फेमिनिस्ट प्रॅक्सीस: रिसर्च, थियरी अँड एपिसटेमोलोजी इन फेमिनिस्ट सोशियोलोजी (पुस्तक)
फेमिनिस्ट प्रॅक्सीस: रिसर्च, थियरी अँड एपिसटेमोलोजी इन फेमिनिस्ट सोशियोलोजी[१] हे लीज स्टॅनले[२] द्वारा संपादित पुस्तक १९९० साली रुटलेज प्रकाशनाद्वारे प्रकाशित झाले. ह्या पुस्तकात संपादक स्त्रीवादी भूमिदृष्टीचे ठाम पणे समर्थन करत व ‘विज्ञानाचे उत्तराधिकारी’ हे लेबल नाकारत, बहुविध स्त्रीवादाचे समर्थन करतात. तसेच या पुस्तकात स्टॅनले यांनी विविध लेखांच्या संकलनाद्वारे ‘परात्मता नसलेले ज्ञान निर्माण’ करण्याची प्रक्रिया दाखवून दिली आहे.
प्रस्तावना
[संपादन]स्त्रीवादी ज्ञानमीमांसाशास्त्राने स्त्रियांमधील भिन्नत्वाच्या स्वीकारावर व ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध असलेले म्हणजेच परात्मता नसलेले ज्ञान निर्माण करण्याकडे (un-alienated knowledge's) विशेष भर दिलेले आहे. स्त्रीवादी ज्ञानमीमांसा/ पद्धतीशास्त्र व पारंपारिक पद्धतीशास्त्र यामधील भिन्नत्व दाखविणारी बरीच पुस्तके असली तरीही त्याचे रूपांतर स्त्रीवादी संशोधन करताना व्यवहारात कसे करावे याबाबत पुस्तके कमी असताना दिसतात. सदरचे पुस्तक स्टॅनले यांनी स्त्रीवादी संशोधकांना डोळ्यासमोर ठेवून केलेले दिसते. येथे संपादक स्त्रीवादी संशोधनाला स्त्रीवादी प्रॅक्सीस[३] म्हणून संबोधून त्याचे समाज परिवर्तनाचे ध्येय अधोरेखित करतात. त्या मांडतात कि स्त्रीवादी संशोधन हे केवळ अभ्यासासाठी नसून जग बदलण्यासाठी आहे. तसेच या शब्दाच्या प्रयोगाद्वारे ते सिद्धांत/संशोधनामधील दरी नाकारतात व त्याला संयुक्त कृती मानतात. स्त्रीवादी भूमिदृष्टीचे ठाम पणे समर्थन करत व ‘विज्ञानाचे उत्तराधिकारी’ हे ठपका नाकारत त्या बहुविध स्त्रीवादाचे समर्थन करतात. स्त्रीवादी भूमिदृष्टीवर आधारलेल्या ज्ञानमीमांसाशास्त्रात परात्मता नसलेले ज्ञान निर्माण करणे हे महत्त्वाचे आहे. Feminist Praxis या पुस्तकात लिज स्टॅनले यांनी विविध लेखांच्या संकलनाद्वारे ‘परात्मता नसलेले ज्ञान निर्माण’ करण्याची प्रक्रिया दाखवून दिली आहे. या पुस्तकातील सर्व लेख मेंचेस्टर विद्यापीठाद्वारे प्रकाशित केलेल्या ‘Studies in Sexual Politics’ शृंखलेतून घेतले गेलेले आहे.
