साहित्यिक कलावंत संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पुणे आणि आसपासच्या ग्रामीण परिसरातील साहित्यिक आणि कलावंत यांच्या उपजत कलागुणांचे संवर्धन व्हावे, या हेतूने प्रा. शैलेश त्रिभुवन आणि दिलीप बराटे यांनी 'साहित्यिक- कलावंत प्रतिष्ठान'ची स्थापना केली. पुण्यातील या संस्थेतर्फे पुणे शहरात 'साहित्यिक- कलावंत' संमेलनाचे आयोजन केले जाते. या संस्थेतर्फे वाग्यज्ञे हा पुरस्कारही दिला जातो. या संमेलनात सर्वांना विनामूल्य प्रवेश असतो.


 • ६वे साहित्यिक-कलावंत संमेलन २२ व २३ एप्रिल २००६ रोजी झाले....
 • ८वे संमेलन पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये १४, १५ आणि १६ डिसेंबर २००८ या दिवसांत झाले.
 • ९वे संमेलन २५ ते २७ डिसेंबर २००९ या दिवसांत झाले. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक उत्तम कांबळे होते.
 • १०वे संमेलन १७ ते १९ डिसेंबर २०१० या दरम्यान झाले. संमेलनाध्यक्ष फ.मुं. शिंदे होते.
 • ११वे साहित्यिक कलावंत संमेलन १0 ते १२ नोव्हेंबर २०११ या काळात झाले
 • १२वे संमेलन २३ ते २५ डिसेंबर २०१२ या काळात डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि कवी संदीप खरे यांना डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते "वाग्यज्ञे गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला.
 • १३वे संमेलन २५-२६ डिसेंबर २०१३ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अश्विनी धोंगडे
 • १४वे संमेलन पुण्यामधील कोथरूड येथे २०१४ साली २५-२६-२७ डिसेंबर या काळात झाले. संमेलनाचे उद्घाटन उषा संजय काकडे यांच्या हस्ते झाले. संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर हे होते.
 • १५वे संमेलन पुण्यात २५ ते २७ डिसेंबर २०१५ या कालावधीत झाले. वात्रटिकाकार रामदास फुटाणे हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन धनंजय मुंडे यांनी केले.
 • १६वे संमेलन पुण्यात २५-२६ डिसेंबर २०१६ या काळात झाले; प्राचार्य द.ता. भोसले संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्‌घाटन डॉ.अक्षयकुमार काळे यानी केले. या साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान आयोजित दोन दिवसीय साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी नागनाथ कोत्तापल्ले यांच्या हस्ते लेखिका मल्लिका अमर शेख यांना साहित्य क्षेत्रातील वाग्यज्ञे साहित्य पुरस्कार आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 • १७वे संमेलन पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २४-२५ डिसेंबर २०१७ या कालावधीत झाले. मराठीचे माजी प्राध्यापक डाॅ. निशिकांत मिरजकर हे संमेलनाध्यक्ष होते. या २५व्या संमेलनात विंदा दर्शन, चित्रांगण, ग्रंथोत्सव, सांस्कृतिक राष्ट्रवाद (चर्चा), काव्यांजली वगैरी कार्यक्रम होते. संमेलनात डॉ.. गिरीश ओक आणि अशोक नायगावकर यांना वाग्यज्ञे पुरस्कार प्रदान झाले. संमेलनाचे आयोजन दिलीप बराटे यांनी केले होते.
 • १८वे संमेलन पुणे येथे २३-२४ डिसेंबर २०१८ या तारखांना झाले. फ्रान्सिस दिब्रिटो संमेलनाध्यक्ष होते.


  • १४व्या संमेलनाचा वृत्तान्त :-

या संमेलनामध्ये चित्रप्रदर्शन, ग्रंथ महोत्सव, नट-खट अप्सरा, महाचर्चा, स्वरआरती, कविसंमेलन, अभिनेत्यांशी गप्पांचा कार्यक्रम, परिसंवाद व बालनाट्ये सादर करण्यात आली.

या साहित्यिक-कलावंत संमेलनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लावणी व वेगवेगळ्या कला नृत्यांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते तर ‘नमो विचार देशाला तारेल कि मारेल ?’ या विषयावर प्रदीर्घ मुलाखतीमध्ये संजय आवटे, यशवंत मनोहर, माधव भंडारी, कुमार सप्तर्षी यांनी आपापली मनोगते व्यक्त केली.

संजय आवटे यांनी बोलताना ख्रिसमसच्या दिवशीच सुशासन दिन का? हे समजले नाही अशी टीका करून साक्षी महाराज, योगी आदित्यनाथ यांच्या विधानांकडे लक्ष वेधले. व पाकिस्तानचे मॉडेल अपयशी का ठरले व भारताचे मॉडेल यशस्वी का झाले याचे उत्तर आपल्या एकीमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. परराष्ट्रमंत्री गीतेला राष्ट्रीय ग्रंथ मानते म्हणजे नक्की काय समजायचे? असा सवालही उपस्थित केला.

