Jump to content

भारतातील उमायद मोहिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उदयोन्मुख लेख
हा लेख ६ मे, २०१७ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. २०१७चे इतर उदयोन्मुख लेख
भारतातील उमायद मोहिमा
मुस्लिम राज्य विस्तार ह्या युद्धाचा भाग
मुस्लिम आक्रमणावेळीचा भारत
मुस्लिम आक्रमणावेळीचा भारत
दिनांक इ.स .७१२ ते इ.स. ७४०
स्थान राजस्थान
परिणती निर्णायक भारतीय विजय
प्रादेशिक बदल उमायद राज्यविस्तार सिंधपर्यंत रोखला.
युद्धमान पक्ष
गुर्जर प्रतिहार साम्राज्य
चालुक्य साम्राज्य
उमायद खिलाफत
सेनापती
नागभट्ट पहिला
विक्रमादित्य दुसरा
बाप्पा रावळ
जुनायद इब्न अल्-रहमान अल्-मुरी
तमिम इब्न झैद अल्-उत्बी
अल्-हकम इब्न अवाना


इसवी सनाच्या आठव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतीय राजे व उमायद खिलाफत यांच्यात सिंधू नदीच्या पूर्वेला मोठ्या लढाया झाल्या.

इ.स. ७१२ मध्ये सिंध राज्य जिंकल्यावर अरबांनी सिंधूच्या आणखी पूर्वेकडे राज्यविस्तार करण्याचे प्रयत्न केले. इ.स. ७२४ ते ८१० च्या दरम्यान उत्तरेकडील गुर्जर-प्रतिहार सम्राट नागभट्ट पहिला, दक्षिणेकडील चालुक्य सम्राट विक्रमादित्य दुसरा व इतर लहान भारतीय राज्ये यांचा पश्चिमेकडून येणाऱ्या अरबांशी संघर्ष झाला. उत्तरेकडे सम्राट नागभट्टाने माळव्यावर चाल करून येणाऱ्या महत्त्वाच्या अरब मोहिमेचा पराभव केला तर दक्षिणेकडून विक्रमादित्याने आपला सेनानी पुलकेशी याला पाठवले. पुलकेशीने गुजरातमध्ये अरबांचा पराभव केला. इ.स. ७७६ मध्ये सैंधव नाविक दलाने अरबांच्या नाविक मोहिमेचा पराभव केला.

या पराभवांमुळे अरबांचा पूर्वेकडील राज्यविस्तार संपुष्टात आला व नंतर सिंधमध्येच अरब राज्यकर्त्यांचा पाडाव होऊन तेथे स्थानिक मुस्लिम राजपूत वंश (सूम्रा व समा) स्थापन झाले.

पार्श्वभूमी

[संपादन]
मुहम्मद बिन कासिमच्या ७११ सालच्या सिंध मोहिमेचा नकाशा

सम्राट हर्षवर्धनाच्या राजवटीनंतर आठव्या शतकाच्या सुरुवातीस उत्तर भारतात अनेक लहानमोठी राज्ये निर्माण झाली होती. वायव्येकडील प्रदेश काश्मीरचे कर्कोटा साम्राज्य व काबूलच्या हिंदू शाही या राज्यांच्या ताब्यात होता. उत्तर भारतातील प्रमुख शहर कनौज हे राजा यशोवर्मन याच्याकडे होते. ईशान्येकडे पाल घराण्याची सत्ता होती तर दक्षिणेस चालुक्यांची राजवट होती. पश्चिम भारतात सिंधचा राई राजवंश तसेच भिनमाळ, मंडोर, राजपीपळाभरूच येथील अनेक गुर्जर कुळांची राज्ये यांची सत्ता होती. यांच्यातील अखेरचे प्रतिहार हे कूळ पुढे सामर्थ्यवान बनले. काठियावाडचे द्वीपकल्प अनेक लहान् राज्यांत विभागले होते व त्यांत मैत्रक राजवंश ही सर्वात प्रबळ सत्ता होती.

उमायद खिलाफतीच्या लष्करी विस्ताराचा तिसरा टप्पा इ.स. ६९२ ते ७१८ पर्यंत टिकला. खलिफा अल्-वालीद पहिला याच्या इ.स. ७०५ ते ७१५ एवढ्या केवळ दहा वर्षांच्या कारकिर्दीत उमायादांचा मोठा विस्तार झाला. या काळात अरबांनी उत्तर आफ्रिका, स्पेन, सिंध व ट्रान्स ऑक्सियाना हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले. उमायाद सेनापती मुहम्मद बिन कासिम याने राई वंशाच्या राजा दाहीर या सिंधी शासकाचा पराभव केला. अल् मन्सूरा राजधानी असलेला सिंध हा खिलाफतीचा दुसऱ्या दर्जाचा प्रांत झाला व तो अरबांसाठी भारतावर आक्रमण करण्याचा योग्य तळ होता परंतु बिन कासिम गेल्यावर त्याने जिंकलेले बहुतांश प्रदेश भारतीय राजांनी परत मिळवले.

