Jump to content

कळंब वृक्ष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कळंब/कदंब वृक्षाचे फुल व पाने
कळंब/कदंब वृक्षाचे फूल व पाने नजीकचे चित्र
दोन अर्ध्यासह एक पूर्ण कळंब
कळंबचे झाड खालचे खोड

कळंब किंवा कदंब ही झाडे भारतात पूर्व हिमालयाच्या पायथ्यापासून महाराष्ट्र, बंगाल, ओरिसाआंध्र प्रदेश या राज्यांत आर्द्र पानझडी जंगलात आढळतात. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष वन्य आहे. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत हा वाढतो. पानगळ मार्चमधे थोड्या काळासाठी होते, व पावसाळ्यात जुलै ऑगस्टमधे कदंबाला फुले येऊ लागतात.

इतिहासातील प्रसिद्ध असणारे ब्राम्हण व नंतर क्षत्रिय झालेल्या कदंब कुळाची उत्पती ही याच झाडाखाली झाल्याचे इतिहासात नमूद आहे. कदंबाचे झाड हे क्षत्रिय कदम मराठा घराण्यातील लग्नामध्ये देवक म्हणून देखील पूजले जाते. तसेच हे झाड श्री कृष्णाचे आवडते झाड देखील आहे. तसेच महाभारतात प्रसिद्ध असणारा कर्ण-कुंती चा कर्ण जन्माचा वृतांत याच झाडाखाली झाला. त्यामुळे कदंब वृक्षाला इतिहासात व हिंदू साहित्यात मनाचे स्थान आहे.

निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. निसर्गात पूर्ण वाढलेल्या वृक्षाची उंची ३० मीटर पर्यंत जाते. रोप लावल्यापासून पहिले सहा ते आठ वर्षापर्यंत वाढ भर-भर होते, मग स्थिरावते आणि २० वर्षांपर्यंत पूर्ण होते. वृक्ष दीर्घायुषी असून, शंभर वर्षं जगू शकतो. कदंबाच्या ताठ राखाडी रंगाच्या बुंध्यावर काटकोनात पसरलेल्या फांद्यांमुळे वृक्षाचा आकार छत्रीसारखा दिसतो. पानगळीचा वृक्ष असूनही संपूर्ण निष्पर्ण वृक्ष आढळत नाही, कारण याची पाने एकदम गळत नाहीत. ही पाने आंब्याच्या आकाराची पण जरा रुंद असतात. पुढून हिरवीगार व तुकतुकीत असतात अन् मागच्या बाजूने काहीशी फिकट लवयुक्त असतात. पानांवरच्या शिरा उठून दिसतात. पण वृक्षाची खरी मजा त्याच्या फुलांमध्ये आहे. संस्कृत काव्यात कदंब फुलण्याचा संबंध पावसाशी जोडला आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, असे म्हणतात.

कदंबाचे फूल

[संपादन]

कदंबाचे एक फूल म्हणजे फुलांचा गोळाच असतो. जणू एखाद्या चेंडूवर बारीक-बारीक फुले सर्व बाजूंनी टोचली तर तो कसा दिसेल, तसेच कदंबाचे फूल दिसते. अगदी सोनेरी-केशरी रंगाचे गुबगुबीत गेंदेदार पिंजलेल्या कदंबवृक्षाच्या खाली उभे राहिले की मधमाश्यांचे गुंजन अगदी स्पष्ट ऐकू येते. पावसाळ्यात इतर फुलांचे दुर्भिक्ष्य असल्याने मधमाश्या हमखास कदंबाच्या शोधात येतात.

कदंबाच्या फुलांसारखीच फळंदेखील लाडवासारखी गोल असतात. कदंबाचे फळ हे तांत्रिक भाषेत \Pseudocorp म्हणजे छद्मफळ असते. फळे पावसाच्या शेवटच्या टप्प्यात पिकतात, त्यांना किंचित आंबट चवही असते. ग्रामीण भागातील मुले ही फळे आनंदाने खातात. मनुष्यांसारखेच अनेक पशु-पक्षीदेखील यांचा फडशा पाडतात, पण या फळांची सर्वात जास्त मजा लुटतात ती वटवाघळे. बदल्यात या फळांचा बीजप्रसार वटवाघळांमार्फतच होतो. या फळांचा औषधी उपयोगही आहे.

कदंब हा वृक्ष दीर्घायुषी आहे. त्याच्या हिरव्यागार आणि तुकतुकीत रुंद पानावरील शिरा ठसठशीत व दोन्ही बाजूंना समांतर असतात. दोन समांतर शिरांमध्ये एकसारख्या उभ्या समांतर उप-शिरा असतात. यामुळे याची फुले व पाने निसर्गप्रेमींना मोहित करतात.

पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी ‘कदंब उत्सव’ साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केल्यावर नृत्य-गाणी गात हा दिवस साजरा केला जातो. कदंबाच्या पूजेने सुख-समृद्धी प्राप्त होते, ही त्यामागील भावना असते.

