वड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वडाचे वनस्पतिशास्त्रीय चित्र
वटवृक्ष
वडाची पाने व फळे

वड (मराठी नामभेद: वटवृक्ष ; शास्त्रीय नाव: Ficus benghalensis, फायकस बेंगालेन्सिस ; इंग्लिश: banyan, बन्यान ;) हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची जात आहे. अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे १५ ते २० मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर या पारंब्यांना खोडांचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडांचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला ‘न्यग्रोध’ असेही नाव आहे.

वडाचे झाडे हे बहुधा रस्त्याच्या कडेला लावले जाते. पण मोकळ्या जागेत हे अधिक चांगले वाढते.

भारतातील काही शहरांत प्राचीन आणि विस्तीर्ण असे वडाचे वृक्ष आढळतात. मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथे एक वटवृक्ष अडीच एकर भूमीवर पसरलेला आहे. बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजराथमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कलकत्त्याच्या शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील पसरलेला वड प्रचंड असून त्यांच्या छायेत चार पाच हजार लोक बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातल्या वटवृक्षाचे वय ३५० वर्षे आहे. मद्रास येथील अड्यारच्या थिऑसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत.

खोड, पाने,फुले,फळे[संपादन]

वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. पाने मोठी रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानाच्या देठाशी व टोकाशी गोलाकार असतात. ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात. पाठीमागे मात्र फिकट असतात. हिरवट रंगाची, फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत न भरणारी असतात. पुष्कळ वेळा ती फळाप्रमाणे दिसतात. पण तो पुष्पाशय असतो. याची फळे, पानाचे देठ आणि खोड यांच्यामध्ये, फांदीवर, खोडावर येतात. सुरुवातीला ती हिरवी पण कठीण असतात. पिकल्यावर लाल व मऊ होतात. वेगवेगळे पक्षी व माकडे यांना ती फळे खूप आवडतात. वडाची फळे देखणी असतात. लालचुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडीजोडीने लागलेली ही फळे बघून बहिणाबाईंना वडाच्या झाडाला पोपटाचे पीक आल्यासारखे वाटले होते. फळामध्ये लहान अळ्या व किडे असतात त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत. फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मेपर्यंत असतो.[१]

कृष्णवट[संपादन]

कृष्णवट नावाचा एक वडाचा प्रकार आहे. त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात. एके दिवशी गोपालकृष्ण गाईंना घेऊन रानात गेले असता, गोपी प्रेमभराने लोणी घेऊन तेथे गेल्या व त्यास आग्रहाने लोणी खाऊ घालू लागल्या. तेव्हा गोपालाने ते लोणी आपल्या सर्व सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात समरसतेचा भाव जागृत केला. गोपी, सवंगडी आणि श्रीगोपाल एक झाले. हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून त्याचे द्रोण तयार केले. तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोणासारखी बनली व पुढेही तशीच पाने येऊ लागली. अशी आख्यायिका आहे म्हणून अशा वटवृक्षाला ‘कृष्णवट’ नाव पडले, अशी आख्यायिका आहे..

उपयोग[संपादन]

वडाच्या पानांच्या जेवणासाठी पत्रावळी करतात. वडाची मुळे, पाने, फुले, चीक व साल या सर्वाचा औषध म्हणून उपयोग होतो. चीक जखमा भरून काढण्यासाठी, दातातील वेदना थांबविण्यासाठी वापरतात. वडाच्या पारंब्या घालून केशवर्धक तेल तयार करतात. वडाच्या पारंब्या शिकेकाईत घालून, उकळून त्या पाण्याने केस धुतल्यास केस वाढतात, लांब होतात, मऊ व काळे होतात व त्यांना चमक येते.

राष्ट्रीय महत्त्व[संपादन]

वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.

सांस्कृतिक/धार्मिक महत्त्व[संपादन]

वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. वटपौर्णिमा हा सण याच झाडाशी संबंधित आहे. सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण आणले. यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते याच वृक्षाखाली म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे यासाठी सुवासिनी स्त्रिया वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात.

चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्ववेदात वडाचा उल्लेख आडळतो. कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले. त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणात याच्या उत्पत्तीची कथा आहे. वड हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवतात. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन जलात भगवान श्रीविष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करीत असत, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवांचे ‘वड’ हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे. तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान मानतात.[२]

भगवान बुद्धाला वटवृक्षाखाली दिव्य ज्ञानाचा साक्षात्कार झाला व नंतर त्याने बौद्ध धर्माची स्थापना केली. त्यामुळे बौद्धधर्मीय वडास अतिशय पवित्र मानतात.

वड हा मघा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.

बाह्य दुवे[संपादन]


संदर्भ[संपादन]

  1. http://www.loksatta.com/balmaifalya-news/novelty-of-nature-1069398/
  2. http://www.tarunbharat.net/Encyc/2016/6/18/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7.aspx