जोर्वे (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोर्वे (पुरातत्त्व उत्खनन स्थळ) या पानावरून पुनर्निर्देशित)
जोर्वे (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) is located in महाराष्ट्र
जोर्वे (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)
जोर्वेचे महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान.

जोर्वे या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील संगमनेरपासून ५ कि.मी. पूर्वेला प्रवरेच्या काठी असणाऱ्या गावी केलेल्या पुरातत्त्वीय उत्खननामुळे एक नव्याने जोर्वे संस्कृती प्रकाशात आली.(इ.स.पूर्व १२०० ते १५००) या काळातील नंतरच्या अनेक वसाहतीही इतरत्र उत्खननामुळे उजेडात आल्या आहेत. पण ही संस्कृती सर्वप्रथम जोर्वे येथील उत्खननात आढळल्यामुळे पुढे याच नावाने तिचे नामाभिधान झाले. या संस्कृतीतील लोक स्थिरस्थावर होऊन शेती करू लागले होते. प्रवरेच्या तीरावरील ही एक सुखसंपन्न वसाहत होती. या वसाहतीचे उत्खनन डॉ.एच.डी. सांकलिया व डॉ.एस.बी.देव यांनी इ.स. १९५०-५१ साली केले.

येथील उत्खननात ब्रॉंझच्या सहा कुऱ्हाडी व एक तांब्याची बांगडी मिळाली. ह्या बांगडीच्या काचेची एकूण लांबी ३२.२ मि.मी. लांबीची असून तिचा व्यास १२ मि.मी. आहे. इथेच २१ मि.मी. लांब व ५ मि.मी. व्यासाचा गारगोटीचा एक मणीही मिळाला. मिळालेल्या कुऱ्हाडींपैकी दोन कुऱ्हाडी वरच्या भागातून अर्धवट तुटलेल्या आहेत. या सर्वांची लांबी ६६ मि.मी. पासून १४४ मि.मी., रुंदी ६६-७८ मि.मी. व जाडी ९-१३ मि.मी. आहे. या कुऱ्हाडींच्या शास्त्रीय निष्कर्षातून त्यात १.७८ टक्के कथील व ९७.०४ टक्कें तांबे या धातूंचे मिश्रण आहे.[१]

खापरे[संपादन]

जोर्वे येथे पुरातत्त्वीय उत्खननस्तळी जास्त प्रमाणात रंगीत खापरे मिळाली. काही कुंभ, वाडगे, थाळ्याही मिळाल्या. राखाडी रंगाची ही खापरे भाजलेल्या तांबट मातीपासून बनवलेली आहेत. पानांची चित्रे, झाडांची चित्रेही क्वचित आढळली आहेत. अशा प्रकारची खापरे जोर्वे संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण मानली जातात. त्यानंतरही महाराष्ट्र, मध्य प्रदेश व कर्नाटक आणि आंध्रच्या काही भागात केलेल्या उत्खननातून अशाच प्रकारची खापरे मिळाली. पण सर्वप्रथम जोर्वे याठिकाणी अशा प्रकारची खापरे सापडलेली असल्याने नंतरच्या अशा प्रकारच्या सर्व खापरांना जोर्वे संस्कृतीची खापरे म्हणून संबोधले जाते.

जोर्वे येथे मिळालेली खापरे चाकावर घडविलेली, सलगपणे न बनविता निरनिराळे भाग चाकावर बनवून नंतर ते एकमेकांना जोडलेली, पक्क्या भाजणीची, लाल गाभ्याची व खणखणीत आवाजाची आहेत. यापैकी काही खापरे जादा भाजल्याने काळपट झालेली अाहेत. या खापरांच्या लाल पृष्ठभागावर काळ्या रंगात भौमितिक आकारांची नक्षी काढलेली आहे. काळवीट, पक्षी व कुत्रा यांचेही चित्रण आहे. यातील काही खापरांवर आतून व बाहेरून ठिपके, रेघा यासारखी चिन्हेही काळ्या रंगात काढलेली आहेत.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक[संपादन]

या ठिकाणाला २२ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.[२]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ हसमुख धीरजलाल सांकलिया आणि शांताराम भालचंद्र देव; रिपोर्ट ऑन द एक्सकेव्हेशन ॲट नासिक ॲन्ड जोर्वे १९५०-५१; डेक्कन कॉलेज पोस्टग्रॅज्युएट ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे १९५५
  2. ^ "नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]