वैभव छाया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वैभव छाया
Vaibhv Chayya.jpg
वैभव छाया
टोपणनाव बंटी
जन्म १७ मे, १९८८ (1988-05-17) (वय: ३०)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, स्फुटलेखन
प्रसिद्ध साहित्यकृती डिलीट केलेलं सारं आकाश
प्रभाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरनामदेव ढसाळ
आई छाया भालेराव
संकेतस्थळ https://vaibhavchhayablog.wordpress.com/

वैभव छाया (जन्म: १७ मे, इ.स. १९८८) हे एक मराठी कवी, मुक्त पत्रकार आणि आंबेडकरवादी लेखक आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला.

परितक्त्या मातेसोबत राहणाऱ्या वैभव छाया यांचे बालपण विठ्ठलवाडी येथे गेले. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी संपादन केली. त्यांनंतर काही काळ पत्रकारितेतही काम केले. त्यांच्या आयुष्यातील बराच काळ हा चळवळीत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणूनच गेला. वैभव छाया यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहीकांतून विपूल स्तंभलेखन केले आहे. या लेखनात आंबेडकरी चळवळ, डिजीटल क्षेत्र, सोशल मिडीया हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय होते.

इ.स. २०१४ साली वैभव छाया यांचा पहिला कविता संग्रह ‘डिलीट केलेलं सारं आकाश’ प्रकाशित झाला. या संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ लेखिका कविता महाजन आणि सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. एकनाथ आव्हाड यांनी केले. हा काव्यसंग्रह लोकप्रसिद्ध झाला आहे.[१][२] प्रकाशनापूर्वीच अनेकांनी नोंदणी केलेल्या या काव्यसंग्रहाच्या छापलेल्या १००० प्रतींपैकी अर्ध्या प्रती पहिल्या दोन दिवसात संपल्या होत्या.[३]

कवी नामदेव ढसाळ यांच्या स्मृती प्रित्यर्थ नामदेव ढसाळांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती तेवत ठेवण्याच्या इराद्याने वैभव छाया आणि इतर समविचारी मित्रांनी 'नामदेव ढसाळ स्मृती गौरव समिती'ची स्थापना करून नामदेव ढसाळांच्या एकुण आयुष्याला सलाम करणारा सारं काही समष्टीसाठी हा अभिवादनपर कार्यक्रम दरवर्षी १५ जानेवारी रोजी मुंबई येथे साजरा केला जातो. या कार्यक्रमात आंबेडकरी कविता, नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन, त्यांच्या कवितांचे नाट्यरूप, त्यांनी लिहिलेल्या गाण्यांचे सादरीकरण तसेच त्यांच्या जीवनावर व कवितांवर आधारित चित्रप्रदर्शन, चित्रकविता प्रदर्शन, शाहिरी, कविता वाचन, चर्चासत्र, चित्रपट लघुपट स्क्रीनिंग अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

या कार्यक्रमात समितीतर्फे दरवर्षी नामदेव ढसाळ यांच्या नावाने एका कवीला गौरवण्यात येते. इ.स. २०१६ रोजी हा मान ख्यातनाम आंबेडकरी कवी लोकनाथ यशवंत यांना मिळाला होता.[४]

आंबेडकरी लेखक[संपादन]

वैभव छाया यांच्या काव्य व लेखनावर महानगरी जाणिवांचा थेट परिणाम जाणवतो. त्यात नामदेव ढसाळ व आंबेडकरांचा प्रभाव अधिक स्पष्टपणे आढळतो. समाजप्रती त्यांचे निरीक्षण व चिंतन सूक्ष्म आहे. त्यांच्या लेखनात आरक्षणाचा प्रश्न, खासगी विद्यापीठांचा प्रश्न, खासगीकरणाची लाट, रमाबाई नगर हत्याकांड, खैरलांजी हत्याकांडातील पीडीतांवरील अन्याय, ॲट्रोसिटी, क्रीडा क्षेत्रात प्रतिनिधित्व नसणे, माध्यमजगतात मागास जातींना असलेले दुय्यम स्थान, दिवसेदिवस महाग होत जाणारी शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्थेतली छुपी जातीयता, समाजव्यवस्थेकडून, न्यायव्यवस्थेकडून होणारी उपेक्षा हे त्यांच्या आजवरच्या लिखाणाचे प्रमुख विषय आहेत.

