयादशमीला वैभवशाली इतिहासाची ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. गडावर विजयादशमीला गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक जाती-धर्माचे व पंथाचे भाविक येथे दर्शनाला येतात. येथे विजयादशमीला 'सीमोल्लंघन उत्सव' साठी भाविकांची रीघ लागते. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. येथील वैशिष्ट्य म्हणजे येथे अनोळखी माणसे एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देताना दिसतात. या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. बाजरीच्या पिठापासून बनवलेली व चुलीच्या विस्तवावर भाजलेल्या भाकरी आणि शिजवलेल्या भरड्या डाळीच्या पीठ्ठले यांची चव वेगळीच असते. मठ, देवळे, आखाडे, धर्मशाळा, फड वगैरेंमधून अनेक भाविक व वारकऱ्यांची सोय होते. या भाविकांसाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
भगवानबाबांची पुण्यतिथी
[संपादन]श्रीक्षेत्र भगवानगड येथे भगवानबाबांची पुण्यतिथीनिमित्त पौष वि प्रतिपदाला हरिनाम सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन जानेवारीत करण्यात येते. यावेळी गडावर भगवानबाबांचा सप्ताह सुरू होतो व पुढे आठ दिवस चालतो. यावेळी भगवानबाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दोन-तीन लाखो भाविकांची गर्दी उसळते.
शुद्ध एकादशी उत्सव
[संपादन]प्रत्येक शुद्ध एकादशी उत्सव गडावर साजरा होतो. या उत्सवात येथे नियमित पूजाअर्चा, महाअभिषेक प्रवचने, गायन, भजन, कीर्तन व भोजन असे कार्यक्रम होत असतात. गडावर ग्रंथपारायण, शैक्षणिक, वैद्यकीय मदत, भाविकांना भोजन व महाप्रसाद असे उपक्रम राबविले जातात. उत्सवाची सांगता काल्याकीर्तनाने होते. या दिवशी भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरूच असतो.
याशिवाय कार्तिक पौर्णिमाला गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात अनेक भाविक दर्शनाला येतात. या दिवशी दोन लाखावर भाविक सहभागी होतात. [२]
भगवानगडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सवनिमित्ते राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास २००८ या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे त्या दिवशी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले.
महंत
[संपादन]डॉ.न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री
पालखी
[संपादन]भगवानबाबा आपल्या कार्यातील बराच काळ त्यांनी संपूर्णपणे नारायणगडावर व भगवानगडावर व्यतीत केला असला तरीही कीर्तनकारणे भगवानबाबांची भ्रमंती पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. भगवानबाबांनी पंढरपूर, आळंदी, पैठणवारीच्या पालखीची प्रथा पाडली. भगवानबाबा आपल्या भाविक भक्तांसोबत दरवर्षी नित्यनेमाने आषाढीवारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे जात असत. भगवानबाबांची पालखी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी पालखी आहे. ही पालखी पंढरपूरला भगवानबाबांच्या पादुका घेऊन भारजवाडी, खरवंडी,खोकरमोहा,करंजवण, पाटोदा, भूम, कुर्डूवाडी, परंडा मार्गे जाते. पादुकास्थान पंढरपूर येथे संत एकनाथांच्या पालखीला आडवी जाण्याचा मान या पालखीला आहे. भगवानबाबा भगवानगडावर असताना पालखीकरिता हत्ती, घोडे, अंबारीसह वगैरे सर्व लवाजमा असे. भगवानगडाची पालखी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पालखीसोबत मराठवाड्याचे असंख्य वारकरी वारीला निघतात. दरवर्षी वारकरी परंपरेनुसार नामस्मरण करत भगव्या पताका खांद्यावर घेऊन वारीमध्ये सहभागी होतात.
संत श्री एकनाथ संस्थान पैठण येथे पालखी व नाथषष्ठी दिंडीचा मान भगवानगड पालखीला आहे. नाथषष्ठीनिमित्त ‘भानुदास एकनाथ’चा नामस्मरण करत भगव्या पताका घेऊन पालखी श्रीक्षेत्र पैठण येथे एकनाथ मंदिरात जातात. दक्षिण गंगा असलेल्या गोदावरी पात्रात पवित्र स्नान करून वारकरी संत श्री एकनाथ दर्शन घेतात. पालखीत एकनाथ वारीसाठी भाविकांचा ओघ सुरूच आहे. भगवानगडाची पालखीत दर्शनासाठी गर्दी करत व या निमित्ताने पालखी भाविक भक्तांनी फुलून जात आहे. [३] [४]
जाण्याचा मार्ग
[संपादन]महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये खरवंडीहून दर तासाला खासगी वाहनांची सोय आहे. खरवंडीगावामध्ये राहण्याची व्यवस्थाही आहे.
