माधव चितळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डाॅ. माधव आत्माराम चितळे (जन्म : यवतमाळ, महाराष्ट्र, भारत), इ.स. १९३४) हे जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ आहेत.

माधव आत्माराम चितळे
जन्म ८ ऑगस्ट, १९३४
निवासस्थान औरंगाबाद
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा जलतज्ज्ञ
ख्याती चितळे समिती
जोडीदार विजया चितळे
पुरस्कार स्टॉकहोम वॉटर प्राईझ
वसुंधरा सन्मान


जीवन[संपादन]

माधव चितळे यांचा जन्म ८ ऑगस्ट १९३४ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण चाळीसगाव येथे झाले. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर माधव चितळे यांनी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हिलची पदवी प्राप्त केली.

माधव चितळे यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. आशा पटवर्धन विद्यार्थीदशेत स्वतः उत्तम खेळाडू, संगीत विशारद व सुवर्णपदकविजेती होत्या. विजया चितळे यांनी त्यांच्या माधव चितळे यांच्या बरोबरच्या सहजीवनावर 'सुवर्णकिरणे' या नावाने पुस्तक लिहिले आहे.

कारकीर्द[संपादन]

माधव चितळे यांनी १९९२ पर्यंत सरकारी नोकरीच्या माध्यमातून आणि निवृत्तीनंतर अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात योगदान दिले आहे. पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी त्यांची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पुढे नगरचा मुळा प्रकल्प, मुंबईचा भातसा प्रकल्प येथेही अभियंता म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर कोयनेच्या भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी त्यांची नियुक्ती चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे झाली.

पुढे प्रिन्स्टन विद्यापीठाच्या वुड्रो विल्सन स्कूलच्या आंतरराष्ट्रीय व सामाजिक व्यवहाराच्या अभ्यासक्रमासाठी चितळे यांचं नाव सुचवलं गेलं. १० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी 'सर्वोत्तम पर्विन फेलो' हा सन्मान पटकावला. 

त्यापुढील काळात दिल्लीत केंद्रीय जल आयोगा Archived 2018-02-02 at the Wayback Machine.चे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ५ वर्षांच्या या दिल्लीतील नियुक्तीचा काळ संपत येत असतानाच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी जलसंपदा मंत्रालयाचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली. जल आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करत असतानाच सामान्य जनतेच्या मनात पाण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून चितळे यांनी जल दिवस साजरा करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला फक्त दिल्लीत साजरा होणारा हा जल दिवस पुढे १९९२ साली भारतभरात १२०० ठिकाणी साजरा झाला.

सरकारी सेवेतून निवृत्तीनंतर १ जानेवारी १९९३ रोजी आंतरराष्ट्रीय जलसिंचन व जलनिस्सारण आयोगाचे सरकार्यवाह म्हणून माधव चितळे यांची नियुक्ती झाली[१]. जलसंधारण आणि जलसंपदेबाबत जनजागरण या क्षेत्रांमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना १९९३ सालच्या स्टॉकहोम वॉटर प्राईझ या पाण्याचे नोबेल पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले[२].

अलीकडच्या काळातही मुंबईतील पूर, महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा[३], गंगा शुद्धीकरण प्रकल्प अशा अनेक समितींच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरू आहे.

सामाजिक काम[संपादन]

माधव चितळे सध्या औरंगाबाद येथे स्थायिक असून सिंचन सहयोग, जलसंस्कृती मंडळ, ऊर्जा सहयोग, सरोवर संवर्धिनी अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे[४]. 'सिंचन सहयोग'ने आयोजित केलेल्या पहिल्या महाराष्ट्र जलसिंचन परिषदेसाठी मोठ्या संख्येने शेतकरी, वैज्ञानिक, अभियंते, सामाजिक कार्यकर्ते असे विविध स्तरांतील लोक आले होते.

जलसंधारणाबरोबरच अन्यही अनेक क्षेत्रांत चितळे यांचे समाजप्रबोधनाचे कार्य सुरू आहे. औरंगाबाद येथे वाल्मीकि रामायणावर त्यांनी दिलेली ८८ प्रवचने पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाली आहेत[५]. भारतीय राष्ट्रीय सौर कालगणनेच्या प्रसारासाठीही ते काम करीत असतात.[६].

लेखन[संपादन]

  • भारतीय जलक्रांतीची पदचिन्हे (प्रकाशक: हिंदुस्तान प्रकाशन संस्था)
  • वाल्मीकिरामायण - माधवराव चितळे यांची प्रवचने (प्रकाशक: साकेत प्रकाशन)[७]

माधव चितळे यांच्याविषयीची पुस्तके[संपादन]

  • विज्ञानयात्री डॉ. माधव चितळे (चरित्र - लेखक : अ.पां. देशपांडे, प्रकाशक: राजहंस प्रकाशन)
  • सुवर्णकिरणे - जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या बरोबरच्या सहजीवनाची वाटचाल (लेखक: सौ. विजया माधव चितळे, प्रकाशक: साकेत प्रकाशन)

माधव चितळे यांना मिळालेले सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ http://www.icid.org/past_sg.html#chitale
  2. ^ http://www.siwi.org/prizes/stockholmwaterprize/laureates/madhav-atmaram-chitale-india/
  3. ^ http://indianexpress.com/article/india/india-news-india/madhav-chitale-committee-report-two-years-after-maharahstra-govt-yet-to-enforce-22-recommendations-4398864/
  4. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2018-01-23. 2017-01-13 रोजी पाहिले.
  5. ^ http://www.loksatta.com/aurangabad-news/ram-naik-published-book-on-valmiki-ramayana-1348734/
  6. ^ http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=147645:2011-04-04-18-00-43&Itemid=1
  7. ^ http://www.aksharnama.com/client/article_detail/212
  8. ^ http://www.sakaaltimes.com/NewsDetails.aspx?NewsId=4755125186451022165&SectionId=5171561142064258099&SectionName=Pune&NewsDate=20100219&NewsTitle=Needed:%20Healthier%20interface%20between%20humans%20and%20nature[permanent dead link]