स्वाइन इन्फ्लुएन्झा
हा एक लेख स्वाईन इन्फ्लुएन्झा या रोगाबद्दल असून यास स्वाईन फ्लू/स्वाईन फ्ल्यू असेही म्हणले जाते.
आजाराची कारणे
[संपादन]स्वाईन इन्फ्लूएन्झा किंवा स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ह्या रोगाचा एक प्रकार आहे ; हा सामान्यतः डुकरामध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुकरांमध्ये सतत वावरणाऱ्या माणसाला ह्या विषाणूची बाधा होऊ शकते. स्वाइन फ्लू हा एक संसर्गजन्य रोग आहे, ार्थात तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे प्रसारित होऊ शकतो.
डुकराचे शिजवलेले मांस खाण्याचा या रोगाशी संबध नाही. त्या प्रमाणेच भारतात २००९ मधील स्वाइन इन्फ्लूएन्झाची साथसुद्धा भारतातील डुकरांमुळे आलेली नव्हती, तर ती अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील डुकरांपासून सुरू झालेली होती.
संसर्ग
[संपादन]स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे होतो. याचा संसर्ग माणसाद्वारे सुद्धा होतो. रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम वा त्याची थुंकी यांमधून या विषाणूंचा प्रसार होतो. स्वाईन फ्लूचे विषाणू हे हवेत साधारणतः 8 तास जीवंत राहतात.
आजाराची लक्षणे
[संपादन]ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अतिसार, उलट्या होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे ही या आजाराची काही लक्षणे आहेत. टॅमी फ्ल्यू हे औषध एच-१ एन-१ च्या विषाणूच्या संसर्गावर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. या औषधाचा भारत सरकारकडे पुरेसा साठा असतो. तथापि, या औषधांचा वापर या विषाणूंचा संसर्ग झाल्याचे नक्की झाल्यावरच होणे आवश्यक आहे. या औषधास विषाणूंकडून प्रतिरोध निर्माण होऊ नये यासाठी शासन ही काळजी घेत असते.
टॅमी फ्ल्यू या गोळ्यांशिवाय , एन ९५, मास्क आणि सर्जिकल मास्क वगैरे वैयक्तिक संरक्षक साधनांचा पुरेसा साठा भारत सारकारकडे असतो. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तसेच बंदरांवर येणाऱ्या परदेशी प्रवाशांची तपासणी वैद्यकीय पथकांच्या साहाय्याने करण्यात येते. २०१४ साली हा आजार महाराष्ट्रातही आला असून पुणे-मुंबईमध्ये आणि नाशिक जिल्ह्यामधील चांदवड, निफाड व मनमाड येथेही या रोगाचे रुग्ण सापडले आहेत.
आजार कसा टाळावा ?
[संपादन]१. हात नेहमी साबण-पाण्याने धुवावेत.
२. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे.
३. स्वाईन फ्ल्यू रुग्णापासून किमान एक हात तरी दूर राहावे.
४. खोकताना- शिंकताना तोंडाला रुमाल लावावा.
५. भरपूर पाणी प्यावे व पुरेशी झोप घ्यावी.
६. पौष्टिक आहार घ्यावा.
७. हस्तांदोलन करण्याचे अथवा आलिंगन देण्याचे, व सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे टाळावे.
८. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे टाळावे.
९. आजारी असल्यास शक्य तितक्या कमी लोकांशी संपर्क ठेवावा व घरीच विश्रांती घ्यावी.
१०. आहारात पातळ पदार्थ मोठ्या प्रमाणात घ्यावेत. . ११. तोंडावर मास्क लावावा.
उपचारानंतर दहा दिवसांत रुग्ण बरा होऊ शकतो.
रोग निदान, विषाणू तपासणी
[संपादन]स्वाईन फ्ल्यूचे प्राथमिक निदान लक्षणांवर आधारित आहे. निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत पाठवावा लागतो.रुग्णाच्या विषाणू तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था ("नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस'-एनआयसीडी), दिल्ली येथे प्रयोगशाळा तपासणीची व्यवस्था उपलब्ध आहे.
उपचार
[संपादन]कोणत्याही खासगी वैद्यकांना, खासगी डॉक्टरांना अथवा खासगी रुग्णालयांची स्वाईन फ्लूवर उपचार करण्याची क्षमता नसून, त्यांना तशी परवानगीही नाही. या रोगाचे उपचार राज्य स्वाईन फ्ल्यू नियंत्रण कक्ष अथवा मान्यताप्राप्त शासकीय रुग्णालयातच उपलब्ध असतात, आणि तसे ते शासकीय रुग्णालयातूनच घेणे बंधनकारक आहे.जर एखादी व्यक्ती या रोगाने आजारी असेल, विषाणू प्रतिबंधक औषधे त्याचे आजार काही प्रमाणात कमी करू शकतात व त्यामुळे रोग्यास लवकर बरे वाटू शकते. लवकरात लवकर (लक्षणे दिसून आल्यावर दोन दिवसात) उपचार सुरू केल्यास, औषधांचा खूप फायदा होतो. विषाणू प्रतिबंधक लस घेण्याखेरीज घरात अथवा इस्पितळात पूरक देखभाल केल्यास ताप कमी होऊ शकतो तसेच यातना कमी होऊ शकतात. त्याप्रमाणेच, माध्यमिक संक्रमण व इतर आरोग्यविषयक समस्या ओळखू येतात.
प्रतिबंधक लस
[संपादन]या रोगाच्या विविध प्रकारांना प्रतिबंध करणाऱ्या विविध लसी उपलब्ध आहेत.
१५ सप्टेंबर २००९ला अमेरिकन एफडीए ने स्वाइन फ्ल्यूसाठी पहिली लस प्रामाणित केली.
ती घेतली की १० दिवसांत शरीरामध्ये प्रतिबंधक रसायने तयार होतात.
अध्ययनातून असे लक्षात आले की, या लसी परिणामकारक तसेच सुरक्षितही आहेत.स्कॉटलंडमध्ये (२५डिसेंबर२००९ पूर्वी) लस घेतलेल्या २,४८,००० लोकांचे सर्वेक्षण केल्यावर असे लक्षात आले की, ९५% लोकांवर तिचा परिणाम झाला आहे.
बाहेरील दुवे
[संपादन]- द हेल्थसाईट-मराठी Archived 2015-04-20 at the Wayback Machine.
- इ-सकाळ Archived 2009-05-01 at the Wayback Machine.
- महाराष्ट्र टाइम्स Archived 2011-09-11 at the Wayback Machine.
- लोकसत्ता Archived 2009-05-13 at the Wayback Machine.
- जागतिक आरोग्य परिषद