अध्यापन क्षेत्रातील उत्पादन पद्धती व परात्म ज्ञान (Alienated knowledge)
[संपादन]पारंपारिक संशोधनातून निर्मित ज्ञान हे ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेपासून विलग कसे होते याचा आढावा पुस्तकातील पहिल्या भागात घेतलेला दिसतो. स्त्रीवादी संशोधन ज्या वातावरणात व स्थानात घडते ते समजण्यास मदत करायला संपादक अध्यापन क्षेत्रात स्त्रिया व स्त्रीवाद्यांचे स्थान दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. पहिल्या भागातील दोन्ही लेखांच्या माध्यमातून संपादक स्त्रीवादी संशोधनाबाबतीतील विचारांना एका सामाजिक संदर्भात म्हणजेच अध्यापन क्षेत्रातील उत्पादनाच्या पद्धतीत स्थापित करतात. पहिल्या लेखात लेखक पारंपारिक संशोधन प्रक्रिये मधील उत्पादन संबंध व त्याला चालना देणारे शक्तिशाली घटक यांचा आढावा घेतात ज्यामुळे निर्मित ज्ञान हे ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेपासून विलग होते (alienated knowledge) व त्यामधील संबंध झाकोळले जाते. पारंपारिक संशोधनामध्ये निरपेक्षता व वैश्विक सत्याचा शोध घेण्याला महत्त्व आहे. या प्रक्रियेत संशोधन करणारा हाच फक्त जाणणारा मानला जातो व त्याचे समाजातील स्थान, भूमिका, विचार व त्या संशोधनावर त्याचा होणारा परिणाम हे महत्त्वाचे असले तरीही निर्मित ज्ञानात प्रतिबिंबित होत नाहीत व पूर्ण पणे झाकोळले जातात. त्या मुळे निर्मित ज्ञान व त्यामागील पार्श्वभूमी हे एक दुसऱ्यांपासून विलग राहतात. स्त्रीवादी संशोधनाचे वेगळेपण या दोन्ही मधील संबंध जोडून ज्ञान निर्मिती करण्यात (un-alienated knowledge) कसे आहे हे संपादक दाखवून देतात. या पुस्तकात 'ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध' जोडणारे ज्ञान निर्माण करण्याच्या प्रक्रियेवर सविस्तर मांडणी केलेली आहे.
स्त्रीवादी पद्धतीशास्त्राची तात्त्विक पार्श्वभूमी
[संपादन]लिज स्टॅनले व स्यू वाईस पुस्तकातील पहिल्या भागातील दुसऱ्या लेखात स्त्रीवादी पद्धतीशास्त्राची तात्त्विक पार्श्वभूमी मांडतात. सांड्रा कॉयनेर या लेखाला सांड्रा हार्डिंगच्या ‘The Science Question In Feminism (1986) व Feminism and Methodology (1987) या पुस्तकांना दिलेली प्रतिक्रिया मानतात[४]. स्त्रीवादी संशोधन प्रक्रियेतील पद्धती, पद्धतीशास्त्र व ज्ञानमीमांसे संदर्भातील समकालीन चर्चेचा आढावा येथे घेतलेला दिसतो. तसेच विविध संकल्पनांचे अर्थ जसे 'स्त्रीवादी भूमिदृष्टीची ज्ञानमीमांसा', 'दडपलेल्या स्त्रीवादी भूमिदृष्टीची' समस्या जिथे काळ्या स्त्रीवादी व लेस्बिअन स्त्रीवाद्यांनी प्रस्थापित स्त्रीवाद्यांवर केलेल्या टीकेचा समावेश आहे, किंवा ‘स्त्रीवादी अधिसत्ता’ निर्माण करण्याचे मोह आदींवर भाष्य करण्यासाठी लेखक महत्त्वाच्या तत्त्वज्ञांच्या (सॅन्ड्रा हार्डिंग, डोरोथी स्मिथ, मेरिलिन फ्राय आदी) विचारांचे चिकित्सात्मक पद्धतीने चर्चा करतात. या भागात त्या स्त्रीवादी भूमिदृष्टीवर ‘विज्ञानाचे उत्तराधिकारी’ असण्याचे लेबल नाकारात ‘स्त्रीवादी भूमिदृष्टीचे’ व त्यातून निर्माण होणाऱ्या बहुविधतेचे ठाम पणे समर्थन करतात. या पुढील भागात संपादक आपल्याला उदाहरणाद्वारे, स्त्रीवादी भूमिदृष्टीचे व्यवहारात रूपांतर कसे करावे हे दाखवून देतात.