पुढे आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी मोदी ज्या पक्षाच्या, संघटनेच्या विचार धारेमध्ये वाढले दुर्दैवाने त्या पक्षाचा आणि संघटनेचा स्वातंत्र्य चळवळीशी काहीही संबंध नव्हता, त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ म्हणजे काय ? स्वातंत्र्य चळवळीत विकसित झालेले मुद्दे म्हणजे काय हेच यांना लक्षात येत नाही, असे सांगितले.

यशवंत मनोहर यांनी घरवापसीचा दाखला देत, ’मुस्लीम-ख्रिश्चन वगैरे धर्माच्या ज्या लोकांना हिंदू होणे शक्य नसेल त्यांनी देश सोडून जावे या पद्धतीची भूमिका घेतली जाणे हे संविधानद्रोही म्हणजे राष्ट्रद्रोही आहे,’ असे परखड मत मांडले.

आताच या राष्ट्राला हिंदू राष्ट्र करण्याचा काहींच्या मनामध्ये उद्रेक का झाला आहे असा सवाल करून, कालपर्यंत सर्व जातीचे लोक या देशामध्ये आनंदाने नांदत होते, या पुढेही आनंदाने नांदू द्या.ज्यांना आपल्यापेक्षा या देशाचे जास्त कळत होते ते महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, यांनी या देशाचा भूतकाळ कमीतकमी लक्षात ठेऊन भविष्यकाळ जास्तीत जास्त लक्षात घेत ही सगळी मांडणी केली आहे असे सांगितले.

माधव भंडारी यांनी या विषयावर बोलताना मोदींनी स्वतःला कुठेही विचारवंत, तत्त्वज्ञ म्हटले नाही. मोदी विचार देशाला तारेल की मारेल या प्रश्नाचे उत्तर १३ महिन्यामध्ये जनतेने दिले आहे.

मोदींचे तर प्रसिद्ध वाक्य आहे 'सबका साथ, सबका विकास' हे असून १३ वर्षामध्ये किती मुस्लीम-ख्रिश्चनांनी गुजरातमधून स्थलांतर केले हे आधी सांगावे असा सवाल उपस्थितांना केला.

सच्चर आयोगाच्या शिफारशीनुसार अहवालामध्ये मुस्लिमच अल्पसंख्याक का, बाकी अल्पसंख्याक समाज विचारात का घेतला नाही असा प्रश्न उपस्थित केला. तसेच सुशासन दिनानिमित्त बोलताना हा दिवस अटलबिहारी वाजपेयींच्या जन्म दिनानिमित्त साजरा केला आहे त्याचा व ख्रिसमसचा काही संबंध नाही असे सांगितले. नथुराम गोडसेच्या बाबत बोलताना गोडसेचा आणि आमचा कसलाही संबंध नाही, हे विष पेरण्याचे काम मुद्दाम केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

डॉ.कुमार सप्तर्षी यांनी बोलताना घटनेच्या आधारे झालेल्या ज्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकांतून ज्यांचा इतिहास लोकशाहीला फारसा पोषक नाही असे लोक आता राजसत्तेवर आलेले आहेत अशी सुरुवात करून," हा जो जनादेश आहे, हा राज्य करायला संधी दिलेली आहे, हे तुम्हाला साईबाबांच्या मूर्ती फेकून द्यायला, नथूरामची मंदिरे बांधायला, आमचे ऐकले नाही तर दुसर्‍या देशात जा हे सांगायला जनादेश दिलेला नाहीउ" असे परखड मत मांडत त्यासाठी असे परिसंवाद होत राहणे बोलत राहणे याला लोकशाहीतला महत्त्वाचा अधिकार म्हणतात असे सांगितले.

पुढे बोलताना मोदी हे नेमके कुणी निवडलेले आहेत असा प्रश्न पडतो, त्या वेळेस ते भाजपने निवडलेले आहेत हे पाव सत्य व आर.एस.एस.ने निवडलेले आहेत हे पाव सत्य म्हणून आर.एस.एस.ने दिलेला आदेश भाजपला देखील पाळावा लागतो. म्हणजे कधीकधी अर्धसत्याचे पूर्ण सत्य होते. म्हणून आर.एस.एस. ला काय करायचे आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. लोक नथुरामचे मंदिर बांधायला लागले तर उद्या दाऊदचेही मंदिर बांधले जाईल मग काय करायचे? कारण गुन्हेगारांची मंदिरे बांधली जाऊ लागल्यावर असेच होईल.

गांधींजींच्या काळातही जातवादी शक्ती होत्या पण गांधीजींनी त्यांना डोके वर काढू दिले नाही असेच शेवटी त्यांनी सांगितले.पहा :मराठी साहित्य संमेलने ;