याझिद दुसरा (इ.स. ७२०-७२४) याच्या राजवटीत भारतासह सर्व सीमाप्रांतात विस्तार मोहिमा सुरू करण्यात आल्या. भारताविरुद्धची मोहीम इ.स. ७२० ते ७४० इतक्या काळापर्यंत टिकली. याझिदच्या काळात अरबांना तुल्यबळ शत्रू नव्हता परंतु दहावा उमायाद खलिफ हिशाम इब्न् अब्द् अल्-मलिक (इ.स. ६९१-७४३) याच्या कारकिर्दीत अरबांचा सर्व आघाड्यांवर पराभव झाला व अरब राज्यविस्तार संपुष्टात आला. इ.स. ७४० ते ७५० या काळात दुर्बळ झालेल्या सैन्यदळामुळे सर्व राज्यविस्तार स्थगित झाला व अरब गृहयुद्धांची तिसरी मालिका सुरू झाली ज्यात उमायाद खिलाफत नष्ट झाली.

मुहम्मद बिन कासिमची मोहीम (७१२-७१५)

[संपादन]
इ.स. ७०० च्या वेळचा सिंध.
मुहम्मद बिन कासिमचा मध्ययुगीन भारतातील उमायाद राजवटीचा विस्तार (आजच्या सीमा लाल रंगात)

इराकचा प्रशासक अल्-हज्जाज याचा पुतण्या असलेला उमायद सेनापती मुहम्मद बिन कासिम याने इ.स. ७१२ साली सिंधवर विजय मिळवला. त्यानंतर त्याने सिंधूच्या काठी असलेला मुलतानपर्यंतचा सर्व प्रदेश जिंकून घेतला. सिंध ताब्यात घेतल्यावर त्याने भारतीय राजांना शरणागती पत्करून मुस्लिम धर्म स्वीकारा अशा आशयाची पत्रे पाठवली. त्याने भिनमाळवर व वल्लभीच्या मैत्रकांवर आक्रमणे केली व या दोन्ही राज्यांनी शरणागती पत्करून तह केले. त्यानंतर त्याने खलिफाच्या फर्मानासह १०,००० इतके अश्वदळ कन्नौजला पाठवले. त्याने स्वतः सैन्यासह काश्मीरच्या सीमेवरील पश्चिम पंजाबवर आक्रमण केले. त्याच्या कन्नौज मोहिमेबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. काश्मीरच्या सीमाप्रदेशाचा नंतरच्या नोंदींमध्ये अल्-किराज्(हिमाचल प्रदेश मधल्याकांग्रा दरीतील किर राज्य) असा उल्लेख आहे व त्याचा बहुदा पराभव करण्यात आला.

बिन कासिमला ७१५ सली भारतातून परत बोलावण्यात आले व वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तो गेल्यावर भारतीय राजे त्यांच्या राज्यांत परत आल्याचे अरब इतिहासकार अल्-बहादूरी याने लिहिले आहे. यानंर खलिफ उमर दुसरा (७१७-७२०) याची कारकीर्द शांतमय होती. त्याने भारतीय राजांना मुस्लिम होऊन त्याचे मांडलिकत्व पत्करण्याचे आवाहन केले व मोबदल्यात त्यांचे राज्यपद अबाधित ठेवण्याचे आश्वासन दिले. हुल्लिशाहसारख्या काही राजांना हाप्रस्ताव मान्य करून अरबी नावे स्वीकारली. त्यानंतर खलिफ याझिद दुसरा (७२०-७२४) व हिशाम (७२४-७४३) यांच्या काळात विस्ताराचे धोरण पुन्हा स्वीकारण्यात आले. जुनायद इब्न अब्द अल्-रहमान अल्-मुरी याची ७२३ साली सिंधचा प्रशासक म्हणून नेमणूक झाली.

अल् जुनायदच्या मोहिमा (७२३-७२६)

[संपादन]
भारतीय उपखंडातील अरब मोहिमा.

सिंधमध्ये आपली सत्ता भक्कम केल्यावर अल् जुनायदने भारताच्या बऱ्याच भागांवर आक्रमणे केली. पहिले राज्य अल्-किराज (कदाचित कांग्रा दरी) होते. त्याच्या पराभवाने ते राज्य नष्ट झाले. नंतर त्याने मरूमाला (जैसलमेर व उत्तर जोधपूर), भिनमाळ व गुर्जरदेश (दक्षिण राजस्थान व गुजरात) यांवर आक्रमणे केली. उज्जैनमाळवा यांवरसुद्धा आक्रमण करण्यात आले. उज्जैनच्या अवंती राज्याच्या पराभव होऊन त्याचा कही भाग नष्ट झाला, पण उज्जैन शहर बहुदा स्वतंत्रच राहिले. माळव्यावरील आक्रमणाची माहिती इतिहासात उपलब्ध नाही.

उत्तरेकडे उमायदांचा पंजाबमधील विस्तार काश्मीरच्या ललितादित्यने रोखला. दक्षिणेकडे मात्र अरबांनी कच्छ, सौराष्ट्र, भरूच, मंडल (कदाचित ओखा) व दहनाज (अज्ञात) हे प्रदेश जिंकून घेतले.

इ.स. ७२६ साली खिलाफतीने अल् जुनायदला काढून त्याच्या जागी तमिम इब्न् झाय्द् इब्न् हमाल् अल्-काय्नी (तमिम) याची नेमणूक केली. पुढच्या काही वर्षांत जुनायदने जिंकलेले सर्व प्रदेश पुन्हा स्वतंत्र झाले.