समलैंगिकता
एकाच लिंगाच्या दोन व्यक्तींमधील लैंगिक आकर्षण व समागम असण्याला समलैंगिकता' (इंग्लिश: Homosexuality) म्हणतात. जी व्यक्ती केवळ स्वतःच्या लिंगाच्या इतर व्यक्तींबद्दल लैंगिक आणि अ-लैंगिक प्रणयदृष्ट्या आकर्षित होते अश्या व्यक्तीस 'समलैंगिक' अथवा 'समलिंगी' (इंग्लिश: Homosexual) म्हणतात. (सम + लिंग->लैंगिक + ता ; संस्कृत घटकांपासून शब्दसिद्धी) समलैंगिकता म्हणजे समान लिंगाच्या वा लिंग-ओळखीच्या व्यक्तींमध्ये शृंगारिक वा शारिरिक आकर्षण, वा लैंगिक संबंध. अंतर्गत दिशा म्हणून समलैंगिकतेचा संदर्भ येणेप्रमाणे : "बहुतेक वा पूर्णतः समान लिंगाच्या व्यक्तींकडे लैंगिक, शृंगारिक वा भावनिक आकर्षणाचा वा अनुभवांचा स्थायी कल वा वर्तनबंध". शब्दाचा आणखी एक संदर्भ म्हणजे "असे आकर्षण, ते आकर्षण अभिव्यक्त करणारी वागणूक, वा आकर्षण आणि वागणूक असलेल्या समाजात सहभाग, यांच्यावर आधारित व्यक्तिगत किंवा सामाजिक ओळख".[१] [२]
समलैंगिकता-ते-भिन्नलैंगिकता या संतत क्षेत्रात समलैंगिकता, भिन्नलैंगिकता व उभयलैंगिकता हे तीन मुख्य प्रवर्ग आहेत.[३] व्यक्तीमध्ये विवक्षित लैंगिक दिशा कशी उद्भवते याविषयी वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही,[३] तरी विशेषज्ञांचा कल जीवशास्त्रीय स्पष्टीकरणांकडे अधिक आहे[४] : जनुकीय वा गर्भांतर्गत वा दोन्ही मिळून कारणे असल्याचे निर्देश मिळतात. [५] अंतर्गत लैंगिक दिशा घडण्यात पालकांचा व्यवहार किंवा बाळपणीचे अनुभव भाग घेतात असा कुठलाही ठोस आधार नाही[५] पुरुषांच्या समलैंगिक वर्तणूकीकरिता घरगुती आणि सामायिक परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही, परंतु स्त्रियांच्या समलैंगिक वर्तणुकीकरिता या घटकांचा गौण प्रभाव पडतो.(५) जरी काही लोकांच्या दृष्टिकोनातून समलैंगिक वर्तणूक अनैसर्गिक आहे,[६] जरी काही जण समलैँगिकता अनैसर्गिक आहे असे मानतात,[७][८] तरी संशोधनावरून असे दिसते की समलैंगिकता ही मनुष्याच्या लैंगिकतेमधील सामान्य आणि नैसर्गिक भिन्नतांपैकी आहे, आणि समलैंगिकता ही स्वतःहून घातक मानसिक परिणामाचा स्त्रोतही नाही. [३][९] बहुतेक लोकांना स्वतःची लैंगिक दिशा निवडू शकतो अशी जाणीव होतच नाही, वा नगण्य प्रमाणात होते. [३] लैंगिक कल बदलण्याकरिता मानसोपचार करण्यासाठी पर्याप्त आधार नाही.[१०]