मथुरा-वृंदावनाप्रमाणे मदुरेलाही कदंबवने होती. मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचा स्थलवृक्ष कदंबच आहे. कादंबरी नावाचे अनेक अर्थ. त्यापैकी एक कदंब वृक्षाशी संबंधित आहे. कदंब वृक्षाला ' पार्वतीचा वृक्ष ' म्हणतात. म्हणून त्याचे नाव हरप्रिया असेही आहे.

कोल्हापूरच्या वनक्षेत्राला "कादंबिनी' असे नाव आहे.

श्रीकृष्णाचा अत्यंत आवडता वृक्ष कोणता? तर कदंब वृक्ष. वृंदावन, मथुरा, मदुरेत जिकडेतिकडे कदंब पाहायला मिळतो. आपण वड पुजतो तसे तिकडे मनोभावे कदंब पुजला जातो. यमुनेच्या काठावर वनच आहे कदंबाचे. गायींना खाद्य म्हणून कदंब उपयोगी. म्हणून सगळे गोपाळ यमुनेच्या काठी गायी चरायला नेत.

महाराष्ट्रातील ठाणे शहरातही कदंबाची खूप झाडे आहेत. कदंबाला फुले येतात तेव्हा तेथे कदंबोत्सव चालू असतो.

कदंब दिसायला डेरेदार असून त्याची सावली घनदाट असते. कदंबाचा वारा अगदी थंडगार असतो व फुले मोहक आणि सुगंधित असतात. फळे रुचकर असतात.

कदंब वनातून वाहणाऱ्या सुवासिक वाऱ्याला "कदंब-नीला" म्हणतात. तर फुललेल्या कदंबाच्या खाली गोळा होणाऱ्या पाण्याला "कदंबरा", तर कदंबाच्या फुलांपासून बनवलेल्या मद्याला किंवा सुगंधित द्रव्याला " कादंबरी " म्हणतात.

कादंबिनी हा शास्त्रीय गायनातील मेघ रागाचा एक उपप्रकार (रागिणी) आहे

साहित्यात कदंब

[संपादन]

भवानीशंकर पंडितांच्याएका कवितेत "कदंब तरूला बांधून दोला, उंच खालती झोल' असा उल्लेख आला आहे. हिंदी कवयित्री सुभद्रा कुमारी चव्हाण यांच्या, "यह कदंब का पेड' कवितेतल्या "यह कदंब का पेड अगर मॉं होता यमुना तीरे, मैं भी उस पर बैठ कन्हैया बनता धीरे धीरे' काल्पनिक कदंब वृक्षावर बसून मुलींनी आईशी केलेल्या अत्यंत निरागस आणि मार्मिक संवादाने हिंदी वाचकांच्या मनात कदंब वृक्षाचे स्थान कायम ठेवले. शंकराचार्यानी "त्रिपुरसुंदरीस्तोत्रम्‌'मध्ये "ललितामहात्रिपुरसुंदरी'च्या सगुण स्वरूपाचे सुंदर वर्णन केले आहे, त्यात अनेक वेळा कदंब वृक्षाचा उल्लेख आढळतो.

ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, अशी कविकल्पना आहे.

पुराणकाळात यमुनेच्या काठी कदंबवने होती. आजही आहेत. श्रीकृष्णचे बालपणचे सवंगडी असलेल्य गोपाळांच्या गाई वृंदावनात चरत, तर श्रीकृष्ण कदंब वृक्षावर बसूनच बासरी वाजवे, असे संदर्भ जुन्या ग्रंथांत आहेत. या वृक्षावर बहरणारी सोनेरी-केशरी रंगाची थोडी टणक असणारी चेंडूप्रमाणे गोल फुले, गोपाळ जणू चेंडू म्हणून खेळण्यास वापरत.

स्वर्गलोकात अमृत प्राशन करून गरुड पृथ्वीवर परतत असताना या वृक्षावर बसला होता आणि तेव्हा चोचीतले काही अमृताचे थेंब या वृक्षावर पडले, अशी लोकश्रद्धा आहे.

कादंबिनी हे भारतीय स्त्रियांचे नाव असते आणि या नावाचे एक हिंदी नियतकालिकही आहे.

औषधी उपयोग

[संपादन]

किंचितशा आंबट असलेल्या कदंबाच्या फळांचा रस पोटाच्या तक्रारींसाठी देतात. जखमांवर पानांचा रस, तर खोडाचा काढा सर्दी-खोकल्यावर औषधाचे काम करतो. याचा डिंक वा गोंद गुढगे दुखी वर अत्यंत चांगला उपाय आहे.

आराध्यवृक्ष

[संपादन]

कदंबवृक्ष हा शततारका नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

वृक्षाची अन्य नावे

[संपादन]
  • शास्त्रीय नाव : Neolamarckia cadamba
  • इंग्रजी नावे : Burflower-tree, Laran, and Leichhardt pine,
  • कदंबाची अन्य संस्कृत नावे : नीप, प्रियक, शिशुपाल, हरिप्रिय आणि हलिप्रिय.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]