सूर्यकांत जोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सूर्यकांत जोग (इ.स. १९२७ - १७ जून, इ.स. २०१६) हे इ.स. १९८५ ते १९८७ या काळात महाराष्ट्राचे पोल‌िस महासंचालक होते.

त्यांचे शालेय शिक्षण अमरावतीतील न्यू हायस्कूल येथे झाले. तर उच्च शिक्षण विदर्भ महाविद्यालयात झाले. आय.पी.एस. झाल्यानंतर ते महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पोलीस अधीक्षक झाले.

हे क्रिकेट खेळाडू असून मुंबई क्रिकेट संघाचे ते कर्णधार होते. दिल्ली येथे विशेष पोलीस महानिरीक्षक असताना पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना १९८२ सालच्या आश‌ियाड क्रीडा स्पर्धेची विशेष जबाबदारी दिली होती.

जोगांनी अमृतसर येथील सुवर्ण मंद‌िरात झालेल्या ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये भाग घेतला होता.

पोलीस दलातून निवृत्त झाल्यावर त्यांनी दोनदा राज्यपालपद नाकारले होते.

मेळघाटमध्ये फळांची झाडे लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी बंधारे आणि पाणी नियोजनावरही काम केले. १९९१ मध्ये त्यांनी चिखलदऱ्यात दीपशिखा गुरुकुल सैनिकी शाळेची ३५ विद्यार्थी घेउन स्थापना केली. आयुष्याच्या अखेरपर्यंत मिळणाऱ्या निवृत्तिवेतनाच्या सगळ्या रकमेतून जोग गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत असत.

१९९५ला पावसाअभावी संत्रीबागा सुकत असताना जोगांनी जलपुनर्भरणाचा वसुंधरा प्रकल्प या नावाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला. चिखलदऱ्याला लागून असलेल्या मेळघाट परिसरातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी जोगांनी अनेक प्रयोग केले. शिवाजीकालीन पाणी साठवण पद्धतीचा त्यांचा अभ्यास होता.

सूर्यकांत जोगांचा मुलगा सुजित विमान अपघातात मरण पावला. तर दुसरा मुलगा दीपक आयपीएस अधिकारी होता.