समलैंगिकता ही ऐतिहासिकदृष्ट्या जगातील बहुतांश देशांमध्ये व संस्कृतींमध्ये कायम अस्तित्वात होती व आहे. ह्याच्या अनेक खुणा अगदी पुराणकालापासूनच्या साहित्य, शिल्प, कला व इतर माध्यमांत आढळून येतात. मात्र विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत समलैंगिक वर्तणूक कधीही खुलेपणाने समाजात बोलली जात नसे. १९७० च्या दशकात अमेरिकेतील 'अमेरिकन सायकलॉजिकल असोसिएशन' आणि 'अमेरिकन सायकियॅट्रिक असोसिएशन' ह्या महत्त्वाच्या वैद्यकीय संस्थांनी 'Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' ह्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या नियतकालिकात 'समलैंगिकता हा मानसिक दोष नाही' हे स्पष्ट केले. ह्या संस्थांनी वैज्ञानिक संशोधनाचा आधार आणि सांख्यिक पुरावा देऊन हे दाखवूल दिले की समलैंगिक व्यक्तींची बौद्धिक, नैतिक क्षमता व जडणघडण इतरांसारखीच असते आणि समलैंगिक व्यक्ती ह्या सर्वसामान्य निरोगी आयुष्य जगू शकतात. वैद्यकीय पेश्याच्या ह्या दृष्टिकोनानंतर गेल्या ३ दशकांत जगभरात, विशेषतः पाश्चिमात्य देशांत, समलैंगिकता मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाऊन समलैंगिक व्यक्ती खुल्या रितीने जगू लागल्या.
पुरुष आणि स्त्री समलैंगिकांसाठी मराठीत वेगवेगळे शब्द नाहीत. इंग्लिशमधे समलैंगिक स्त्रियांना 'लेस्बिअन' (इंग्लिश: Lesbian) व समलैंगिक पुरुषांना 'गे' (इंग्लिश: Gay) म्हणले जाते. स्वतःला समलैंगिक म्हणवून घेणाऱ्यांचे आणि समलैंगिक संबंधांचा अनुभव घेणाऱ्या लोकांचे प्रमाणाचा अंदाज घेणे संशोधकांना कठीण जाते. विषमलैंगिक लोकांकडून होणारा त्रास आणि लोकांना समलैंगिकांच्या वाटणाऱ्या भीतीपोटी अनेक समलैंगिक स्वतःची लैंगिकता उघड करत नाहीत. माणसाखेरीज अन्य प्राण्यांमधेही समलैंगिक वर्तन पाहिलेले आहे.
समलैंगिक हे विशेषण जरी पूर्वकालीन लेखकांनी एकाच लिंगाच्या संदर्भात वापरले उदा. केवळ मुलींची शाळा (याला समलैंगिकांची शाळा या अर्थाने वापरले जात असे) तरी आज ही संज्ञा केवळ लैंगिक आकर्षण, लैंगिक कृती वा लैंगिक कल या अर्थानेच वापरली जाते. समसमाजी ही संज्ञा आता समान लिंगाच्या व्यक्तींच्या संदर्भात वापरली जाते (जी खासकरून लैंगिकतेव्यतिरिक्त इतर सर्व संदर्भात वापरली जाते.) समलिंगीच्या प्रेमासाठी होमोफिलीया हा आणखी एक शब्द आहे.
