टेक्सासमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या झेलवेगरने ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठात इंग्रजी साहित्याचा अभ्यास केला. सुरुवातीला पत्रकारितेतील कारकिर्देची आकांक्षा बाळगून, कॉलेजमध्ये असताना रंगमंचावरील तिच्या छोट्या कामानंतर ती अभिनयाकडे ओढली गेली. डेझड अँड कन्फुज्ड (१९९३) आणि रियालीटी बाइट्स (१९९४) मधील किरकोळ भूमिकांनंतर, तिची पहिली प्रमुख भूमिका द रिटर्न ऑफ द टेक्सास चेनसॉ मॅसेकर (१९९५) या भयपटात आली. रोमँटिक कॉमेडी जेरी मॅग्वायर (१९९६), नाट्य चित्रपट वन ट्रू थिंग (१९९८), आणि ब्लॅक कॉमेडी नर्स बेट्टी (२०००) मधील भूमिकांमुळे ती प्रसिद्ध झाली, यापैकी शेवटच्यासाठी तिने गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकला.[१]
रोमँटिक कॉमेडी ब्रिजेट जोन्स डायरी (२००१) मध्ये ब्रिजेट जोन्स आणि म्युझिकल शिकागो (२००२) मध्ये रॉक्सी हार्टच्या भूमिकेसाठी, झेलवेगरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अकादमी पुरस्कारांसाठी व बाफ्टा पुरस्कारांसाठी सलग नामांकन मिळाले होते. शिकागो चित्रपटासाठी तिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला व दोन्ही कामांसाठी स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार तिने जिंकला. ब्रिजेट जोन्स चित्रपटामध्ये तिने ह्यू ग्रँट आणि कॉलिन फर्थच्या सोबत काम केले. या भूमिकेसाठी, तिने २० पौंड वजन वाढवले आणि ब्रिटिश उच्चारणात बोलण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते.
निकोल किडमन आणि जूड लॉ यांच्या सोबत तिने कोल्ड माउंटन (२००३) या युद्ध चित्रपटात एका शेतकऱ्याच्या भूमिकेसाठी पहिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार मिळावला. सोबतच तिने बाफ्टा, गोल्डन ग्लोब व स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार देखील मिळवले होते.
ब्रिजेट जोन्स: द एज ऑफ रीझन (२००४) आणि नंतर खुप अंतरानंतर तिने जोन्सची भूमिका पुन्हा साकारली ती ब्रिजेट जोन्स बेबी (२०१६) मधील चित्रपटात. २००६ मध्ये "मिस पॉटर" या चित्रपटात तिने हेलन बीट्रिक्स पॉटरची भूमिका साकारली होती जी एक इंग्रजी लेखिका, चित्रकार, नैसर्गिक वैज्ञानिक आणि संवर्धनवादी होती जी तिच्या ल्हान मुलांच्या प्राण्यांच्या गोष्टीच्या पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये, झेलवेगरने नेटफ्लिक्स मालिका व्हॉट/इफ मध्ये तिच्या पहिल्या प्रमुख दूरचित्रवाणी भूमिकेत अभिनय केला आणि ज्युडी गार्लंडची (अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका) बायोपिक ज्युडी (२०१९) मध्ये भूमिका केली ज्यासाठी तिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अकादमी पुरस्कार जिंकला. त्यानंतर तिने द थिंग अबाउट पाम (२०२२) या एनबीसी क्राइम मिनीसिरीजमध्ये पॅम हप (अमेरिकन खुनी) म्हणून काम केले आहे.
रेनी कॅथलीन झेलवेगरचा जन्म २५ एप्रिल १९६९ रोजी कॅटी, टेक्सास येथे झाला.[३][४][५] तिचे वडील, एमिल एरिच झेलवेगर, सेंट गॅलेन या स्विस शहराचे आहेत.[६] ते एक यांत्रिक आणि इलेक्ट्रिकल अभियंता होते जे तेल शुद्धीकरण व्यवसायात काम करत होते. तिची आई केजेलफ्रीड, नॉर्वेजियन आहे आणि एक परिचारिका आणि दाई होती जी टेक्सासमधील नॉर्वेजियन कुटुंबासाठी प्रशासक म्हणून काम करण्यासाठी युनायटेड स्टेट्समध्ये गेली.[७][८],
१९९९ ते २००० पर्यंत, झेलवेगरचे जिम कॅरीशी प्रेमसंबंधात होती.[९] २००३ मध्ये, तिचे संगीतकार जॅक व्हाईट यांच्याशी संक्षिप्त संबंध होते.[१०] मे २००५ मध्ये, झेलवेगरने गायक केनी चेस्नीशी विवाह केला; पण चार महिन्यांनंतर, झेलवेगरचा हा विवाह रद्द करण्यात आले.[११] २००६ मध्ये चित्रित झालेल्या केस ३९ च्या सेटवर भेटल्यानंतर २००९ मध्ये तिने ब्रॅडली कूपरशी डेटिंग सुरू केली आणि २०११ मध्ये ते वेगळे झाले.[१२] जून २०२१ मध्ये, तिने इंग्लिश दूरचित्रवाणी प्रेझेंटर अँट ॲन्स्टीड यांच्याशी संबंध बेनवले.[१३][१४][१५]