विल्यम केरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्यम केरी

विल्यम केरी (en:William Carey) हे ख्रिस्ती धर्मोपदेशक, मराठी भाषेचे व्याकरणकार आणि कोशकार तसेच मराठी ग्रंथांचे देवनागरी लिपीतील आद्य मुद्रक म्हणून प्रसिद्ध आहेत. विल्यम केरी हे मराठी आणि मोडी गद्य मुद्रणाचा ओनामा करणारे पहिले इंग्रज पंडित, वनस्पतिशास्त्रज्ञ, कोशकार, व्याकरणकार व बहुश्रुत आणि बहुभाषी भाषांतरकार होते.

विल्यम केरी ह्यांचे चरित्र[संपादन]

केरी यांचा जन्म इंग्लंडमध्ये नॉर्‌दॅम्प्टन परगण्यात टोस्टर(Towcester)जिल्ह्यात पॉलरस्परी(Paulerspury)या खेड्यात १७ ऑगस्ट १७६१ रोजी झाला. वडील शाळामास्तर. घरची गरिबी. त्यामुळे शालेय शिक्षण फारसे नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी एका चांभाराकडे उमेदवारी केली.

सोळाव्या वर्षापासून अठ्ठाविसाव्या वर्षांपर्यंत चर्मकाराचा व्यवसाय केला. जोडे शिवीत असताना समोरच्या येशू ख्रिस्ताच्या चित्राकडे पाहून मिशनरी व्हावयाचे ठरवले. धंदा सोडून बॅप्टिस्ट पंथात दाखल. त्यानंतर जॉन थॉमस आणि विल्यम केरी पहिले बॅप्टिस्ट मिशनरी म्हणून भारतात आले(११ नोव्हेंबर १७९३. जहाजावरील प्रवासादरम्यान जॉन थॉमसकडून बंगाली भाषेची तोंडओळख करून घेतली.

भारतात बंगालमध्ये आल्यावर माल्दा येथे शेती केली, पण जमली नाही. त्यामुळे जवळच मदनवती येथे निळीच्या मळ्यात पाच वर्षे नोकरी केली. या काळात राम बसु यांच्या मदतीने बंगालीचा सखोल अभ्यास केला. त्याकरिता जरूर पडली म्हणून संस्कृतचे अध्ययन केले. व्याकरण आणि ग्रंथ यांच्या साहाय्याने ९ वर्षात वेद वाचण्याइतकी प्रगती केली. त्यानंतर ते १० जानेवारी १८०० रोजी कलकत्त्यापासून २९ किलोमीटरवर असलेल्या श्रीरामपूर(Serampur)या डॅनिश वसाहतीत आले. तेथे त्यांनी एक चर्च व एक शाळा काढली आणि एक छापखाना उभारला.

कलकत्त्याच्या फ़ोर्ट विल्यम कॉलेजमध्ये ते बंगाली व संस्कृत भाषा आणि पौर्वात्य संस्कृती या विषयांचे १८०१ ते १८३० पर्यंत प्राध्यापक होते. ते या भाषांशिवाय इंग्रजी, फ़्रेंच, लॅटिन, ग्रीक, हिब्रू या भाषांत पारंगत होते. त्यांचे देहावसान श्रीरामपूर (बंगाल) येथे १ जून १८३४ रोजी झाले.

मुद्रक म्हणून कामगिरी[संपादन]

पंचानन कर्मकार नावाच्या लोहाराकडून त्यांनी अनेक भाषांचे खिळे करून घेतले आणि छपाईला सुरुवात केली. छापखान्यातून १८३४ पर्यंत बंगाली, मराठी, नागरी, संस्कृत, हिंदी, कोंकणी, गुजराती, कानडी, तेलुगू , पंजाबी , उडिया, अरेबिक, पर्शियन, चिनी इत्यादी इत्यादी चाळीस भाषांमधून ख्रिस्ती धर्मग्रंथांच्या दोन लक्ष बारा हजार प्रती छापून प्रसिद्ध केल्या. पौर्वात्य भाषांच्या छपाईचा त्यांनी पाया घातला.

ग्रंथरचना[संपादन]

विल्यम केरी यांनी लिहिलेले काही ग्रंथ :-

  1. मराठी भाषेचे व्याकऱण (१८०५)
  2. बाङ्ला/ बंगाली भाषेचे व्याकरण (१८०५)
  3. संस्कृत व्याकरण (१८०६)
  4. बाङ्ला शिकण्यासाठी उपयुक्त संवाद (१८०६)
  5. मराठी भाषेचे व्याकरण (आ. २री) (१८०८) (ह्या आवृत्तीत व्याकरणातील मराठी मजकूर मोडी लिपीत छापलेला आहे.)
  6. मराठी-इंग्रजी शब्दकोश (१८१०) (ह्या कोशातील मराठी मजकूर मोडी लिपीत छापलेला आहे.)
  7. पंजाबी भाषेचे व्याकरण (१८१२)
  8. तेलुगू भाषेचे व्याकरण (१८१४)

बाह्य दुवे[संपादन]

विल्यम केरी चरित्र व साहित्य ह्यांच्या अभ्यासकेंद्राचे संकेतस्थळ