काही समानार्थी जे समलिंगी आकर्षण अथवा समलिंगी क्रिया ज्यात पुरुष पुरुषांशी संभोग करतात किंवा एम एस एम (जे वैद्यकीय जगतात विशेषतः लैंगिक कृतीविषयी चर्चा करतांना वापरले जातात). इंग्रजीत या संदर्भात काही तिरस्कारदर्शक शब्द जसे क्विअर, फ़ॅगॉट, फ़ेअरी, पुफ आणि होमो वापरले जातात. (मराठीत छक्का, गांडू असे शब्द वापरले जातात). या वरील शब्दांपैकी काही शब्द समलैंगिकांनी साधारण १९९० च्या सुरुवातीपासून सकारात्मकरित्या वापरण्यास सुरुवात केली. याचा वापर त्यांनी 'क्विअर थेअरी'च्या अभ्यासात आणि इतर ठिकाणी केला. या शब्दाच्या लोकप्रियतेमुळे एका अमेरीकन टी.व्ही. कार्यक्रमाचे नाव 'क्विअर आय फॉर स्ट्रेट गाय' असे आहे. होमो हा शब्द इतर अनेक भाषांमध्ये इंग्रजीप्रमाणे तिरस्कारदर्शक असा वापरला जात नाही. सांस्कृतिक आणि वांशिक संदर्भात मात्र या संज्ञांचा गैरवापर मात्र अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने होऊ शकतो. या संज्ञा वापरणे मान्य होईल की नाही हे वक्ता आणि त्याने ज्या संदर्भात याचा वापर केला आहे त्यावर अवलंबून असते. उलटपक्षी मुळात गे या शब्दाचा स्वीकार समलैंगिक स्त्री-पुरुषांनी एक सकारात्मक संज्ञा म्हणून केलेला होता. (उदा: गे मुक्ती, गे हक्क असा) मात्र हा आता तरुणांकडून तिरस्कारदर्शक अर्थाने वापरला जात आहे.
समलैंगिकता व धर्म
[संपादन]हिंदू धर्म
[संपादन]हिंदू आणि वैदिक ग्रंथांमधे संत, अवतार आणि देवही वेगवेगळ्या लैंगिक कृती करत अशी वर्णने आहेत. अनेक पौराणिक, भारतीय काव्यांमधे देवादिकांची समलैंगिक वर्णने आहेत. राजेराण्यांमधल्या समलैंगिकतेच्या अनेक गोष्टी आहेत. प्रेम आणि लैंगिकतेबद्दल लिखाण असणाऱ्या कामसूत्र या ग्रंथातही समलैंगिकतेचा समावेश आहे. Transsexuals लोकांचीही पूजा केल्याची वर्णने आहेत, उदा: विष्णूचे मोहिनीरूप, शंकराचे अर्धनारीनटेश्वर रूप. [११]
मनुस्मृती
[संपादन]मनुस्मृतीमध्ये समलैँगिकतेसाठी दिलेली शिक्षा कठोर किंवा प्राणघातक अशी नसून सौम्य आहे अशी म्हटली जाऊ शकते.
ब्राह्मणस्य रजः कृत्वा घ्रातिर् अघ्रेयमद्ययोः ।
जैह्म्यंच मैथुनं पुंसि जातिभ्रंशकरं स्मृतम् ॥ ११.६७ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.६८)
...
अमानुषीषु पुरुष उदक्यायामयोनिषु ।
रेतः सिक्त्वा जले चैव कृच्छ्रं सांतपनं चरेत् ॥ ११.१७२ (किंवा कुठल्या आवृत्तींमध्ये ११.१७३)
...
गोमूत्रं गोमयं क्षीरं दधि सर्पि: कुशोदकम् ।
एकरात्रोपवासश्च कृच्छ्रं सांतपनं स्मृतम् ॥ ११.२१०-२१२[१२]
पहिल्या उताऱ्यात अन्य कार्यांसोबत, द्विज माणसाने पुरुषासोबत मैथुन केल्यावर जातिभ्रंश म्हणजेच जात गमावणे ही शिक्षा सांगण्यात आली आहे. परंतु दुसऱ्या उताऱ्यात अमनुष्यांत, मासिक पाळी येणाऱ्या स्त्रीत, योनीपेक्षा वेगळ्या ठिकाणी, किंवा पाण्यामध्ये वीर्य शिंपडले, तर पुरुषाने "सांतपन" नावाचे प्रायश्चित्त करावे असे म्हणले आहे. गोमूत्र, गाईचे शेण, दूध, दही, तूप कुश-गवताचे पाणी (खावे) आणि एक रात्रीचा उपवास, हे सांतपन प्रायश्चित्त होय. वरील ११.१७२ (किंवा ११.१७३) हा उतारा अगदी तसाच्या तसाच कूर्म पुराणात (उत्तरभाग, ३३.१०) पण आहे.[१३][१४]
स्त्री-समलिंगी संभोगाच्या बाबतीत मात्र मनुस्मृती जास्त कडक आहे.
