दायमाबाद (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)
महाराष्ट्रात अहिल्यादेवीनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील दायमाबाद ही एक आद्य शेतकरी वसाहत असून पुरातत्त्वीय उत्खननस्थळ आहे.दायमाबाद प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. तसेच ते प्राचीन काळी काळ्या मातीच्या थरावर वसलेले होते.
अतीव कष्टप्रद मानवी जीवनातील भटक्या व शिकारी जीवनाची समाप्ती करून मानवाने स्थिर जीवनाची सुरुवात येथे केली होती. जीवनाच्या दैनंदिन गरजा पुरविणारे स्वयंपूर्ण असे हे खेडे होते. या ठिकाणी लोक लहान लहान घरामध्ये दाटीवाटीने व गटाने एकत्र येऊन राहत. दायमाबादचा काळ हा इतिहासोद्भव आहे. मानवाला लेखनकलेचे ज्ञान होण्यापूर्वीचा जो काळ तो सर्व इतिहासपूर्व काळ होय परंतु जेव्हापासून मानवाला लेखनकलेचे ज्ञान झाले परंतु त्या काळातल्या लिखाणाचे अजून पूर्णपणे वाचन होऊ शकले नाही अशा काळाला इतिहासोद्भव काळ म्हणले जाते. म्हणजेच भारतातील इ.स.पूर्व ५०० ते सिंधु संस्कृतीपर्यंतचा काळ होय. प्रथमत: १९५८-५९ साली भारतीय पुरातत्त्व विभागाचे त्यावेळचे सरसंचालक एम.एन. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दायमाबाद येथे उत्खनन झाले. त्यानंतर १९७४ ते ७९ पर्यंत डॉ. शंकरराव साळी यांनी केलेले उत्खनन सर्वात यशस्वी म्हणावे लागेल. दायमाबाद येथे खापरावरील रंगीत संस्कृती (जोर्वे) आढळते. येथे तांब्याचा गेंडा, रथ, हत्ती यांच्या जवळजवळ ६५ किलो वजनाच्या मूर्ती आढळल्या. डॉ. साळी यांनी केलेल्या उत्खननातून मिळालेल्या ७५ सांगाड्यांची शास्त्रीय पाहणी केली गेली. येथे उत्तर हडप्पाकालीन थरात मिळालेला एका माणसाचा सांगाडा, दायमाबादला थेट सिंधू संस्कृतीपर्यंत घेऊन जातो.
राष्ट्रीय संरक्षित स्मारक
[संपादन]या ठिकाणाला ३० मे, इ.स. १९६३ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[१]
संदर्भ
[संपादन]- ^ "नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले.
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]