Jump to content

पैनगंगा वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पैनगंगा अभयारण्य या पानावरून पुनर्निर्देशित)
Beautiful peacock ready to dance with nature...
Tiger searching for food near small pond...
Painganga Sanctuary gate
Beautifull
group of dear wandering...

पैनगंगा अभयारण्य यवतमाळ जिल्हा आणि नांदेड जिल्हा यांना विभागणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूंस असलेल्या संरक्षित वनास दिलेले नाव आहे. तीन बाजूंनी पाण्यानं वेढलेले एकमेव अभयारण्य असावे. पैनगंगा अभयारण्याची स्थापना १ जानेवारी १९९६ रोजी झाली. याचे क्षेत्रफळ सुमारे ३२५ किमी इतके आहे. अभयारण्यात साग हा प्रमुख वृक्ष आहे. या अभयारण्यावर उपवनसंरक्षक (वन्यजीव) पांढरकवडा यांची देखरेख व थेट नियंत्रण आहे.

कसे जावे

[संपादन]

पैनगंगा अभयारण्य हे यवतमाळहून सुमारे १५० किलोमीटरवर आहे. यवतमाळ-उमरखेडमार्गे किंवा यवतमाळ-महागांव-ढाणकी-बिटरगावमार्गे पैनगंगा अभयारण्यास पोहोचता येते. या दोन्ही मार्गांवर एस.टी. बसेस मिळतात. उमरखेड किंवा ढाणकी बिटरगावहून खाजगी वाहने आणि ऑटोरिक्षाही उपलब्ध असतात. श्यामा कोलामचीची टेकडी, मसलगा, दोधारी धबधबा, राजोबा देवस्थान, वाघ भुयार, एक शिवालय आणि सोनधाबी आणि सहस्त्रकुंड धबधबा अशी येथील अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. मात्र, रस्ते, वाहने, वाटाडे वगैरे सोयी नसल्याने पर्यटकांना सर्व ठिकाणी पोहोचणे शक्य होत नाही.

१००० ते १५०० मिलिमीटर पर्जन्यमान आणि आजूबाजूला पैनगंगा नदीचा जलाशय यामुळे या अभयारण्य परिसरातील अर्जुन, आवळा, ऐन, कदंब, गुळवेल, चारोळी, चिंच, तिवसा, धामणवेल, धावडा, बेहडा, मोईन, मोहा, साग, साजड, सूर्या, हलदू इत्यादी अनेक वृक्ष आहेत.

अभयारण्यात वनौषधींच्याही सुमारे २०० जाती आहेत.

कुसळी, खस, तिरकडी, पवण्या, मारवेल, यांसारखे गवत उगवत असल्याने अस्वल, कोल्हा, खवलेमांजर, चिंकारा, चितळ, चौसिंगा, तरस, नीलगाय, भेकड, मसण्या ऊद, रानमांजर, हरीण, इत्यादी अनेक तृणभक्षी वन्यप्राणी अभयारण्यात मोठ्या संख्येत असतात, असे सांगितले जाते. ह्या प्राण्यांची शिकार करूनच बिबटे, रानकुत्रे इत्यादी श्वापदेही इथे राहत असावेत.

साप : या अभयारण्यात अजगर, घोणस, घोरपड, धामण, फुरसे, लाल तोंडाचा सरडा, वगैरे साप आहेत.

पैनगंगा अभयारण्यातले पक्षी :- अडई, पांढऱ्या मानेचा करकोचा, कूट, कोतवाल, घनवर किंवा हळदी कुंकू(स्पॉटबिल बदक), जकाना, पॉंड, पाणकावळा, पाणपिपुली, पारवा, भोरी, शिक्रा, शिखा सर्प गरुड, हेरॉन इत्यादी.


पैनगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच खरबी या गावी वनखात्याचे विश्रामगृह आहे. किनवट शहरात अनेक चांगली हॉटेल्स आहेत. उनकेश्वर येथेही एक विश्रामगृह आहे.

किनवट अभयारण्य

[संपादन]

यवतमाळ आणि नादेड या जिल्ह्यांना समाईक, पण बहुतांशी नांदेड जिल्ह्यात असलेले किनवट अभयारण्य नावाचे आणखी एक अभयारण्य आहे. हेही अभयारण्य पैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहे. त्याचे आकारमान दोन्ही जिल्ह्यांत मिळून २१९ चौरस किलोमीटर इतके आहे. जवळचे रेल्वे स्थानक, मुदखेड-आदिलाबाद लोहमार्गावरील किनवट हे असून रेल्वे स्थानकपासून अभयारण्याचे अंतर ५ किलोमीटर आहे. रस्तामार्गाने हे अभयारण्य नांदेडपासून १३८ किलोमीटरवर आहे. यवतमाळ व नांदेडहून नियमित बससेवा असते. जंगलात बाराही महिने पिण्याचे पाणी मिळते.

हे एक शुष्क पानझडीचे अरण्य आहे. त्यात साग, सलई, हलदू, कुलू, सावर, मोई, ऐन इत्यादी वृक्ष आणि वाघ, बिबटे, नीलगाय, अस्वल,सांबर, चितळ, चिंकारा, रानडुक्कर व भेकर इत्यादी वन्य पशू आहेत. पक्षीजीवनही समृद्ध आहे.

रहाण्याची सोय :

  • पी.डब्ल्यू.डी रेस्ट हाउस, किनवट
  • फॉरेस्ट रेस्ट हाउसेस : खारबी, कोराट, मोरचदी, सोनदाबी व चिखली

चौकशी : कार्यकारी अभियंता, नांदेड



जवळची ठिकाणे ::

  • नांदेड किनवट रस्त्यावर किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा.
  • किनवटपासून ३५-४० कि.मी. अंतरावर उनकेश्वर येथील प्रसिद्ध गरम पाण्याचे झरे.
  • उनकेश्वरहून जवळच देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक असलेले रेणुका मातेचे मंदिर.
  • किनवट पासून 18किमी अंतरावर पेंदा नागढव येथे शिव मंदिर आहे.
  • पेंदा नागढव येथे जाण्यासाठी किनवटवरून अाटो रिक्षा उपलब्ध आहेत.