कन्यैव कन्यां या कुर्यात् तस्या: स्याद द्विशतो दमः ।
शुल्कंच द्विगुणं दद्यात शिफाश्चाप्नुयाद दश ॥
या तु कन्यां प्रकुर्यात स्त्री सा सद्यो मौण्ड्यमर्हति ।
अङ्गुल्योरेव वा छेदं खरेणोद्वहनं तथा ॥ ७.३६९-३७०
जी कन्याच कन्येशी (संभोग) करेल, तिला दंड दोनशे ("पण" ही मुद्रा) असावे. तिचे (विवाह-)शुल्क दुप्पट द्यावे, आणि तिला दहा छड्या मिळाव्यात. पण जी स्त्री कन्येशी संभोग करेल, ती लगेच मुंडनास, दोन बोटे छाटली जाण्यास, वा गाढवावरून धिंड काढली जाण्यास पात्र ठरेल.
कायदेशीर मान्यतेची स्थिती
[संपादन]१९७०/८० च्या दशकांपर्यंत बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकता ही कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आली होती. २०१० च्या सुरुवातीस, कॅनडा, स्पेन, नॉर्वे, स्वीडन, बेल्जिअम, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांमध्ये समलिंगी विवाहास कायदेशीर मान्यता आहे. काही युरोपियन देशांमध्ये, विवाहांस अधिकृत मान्यता नसली तरी काही प्रमाणात 'सिव्हिल युनियन'च्या स्वरूपात वैवाहिक जोडप्यांसारखे काही हक्क दिले गेले आहे. अमेरिकेत समलैंगिक विवाहास कायदेशीर दर्जा दिला जावा की नाही हा एक वादाचा विषय असून विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान ह्या विषयावर प्रसारमाध्यमांमध्ये बऱ्याच वेळी चर्चा घडून येतात. समलिंगी विवाहाची अधिकृतरित्या कायदेमान्यता वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी आहे. कनेटिकट,आयोवा, मॅसेच्युसेट्स, व्हर्मॉँट व न्यू हँपशायर ह्या पाच राज्यांमध्ये समलैंगिक विवाह कायदेशीर आहे, (इतर राज्यांमध्ये समलैंगिक विवाहास कायदेशीर मान्यता नसली तरी समलैंगिक संबंधांना अटकाव नाही). कॅलिफोर्नियामध्ये सन २००८ प्रथम समलिंगी विवाहास मान्यता देणारा कायदा मंजूर झाला होता, मात्र नोव्हेंबर २००८ मधील निवडणुकांमध्ये 'प्रपोझिशन ८' हे कलम सार्वमताने मंजूर झाले ज्याद्वारे वरील कायदा बाद ठरवला गेला. बहुतांश पाश्चिमात्य देशांमध्ये समलैंगिकमुळे एखाद्या व्यक्तीला डावलले जाणे (नोकरी, सामाजिक, शासकीय, शैक्षणिक किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी अथवा खासगी व्यवसायांमध्ये) हे बेकायदेशीर ठरवले गेले आहे.
भारतीय घटनेच्या प्रभाग ३७७ मधील काही कलमांनुसार काही विशिष्ट 'अनैसर्गिक समागम संबंध' - जरी ते प्रौढ व्यकींमध्ये 'परस्परसंमतीने आणि खासगीपणे' होत असतील तरीही - गुन्हा म्हणून गणले जात होते. ह्या कलमांनुसार समलैंगिक संबंध (इतकेच नव्हे तर स्त्री-पुरुषांमधील समागमाचे काही प्रकारही) बेकायदेशीर होते. मात्र जुलै २००९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक निर्णयाद्वारे[१५] हे कलम 'घटनात्मक व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या आड येणारे' म्हणून अवैध घोषित केले होते मात्र १२ डिसेंबर २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा रद्द करण्यात आली.समलैंगिक संबंध ठेवणं गुन्हा आहे आणि त्यासाठी भारतीय दंड विधानातील ३७७ नुसार १० वर्षं ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. निसर्ग नियमांच्या विरुद्ध लैंगिक संबंध (सेक्स) करणं फौजदारी गुन्हा आहे असं कायदा सांगतो आणि हा कायदा बदलायचा असेल तर सर्वोच्च न्यायालय काहीही करू शकणार नाही. कारण कायदा बदलण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे असं सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे.
