धनंजय मुंडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
धनंजय मुंडे
महाराष्ट्र शासन
मंत्री सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
Assumed office
३० डिसेंबर २०१९
Constituency परळी, महाराष्ट्र विधानसभा

धनंजय पंडितराव मुंडे हे महाविकास आघाडी सरकार मध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे यांचा तब्बल 31000 मतांनी पराभव केला. ही निवडणूक दोघांनीही खूप प्रतिष्ठेची केली होती. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे फायरब्रॅंड नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

वैयक्तिक जीवन आणि शिक्षण[संपादन]

धनंजय पंडितराव मुंडे यांचा जन्म १५ जुलै १९७५ ला नाथ्रा, परळी वैजनाथ, बीड येथे वंजारी कुटुंबात झाला. धनंजय मुंडे यांच्या कुटुंबात त्यांची आई रुख्मिणी मुंडे, पत्नी राजश्री मुंडे आणि  मुलगी आदिश्री मुंडे आहेत. मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल परळी वैजनाथ येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण  सिम्बॉयसीस कॉलेज पुणे येथून झाले आहे. त्यांनी बॅचलर ऑफ सोशल लॉ मधून आपली पदवी संपादन केली आहे.

राजकारण[संपादन]

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदार संघातून विजयी झाले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री असा पदभार त्यांच्याकडे आहे.

आपले काका स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा हाथ धरून १९९५ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरवातीला ते भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. भारतीय जनता पक्षात काम करीत असताना धनंजय मुंडे यांनी विविध यात्रा तसेच कार्यक्रमांचे आयोजक म्हणून जबाबदारी उत्कृष्टपणे  पार पाडली. तसेच बेरोजगारांच्या सभा घेऊन  त्यांच्या प्रश्नांवर दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे येथे भव्य मोर्चाचे आयोजन आणि त्यांचे नेतृत्व ही मुंडे यांनी केले. २००१ साली बेरोजगारी व दहशतवाद या विरोधात पाच लाख युवकांचा मोर्चा काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. २००३ साली केंद्र सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या वतीने दिल्ली येथे आयोजित एफ्रो-एशियन्स गेम्सच्या संयोजन समितीवर निवड झाली. 

९ ऑगस्ट २००८ साली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने दिल्ली येथे झालेल्या युवा क्रांती रॅलीत १५ हजार युवकांचे नेतृत्व त्यांनी केले. मार्च २००९ मध्ये युवकांच्या प्रश्नांसंदर्भात पुणे येथे राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करून युवकांच्या हक्काची सनद प्रसिद्ध केली. बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ९ वर्ष, उपाध्यक्ष म्हणून अडीज वर्ष व गटनेते म्हणून अडीज वर्ष काम पहिले. २००२ ते २०१० या काळात त्यांनी पट्टीवडगाव या आपल्या जि.प. गटात ८ वर्षात शंभर कोटींची विकास कामे करून हा गट विकासाच्या बाबतीत राज्यात आघाडीवर नेला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना जिल्ह्याच्या विकासासाठी विकास निधी आणून विकास कामे केली. या मध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना तसेच पाणी पुरवठा योजनांसाठी मोठा निधी उपलब्ध केला. १० जून २०१० मध्ये भारतीय जनता पक्षातर्फे महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची प्रथम निवड झाली होती. त्यांनी ‘पडेल ती कामे आणि असेल ती जबाबदारी’ भारतीय जनता पक्षात असताना स्वीकारली.  असे असूनही त्यांच्या वाट्याला निराशाच आली. त्यामुळे त्यांनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी  २०११ मध्ये भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.  प्रवेश करताच ते राष्ट्रवादी कॉंग्रस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले.  तसेच प्रदेश प्रवक्ते म्हणुन त्यांनी कामे पाहिली. भाजपा मध्ये काम करत असताना, पडद्या मागे असणारे धनंजय मुंडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये आल्यानंतर एक तरुण तडफदार आणि महत्वाकांक्षी नेतृत्व म्हणून आपल्या समोर आले. २ जुलै २०१३ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्र विधान परिषदेवर त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली. २२ डिसेंबर २०१४ महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. धनंजय मुंडे १० जानेवारी २०१६  मध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून गेले आणि तेव्हाच महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची दुसऱ्यांदा निवड झाली. धनंजय मुंडेना राजकारणाचा वारसा जरी त्यांचे काका स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून मिळाला असला तरी त्यांनी राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी विधानपरिषद विरोधी पक्ष नेते पदाची भूमिका अगदी चोखपणे पार पाडली.

सामाजिक कार्य[संपादन]

- धनंजय मुंडे हे राजकारणात तर आहेतच परंतु त्यांचा सामजिक कार्यात ही तितकाच हातखंडा आहे. प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन जनसमुदायाला भेटणे त्यांच्या समस्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून जाणून घेणे व स्थानिकांचे प्रश्न सोडविणे यामुळे परळीकरांसोबत त्यांची नाळ अधिक घट्ट झाली आहे. तसेच धनंजय मुंडे हे नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून काम पहातात.

- नाथ प्रतिष्ठानच्या वतीने प्रत्येक वर्षी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मागील १२ वर्षांत १५०० हून अधिक गरीब मुला-मुलींचे मोफत विवाह नाथ प्रतिष्ठानच्या वतीने धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

- मराठवाडा, राज्यस्तरीय, देशपातळीवरील निमंत्रीतांच्या तसेच डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन मुंडेंच्या वतीने करण्यात येते.

- २००३ घाटनांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथे झालेल्या रेल्वे अपघातामध्ये मदत कार्य करताना १२ प्रवाशांचे प्राण त्यांनी वाचविले.

- परळी मध्ये दरवर्षी गणेश महोत्सवच्या माध्यमातून प्रतिवर्षी गणेशोत्सव काळात सांकृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

- नाथ प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाभरात कॅन्सर रोग निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात येते.

- नाथ प्रतिष्ठानच्या माध्यामतून पाणीटंचाई सोडविण्यासाठी परळी शहरात व ग्रामीण भागात ५०० बोअर घेऊन पाणी प्रश्न सोडविला.

- परळी मतदार संघातील शेतकरी व युवकांना रोजगार मिळावा यासाठी श्री शिव-पार्वती साखर कारखाना लि.मुंगी, जि. बीड या खाजगी तत्वावरील साखर कारखाण्याची उभारणी सुरु केली आहे.

- परळी मतदार संघातील व जिल्ह्यातील विविध खेळाडू, अपंग, निराधार, गोर-गरीब आदींना वैयक्तिक स्वरुपाची आर्थिक मदत.

पुरस्कार[संपादन]

१. दैनिक लोकमतच्या वतीने विधिमंडळातील उत्कृष्ट अभ्यासू वक्ता पुरस्कार

२. दैनिक लोकमतच्या वतीने पॉवरफुल राजकारणी पुरस्कार

 [संपादन]