वर्षावास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भगवान बुद्ध धम्माचा सारनाथ येथे प्रथम उपदेश देताना
बुद्ध उपदेश

वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील तीन महिने अर्थात आश्विन पौर्णिमेपर्यंत निमंत्रित बुद्ध विहारात जीवन व्यतीत करणे. या काळात भिक्खू मध्ये विनयात कमीपणा आला असेल त्यांनी ज्येष्ठ भिक्खुंद्वारा पूर्तता करणे, ध्यान-साधना करणे, बौद्ध उपासक / उपासिकांना धम्म शिकविणे, उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारणे व उर्वरित नऊ महिने धम्म-प्रचार-प्रसाराला घालविणे हे भिक्खूंचे कार्य असते.

तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन बहुजन हिताय - बहुजन सुखाय धम्मची अशी सिंहगर्जना केली. जेव्हापासून तथागतांनी आषाढी पौर्णिमेला भिक्षु समवेत प्रथम वर्षावास इसिपतन मध्ये केला, तेव्हापासून भिक्खू वर्षावास प्रारंभ करतात.

वर्षावास
वर्षावास

भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिख्खू या कामात गुंतले होते, परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागे. पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत त्यांनी हे तथागतांना सांगितले, बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी रहावे, भिक्षेसाठी गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण अध्ययन करावे. जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त एका आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात, भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. भगवान बुद्धांनी पहिला वर्षावास इ.स.पू. ५२७ मध्ये सारनाथच्या इसिपटन मध्ये केला आणि त्यानंतर ४५ वर्षावास त्यांनी श्रावस्ती, जेतावन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. अश्या प्राचीन गुरू शिष्य परंपरेचे पालन आजही भारतात आणि बौद्धराष्ट्र थायलंड, म्यानमार, श्रीलंका कंबोडिया आणि बांगलादेश पालन करतात.

उपासकांनी पाळावयाची तत्त्वे.[संपादन]

  • पंचशील: १) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. २) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी' अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे. ५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणाऱ्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.
  • धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात.
    धम्मचक्रातील आठ आरे हे अष्टांगिक मार्ग दर्शवतात.
    अष्टांगिक मार्ग :
    १) सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. २) सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार. ३) सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे. ४) सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे. ५) सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे. ६) सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे. ७) सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे. ८) सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे
  • दहा पारमिता :
    १) शील शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
    २) दान स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
    ३) उपेक्षा निरपेक्षतेने सतत प्रयत्‍न करीत राहणे.
    ४) नैष्क्रिम्य ऐहिक सुखाचा त्याग करणे.
    ५) वीर्य हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
    ६) शांती शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
    ७) सत्य सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
    ८) अधिष्ठान ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
    ९) करुणा मानवासकट सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.
    १०) मैत्री मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.