अनेक आशियाई, आखाती देशांमध्ये समलैंगिकता अजूनही गुन्हा आहे. सहा देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा जन्मठेप-पात्र गुन्हा आहे; १० देशांत तर समलैंगिकतेस मृत्युदंडाची शिक्षा आहे.[१६]
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 06/09/2018 रोजी भारतीय दंडविधान संहितेचे 377 हे कलम आता एकमेकांच्या संमतीने खाजगीत होणाऱ्या समलिंगी लैंगित संबंधानां लागू करता येणार नाही असा निर्णय दिला. ह्या कलमा अंतर्गत आता फक्त पौढ नसलेल्या व्यक्तिंशी केलेल्या लैंगिक क्रियाच गुऩ्हा ठरतील.[१७]
संदर्भ
[संपादन]- ^ "Sexual Orientation and Gender Identity". http://www.apa.org (इंग्रजी भाषेत). 2018-09-06 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य) - ^ "Case No. S147999 in the Supreme Court of the State of California, In re Marriage Cases Judicial Council Coordination Proceeding No. 4365(...) - APA California Amicus Brief — As Filed" (PDF). p. 30. 2012-01-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 21 December 2010 रोजी पाहिले.
- ^ a b c d "Sexual Orientation, Homosexuality, and Bisexuality", APAHelpCenter.org, 30 March 2010 रोजी पाहिले
- ^ Frankowski, Barbara L. (2004-06-01). "Sexual Orientation and Adolescents". Pediatrics (इंग्रजी भाषेत). 113 (6): 1827–1832. doi:10.1542/peds.113.6.1827. ISSN 0031-4005. PMID 15173519.
- ^ a b "Submission to the Church of England's Listening Exercise on Human Sexuality". The Royal College of Psychiatrists. 13 June 2013 रोजी पाहिले.
- ^ साचा:Cite doi
- ^ Robinson, B. A. (2010). "Divergent beliefs about the nature of homosexuality". Religious Tolerance.org. 2019-05-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 September 2011 रोजी पाहिले.
- ^ Schlessinger, Laura (2010). "Dr. Laura Schlessinger and homosexuality". Religious Tolerance.org. 2019-01-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 19 September 2012 रोजी पाहिले.
- ^ ""Therapies" to change sexual orientation lack medical justification and threaten health". Pan American Health Organization. रोजी मूळ पानापासून संग्रहित2011-01-13. 26 May 2012 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)archived here .
- ^ American Psychological Association: Resolution on Appropriate Affirmative Responses to Sexual Orientation Distress and Change Efforts
- ^ "मनुस्मृति आणि समलैंगिकता".
- ^ मनुस्मृती, [१], संस्कृत व सोबत इंग्रजी अनुवाद
- ^ कूर्म पुराण, [२], संस्कृत व सोबत हिंदी अनुवाद
- ^ "stotra in Devanagari script : Sanskrit Documents". sanskritdocuments.org. 2018-09-06 रोजी पाहिले.
- ^ "India decriminalises gay sex".
- ^ Ottosson, Daniel (November, 2006), LGBT world legal wrap up survey (PDF), ILGA, 2007-09-25 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित, 2007-09-21 रोजी पाहिले
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "section 377: काय आहे ३७७ कलम-Maharashtra Times". Maharashtra Times (हिंदी भाषेत). 2018-09-06 रोजी पाहिले.[permanent dead link]