Jump to content

मुकुंदराव किर्लोस्कर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मुकुंद शंकरराव किर्लोस्कर या पानावरून पुनर्निर्देशित)

मुकुंद शंकर किर्लोस्कर (मुकुंदराव किर्लोस्कर )( ३ मार्च १९२१ - मृत्यु:२८ फेब्रुवारी २०१३ ) हे व्यंगचित्रकार शंकर वासुदेव किर्लोस्कर (शंवाकि) यांचे चिरंजीव. त्यांचा जन्म ३ मार्च १९२१ रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेतून झाले. त्यानंतर मुकुंदराव किर्लोस्करांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन एम.ए.ची पदवी संपादन केली. त्यानंतर १९४३ साली ते शंवाकि यांनी स्थापन केलेल्या ते किर्लोस्कर ग्रुप ऑफ पब्लिकेशनमध्ये साहाय्यक संपादक या पदावर रुजू झाले. शंवाकि निवृत्त झाल्यावर १९५८ मध्ये ते किर्लोस्कर प्रेसचे मुख्य संपादक आणि व्यवस्थापक झाले. १९४३ ते १९८१ या काळात त्यांनी किर्लोस्कर मासिकाबरोबरच स्त्री, मनोहर (किस्त्रीम) या मासिकांचे प्रकाशक आणि संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. मुकुंदरावांनी पुढे ‘मनोहर’ या मासिकाचे १९७३मध्ये साप्ताहिकात रूपांतर केले.[]

अफाट लोकसंग्रह असलेले मुकुंदराव वाचकांच्या पत्रांना आवर्जून उत्तरे देत असत. सुधीर गाडगीळ, एकनाथ बागूल, विद्या बाळ, ह.मो. मराठे, श्री.भा. महाबळ, दत्ता सराफ यांच्यासारखे पत्रकार आणि लेखक किस्त्रीमच्या तालमीत तयार झाले. डॉ. अनिल अवचट, भानू काळे, डॉ. नागनाथ कोतापल्ले, राजन खान, देवयानी चौबळ, मुकुंद टाकसाळे, निळू दामले, सदानंद देशमुख, अशोक पाध्ये, मिलिंद बोकील वगैरे लेखकांना नावारूपाला आणण्याचे श्रेय मुकुंदरावांना जाते. मुकुंदरावांच्या पत्नी शांताबाई किर्लोस्कर या स्त्री मासिकाच्या संपादक होत्या.[]

मुकुंदराव इंडियन ईस्टर्न न्यूजपेपर सोसायटीचे काही काळ उपाध्यक्ष होते. पत्रकारितेसह प्रवास आणि फोटोग्राफी यांचा त्यांना छंद होता. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि 'अंतर्नाद' मासिकातर्फे १७ फेब्रुवारी २०१३ रोजी झालेल्या नियतकालिकांच्या संपादकांच्या बैठकीला मुकुंदराव उपस्थित होते. 'प्रतिकूल परिस्थितीवर मात करूनही आपण नियतकालिकाची वाटचाल यशस्वीपणे पुढे नेऊ शकतो', असा विश्वास देत त्यांनी सर्व संपादकांना मार्गदर्शन केले होते.

मुकुंदराव किर्लोस्करांनी लिहिलेल्या संपादकीय लेखांचा ‘पेरणी’ हा संग्रह प्रसिद्ध आहे.

मुकुंदराव किर्लोस्कर यांचे २८-२-२०१३ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने, वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "मुकुंदराव किर्लोस्कर यांचे निधन". 2013-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-03-03 रोजी पाहिले.
  2. ^ 'किस्त्रीम' चे माजी संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांचे निधन
  3. ^ ज्येष्ठ पत्रकार मुकुंदराव किर्लोस्कर कालवश