स्त्रीवादी तत्त्वज्ञानाचे व्यवहारात रूपांतर
[संपादन]ज्ञान निर्मितीसाठीच्या संशोधन प्रक्रियेचे विविध व्यावहारिक उदाहरण पुस्तकातील दुसऱ्या विभागातील ५ भागांद्वारे संपादक आपल्याला दाखवून देतात. यात संशोधन विषयाची व्याख्या व सुरुवात, संशोधनात वापरण्यात आलेल्या पद्धतीचे विश्लेषण, संशोधनांचे लिखित किंवा दृष्य निष्कर्षांचे विश्लेषण आदींचा समावेश केलेला आहे. या विभागातील धड्याना आपण अभ्यासलेल्या विशिष्ठ विषयावरील योगदान किंवा स्त्रीवादी संशोधन प्रक्रियेतील उदाहरण म्हणून बघू शकतो. सर्व लेखांमध्ये 'ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध' जोडणारे ज्ञान निर्माण करण्याबाबत प्रचंड विश्वास झळकतो. हे पुस्तक फ़क़्त स्त्रीवादी पद्धतीशास्त्राने पारंपारिक पद्धतीशास्त्राला केलेले आव्हानच पुढे आणत नाहीत तर सोबतच स्त्रीवादी संशोधन व तत्त्वज्ञानातील विहित नियमांनाही आव्हान देते. स्त्रीवादी संशोधन हे स्त्रियांच्या अनुभवावरच आधारलेले असावे या गृहितकाला जोयस लेलॅंड त्यांच्या लेखातून छेद देतात[५]. एका गे मुलाची आई असल्यामुळे, गे पुरुष, पुरुषत्वाची व्याख्या वेगळ्या तऱ्हेने कशे करतात व त्याचा परिणाम त्यांचे स्त्रियांशी असलेल्या नात्यावर कसा पडतो या प्रश्नाकडे लेलॅंड आकर्षित झाल्या. तसेच डेनिस फेरान, मार्लिन मोनरोयच्या चित्राला बघण्याचे वेगळे पर्याय सुचवतात ज्यांच्या चित्राला बहुतेक वेळा लैंगिकतेच्या अभ्यासासाठी बघितले गेलेले दिसते.
दुसऱ्या बाजूला सदरचे धडे माहितीच्या विश्लेषणाच्या प्रक्रिये बाबत भाष्य करतात. डेनिस फरान तरुण मुलांच्या करमणूकी संदर्भातील मुलाखतींना सांख्यिकीय माहितीत रूपांतरीत करण्याची प्रक्रिया तिच्या लेखाद्वारे दाखवून देते. त्या प्रक्रियेत कशा पद्धतीने सत्याची एक आवृत्ती रचली जाते ज्याला समजून घेण्यासाठी संदर्भ माहिती असणे आवश्यक आहे, हे ती दाखवते तसेच संकेतीकरणाच्या(coding) प्रक्रियेत कशा प्रकारे तिची व्यक्तीनिष्ठता दिसून येते हे समोर आणत ती संख्यात्मक माहिती सुद्धा व्यक्तीनिष्ठ असते हे दाखवून देते तसेच तठस्थता/निरपेक्ष ज्ञान व व्यक्तीनिष्ठ्ते मधील भेद मोडून काढते. तसेच ऐन तेइट, शस्त्रक्रियेनी स्तन काढण्यात आलेल्या (masectomy ) एका महिलेच्या मुलाखतीचे विश्लेषण करताना दाखवून देते कि त्या महिलेचे अनुभव वेगळे बघून चालणार नाहीत तर तेइटचा संशोधन प्रक्रियेतील सहभाग पण आपल्याला लक्षात घेणे गरजेचे आहे. किंबहुना ते दोन्ही एकत्र बघण आवश्यक आहे. तरी या उदाहरणांद्वारे संपादक परात्मता नसलेले ज्ञान निर्माण करण्याची प्रक्रिया स्पष्ट करतात.
महत्त्वाच्या संकल्पना
[संपादन]परात्मता नसलेले ज्ञान/ ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध जोडणारे ज्ञान
[संपादन]ज्ञान निर्मितीची प्रक्रिया व निर्मित ज्ञान यामधील आंतरसंबंध (un -alienated knowledge's) जोडणे म्हणजे निर्मित ज्ञानावर, ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेचा, संशोधनकर्त्याच्या विचारांचा, पूर्वग्रहांचा परिणाम स्वीकारणे तसेच तटस्थ ज्ञान निर्मितीच्या विचारांना छेद देत उत्पादनाच्या मीमांसेत संशोधनकर्त्याचे स्थान, त्याची भूमिका, विचार, भावना या सर्वांचे विश्लेषण अंतर्भूत करणे असे होय.
स्त्रीवादी अधिसत्ता निर्माण करणे
[संपादन]विविध पद्धतीने स्त्रीवादी अध्यापन क्षेत्रातील इतर ज्ञान निर्माण करण्याच्या पद्धतीच्या तुलनेत एकाच ज्ञान निर्मितीच्या प्रक्रियेला श्रेष्ठ म्हणणे व त्यामुळे स्त्रीवादी संशोधकांमधील बहुविधतेला नाकारणे.
विज्ञानाचे उत्तराधिकारी
[संपादन]विज्ञानाच्या मुलभूत तत्त्वांचा स्वीकार करणारे, ‘पूर्ण सत्य शोधता येते’ या विचाराचा स्वीकार करणारे व निर्मित ज्ञानाला सत्य सिद्ध करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा उपयोग करणारे
निष्कर्ष
[संपादन]एकंदरीत या पुस्तकातील लेखांमुळे आपल्याला संशोधन प्रक्रियेचे विश्लेषण करणे, तसेच आपल्या स्वतःच्या अनुभवांना महत्त्व देणे व अभ्यासाला स्त्रीवादी अभ्यास बनवण्याची प्रक्रिया समजून येईल.
प्रतिक्रिया/ योगदान
[संपादन]१९९० च्या काळात आलेल्या पुस्तकांमध्ये, स्त्रीवादी संशोधनात ज्ञानमीमांसा व पद्ध्तीशास्त्रावर, स्त्रीवादी भूमिदृष्टीवर तसेच स्त्रीवाद्यांमधील बहुविधतेचे समर्थन करणारे हे महत्त्वाचे पुस्तक मानले जाते. स्त्रिया/ लिंगभाव व करमणूक यावरील लिखाण वाढत असताना हे पुस्तक करमणूक संशोधकांना (leisure researchers) पण उपयोगी पडू शकते असे मांडण्यात आले आहे[६]. सांड्रा कोयनरच्या मते या पुस्तकातील सर्व लेखकांने संशोधन प्रक्रिया व त्याच्या परिणामांकडे विशेष लक्ष दिलेले दिसते व यामागील विद्यापीठाचा प्रभाव ही ते मांडतात. त्यामुळे या लेखांमध्ये आपल्याला वैयक्तिक संशोधक त्यांच्या विशिष्ठ विषयांवर काम करत असताना त्या संशोधन प्रकल्पामधील विरोधाभास व कोंडीवर भाष्य करताना दिसतात. बहुतेक लेखांमध्ये संशोधन प्रक्रियेतील एका विशिष्ठ टप्प्याबाबत मांडणी दिसते. तसेच सर्व लेखांमध्ये संशोधकाचे प्रतिबिंब एक विचार करणारा व पद्धतीशास्त्रात उद्भवलेल्या समस्यांवर काम करताना कृती करणारा व्यक्ती म्हणून दिसते. या सर्व लेखांमध्ये स्त्रीवादी परावर्तितता(feminist reflexivity) दिसत असल्याने स्त्रीवाद्यांचे पद्धतीशास्त्रावर व पद्धतीशास्त्राचे स्त्रीवाद्यांवर होणाऱ्या परिणामांचे सामर्थ्य, तीव्रता व विस्तृततेचा अंदाज वाचकांना येऊ शकतो[७].
संदर्भ सूची
[संपादन]- ^ Stanley, L. (1990). Feminist Praxis: Research Theory and Epistemology in Feminist Sociology. London: Routledge Publication.
- ^ "संग्रहित प्रत". 2016-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-03-12 रोजी पाहिले.
- ^ http://www.markfoster.net/struc/praxis.html
- ^ Coyner, S. (1993). Book Review of Feminist Research Methods. NWSA Journal, Vol.5, No.1
- ^ Chase, S. E. (Sep. 1992). Review. Social Forces, Vol. 71, No. 1, 273-274.
- ^ Book Reviews. (1992). Journal of Leisure Research, Vol. 24, No. 4, 394-400
- ^ Coyner, S. (1993). Book Review of Feminist Research Methods. NWSA Journal, Vol.5, No.1, 111-119