पाब्लो नेरुदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाब्लो नेरुदा
जन्म १२ जून १९०४ (1904-06-12)
पार्राल, चिली
मृत्यू २३ सप्टेंबर, १९७३ (वय ६९)
सान्तियागो, चिली
राष्ट्रीयत्व चिलियन
कार्यक्षेत्र कवी
भाषा स्पॅनिश
पुरस्कार नोबेल पुरस्कार
आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार
स्वाक्षरी पाब्लो नेरुदा ह्यांची स्वाक्षरी

पाब्लो नेरुदा (स्पॅनिश: Pablo Neruda; १२ जून १९०४ - २३ सप्टेंबर १९७३) हे नेफ्ताली रिकार्दो रेयेस बासोआल्तो (Neftali Ricardo Reyes Basoalto) ह्या लोकप्रिय चिलीयन कवी, राजकारणी व मुत्सद्याचे टोपणनाव होते. वयाच्या १४व्या वर्षापासून कविता करणाऱ्या नेरुदाला १९७१ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. गॅब्रियेल गार्सिया मार्केझ ह्या कोलंबियन लेखकाच्या मते नेरुदा २०व्या शतकामधील जगातील सर्वोत्तम कवी होता.

चिलीयन कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य असलेल्या नेरुदाने १५ जुलै १९४५ रोजी ब्राझीलच्या साओ पाउलो शहरामध्ये १ लाख लोकांसमोर लुइस कार्लोस प्रेस्तेस ह्या कम्युनिस्ट नेत्याच्या स्तुतीकवितांचे वाचन केले होते. १९४८ साली कम्युनिस्टविरोधी नेता गाब्रियेल गोन्झालेस विदेला चिलीच्या राष्ट्राध्यक्षपदावर आल्यानंतर नेरुदाने चिलीमधून पळ काढला व आर्जेन्टिनामध्ये आश्रय घेतला. १९५२ मध्ये नेरुदा चिलीमध्ये परतला व कालांतराने राष्ट्राध्यक्ष साल्व्हादोर आयेंदे ह्याचा निकटवर्ती सल्लागार बनला. कट्टर साम्यवादी विचारांच्या नेरुदाने स्टॅलिनच्या हुकुमशाहीची प्रसह्ंसा केली होती तसेच क्युबन क्षेपणास्त्र आणीबाणीच्या काळात व व्हियेतनाम युद्धादरम्यान अमेरिकेची यथेच्छ निंदा केली होती. अमेरिकेच्या सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने नेरुदाची प्रतिष्ठा घटवण्याचे अनेक प्रयत्न केले व त्याला नोबेल पारितोषिक मिळू नये ह्यासाठी देखील कट आखले. नेरुदाला अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यास बंदी होती. परंतु त्याच्या जागतिक लोकप्रियतेमुळे १९६६ साली त्याला न्यू यॉर्क शहरामधील एका साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.

१९७३ साली घडलेल्या लष्करी बंडामध्ये आयेंदेला राष्ट्राध्यक्षपदावरून हाकलून ऑगुस्तो पिनोचे ह्या लष्करी अधिकाऱ्याने चिलीची सत्ता बळकावली व नेरुदाचे चिलीमध्ये मार्क्सवाद रुजवण्याचे स्वप्न भंग पावले. ह्याच वर्षी त्याचे कर्करोगामुळे निधन झाले.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
मागील
अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९७१
पुढील
हाइनरिश ब्योल