- श्रीक्षेत्र भगवानगड हे टेकडीच्या माथ्यावर असून पक्क्या रस्त्याने पायथ्याच्या खरवंडी गावापासून सुमारे ४-५ कि.मी. अंतरावर आहे.
- भगवानगडाच्या सर्वात जवळचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बस स्थानक खरवंडी येथे आहे.
- मुंबई-पुणे-अहमदनगरवरून पाथर्डीमार्गे भगवानगडावर पोहोचता येते. राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणमवर पाथर्डीपासून साधारणपणे ३० कि.मी. अंतरावर भगवानगड वसले आहे.
- औरंगाबाद-पैठणवरून शेवगावमार्गे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र. १४८ वर पैठणपासून ७० कि.मी. अंतरावर भगवानगड आहे.
- बीड-गेवराईवरून पाडळसिंगीमार्गे ७० कि.मी. अंतर पार करून भगवानगडावर जाता येते.
- भगवानगडाच्या सर्वात जवळचे रेल्वेस्थानक अहमदनगर येथे आणि विमानतळ औरंगाबाद येथे असून आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे येथे आहे.
- भगवानगड हे राष्ट्रीय महामार्ग कल्याण ते विशाखापटणम आणि राज्य महामार्ग क्र. १४८ (अहमदनगर-अमरापूर-शेवगाव-पैठण) या महामार्गांनी महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशमधील शहरांशी जोडले गेले आहे.
- औरंगाबाद-पैठण मार्गे किंवा बीड-गेवराईवरून पाडळसिंगीमार्गे जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक खासगी वाहतूक कंपन्यांच्या बसगाड्याही उपलब्ध आहेत. महाराष्ट्रातून येथे अनेक बस येतात. श्रीक्षेत्र भगवानगड येथे जाणा-या भाविकांसाठी शेवगाव, गेवराई, पैठण, पाथर्डी परिवहन महामंडळ बसस्थानकमधुन बसची ये-जा चालू असते.
विकास आराखडा
[संपादन]श्रीक्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांचे गडाच्या विकासासाठी अंदाजे तीन कोटीचे ६० फूट उंच महाद्वार, साडेचार कोटीचा सभामंडप, दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, उद्यान, दवाखाना, योग निसर्गोपचार केंद्र , जॉगिंग ट्रॅक, ध्यानधारणा केंद्र, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य संग्रहालय, रेसिडेन्शियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा वगैरे बांधण्याचा प्रयत्न सुरू आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. या ठिकाणी सौरदिवे आहेत व पवनऊर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसते.[१] श्रीक्षेत्र भगवानगडाचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ात व्हावा, भगवानगडाजवळील वनविभागाची जमीन गडाच्या विकासासाठी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. [५] भगवानगडाचे मठाधिपती डॉ. नामदेवशास्त्री सानप यांनी गडाच्या विकासासाठी कार्यभार घेताना २६ कोटींची विकासकामे केली आहेत. तीन कोटी रुपयांचे स्वयंपाकगृह, महिलांसाठी दोन कोटींची धर्मशाळा, महाप्रसादगृह, महिला अतिथिगृह, पारायण हॉल, किर्तन हॉल, संत विद्यापीठ, किर्तन-प्रवचन-टाळ-मृदुंग प्रशिक्षण वर्ग, अंतर्गत रस्ते बांधण्याचा प्रस्ताव यासाठी प्रयत्न सुरू आहेत. [६] [७]
हेही पाहा
[संपादन]- भगवानबाबा
- भीमसिंह महाराज
- नामदेवशास्त्री सानप
- वामनभाऊ महाराज
- गहिनीनाथगड
- विठ्ठल महाराज
- खंडुबाबा
- योगिराज महाराज पैठणकर
- हनुमानगड
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ a b c "श्रीक्षेत्र भगवानगड". ३१ जुलै २०१२ रोजी पाहिले.
- ^ "श्रीक्षेत्र भगवानगड पान नं: ८" (PDF). ३१ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "वंजारी संत - भगवान बाबा". ३१ जुलै २०१२ रोजी पाहिले.
- ^ "शिष्य परंपरा". 2013-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले.
- ^ "भगवानगड, चांदबिबी महालावर एनर्जी पार्क करण्यासाठी प्रयत्नशील - अन्बलगन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". १३ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
- ^ "भगवानगडाला "अ' दर्जासाठी आवाज उठवा". १३ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "आदर्श गाव योजनेत होणार भगवानगडाचा समावेश". 2011-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १३ सप्टेंबर २०१२ रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- CS1 errors: dates
- CS1 errors: URL–wikilink conflict
- मृत बाह्य दुवे असणारे लेख from November 2022
- कायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख
- विस्तार विनंती
- वारकरी तीर्थस्थळे
- बीड जिल्हा
- अहमदनगर जिल्हा
- हिंदू मंदिरे
- महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे
- बीड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे
- अहमदनगर जिल्ह्यातील गावे
- अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे