Jump to content

श्रीकांत मोघे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीकांत मोघे
जन्म ६ नोव्हेंबर १९२९
किर्लोस्करवाडी
मृत्यू ६ मार्च २०२१
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

श्रीकांत राम मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ६ नोव्हेंबर १९२९; - पुणे, ६ मार्च २०२१, पुणे) हे एक मराठी नाट्य-चित्र‍अभिनेते होते. मराठी कवी कै. सुधीर मोघे यांचे हे थोरले बंधू होत.

बालपण आणि शिक्षण

[संपादन]

श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बीएस्‌‍सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले.

महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले.

श्रीकांत मोघे यांनी साठांहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत कामे केली आहेत.

’पुलकित आनंदयात्री’ या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, युरोप, दुबई अशा ठिकाणचा दौरा केला आहे.

कारकीर्द

[संपादन]

१९४०-४१ : शाळेत असताना ना.धों. ताम्हनकर लिखित ‘पारितोषिक’ व ‘विद्यामंदिर’ या नाटकांत भूमिका.
१९५१-५२ :आंतरमहाविद्यालयीन नाट्यस्पर्धेत सहभाग
१९५८ : दिल्लीत झालेल्या ’तुझं आहे तुजपाशी’च्या प्रयोगात ‘श्याम’ची भूमिका
१९५९-६० : दिल्लीत झालेल्या ‘कृष्णाकाठी कुंडल’ या नाट्यप्रयोगात भूमिका
१९६१ : मुंबई आकाशवाणी केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून बदली

श्रीकांत मोघे यांनी १९५१-५२ मध्ये पुण्यात आल्यानंतर शरद तळवलकर यांच्या हाताखाली पु. ल. देशपांडे यांचे ‘अंमलदार’ सादर केले. त्या प्रयोगाला वाळवेकर ट्रॉफी मिळाली होती.

पुण्याच्या महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने १९५५ साली झालेल्या राज्य शासनातर्फे आयोजित पहिल्या राज्य नाट्यस्पर्धेत मामा वरेरकर यांचे ‘अपूर्व बंगाल’ हे नाटक सादर केले. यातील प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघे यांना राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले.

पुण्यामध्ये किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनीत नोकरी करत असतानाच श्रीकांत मोघे यांना नाटकात काम करण्याची ओढ स्वस्थ बसू देईना. भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीत प्रवेश घेण्यासाठी ते दिल्लीला गेले. परंतु, अकादमीच्या चमूत प्रवेश मिळाला नाही. पुढे चारुदत्त नावाच्या हिंदी नाटकात त्यांनी साकारलेली छोटीशी भूमिका भारत सरकारातले तत्कालीन नभोवाणी मंत्री डॉ. बाळकृष्ण केसकर यांना खूप आवडली. पुढे श्रीकांत मोघे यांनी १९५६मध्ये दिल्लीत संगीत नाटक अकादमीत नोकरी करायला सुरुवात केली.

नंतर, १९५७ साली पहिल्या स्वातंत्र्यलढ्याच्या शताब्दीनिमित्त आयोजित सेंटेनरी ड्रामा फेस्टिव्हलमध्ये ‘और भगवान देखता रहा’ या नाटकातील नायक म्हणून काम करणाऱ्या श्रीकांत मोघे यांच्या अभिनयाचे पंडित नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद तसेच अनेक मंत्री यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला. त्याच वर्षी श्रीकांत मोघे आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावर वृत्तनिवेदक म्हणून लागले.

त्या सुमारास पु.ल. देशपांडे दिल्लीत होते. त्यांना एका गायक नटाची गरज होती. पुलंनी श्रीकांत मोघे यांनी ’कृष्णाकाठी कुंडल’ या नाटकातली एक भूमिका दिली.

आत्मचरित्र

[संपादन]

श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित ’नटरंगी रंगलो’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचे प्रकाशन ६ फेब्रुवारी २०१५ रोजी बेळगाव येथे भरलेल्या नाट्यसंमेलनात झाले.