त्यांचे लेखन आणि कविता सामाजिक विषय पोटतिडकीने मांडून तरूणांचे आत्मभान जागे करतात.[५]

आंबेडकरी कवी[संपादन]

वैभव छाया यांची वैचारिक प्रेरणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे ते म्हणतात.

मण्या ओवणारी आई म्हणते ही तुझी पाटी पेन्सिल गिरव धडा बाबासाहेबांचा सुरुवात कर.. आ आंबेडकरांचा अन् गिरव त्यासोबतच घामाचा
कष्टाचा
लढ्याचा

संघर्षाचा...[६]

तर त्यांच्या काव्यावर कवी व जेष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांचा प्रभाव आढळतो. त्यांच्या काव्यातून ते अनेक सामाजिक घडामोडींचा वेध घेऊन वास्तव मांडात वास्तवाचे भान जागृत करत लक्ष वेधतात. बा भिमा कवितेत ते म्हणतात,

तेलकटलेलं शहर, गाव, वाडी-वस्ती आणि रक्तानं चिकट अंग धू धू धूतलं तरी स्वच्छ होत नाही डाग काही केल्या जात नाही तेल काही केल्या उतरत नाही हे जग काही आजच निर्माण झालं नाही हे जग काही आजच नष्ट होणार नाही

आत्मा, देव, पुनर्जन्म, श्रद्धा क्षूद्र गोष्टींना मूठमाती देणाऱ्यांची जमात आपली मेणकापडाचं छत, पत्र्याची भिंत सिमेंटचा काळसर कोबा चुन्याचा निळसर गिलावा बाजरीची भाकरी, लसणाची चटणी आठवड्याला रश्शीचं कालवण माळ्यावरची रद्दी, उबट चादरी आणि नियतीनं गायलेलं गजकर्णाचं गाणं भोकाड पसरलेल्या भटक्या कुत्र्यांना

रात्रीचा रस्ता देखील पडतो अपुरा[७]

सर्वव्यापी आंबेडकर[संपादन]

सर्वव्यापी आंबेडकर या एबीपी माझा वरील २२ भागांच्या दीर्घ संशोधनपर कार्यक्रमाची रूपरेषा, संशोधन व लेखन सहाय्य वैभव छाया यांनी केलेले आहे. सदर कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना १२५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन होते.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "Books". www.bookganga.com. 2018-03-16 रोजी पाहिले. 
  2. "डिलीट केलेलं सारं आकाश". erasik.com (इंग्रजी मजकूर). 2018-03-16 रोजी पाहिले. 
  3. दै. तरूण भारत दिनांक ३१/०७/२०१४ डिलीट केलेलं सारं आकाश’-"पहिल्या दोन दिवसांत अर्ध्या आवृत्तीचा खप"[मृत दुवा]
  4. टीम, एबीपी माझा वेब. "सारं काही समष्टीसाठी, ढसाळांच्या आठवणींचा जागर" (MR मजकूर). 2018-03-16 रोजी पाहिले. 
  5. "नवा सूर्य कवेत घेताना - Maharashtra Times". Maharashtra Times (mr मजकूर). 2018-03-16 रोजी पाहिले. 
  6. "बा भीमा... (दीर्घ कविता)". marathibhaskar (mr मजकूर). 2015-12-13. 2018-03-16 रोजी पाहिले. 
  7. "तुच तो आमचा आंबेडकर". marathibhaskar (mr मजकूर). 2014-12-06. 2018-03-16 रोजी पाहिले.