भारत सासणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारत जगन्नाथ सासणे (जन्म :२७ मार्च १९५१) हे मराठी कथाकार आहेत. त्यांचा जन्म जालना येथे झाला. त्यांनी अहमदनगर महाविद्यालयातून बी.एस्‌सी. ही पदवी घेतली. विविध शासकीय अधिकारीपदांवर त्यांनी नोकरी केली. उदगीर येथे २०२२ मध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली आहे.[१]

कारकीर्द[संपादन]

१९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. नव कथेची सारी वैशिष्ट्ये आत्मसात करून त्यातून आपला वेगळा, स्वतंत्र बाज निर्माण करणारी कथा सासणे यांनी लिहिली. पारंपरिकता व प्रयोगशीलता यांचे मिश्रण त्यांच्या कथांमध्ये आढळते; त्यांच्या कथांमधून व्यक्त होणारे जीवनानुभव हे नावीन्यपूर्ण, असांकेतिक, गूढगहन व चमत्कृतिपूर्ण असतात, पण त्यांचे वास्तवाशी घट्ट अनुबंध जुळवलेले असतात. त्यांच्या कथांतून ग्रामीण, आदिवासी, नागर असे समाजजीवनाचे विविध स्तर व त्या सामाजिक परिसरात जगणारी, वैशिष्ट्यपूर्ण स्वभावधर्म असणारी नानाविध माणसे भेटतात. मानवी जीवनाची अतर्क्यता व असंगतता, मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, व्यक्तीच्या मनोविश्वातील गूढ, व्यामिश्र व अनाकलनीय गुंतागुंत, त्यांचे सूक्ष्म, अनेक पदरी चित्रण करणाऱ्या त्यांच्या कथा स्वाभाविकपणेच दीर्घत्वाकडे झुकतात. कित्येकदा या कथांतून गंभीर, शोकाकुल, व्यामिश्र भावजीवनाचा विलक्षण अस्वस्थ करणारा प्रत्यय येतो. त्यांच्या कथांतून व्यक्तीच्या आत्मशोधाच्या प्रक्रियेचे चित्रण जसे आढळते, तसेच स्त्री-पुरुषांतील परस्पर आकर्षणामागचे गूढ, तरल, सूक्ष्म मनोव्यापारही ते कौशल्याने उलगडून दाखवतात.

काही कथांतून मुस्लिम संस्कृतीच्या छायेत जगणाऱ्या मराठवाड्यातील शहरांचे व व्यक्तींचे सखोल, तपशीलवार चित्रण आढळते. त्यांच्या कथनशैलीत कथाशयाला अनुरूप अशा अन्वर्थक प्रतिमा, प्रतीके, तरल काव्यात्मता, गूढ चमत्कृती (फॅंटसी) अशा अनेकविध घटकांचा सुसंवादी मेळ साधलेला दिसतो. माणसाला केंद्रबिंदू मानणाऱ्या व मनुष्यजीवनाबद्दल अपार करुणा व्यक्त करणाऱ्या कथा सासणे यांनी लिहिल्या आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट वाङ्‌मयनिर्मितीचे पुरस्कार, तसेच इतरही मानाचे व प्रतिष्ठेचे पुरस्कार लाभले आहेत. भारत सासणे यांच्या डफ या दीर्घ कथेवर प्रसिद्ध सिने अभिनेते मकरंद अनासपुरे हे 'काळोखाच्या पारंब्या'या नावाचा चित्रपट दिग्दर्शीत करीत आहेत या चित्रपटाच्या प्रमुख भूमिकेमध्ये स्वतःही काम करत आहेत.

भारत सासणे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]

 • अदृष्ट (दीर्घकथा संग्रह)
 • अनर्थ रात्र (दीर्घकथा संग्रह)
 • अस्वस्थ (दीर्घकथा संग्रह)
 • आतंक (दोन अंकी नाटक)
 • आयुष्याची छोटी गोष्ट (कथासंग्रह)
 • ऐसा दुस्तर संसार (दीर्घकथा संग्रह)
 • कॅंप/बाबींचं दुःख (दीर्घकथा संग्रह)
 • चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (मुलांसाठी दोन नाटिका)
 • चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
 • जंगलातील दूरचा प्रवास (मुलांसाठी कादंबरी)
 • चिरदाह (दीर्घकथा संग्रह)
 • जॉन आणि अंजिरी पक्षी (लेखकाचा पहिला कथासंग्रह)
 • त्वचा (दीर्घकथा संग्रह)
 • दाट काळा पाऊस (दीर्घकथा)
 • दूर तेव्हा तेथे दूर तेव्हा/सर्प (दोन कादंबरिका)
 • दोन मित्र (कादंबरी)
 • नैनं दहति पावकः
 • बंद दरवाजा (कथासंग्रह)
 • मरणरंग (तीन अंकी नाटक)
 • राहीच्या स्वप्नांचा उलगडा (कादंबरी)
 • लाल फुलांचे झाड (कथासंग्रह)
 • वाटा आणि मुक्काम (सहलेखक - आशा बगे, मिलिंद बोकील, सानिया)
 • विस्तीर्ण रात्र (दीर्घकथा संग्रह)
 • शुभ वर्तमान (कथासंग्रह)
 • सटवाईचा लेख (पाच भागात वाटल्या गेलेल्या लेखांचा संग्रह)
 • स्यमंतक मण्याचे प्रकरण (कथासंग्रह)
 • क्षितिजावरची रात्र (दीर्घकथा संग्रह)

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड". Loksatta. 2022-01-03 रोजी पाहिले.