श्रीकांत मोघे यांची भूमिका असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)

[संपादन]
  • अजून यौवनात मी (नायक)
  • अपूर्व बंगाल
  • अंमलदार (सर्जेराव)
  • अबोल झाली सतार
  • अशी पाखरे येती (अरुण सरनाईक)
  • अश्रूंची झाली फुले (शंभू महादेव)
  • अश्वमेघ (गिरीश)
  • असं झालं आणि उजाडलं
  • आंधळ्यांची शाळा
  • एका घरात होती (सहकलाकार विजया मेहता)
  • और भगवान देखता रहा (हिंदी)
  • कथा कुणाची व्यथा कुणाला (अरविंद)
  • कृष्णाकाठी कुंडल
  • गरुडझेप (शिवाजी)
  • गारंबीचा बापू (बापू)
  • घरोघरी मातीच्या चुली
  • चिं.सौ.कां. चंपा गोवेकर
  • चौऱ्यांऐंशीचा फेरा
  • जावयाचे बंड (श्रीकांत)
  • तुझे आहे तुजपाशी (सतीश, राजेश व श्याम)
  • देवकी
  • नवी कहाणी स्मृती पुराणी (यशवंत)
  • फक्त एकच कारण
  • बिकट वाट वहिवाट
  • मन पाखरू पाखरू
  • मी स्वामी या देहाचा
  • मी जिंकलो मी हरलो
  • मृत्युंजय (दुर्योधन)
  • म्हणून मी तुला कोठे नेत नाही
  • राजयाचा पुत्र अपराधी देखा
  • राजे मास्तर
  • रात्र नको चांदणी
  • लेकुरे उदंड झाली (राजशेखर)
  • वाऱ्यावरची वरात (बोरटाके गुरुजी, शिरपा, शाहीर,व कडवेकर)
  • शेर शिवाजी (हिंदी) (शिवाजी)
  • संकेत मीलनाचा (तो)
  • सरी गं सरी
  • सहज जिंकी मना
  • साक्षीदार (मधुकर मोहिले)
  • सुंदर मी होणार (सुरेश)
  • सीमेवरून परत जा (सिकंदर, पौरस)
  • सौदामिनी
  • हा स्वर्ग सात पावलांचा

दिग्दर्शित केलेली नाटके

[संपादन]

श्रीकांत मोघे यांचे काम असलेले चित्रपट

[संपादन]
  • आम्ही जातो आमुच्या गावा
  • उंबरठा
  • एक क्रांतिवीर वासुदेव बलवन्त फडके (हिंदी)
  • काका मला वाचवा
  • कालचक्र (हिंदी)
  • गंमत जंमत
  • दैव जाणिले कुणी
  • दोन्ही घरचा पाहुणा
  • नंदिनी
  • नवरी मिळे नवऱ्याला
  • निवृत्ती ज्ञानदेव
  • प्रपंच (पहिला चित्रपट. या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळाले).
  • बाबा लगीन
  • भन्‍नाट भानू
  • मधुचंद्र
  • मनचली (हिंदी)
  • Milky Way (इंग्रजी)
  • रास्ता रोको (हिंदी)
  • वासुदेव बळवंत फडके
  • शेवटचा मालुसरा
  • सत्य : मोअर दॅन अ ह्यूमन
  • सावरे रे
  • सिंहासन
  • सूत्रधार

निवडक दूरचित्रवाणी मालिका

[संपादन]
  • अजून चांदरात आहे
  • अवंतिका
  • उंच माझा झोइका
  • भोलाराम
  • स्वामी (राघोबादादा) : अभिनय; निर्मिती आणि दिग्दर्शन साहाय्य

श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • आंतरहविद्यालयेन नाट्यस्पर्धेत ‘अंमलदार’ नाटकातील भूमिकेबद्दल वाळवेकर स्मृती सन्मान (१९५१-५१)
  • काशीनाथ घाणेकर पुरस्कार (२०१०)
  • केशवराव दाते पुरस्कार (२०१०)
  • गदिमा पुरस्कार (२०१३)
  • झी मराठी जीवनगौरव पुरस्कार (२०१४)
  • अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुय्रस्कार (२०१०)
  • सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
  • नानासाहेब फाटक पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचा इ.स. २०१४चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
  • महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००५-०६)
  • महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार
  • लोक कल्याण प्रतिष्ठान पुरस्कार (२०१०)
  • शाहू छत्रपती पुरस्कार